एस्तेर 2:1-17
एस्तेर 2:1-17 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
ह्यानंतर अहश्वेरोश राजाचा क्रोध शमला, तेव्हा त्याला वश्तीने काय केले होते व त्यामुळे तिच्याविरुद्ध काय ठराव झाला होता ह्याचे स्मरण झाले. मग त्याची सेवाचाकरी करणारे त्याचे सेवक त्याला म्हणाले, “राजासाठी तरुण व सुंदर कुमारींचा शोध करावा; राजाने आपल्या राज्याच्या सर्व प्रांतांत अंमलदार नेमावेत, त्यांनी सर्व सुंदर व तरुण कुमारी शूशन राजवाड्यातील अंतःपुरात जमा करून राजस्त्रियांचा रक्षक खोजा जो हेगे त्याच्या स्वाधीन कराव्यात आणि त्यांच्या शुद्धतेसाठी असलेल्या वस्तू त्यांना द्याव्यात. मग त्यांपैकी जी कुमारी राजाच्या मनास येईल ती वश्तीच्या ठिकाणी राजाची पट्टराणी व्हावी.” ही गोष्ट राजाला पसंत पडून त्याप्रमाणे त्याने केले. शूशन राजवाड्यात मर्दखय बिन याईर बिन शिमई बिन कीश ह्या नावाचा एक बन्यामिनी यहूदी होता; बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर ह्याने यहूदाचा राजा यखन्या ह्याच्याबरोबर जे लोक यरुशलेमाहून पकडून नेले होते त्यांच्यापैकी हा एक होता. त्याने आपल्या चुलत्याची कन्या हदस्सा उर्फ एस्तेर हिचे पालनपोषण केले होते; तिला आईबाप नव्हते; ती मुलगी सुंदर व रूपवती होती. तिचे आईबाप मेल्यावर मर्दखयाने तिला स्वतःच्या मुलीप्रमाणे सांभाळले होते. राजाची आज्ञा व त्याचा ठराव प्रसिद्ध झाल्यावर बहुत कुमारी शूशन राजवाड्यात हेगेच्या हवाली करण्यात आल्या; तेव्हा एस्तेर हिलाही राजमंदिरातील स्त्रियांचा रक्षक हेगे ह्याच्या ताब्यात दिले. ती तरुण स्त्री त्याला पसंत पडली व तो तिच्यावर प्रसन्न झाला; त्याने काहीएक विलंब न लावता तिच्या शुद्धतेच्या वस्तू, तिचे भोजनपदार्थ आणि तिला निवडक अशा सात सख्या राजवाड्यातून दिल्या आणि तिला व तिच्या सख्यांना तेथून नेऊन अंतःपुरात सर्वांहून उत्तम जागा राहण्यास दिली. एस्तेरने आपले गणगोत सांगितले नाही; तिने ते सांगू नये असे मर्दखयाने तिला बजावून सांगितले होते. एस्तेर कशी आहे व तिचे काय होणार हे समजण्यासाठी मर्दखय रोजच्या रोज अंतःपुराच्या अंगणात फेर्या घालत असे. स्त्रियांसाठी ठरवलेल्या नियमांप्रमाणे बारा महिन्यांपर्यंत सर्वकाही उपचार झाल्यावर एकेका कुमारीची अहश्वेरोश राजाकडे जाण्याची पाळी आली. त्यांच्या शुद्धीकरणाची रीत म्हटली म्हणजे त्यांना गंधरसाचे तेल सहा महिने व सुगंधी द्रव्ये सहा महिने लावत असत; शिवाय इतर शुद्धतेच्या वस्तू त्यांना लावत असत. कुमारीने राजाकडे जाण्याचा प्रकार असा : अंतःपुरातून राजमंदिरात जाताना जे काही ती मागे ते तिला देण्यात येई; संध्याकाळी ती जात असे; आणि सकाळी ती उपपत्न्यांचा रक्षक राजाचा खोजा शाशगज ह्याच्या देखरेखीखाली दुसर्या अंतःपुरात जाई; राजाने तिच्यावर प्रसन्न होऊन तिचे नाव घेऊन बोलावल्यावाचून ती पुन्हा त्याच्याकडे जात नसे. मर्दखयाचा चुलता अबीहाईल ह्याची कन्या एस्तेर, जिला मर्दखयाने मुलगी म्हणून सांभाळले होते, तिची राजाकडे जाण्याची पाळी आली तेव्हा स्त्रियांचा रक्षक राजाचा खोजा हेगे ह्याने जे तिला देण्याचे ठरवले होते त्याहून अधिक काही तिने मागितले नाही. ज्याने-ज्याने एस्तेरला पाहिले त्या सर्वांची तिच्यावर कृपादृष्टी झाली. ही एस्तेर अहश्वेरोश राजाच्या कारकिर्दीच्या सातव्या वर्षी दहाव्या महिन्यात म्हणजे तेबेथ महिन्यात राजमंदिरी राजाकडे आली. राजाने एस्तेरवर इतर सर्व स्त्रियांहून अधिक प्रीती केली आणि वरकड सर्व कुमारींपेक्षा तिच्यावर त्याचा अनुग्रह व कृपादृष्टी विशेष झाली. त्याने तिच्या मस्तकी राजमुकुट घातला व वश्तीच्या जागी तिला राणी केले.
