YouVersion लोगो
सर्च आयकॉन

एस्तेर 3:1-15

एस्तेर 3:1-15 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

या सर्व घडामोडी झाल्यानंतर अहश्वेरोश राजाने हम्मदाथा अगागी याचा पुत्र हामान ह्याला बढती देऊन गौरव केला. त्याच्याबरोबरच्या सर्व अधिकाऱ्यांपेक्षा वरचे आसन त्यास दिले. राजाच्या आज्ञेनुसार राजद्वारावरील राजाचे सर्व सेवक हामानाला नमन व मुजरा करून मान देऊ लागले. पण मर्दखय त्यास नमन किंवा मुजरा करीत नसे. तेव्हा प्रवेशद्वारावरील राजाच्या इतर सेवकांनी मर्दखयाला विचारले, “राजाची आज्ञा तू का पाळत नाहीस?” राजाचे सेवक त्यास दररोज हेच विचारू लागले तरी त्याने मुजरा करायची राजाज्ञा पाळली नाहीच. तेव्हा असे झाले की, मर्दखयाचे हे करणे चालेल किंवा नाही हे पाहावे म्हणून त्यांनी हामानाला सांगितले; आपण यहूदी असल्याचे त्याने या सेवकांना सांगितले होते. जेव्हा मग मर्दखय आपल्याला नमन व मुजरा करत नाही हे हामानाने पाहिले तेव्हा तो संतापला. पण फक्त मर्दखयाला जिवे मारणे त्यास अपमानकारक वाटले. कारण मर्दखयाचे लोक कोण होते, ते त्यांनी हामानाला सांगितले होते, म्हणून अहश्वेरोशाच्या राज्यातल्या सर्वच्या सर्व यहूदी लोकांस कसे मारता येईल याचा विचार तो करु लागला. अहश्वेरोश राजाच्या कारकीर्दीच्या बाराव्या वर्षीच्या पहिल्या महिन्यामध्ये, हामानाने विशेष दिवस आणि महिना निवडण्यासाठी चिठ्ठ्या टाकल्या, त्या चिठ्ठ्या ते रोज व प्रत्येक महिन्यांमध्ये टाकत होते त्यानुसार अदार हा बारावा महिना त्यांनी निवडला. मग हामान राजा अहश्वेरोशकडे येऊन म्हणाला, राजा अहश्वेरोश, तुझ्या साम्राज्यात सर्व प्रांतांमध्ये विशिष्ट गटाचे लोक विखरलेले व पांगलेले आहेत. इतरांपेक्षा त्यांचे कायदे वेगळे आहेत. शिवाय ते राजाचे कायदे पाळत नाहीत. म्हणून त्यांना राज्यात राहू देणे राजाच्या हिताचे नाही. “जर राजाची मर्जी असल्यास, या लोकांचा संहार करण्याची आज्ञा द्यावी आणि दहा हजार किक्कार रुपे राजाच्या खजिन्यात आणावे, म्हणून मी ते तोलून राजाचे काम पाहणाऱ्यांच्या हातांत देतो.” तेव्हा राजाने आपली राजमुद्रा बोटातून काढून यहूद्यांचा शत्रू हम्मदाथा अगागी याचा पुत्र हामानाला दिली. राजाने हामानास म्हटले, “तुला चांदी दिली आहे व लोकही दिले आहेत; तुला बरे वाटेल तसे त्यांचे करावे.” त्यानंतर पहिल्या महिन्याच्या तेराव्या दिवशी राजाच्या लेखकांना बोलावले. राजाचे प्रतिनिधी, प्रत्येक प्रांताचे सुभे व सगळ्या लोकांचे सरदार यांस त्यांनी हामानाच्या आज्ञेप्रमाणे प्रत्येक प्रांताच्या लिपीत व प्रत्येक जातीच्या लोकांच्या भाषेत लिहून पाठविण्यात आली. राजा अहश्वेरोशच्या नावाने त्यांनी ते लिहिले आणि त्यावर राजाची मोहर केली. जासुदांनी ही पत्रे राजाच्या सर्व प्रांतात नेऊन दिली. एकाच दिवशी म्हणजे अदार महिन्याच्या, बाराव्या महिन्याच्या तेराव्या दिवशी तरुण व वृध्द माणसे, स्त्रिया, मुले अशा सर्व यहूद्यांचा नाश करावा, त्यांना ठार करावे व त्यांचा नायनाट करावा. त्यांची सर्व मालमत्ता लुटून घ्यावी म्हणून लिहून पाठवले. हा आदेश असलेल्या पत्राची प्रत कायदा म्हणून प्रत्येक प्रांतातून हा कायदा लागू होणार होता आणि राज्यातल्या सर्व लोकांस तो कळवण्यात आला, जेणेकरून त्या दिवशी सर्व लोकांनी तयार असावे. राजाच्या हुकूमानुसार सर्व जासूद तातडीने निघाले. शूशन राजावाड्यातून हा हुकूम निघाला. राजा आणि हामान पेयपान करायला बसले पण शूशन नगर मात्र गोंधळून गेले.

