YouVersion लोगो
सर्च आयकॉन

इफिसकरांस पत्र 2:1-13

इफिसकरांस पत्र 2:1-13 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

आणि तुम्ही आपले अपराध आणि पापामुळे मरण पावला होता, ज्यामध्ये तुम्ही पूर्वी चालत होता, हे तुमचे कृत्य जगाच्या चालीरीतीप्रमाणे अंतरीक्षाचा राज्याधिपती जो सैतान, म्हणजे आज्ञा मोडणाऱ्या लोकात आता कार्य करणाऱ्या दुष्ट आत्म्याचा अधिपती, ह्याच्या वहीवाटीप्रमाणे असे होते. आम्ही सर्व यापूर्वी या अविश्वासणाऱ्यांमध्ये आपल्या शारीरिक वासनेने वागत होतो, शरीर आणि मनाच्या इच्छेप्रमाणे करत होतो व आम्ही स्वभावाने इतरांप्रमाणे राग येणारे लोक होतो. पण देव खूप दयाळू आहे कारण त्याच्या महान प्रीतीने त्याने आमच्यावर प्रेम केले. आम्ही आमच्या अपराधामुळे मरण पावलेले असता त्याने आम्हास ख्रिस्ताबरोबर नवीन जीवन दिले. तुमचे तारण कृपेने झाले आहे. आणि आम्हास त्याच्याबरोबर उठवले आणि स्वर्गीय स्थानात ख्रिस्त येशूसोबत बसविले. यासाठी की, येशू ख्रिस्तामध्ये त्याची आम्हांवरील प्रीतीच्याद्वारे येणाऱ्या युगात त्याची महान कृपा दाखविता यावी. कारण देवाच्या कृपेने विश्वासाच्याद्वारे तुम्हास शिक्षेपासून वाचवले आहे आणि ते आमच्याकडून झाले नाही, तर हे दान देवापासून आहे, आपल्या कर्मामुळे हे झाले नाही यासाठी कोणी बढाई मारू नये. कारण आम्ही देवाच्या हाताची कृती आहोत जी ख्रिस्तामध्ये आहे जेणेकरूण आम्ही जीवनात चांगली कामे करावी जे देवाने आरंभीच योजून ठेवले होते. म्हणून आठवण करा, एकेकाळी तुम्ही शरीराने परराष्ट्रीय होता आणि ज्यांची शरीराची सुंता मनुष्याच्या हाताने झालेली होती ते लोक स्वतःला सुंती असे म्हणत, ते त्यांना बेसुंती संबोधत. त्यावेळी तुम्ही ख्रिस्तापासून वेगळे होता, इस्राएलाच्या बाहेरचे होता, वचनाच्या कराराशी तुम्ही अपरिचित असे होता, तुम्ही तुमच्या भविष्याविषयी आशाविरहित आणि देवहीन असे जगात होता. पण आता, ख्रिस्त येशूमध्ये जे तुम्ही एकेकाळी देवापासून दूर होता, पण आता, येशू ख्रिस्तामध्ये ते तुम्ही ख्रिस्ताच्या रक्ताने त्याच्याजवळ आले आहात.

