YouVersion लोगो
सर्च आयकॉन

इफिसकरांस पत्र 1:1-14

इफिसकरांस पत्र 1:1-14 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

इफिस शहरातील पवित्र जन आणि ख्रिस्त येशूच्या ठायी विश्वास ठेवणारे यांना, देवाच्या इच्छेद्वारे ख्रिस्त येशूचा प्रेषित, पौल याच्याकडून देव आपला पिता आणि प्रभू येशू ख्रिस्त यापासून तुम्हास कृपा व शांती असो. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या पित्याला धन्यवाद असो; स्वर्गीय गोष्टीविषयी प्रत्येक आत्मिक आशीर्वाद देऊन ज्या देवाने आम्हास ख्रिस्ताकडून आशीर्वादित केले आहे. देवाने ख्रिस्तामध्ये विश्वास ठेवणाऱ्यांना जगाच्या रचनेपूर्वीच निवडले यासाठी की आम्ही त्याच्या समक्षतेत पवित्र आणि निर्दोष असावे. देवाच्या प्रीतीप्रमाणे, येशू ख्रिस्ताद्वारे त्याचे स्वतःचे पुत्र होण्याकरता आम्हास दत्तक घेण्यासाठी पूर्वीच आमची नेमणूक केली. त्याने हे सर्व देवाच्या गौरवी कृपेची स्तुती व्हावी म्हणून केले. ही कृपा त्याने त्याच्या प्रिय पुत्राद्वारे आम्हास भरपूर केली. त्या प्रिय पुत्राच्या ठायी रक्ताने खंडणी भरून आम्हास मुक्त करण्यात आले आहे, देवाच्या कृपेच्या विपुलतेने आम्हास आमच्या पापांची क्षमा मिळाली आहे. देवाची ही कृपा आम्हास सर्व ज्ञानाने आणि विवेकाने भरपूर पुरवण्यात आली आहे. देवाने गुप्त सत्याची योजना आपणास कळवली आहे जी त्याने ख्रिस्ताच्याद्वारे आपल्या इच्छेप्रमाणे प्रदर्शित केली. देवाच्या योजनेप्रमाणे जेव्हा काळाची पूर्णता होईल तेव्हा तो स्वर्गातील आणि पृथ्वीवरील सर्वकाही ख्रिस्तामध्ये एकत्र आणील. देवाचे लोक म्हणून आम्ही पूर्वीच ख्रिस्तामध्ये त्याच्या योजनेप्रमाणे नेमले गेलो होतो, जो सर्व गोष्टी हेतुपूर्वक त्याच्या इच्छेप्रमाणे करतो, ह्यासाठी की ख्रिस्ताच्या गौरवाची स्तुती यहूदी आमच्याकडून व्हावी, ज्याच्यावर आम्ही आधीच आशा ठेवली. ख्रिस्ताद्वारे तुम्हीसुद्धा खऱ्या वचनाची आणि तुमच्या तारणाची सुवार्ता ऐकली आहे आणि त्यावर विश्वास ठेवला, तेव्हा पवित्र आत्म्याच्या अभिवचनाचा तुम्हावर शिक्का मारण्यात आलेला आहे. त्याच्या प्रियजनांची खंडणी भरून मिळवलेल्या मुक्तीसाठी हा पवित्र आत्मा आपल्या वतनाचा पुरावा आहे जेणेकरून देवाच्या गौरवाची स्तुती व्हावी.

