इफिसकरांस पत्र 4:17-27
इफिसकरांस पत्र 4:17-27 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
म्हणून मी हे म्हणतो व प्रभूच्या नावात आग्रहाने विनंती करतोः ज्याप्रमाणे परराष्ट्रीय भ्रष्ट मनाच्या व्यर्थतेप्रमाणे चालतात तसे चालू नका. त्यांचे विचार अंधकारमय झालेले आहेत आणि त्यांच्या अंतःकरणातील हट्टीपणामुळे त्यांच्यात अज्ञान असून देवाच्या जीवनापासून ते वेगळे झाले आहेत. त्यांनी स्वतःला कामातुरपणाला वाहून घेतले आहे व प्रत्येक प्रकारच्या अशुद्धतेला हावरेपणाला वाहून घेतले आहे. परंतु तुम्ही ख्रिस्ताबद्दल अशाप्रकारे शिकला नाही. जर तुम्ही त्याच्याबद्दल ऐकले असेल आणि त्याकडून येशूच्या ठायी जे सत्य आहे त्याप्रमाणे तुम्हास त्याच्यामध्ये शिक्षण मिळाले असेल, तर तुमचा जुना मनुष्य त्यास काढून टाकावा कारण तो तुमच्या पूर्वीच्या आचरणासंबंधी जो जुना कपटाच्या वाईट वासनांनी भरलेला असून त्याचा नाश होत आहे, यासाठी तुम्ही आत्म्याद्वारे मनात नवे केले जावे, आणि जो नवा मनुष्य, जो देवानुसार नीतिमान आणि खऱ्या पवित्रतेत निर्माण केलेला आहे. तो धारण करावा. ‘म्हणून खोटे सोडून द्या. प्रत्येकाने त्याच्या शेजाऱ्याबरोबर खरे तेच बोलावे कारण आपण एकमेकांचे अवयव आहोत. तुम्ही रागवा पण पाप करू नका.’ सूर्यास्तापूर्वी तुम्ही तुमचा राग सोडून द्यावा. सैतानाला संधी देऊ नका.
इफिसकरांस पत्र 4:17-27 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
प्रभुच्या वतीने मी तुम्हाला आग्रहाने सांगतो की तुम्ही येथून पुढे ज्यांचे विचार भ्रष्ट झाले आहेत अशा गैरयहूदीयांसारखे जगू नका. कारण त्यांचे विचार व बुद्धी अंधकारमय झाली असून, ते त्यांच्या हृदयाच्या कठीणपणामुळे अज्ञानी झाले आहेत व परमेश्वराच्या जीवनापासून दूर गेले आहेत. सर्वसाधारण अकलेचा त्यांना गंध राहिला नाही, त्यांनी स्वतःला कामुकता व सर्व अशुद्धतेच्या स्वाधीन केले असून ते लोभाने भरलेले आहेत. पण अशाप्रकारे जीवनाचा मार्ग तुम्ही शिकला नाही तर, जेव्हा तुम्ही ख्रिस्ताबद्दल ऐकले आणि येशूंमध्ये जे सत्य आहे त्याबद्दल तुम्ही शिकला आहात; फसवणुकीच्या इच्छेने भ्रष्ट होत आलेला जुना मनुष्य काढून टाकणे, हे तुम्ही शिकला आहात; तुमची मनोवृत्ती नवी केली जावी; आणि खरे नीतिमत्व व पवित्रता यामध्ये परमेश्वरासारखा उत्पन्न केलेला नवा स्वभाव तुम्ही परिधान करावा. यास्तव तुम्ही प्रत्येकजण एकमेकांशी लबाडी करण्याचे सोडून, आपल्या शेजार्यांशी सत्य बोला, कारण आपण सर्व एकाच शरीराचे अवयव आहोत. “तुम्ही रागावले असला तरी पाप करू नका.” तुम्ही रागात असताना सूर्य मावळू देऊ नका. आणि सैतानाला पाय ठेवण्यास जागा देऊ नका.
