इफिसकरांस पत्र 4:8-15
इफिसकरांस पत्र 4:8-15 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
वचन असे म्हणते. जेव्हा तो वर चढला, तेव्हा त्याने कैद्यास ताब्यात घेतले व नेले, आणि त्याने लोकांस देणग्या दिल्या. आता, जेव्हा वचन असे म्हणते, “वर चढला” तर त्याचा अर्थ काय? म्हणजे तो पृथ्वीच्या अधोलोकी सुद्धा उतरला असाच होतो की नाही? जो खाली उतरला तोच वर सर्व स्वर्गांहून उंच ठिकाणी चढला. यासाठी की सर्व गोष्टी त्याने भरून काढाव्या. आणि त्याने स्वतःच काही लोकांस प्रेषित, संदेष्टे, सुवार्तिक, पाळक आणि शिक्षक असे दाने दिली. त्या देणग्या देवाच्या सेवेच्या कार्यास पवित्रजनांना तयार करण्यास व ख्रिस्ताचे शरीर आत्मिकरित्या सामर्थ्यवान होण्यासाठी दिल्या. देवाची ही इच्छा आहे की आपण सगळे विश्वास ठेवणारे एक होऊ कारण आपण त्याच्या पुत्रावर विश्वास ठेवतो आणि आपण उन्नत व्हावे म्हणजे त्याच्याविषयीचे ज्ञान आपणास समजेल, देवाची ही इच्छा आहे की आपण प्रौढ विश्वास ठेवणारे व्हावे, एक होऊन, वाढत ख्रिस्ता सारखे बनावे जो परिपूर्ण आहे. ह्यासाठी की आपण यापुढे लहान मुलांसारखे नसावे. म्हणजे मनुष्यांच्या कपटाने, फसवणाऱ्या मार्गाने नेणाऱ्या युक्तीने अशा प्रत्येक नव्या शिकवणरूपी वाऱ्याने तुमचे मार्ग लाटांनी इकडेतिकडे हेलकावणाऱ्या बोटीसारखे होऊ नये; त्याऐवजी आपण प्रेमाने सत्य बोलावे आणि प्रत्येक मार्गाने त्याच्यामध्ये वाढावे जो आमचा मस्तक आहे, ख्रिस्त
इफिसकरांस पत्र 4:8-15 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
यामुळे असे म्हटले आहे: “जेव्हा त्यांनी उच्चस्थानी आरोहण केले, त्यांनी अनेक बंदिवान नेले आणि त्यांच्या लोकांना दाने दिली.” “त्यांचे आरोहण झाले” याचा अर्थ काय? की ते खाली पृथ्वीच्या अधोभागात उतरले होते. जे अधोभागात उतरले त्यांनी पूर्ण सृष्टी भरून जाण्याच्या उद्देशाने स्वर्गाच्या उच्च स्थानापर्यंत सन्मानाने आरोहण केले. म्हणून ख्रिस्ताने स्वतः मंडळीला काही प्रेषित, संदेष्टे, सुवार्तिक, पाळक आणि शिक्षक म्हणून दिले, हे यासाठी की त्यांच्या लोकांना सेवेच्या कार्यात सिद्ध करून ख्रिस्ताचे शरीर सुसज्ज व्हावे. जोपर्यंत आपण सर्व विश्वास आणि परमेश्वराच्या पुत्राच्या ज्ञानामध्ये एकता, परिपक्वता व ख्रिस्ताची परिपूर्णता यापर्यंत पोहोचत नाही, तोपर्यंत हे दिले आहे. आता यापुढे आपण बाळांसारखे असू नये, आणि तर्हेतर्हेच्या शिक्षणरूपी वार्याने, मनुष्यांच्या धूर्तपणाने व कपटाने फसविले जाऊन लाटांनी इकडे तिकडे वाहणारे व हेलकावे खाणारे होऊ नये. त्याऐवजी प्रीतीमध्ये सत्य बोलत असताना, आपण प्रत्येक गोष्टींमध्ये ख्रिस्त ज्यांचे मस्तक आहेत, त्यांचे परिपक्व शरीर होण्यासाठी वाढत जावे.