इफिसकरांस पत्र 2:1-13 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

तुम्ही स्वतःच्या पातकांमध्ये व अपराधांमध्ये मृत झालेले होता. त्यामध्ये तुम्ही जगाच्या रीतीप्रमाणे वागत होता व आकाशमंडळातील शासक आत्मा जो प्रत्यक्ष या क्षणीही आज्ञा न पाळणार्‍यांमध्ये कार्य करीत आहे, त्याच्यामागे चालणारे होता. एकेकाळी आपणही त्यामध्ये जगत होतो. आपल्यामधील दैहिक वासना आणि विचार यांचे अनुसरण करणार्‍यांप्रमाणेच नैसर्गिकरित्या परमेश्वराच्या क्रोधास पात्र होतो. परंतु परमेश्वर हे दयेचे सागर आहेत व आपल्यावरील त्यांच्या अपरंपार प्रीतीमुळे, आपण आपल्या अपराधांमध्ये मृत झालो असताना त्यांनी ख्रिस्तामध्ये आपणास जिवंत केले व कृपेनेच तुमचे तारण झाले आहे. आणि परमेश्वराने आपल्याला ख्रिस्त येशूंमध्ये उठवून स्वर्गीय राज्यात त्यांच्याबरोबर बसविले आहे. यासाठी की ख्रिस्त येशूंमध्ये त्यांची आपल्यावरील दया व येणार्‍या युगांमध्ये त्यांची कृपा किती अतुलनीय आहे हे आपणास दाखवावे. कृपेनेच विश्वासाद्वारे तुमचे तारण झाले आहे आणि हे तुमच्याकडून झाले नाही तर ते परमेश्वराचे दान आहे, कृत्याद्वारे नव्हे; त्यामुळे कोणी गर्व करू शकत नाही. कारण परमेश्वराने पूर्वीच आमच्यासाठी नेमून ठेवलेली चांगली कृत्ये करण्याकरिता आम्ही ख्रिस्त येशूंमध्ये घडविलेली परमेश्वराची हस्तकृती आहोत. यास्तव, आठवण ठेवा की जे आपण पूर्वी जन्माने गैरयहूदी व सुंता झालेल्याकडून असुंती समजले जात होतो, ती सुंता शरीरात मनुष्यांच्या हाताने केली जात असे. लक्षात असू द्या, त्या दिवसांमध्ये तुम्ही ख्रिस्तापासून अलिप्त, इस्राएलाच्या नागरिकत्वापासून वेगळे केलेले, कराराच्या वचनाला परके, आणि जगात परमेश्वरावाचून व आशेवाचून जगत होता. जे तुम्ही एकेकाळी खूप दूर होता, त्या तुम्हाला आता ख्रिस्त येशूंमध्ये, त्यांच्या रक्ताद्वारे निकट आणले आहे.

इफिसकरांस पत्र 2:1-13 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

तुम्ही आपले अपराध व आपली पातके ह्यांमुळे मृत झालेले होता; त्या पातकांमध्ये तुम्ही पूर्वी चालत होता, अर्थात ह्या जगाच्या रहाटीप्रमाणे अंतरिक्षातील राज्याचा अधिपती म्हणजे आज्ञा मोडणार्‍या लोकांत आता कार्य करणार्‍या आत्म्याचा अधिपती ह्याच्या धोरणाप्रमाणे चालत होता. त्या लोकांत आपणही सर्व पूर्वी आपल्या दैहिक वासनांना अनुरूप असे वागलो, आपल्या देहाच्या व मनाच्या इच्छांप्रमाणे करत होतो व स्वभावतः इतरांप्रमाणे क्रोधाची प्रजा होतो. तरी देव दयासंपन्न आहे म्हणून आपण आपल्या अपराधांमुळे मृत झालेले असताही त्याने आपल्यावरील स्वतःच्या अपरंपार प्रेमामुळे, ख्रिस्ताबरोबर आपल्याला जिवंत केले, (कृपेने तुमचे तारण झालेले आहे); आणि ख्रिस्त येशूच्या ठायी त्याच्याचबरोबर उठवले व त्याच्याचबरोबर स्वर्गात2 बसवले; ह्यासाठी की, ख्रिस्त येशूच्या ठायी त्याच्या तुमच्या-आमच्यावरील ममतेच्या द्वारे येणार्‍या युगात त्याने आपल्या कृपेची अपार समृद्धी दाखवावी. कारण कृपेनेच विश्वासाच्या द्वारे तुमचे तारण झालेले आहे आणि हे तुमच्या हातून झाले असे नाही, तर हे देवाचे दान आहे; कोणी आढ्यता बाळगू नये म्हणून कर्मे केल्याने हे झाले नाही. आपण सत्कृत्ये करावीत म्हणून ख्रिस्त येशूच्या ठायी निर्माण केलेले असे आपण त्याची हस्तकृती आहोत; ती सत्कृत्ये आचरत आपण आपला आयुष्यक्रम चालवावा म्हणून देवाने ती पूर्वी योजून ठेवली. म्हणून आठवण करा की, तुम्ही पूर्वी देहाने परराष्ट्रीय आणि ज्यांची सुंता हाताने केलेली म्हणजे देहाची आहे अशा स्वतःला सुंती म्हणवणार्‍या लोकांकडून बेसुंती म्हणवले जाणारे होता; ते तुम्ही त्या वेळेस ख्रिस्तविरहित, इस्राएलाच्या राष्ट्राबाहेरचे, वचनाच्या करारांना परके, आशाहीन व देवविरहित असे जगात होता. परंतु जे तुम्ही पूर्वी ‘दूर’ होता ते तुम्ही आता ख्रिस्त येशूच्या ठायी ख्रिस्ताच्या रक्ताच्या योगे ‘जवळचे’ झाला आहात.