इफिसकरांस पत्र 4:17-27 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
म्हणून मी हे म्हणतो व प्रभूमध्ये निश्चितार्थाने सांगतो की, परराष्ट्रीय भ्रष्ट मनाने चालत आहेत त्याप्रमाणे तुम्ही ह्यापुढे चालू नये; त्यांची बुद्धी अंधकारमय झाली आहे, त्यांच्या अंत:करणातील कठीणपणामुळे त्यांच्यात अज्ञान उत्पन्न होऊन ते देवाच्या जीवनाला पारखे झालेले आहेत; ते कोडगे झाल्यामुळे त्यांनी हावरेपणाने सर्व प्रकारची अशुद्धता करण्यासाठी स्वतःला कामातुरपणास वाहून घेतले आहे. परंतु तुम्ही अशा प्रकारे ख्रिस्ताविषयी शिकला नाही! तुम्ही तर त्याचेच ऐकले असेल व येशूच्या ठायी जे सत्य आहे त्याप्रमाणे तुम्हांला त्याच्यामध्ये शिक्षण मिळाले असेल; ते असे की, तुमच्या पूर्वीच्या आचरणासंबंधी जो जुना मनुष्य त्याचा तुम्ही त्याग करावा, तो कपटाच्या वासनांनी युक्त असून त्याचा नाश होत आहे; आणि तुम्ही आपल्या मनोवृत्तीत नवे व्हावे; आणि सत्यापासून निर्माण होणारे नीतिमत्त्व व पवित्रता ह्यांनी युक्त असा देवसदृश निर्माण केलेला नवा मनुष्य धारण करावा. म्हणून लबाडी सोडून देऊन तुम्ही प्रत्येक जण आपापल्या शेजार्याबरोबर खरे बोला, कारण आपण एकमेकांचे अवयव आहोत. तुम्ही रागवा, परंतु पाप करू नका; तुम्ही रागात असताना सूर्य मावळू नये; आणि सैतानाला वाव देऊ नका.
इफिसकरांस पत्र 4:17-27 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
प्रभूच्या नावाने मी तुम्हांला ठामपणे सांगतो व आग्रह धरतो की, यहुदीतर लोक निरर्थक विचारांनी चालत आहेत, त्याप्रमाणे तुम्ही ह्यापुढे चालू नये. त्यांची बुद्धी अंधकारमय झाली आहे, त्यांच्या अंतःकरणातील कठोरपणामुळे त्यांच्यात अज्ञान उत्पन्न होऊन ते देवाच्या जीवनाला पारखे झालेले आहेत. संवेदनशीलता नष्ट झाल्यामुळे त्यांनी हावरेपणाने सर्व प्रकारचे अशुद्ध वर्तन करण्यासाठी स्वतःला कामातुरपणात झोकून दिले आहे. तुम्ही अशा प्रकारे ख्रिस्ताविषयी शिकला नाही! तुम्ही तर त्याच्याविषयी निश्चितपणे ऐकले व त्याच्यामध्ये जे सत्य आहे त्याप्रमाणे तुम्हांला शिक्षण मिळाले. म्हणून तुमच्या पूर्वीच्या आचारणाचा कर्ता जो जुना मनुष्य तो भ्रष्ट व देहलालसेने भ्रमिष्ट झाला आहे. त्याचा तुम्ही त्याग करा. तुम्ही नव्या मनोवृत्तीचा स्वीकार करा आणि देवसदृश निर्माण केलेला, सरळमार्गी आणि पवित्र असा नवा मनुष्य धारण करा. लबाडी सोडून देऊन तुम्ही प्रत्येक जण आपापल्या शेजाऱ्याबरोबर खरे बोला; कारण आपण एकमेकांचे अवयव आहोत. तुमचा राग तुम्हांला पाप करण्यास प्रवृत्त करणार नाही, ह्याची काळजी घ्या; दिवसभर राग मनात बाळगू नका. सूर्य मावळण्यापूर्वी तुमचा राग सोडून द्या. सैतानाला वाव देऊ नका.