इफिसकरांस पत्र 4:8-15 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
म्हणून तो म्हणतो, “त्याने उच्चस्थानी आरोहण केले, तेव्हा त्याने कैद्यांना1 कैद करून नेले, व मानवांना देणग्या दिल्या.” (“त्याने आरोहण केले,” ह्यावरून तो पृथ्वीच्या अधोलोकी2 उतरला होता, ह्यापेक्षा दुसरे काय समजावे? जो खाली उतरला होता त्यानेच सर्वकाही भरून टाकण्याच्या उद्देशाने सर्वोच्च स्वर्गावर ‘आरोहण केले.’) आणि त्यानेच कोणी प्रेषित, कोणी संदेष्टे, कोणी सुवार्तिक, कोणी पाळक व शिक्षक असे नेमून दिले; ते ह्यासाठी की, त्यांनी पवित्र जनांना सेवेच्या कार्याकरता व ख्रिस्ताच्या शरीराची रचना पूर्णतेस नेण्याकरता सिद्ध करावे. देवाच्या पुत्रावरील विश्वासाच्या व तत्संबंधी परिपूर्ण ज्ञानाच्या एकत्वाप्रत, प्रौढ मनुष्यपणाप्रत, ख्रिस्ताची पूर्णता प्राप्त होईल अशा वृद्धीच्या मर्यादेप्रत आपण सर्व येऊन पोहचू तोपर्यंत दिले; ह्यासाठी की, आपण ह्यापुढे बाळांसारखे असू नये, म्हणजे माणसांच्या धूर्तपणाने, भ्रांतीच्या मार्गास नेणार्या युक्तीने, प्रत्येक शिकवणरूपी वार्याने हेलकावणारे व फिरणारे असे होऊ नये. तर आपण प्रीतीने सत्याला धरून मस्तक असा जो ख्रिस्त त्याच्याप्रत सर्व प्रकारे वाढावे.
इफिसकरांस पत्र 4:8-15 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
पवित्र शास्त्रात म्हटल्याप्रमाणे, त्याने उच्चस्थानी आरोहण केले, तेव्हा पुष्कळांना कैद करून नेले व मानवांना देणग्या दिल्या. त्याने आरोहण केले, ह्यावरून तो पृथ्वीच्या अधोलोकी उतरला होता, ह्यापेक्षा दुसरे काय समजावे? म्हणून जो खाली उतरला त्यानेच सर्व काही भरून टाकण्याच्या उद्देशाने सर्वोच्च स्वर्गावर आरोहण केले आणि त्यानेच काहींना प्रेषित, काहींना संदेष्टे, काहींना शुभवर्तमानप्रचारक, काहींना पाळक व शिक्षक असे नेमले. ते ह्यासाठी की, त्यांनी पवित्र लोकांना सेवाकार्याकरिता व ख्रिस्ताच्या शरीराची रचना पूर्णतेस नेण्याकरिता सिद्ध करावे. अशा प्रकारे देवाच्या पुत्रावरील विश्वासाने व त्यासंबंधी परिपूर्ण ज्ञानाने आपण प्रौढ होऊन एकीने जीवन जगू म्हणजे आपण सर्व ख्रिस्ताच्या परिपूर्णतेपर्यंत पोहचू. त्यामुळे आपण ह्यापुढे लहान मुलांसारखे असू नये, म्हणजे माणसांच्या धूर्तपणाने, चुकीच्या मार्गास नेणाऱ्या युक्तीने, प्रत्येक बदलत्या शिकवणरूपी वाऱ्याने हेलकावणारे व फिरणारे असे होऊ नये. तर आपण प्रीतीने सत्याला धरून, मस्तक असा जो ख्रिस्त, त्याच्यामध्ये सर्व प्रकारे वाढावे.