एस्तेर 2:1-17 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
या गोष्टी झाल्यानंतर, राजा अहश्वेरोशचा राग शमला, त्याने वश्तीची आणि तिने जे काय केले त्याचा विचार केला. तिच्याविरूद्ध दिलेल्या आदेशाचाहि त्याने विचार केला. तेव्हा राजाच्या सेवेतील तरुण सेवक त्यास म्हणाले की, राजासाठी तरुण, सुंदर कुमारींचा शोध घ्यावा. आपल्या राज्यातील प्रत्येक प्रांतातून राजाने एकेक अधिकारी नेमावा, त्या अधिकाऱ्यांनी सर्व सुरेख व सुंदर कुमारीकांना शूशन राजवाड्यात अंत:पुरात ठेवावे. तेथे राजाचा अधिकारी हेगे, याच्या निगराणीखाली स्त्रीयांना त्यांच्या ताब्यात द्यावे आणि त्याने त्यांना त्यांची सौंदर्य प्रसाधने द्यावीत. त्यांच्यामधून मग जी तरुण कन्या राजाला पसंत पडेल तिला वश्तीच्या जागी राणीपद मिळावे. राजाला ही सूचना आवडली आणि त्याने ती मान्य केली. बन्यामीनाच्या घराण्यातील मर्दखय नावाचा एक यहूदी शूशन शहरात होता. तो याईराचा पुत्र आणि याईर शिमईचा पुत्र आणि शिमई कीश याचा पुत्र होता. बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर याने यहूदाचा राजा यखन्या याच्याबरोबर जे लोक पकडून नेले होते त्यांच्यामध्ये यालाही यरूशलेमेहून पकडून नेले होते. तो आपल्या चुलत्याची कन्या हदस्सा, म्हणजे एस्तेर, हिची काळजी घेत असे. कारण तिला आईवडील नव्हते. मर्दखयाने तिला आपली स्वतःची कन्या मानून वाढवले होते. ती तरुण स्त्री सुंदर बांध्याची आणि अतिशय रुपवती होती. जेव्हा राजाची आज्ञा लोकांपर्यंत पोचल्यावर, पुष्कळ मुलींना शूशन राजवाड्यात आणून हेगेच्या देखभालीखाली ठेवण्यात आले. त्या मुलींमध्ये एस्तेरही होती. हेगे राजाच्या जनानखान्याचा प्रमुख होता. त्यास ती तरुणी आवडली आणि तिच्यावर त्याची कृपादृष्टी झाली. त्याने तिला ताबडतोब सौंदर्यप्रसाधने पुरवली आणि तिच्या अन्नाचा भाग दिला. त्याने राजाच्या राजवाड्यातील सात दासी नेमून तिला दिल्या आणि तिला व तिच्या सात तरुण दासींना त्याने अंत:पुरातील उत्तम जागा राहण्यास दिली. मर्दखयाने बजावल्यामुळे एस्तेरने आपल्या लोकांविषयी व नातलगांविषयी कोणालाही सांगितले नव्हते. आणि एस्तेर कशी आहे व तिचे काय होणार हे जाणून घेण्यासाठी मर्दखय प्रत्येक दिवशी अंतःपुराच्या अंगणासमोर फेऱ्या घालीत असे. स्त्रियांसाठी केलेल्या नियमाप्रमाणे, बारा महिने झाल्यावर, अहश्वेरोश राजाकडे जाण्याची पाळी एकेका तरुणीला येत असे. तिला बारा महिने सौंदर्योपचार घ्यावे लागत. त्यापैकी सहा महिने गंधरसाच्या तेलाचे तर सहा महिने सुंगधी द्रव्ये आणि प्रसाधने यांचे उपचार होत असत. आणि राजाकडे जायच्या वेळी अशी पध्दत होती, अंत:पुरातून राजमंदिरात जाण्यासाठी जे काही ती मागे ते तिला मिळत असे. संध्याकाळी ती राजाकडे जाई आणि सकाळी ती दुसऱ्या अंतःपुरात परत येत असे. तिथे शाशगज नावाच्या खोजाच्या हवाली केले जाई. शाशगज हा राजाच्या उपपत्नीची देखरेख करणारा खोजा होता. राजाला जी कन्या पसंत पडेल तिला तो नांव घेऊन बोलावत असे. एरवी या मुली पुन्हा राजाकडे जात नसत. आता एस्तेरची राजाकडे जायची पाळी आली तेव्हा स्त्रियांचा रक्षक राजाचा खोजा हेगे याने जे तिला देण्याचे ठरविले होते त्याहून अधिक काही मागून घेतले नाही. (मर्दखयाचा चुलता अबीहाईल याची कन्या जिला मर्दखयाने कन्या मानले होते) आता ज्या कोणी एस्तेरला पाहीले त्या सर्वांची कृपादृष्टी तिच्यावर झाली. तेव्हा अहश्वेरोश राजाच्या महालात एस्तेरची रवानगी झाली. तो राजाच्या कारकिर्दीच्या सातव्या वर्षातला दहावा म्हणजे तेबेथ महिना होता. इतर सर्व मुलींपेक्षा राजाने एस्तेरवर अधिक प्रीती केली. आणि इतर सर्व कुमारीहून तिजवर त्याची मर्जी बसली व तिच्यावर कृपादृष्टी झाली. तेव्हा राजा अहश्वेरोशने एस्तेरच्या मस्तकावर राजमुकुट घालून वश्तीच्या जागी तिला राणी केले.