इफिसकरांस पत्र 1:1-14 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

परमेश्वराच्या इच्छेने झालेला ख्रिस्त येशूंचा प्रेषित पौल याजकडून, इफिस शहरातील ख्रिस्त येशूंमधील विश्वासू असलेल्या परमेश्वराच्या पवित्र लोकांना, आपले परमेश्वर पिता आणि प्रभू येशू ख्रिस्त यांच्यापासून तुम्हाला कृपा व शांती लाभो. परमेश्वर आणि आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचे पिता यांची स्तुती असो, ज्यांनी आपल्याला स्वर्गामधील सर्व आत्मिक आशीर्वादाने ख्रिस्तामध्ये आशीर्वादीत केले आहे. आम्ही त्यांच्या दृष्टीने पवित्र आणि निष्कलंक असावे म्हणून त्यांनी जगाच्या स्थापनेपूर्वी आपल्याला ख्रिस्तामध्ये प्रीतिमुळेच निवडले. त्यांच्या आनंदास आणि इच्छेस अनुसरून येशू ख्रिस्ताद्वारे आपण दत्तकपुत्र व्हावे, ही त्यांची पूर्व योजना होती; त्यांच्या प्रिय पुत्राद्वारे आपल्याला मुक्तपणे दिलेल्या गौरवयुक्त कृपेची स्तुती व्हावी. त्यांच्यामध्ये परमेश्वराच्या विपुल कृपेद्वारे व त्यांच्या रक्ताद्वारे खंडणी म्हणून आपल्याला पापांची क्षमा देऊन आपल्यावर कृपेची वृष्टी केली आहे. सर्व ज्ञान व बुद्धिने, त्यांनी ख्रिस्तामध्ये त्यांच्या इच्छेचे रहस्य त्यांच्या उद्देशानुसार आपल्याला कळविले आहे. ही योजना काळाच्या पूर्णतेची होती, यासाठी की स्वर्गातील आणि पृथ्वीवरील सर्वगोष्टी ख्रिस्तामध्ये एकत्र व्हाव्या. कारण ज्यांच्या इच्छेनुसार व उद्देशानुसार जे सर्वकाही चालवितात, त्यांच्या पूर्व योजनेनुसार आपण त्यांच्यामध्ये निवडलेले होतो. यात उद्देश असा होता की, आपण ज्यांनी ख्रिस्तावर प्रथम आशा ठेवली होती, त्यांनी त्यांच्या गौरवाच्या स्तुतीचे साधन व्हावे. जेव्हा तुम्ही सत्याचा संदेश ऐकला, आणि तारणाच्या शुभवार्तेवर विश्वास ठेवला, तेव्हा तुमचा ख्रिस्तामध्ये समावेश झाला व तुम्हावरही वचनदत्त पवित्र आत्म्याचा शिक्का मारला गेला, आणि हा आत्मा परमेश्वराच्या लोकांसाठी खंडणी व आपल्याला वतनाचा विसार म्हणून त्यांच्या गौरवाच्या स्तुतीसाठी दिला आहे.

इफिसकरांस पत्र 1:1-14 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

इफिस येथील पवित्र जन व ख्रिस्त येशूच्या ठायी विश्वास ठेवणारे ह्यांना देवाच्या इच्छेनुसार झालेला ख्रिस्त येशूचा प्रेषित पौल ह्याच्याकडून : देव आपला पिता व प्रभू येशू ख्रिस्त ह्यांच्यापासून तुम्हांला कृपा व शांती असो. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव व पिता धन्यवादित असो. त्याने स्वर्गातील सर्व आध्यात्मिक आशीर्वाद देऊन आपल्याला ख्रिस्तामध्ये आशीर्वादित केले आहे; त्याचप्रमाणे आपण त्याच्या समक्षतेत पवित्र व निर्दोष असावे, म्हणून त्याने जगाच्या स्थापनेपूर्वी आपल्याला ख्रिस्ताच्या ठायी निवडून घेतले. त्याने आपल्या मनाच्या सत्संकल्पाप्रमाणे आपल्याला येशू ख्रिस्ताच्या द्वारे स्वतःचे दत्तक होण्याकरता प्रेमाने पूर्वीच नेमले होते. त्याच्या कृपेच्या गौरवाची स्तुती व्हावी म्हणून हे झाले. ही कृपा त्याने आपल्यावर त्या प्रियकराच्या ठायी विपुलतेने केली आहे. त्याच्या कृपेच्या समृद्धीप्रमाणे त्या प्रियकराच्या ठायी, त्याच्या रक्ताच्या द्वारे खंडणी भरून मिळवलेली मुक्ती, म्हणजे आपल्या अपराधांची क्षमा, आपल्याला मिळाली आहे. सर्व ज्ञान व बुद्धी ह्यांच्यासह त्याने ही कृपा आपल्यावर विपुलतेने केली आहे. ख्रिस्ताच्या ठायी पूर्वी केलेल्या योजनेप्रमाणे त्याने स्वतःच्या इच्छेनुरूप स्वसंकल्पाचे रहस्य आपल्याला कळवले; ती योजना अशी की, कालखंडाच्या पूर्णतेची व्यवस्था लावताना स्वर्गात व पृथ्वीवर जे आहे ते सर्व ख्रिस्तामध्ये एकत्र करावे. आपल्या मनाच्या संकल्पाप्रमाणे जो अवघे चालवतो त्याच्या योजनेप्रमाणे आम्ही पूर्वी नेमलेले असून ख्रिस्ताच्या ठायी वतनदार1 झालो आहोत; ह्यासाठी की, ज्या आम्ही ख्रिस्तावर पूर्वीच आशा ठेवली होती, त्या आमच्याकडून त्याच्या गौरवाची स्तुती व्हावी. तुम्हीही सत्याचे वचन म्हणजे तुमच्या तारणाविषयीची सुवार्ता ऐकून घेतल्यानंतर त्याच्यावर विश्वास ठेवला आणि त्याने देऊ केलेल्या पवित्र आत्म्याचा तुमच्यावर त्याच्या ठायी शिक्का मारण्यात आला आहे. देवाच्या गौरवाची स्तुती व्हावी म्हणून त्याच्या स्वकीय जनाच्या, खंडणी भरून मिळवलेल्या मुक्तीसाठी हा पवित्र आत्मा आपल्या वतनाचा विसार आहे.