सामायिक करा
एस्तेर 3 वाचा

एस्तेर 3:1-15 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

ह्या गोष्टी घडल्यावर अहश्वेरोश राजाने अगागी हामान बिन हम्मदाथा ह्याला बढती देऊन उच्च पदास चढवले व त्याच्याबरोबरच्या सरदारांपेक्षा त्याचे आसन उंच केले. राजद्वारी असलेले राजाचे सर्व सेवक हामानासमोर वाकून त्याला मुजरा करीत असत, कारण त्याच्या बाबतीत राजाने अशीच आज्ञा केली होती; मर्दखय काही त्याला नमन अथवा मुजरा करीत नसे. तेव्हा राजद्वारातील राजसेवकांनी मर्दखयास विचारले की, “तू राजाज्ञेचे का उल्लंघन करतोस?” ते रोज त्याला असे बोलत तरी त्याने त्यांना जुमानले नाही, तेव्हा मर्दखयाचे हे करणे चालेल किंवा नाही हे पाहण्याकरता त्यांनी हामानाच्या कानी ही गोष्ट घातली; आपण यहूदी आहोत असे त्याने त्यांना सांगितले होते. मर्दखय आपणासमोर नमून मुजरा करीत नाही हे हामानाने पाहिले तेव्हा त्याला फार क्रोध आला. एकट्या मर्दखयावर हात टाकणे हे त्याला त्याच्या दृष्टीने कमीपणाचे वाटले, कारण मर्दखय कोणत्या जातीचा आहे हे त्यांनी हामानास सांगितले होते; त्यामुळे अहश्वेरोशाच्या अवघ्या साम्राज्यातील मर्दखयाचे लोक म्हणजे सर्व यहूदी लोक ह्यांचा नायनाट करण्याचा बेत हामानाने केला. अहश्वेरोश राजाच्या कारकिर्दीच्या बाराव्या वर्षी त्यांनी पहिल्या म्हणजे नीसान महिन्यापासून हामानासमक्ष पूर (चिठ्ठ्या) टाकायला लावल्या. हा क्रम दररोज, दरमहा, बारावा महिना अदार संपेपर्यंत चालू राहिला. हामान अहश्वेरोश राजाला म्हणाला, “आपल्या साम्राज्यातील सर्व प्रांतांतून राहणार्‍या देशोदेशींच्या लोकांमध्ये पांगलेले व विखरलेले एक राष्ट्र आहे; त्या लोकांचे कायदे इतर सर्व लोकांच्या कायद्यांहून भिन्न आहेत. ते राजाच्या कायद्यांप्रमाणे चालत नाहीत म्हणून त्यांना राहू देणे राजाच्या हिताचे नाही. राजाची मर्जी असल्यास त्यांचा नाश करावा अशी आज्ञा लिहावी; राजभांडारात जमा करण्यासाठी मी दहा हजार किक्कार चांदी राजाच्या कारभार्‍यांच्या हाती देतो.” तेव्हा राजाने आपली मुद्रा आपल्या बोटातून काढून यहूद्यांचा शत्रू जो अगागी हामान बिन हम्मदाथा ह्याला दिली. राजाने हामानास म्हटले, “तुला चांदी दिली आहे व लोकही दिले आहेत; तुला बरे वाटेल त्याप्रमाणे त्यांचे कर.” तेव्हा पहिल्या महिन्याच्या त्रयोदशीस राजाचे लेखक बोलावण्यात आले आणि राजाचे प्रतिनिधी, प्रत्येक प्रांताचे सुभे व सगळ्या लोकांचे सरदार ह्यांना हामानाच्या सांगण्याप्रमाणे प्रत्येक प्रांताच्या लिपीत व प्रत्येक जातीच्या लोकांच्या भाषेत (खलिते) लिहून पाठवण्यात आले. अहश्वेरोश राजाच्या नावाने ते लिहून त्यांवर राजाची मोहर केली होती. राजाच्या सर्व प्रांताप्रांतांतून जासुदांच्या हस्ते अशा आशयाची पत्रे पाठवण्यात आली की, एकाच दिवशी म्हणजे बाराव्या अदार महिन्याच्या त्रयोदशीस वृद्ध, तरुण, स्त्रिया, मुले अशा सर्व यहूदी लोकांचा विध्वंस, संहार व नायनाट करावा व त्यांची धनसंपत्ती लुटून घ्यावी. ह्या आज्ञापत्राच्या नकला सर्व प्रांतांतून खुल्या पाठवण्यात आल्या, त्या अशा हेतूने की सर्व लोकांनी त्या दिवशी तयार असावे. हा हुकूम शूशन राजवाड्यात देण्यात आला आणि राजाज्ञेने जासूद त्वरित निघून गेले; त्या प्रसंगी राजा व हामान हे प्यायला बसले; पण शूशन नगर चिंताक्रांत झाले.

सामायिक करा
एस्तेर 3 वाचा