इफिसकरांस पत्र 2:1-13 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)

तुम्ही आपले अपराध व आपली पापे ह्यांमुळे पूर्वी मृत झाला होता. त्या वेळी तुम्ही पापांमध्ये चालत होता, अर्थात, ह्या जगाच्या रहाटीप्रमाणे अंतरिक्षातील राज्याचा अधिपती म्हणजे आज्ञा मोडणाऱ्या लोकांत आता कार्य करणारा दुरात्मा ह्याच्या धोरणाप्रणाणे चालत होता. खरे म्हणजे आम्हीही सर्व पूर्वी आपल्या दैहिक वासनांना अनुरूप असे वागलो. आम्हीदेखील आपल्या देहाच्या व मनाच्या इच्छांप्रमाणे करत होतो व स्वभावतः इतरांप्रमाणे वागत क्रोधासाठी नेमलेले होतो. परंतु देव दयासंपन्न आहे म्हणून आपण आपल्या अपराधांमुळे मृत झालेले असताही त्याने आपल्यावरील स्वतःच्या विपुल प्रीतीमुळे, ख्रिस्ताबरोबर आपल्याला जिवंत केले; देवाच्या कृपेने आपले तारण झालेले आहे आणि ख्रिस्त येशूमध्ये त्याने आपल्याला त्याच्याबरोबर स्वर्गलोकात राज्य करण्यासाठी उठविले. ख्रिस्त येशूमध्ये त्याच्या तुमच्याआमच्याविषयीच्या सदिच्छेद्वारे पुढे येणाऱ्या सर्व युगांत त्याने आपल्या कृपेची समृद्धी दाखवावी म्हणून त्याने हे केले. देवाच्या कृपेनेच विश्वासाद्वारे तुमचे तारण झालेले आहे आणि हे तुमच्या हातून झाले असे नाही, तर ते देवाचे दान आहे. कोणी आढ्यता बाळगू नये म्हणून कर्मे केल्याने हे झाले नाही. आपण सत्कृत्ये करावीत म्हणून ख्रिस्त येशूमध्ये आपली निर्मिती करण्यात आली आहे. आपण त्याची हस्तकृती आहोत. ती सत्कृत्ये करीत आपण आपले जीवन जगावे म्हणून देवाने ती पूर्वी योजून ठेवली आहेत. ज्यांची शारीरिक सुंता झालेली आहे व जे स्वतःला सुंता झालेले असे म्हणवून घेत असत अशा यहुदी लोकांकडून तुम्ही पूर्वी जन्माने यहुदीतर लोक म्हणविले जात होता; म्हणजेच शरीराची सुंता न झालेले म्हणून ओळखले जात होता, हा तुमचा पूर्वेतिहास लक्षात आणा. तुम्ही त्या वेळेस ख्रिस्तविरहित, इस्राएल राष्ट्राबाहेरचे, वचनांच्या करारांना परके, आशाहीन व देवाविना असे जीवन जगत होता. परंतु जे तुम्ही पूर्वी दूर होता, ते तुम्ही आता ख्रिस्त येशूमध्ये ख्रिस्ताच्या रक्तायोगे जवळचे झाला आहात