एस्तेर 4:11-16
एस्तेर 4:11-16 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
ती म्हणाली, “मर्दखय, राजाचे सर्व अधिकारी आणि राजाच्या प्रदेशातील सर्व लोक हे जाणून आहेत की न बोलावता जो राजाकडे जाईल त्या व्यक्तीसाठी मग तो पुरुष असो की स्त्री, राजाचा एकच कायदा आहेः तो म्हणजे मृत्यूदंड. मात्र राजाने आपला सुवर्ण राजदंड त्या व्यक्तीपुढे केल्यास हा कायदा अंमलात आणला जात नाही. राजाच्या तेवढ्या कृतीने त्या मनुष्यास जीवदान मिळते. आणि मला तर राजाकडून गेल्या तीस दिवसात बोलावणे आलेले नाही.” मग एस्तेरचा हा निरोप मर्दखयाला मिळाला. मर्दखयाला तिचा निरोप मिळाल्यावर त्याने एस्तेरला आपले उत्तर पाठवले. “राजमहालात राहतेस म्हणून तू यहूदी लोकांतून सुरक्षित सुटशील असे समजू नकोस. तू आत्ता गप्प बसलीस तर यहूद्यांना दुसऱ्या ठिकाणाहून सुटका आणि मुक्ती मिळेल, पण तुझा आणि तुझ्या पित्याच्या घराण्याचा मात्र नाश होईल. कोणी सांगावे, या अशा काळासाठीच कदाचित तुझी राणी म्हणून निवड झाली असेल.” तेव्हा एस्तेरने मर्दखयाला हे उत्तर पाठवले: “जा, शूशनमधल्या सर्व यहूद्यांना एकत्र घेऊन ये आणि माझ्यासाठी सर्वजण उपास करा. तीन दिवस आणि तीन रात्र काहीही खाऊ पिऊ नका. मी तुमच्यासारखाच उपास करीन, तसेच माझ्या दासीदेखील करतील. आत जाणे नियमाप्रमाणे नसतानाही मी तशीच राजाकडे जाईन. मग मी मरण पावले तर मरण पावले.”
एस्तेर 4:11-16 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
“राजाचे सर्व सेवक व राजाच्या सर्व परगण्यांतील लोक जाणून आहेत की कोणी पुरुष अगर स्त्री बोलावल्यावाचून आतल्या चौकात राजाकडे गेली तर त्याला अथवा तिला प्राणदंड करावा असा सक्त हुकूम आहे; मात्र राजा आपला सोन्याचा राजदंड ज्याच्यापुढे करील त्याचाच बचाव होणार; मला तर आज तीस दिवस राजाकडून बोलावणे आले नाही.” एस्तेरचे हे म्हणणे मर्दखयास कळवण्यात आले. तेव्हा त्याने त्याच्या हस्ते एस्तेरला सांगून पाठवले की, “तू राजमंदिरात आहेस म्हणून तू यहूदी लोकांतून वाचून राहशील असे तुझ्या मनास वाटू देऊ नकोस. तू ह्या प्रसंगी गप्प राहिलीस तरी दुसर्या कोठूनही यहूद्यांची सुटका व उद्धार होईलच. पण मग तुझा व तुझ्या बापाच्या घराण्याचा नाश होईल. तुला ह्या असल्याच प्रसंगासाठी राजपद प्राप्त झाले नसेल कशावरून?” मग एस्तेरने मर्दखयास उलट निरोप पाठवला की, “जा, शूशन येथले सर्व यहूदी जमवा; माझ्याकरता उपास करा; तीन दिवस व तीन रात्री अन्नोदक सेवू नका; मीही आपल्या दासींसह तसाच उपास करीन; असल्या स्थितीत नियमाविरुद्ध मी आत राजाकडे जाईन; मग मी मेले तर मेले.”