इफिसकरांस पत्र 1:1-14 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)

येशूमधील जीवनात विश्वासू असणाऱ्या इफिस येथील पवित्र लोकांना देवाच्या इच्छेनुसार झालेला ख्रिस्त येशूचा प्रेषित पौल ह्याच्याकडून: देव आपला पिता व प्रभू येशू ख्रिस्त तुम्हांला कृपा व शांती देवो. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव व पिता धन्य असो. त्याने स्वर्गातील सर्व आध्यात्मिक आशीर्वाद देऊन आपल्याला ख्रिस्तामध्ये आशीर्वादीत केले आहे. आपण प्रीतीत त्याच्या समक्ष पवित्र व निर्दोष असावे, म्हणून त्याने जगाच्या स्थापनेपूर्वी आपल्याला ख्रिस्तामध्ये निवडून घेतले. त्याने आपल्या मनाच्या सत्संकल्पाप्रमाणे आपल्याला येशू ख्रिस्ताद्वारे स्वतःचे दत्तक होण्याकरता प्रेमाने निवडले आहे. त्याच्या ह्या वैभवशाली कृपेबद्दल आपण त्याची स्तुती करू या. त्याच्या प्रिय पुत्रामध्ये त्याने आपल्याला हे अनमोल वरदान दिले आहे. त्याच्या कृपेच्या समृद्धीनुसार त्याच्या रक्‍ताद्वारे खंडणी भरून मिळविलेली मुक्ती म्हणजे अपराधांची आपल्याला क्षमा मिळाली आहे. त्याचे सर्व शहाणपण व अंतर्ज्ञान ह्यांना अनुसरून त्याने आपल्यावर कृपेचा वर्षाव केला आहे. स्वत:च्या आवडीनुसार ख्रिस्तामध्ये ठरविलेल्या योजनेअंतर्गत त्याने त्याच्या इच्छेचे रहस्य आपल्याला कळविले. ही योजना म्हणजे स्वर्गात व पृथ्वीवर जे आहे, ते सर्व ख्रिस्ताच्या नेतृत्वाखाली एकत्रित करावे. योग्य वेळी परमेश्वर हे पूर्ण करील. आपल्या मनाच्या संकल्पाप्रमाणे जो सर्व काही चालवितो त्याच्या योजनेप्रमाणे ख्रिस्तावरील आपल्या निष्ठेमुळे त्याने आपल्याला त्याचे वारसदार म्हणून निवडले आहे. सुरुवातीपासून ख्रिस्तावर भिस्त ठेवून असलेले आपण परमेश्वराच्या वैभवाबद्दल त्याची स्तुती करू या. तुम्हीही सत्याचे वचन म्हणजे तुमच्या तारणाविषयीचे शुभवर्तमान ऐकून घेतल्यानंतर त्याच्यावर विश्वास ठेवला आणि त्याने वचन दिलेल्या पवित्र आत्म्याचा तुमच्यावर त्याच्यामध्ये ठसा उमटविण्यात आला आहे. हा पवित्र आत्मा आपल्या वारशाची हमी आहे व यामुळे आपल्याला खातरी बाळगता येते की, परमेश्वर त्याच्या स्वकीयांना खंडणी भरून मिळविलेली मुक्ती प्रदान करील. आपण त्याच्या वैभवाची स्तुती करू या!