उपदेशक 7:1-15
उपदेशक 7:1-15 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
किंमती सुगंधी द्रव्यापेक्षा चांगले नाव असणे हे उत्तम आहे, आणि जन्मदिवसापेक्षा मरण दिवस उत्तम आहे. मेजवाणीच्या घरी जाण्यापेक्षा, शोक करण्याऱ्याच्या घरी जाणे उत्तम आहे, जिवंतांनी हे मनात बिंबवून ठेवावे. म्हणून जिवंत हे मनात ठसवून राहील. हास्यापेक्षा शोक करणे चांगले आहे. कारण चेहरा खिन्न असल्याने नंतर हृदयात आनंद येतो. शहाण्याचे मन शोक करणाऱ्याच्या घरात असते, पण मूर्खाचे मन मेजवाणीच्या घरात असते. मूर्खाचे गायन ऐकण्यापेक्षा शहाण्याची निषेध वाणी ऐकणे उत्तम आहे. भांड्याखाली जळत असलेल्या काट्यांच्या कडकडण्यासारखे मूर्खाचे हसणे आहे. हे सुद्धा व्यर्थच आहे. पिळवणूक खात्रीने शहाण्या मनुष्यास मूर्ख करते आणि लाच मन भ्रष्ट करते. एखाद्या गोष्टीच्या सुरुवातीपेक्षा तिचा शेवट उत्तम आहे. आणि आत्म्यात गर्विष्ठ असलेल्या लोकांपेक्षा आत्म्यात सहनशील असलेला उत्तम आहे. तू आपल्या आत्म्यात रागावयाला उतावळा असू नको. कारण राग हा मूर्खाच्या हृदयात वसतो. या दिवसापेक्षा पूर्वीचे दिवस बरे होते, हे का? असे म्हणू नको. कारण याविषयी तू शहाणपणाने हा प्रश्न विचारत नाही. आमच्या पूर्वजापासून आम्हास वतनाबरोबर मिळालेल्या मौल्यवान वस्तूपेक्षा शहाणपण असल्यास अति उत्तम आहे. ज्या कोणाला सूर्य दिसतो त्यांचा फायदा होतो. कारण जसा पैसा रक्षणाची तरतूद करतो तसेच ज्ञानपण रक्षणाची तरतूद करू शकते. परंतु जो कोणी शहाणपणाने ज्ञान मिळवतो त्याचा फायदा हा आहे की, ते जीवन वाचविते. देवाच्या कृत्यांचा विचार कराः जे काही त्याने वाकडे केले आहे ते कोणाच्याने सरळ करवेल? जेव्हा समय चांगला असतो, तेव्हा त्या समयात आनंदाने राहा. परंतु जेव्हा समय वाईट असतो, तेव्हा हे समजाः देवाने एकाच्या बरोबर तसेच त्याच्या बाजूला दुसरेही करून ठेवले आहे. या कारणामुळे भविष्यात त्यानंतर काय घडणार आहे ते कोणालाही कळू नये. मी माझ्या अर्थहीन दिवसात पुष्कळ गोष्टी पाहिल्या आहेत. तेथे नीतिमान लोक जे त्यांच्या नीतीने वागत असताना देखील नष्ट होतात, आणि तेथे वाईट लोक वाईटाने वागत असतानाही खूप वर्षे जगतात.
उपदेशक 7:1-15 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
सुवासिक अत्तरापेक्षा नावलौकिक बरा; जन्मदिनापेक्षा मृत्युदिन बरा. भोजनोत्सवगृही जाण्यापेक्षा शोकगृही जाणे बरे; कारण प्रत्येक मनुष्याचा शेवट हाच आहे; जिवंताच्या मनात ही गोष्ट बिंबून राहील. हसण्यापेक्षा खेद करणे बरे; मुद्रा खिन्न असल्याने मन सुधारते. शहाण्यांचे चित्त शोकगृहाकडे लागते; पण मूर्खांचे चित्त हास्यविनोदगृहाकडे लागते. मूर्खांचे गायन ऐकण्यापेक्षा शहाण्याची निषेधवाणी ऐकणे बरे. कारण मूर्खाचे हास्य हंड्याखाली जळणार्या काट्याकुट्यांच्या कडकडण्यासारखे असते; हेही व्यर्थ होय. जुलूम केल्याने शहाणा वेडा बनतो; लाच खाल्ल्याने बुद्धीला भ्रंश होतो. एखाद्या गोष्टीच्या आरंभापेक्षा तिचा शेवट बरा; उन्मत्त मनाच्या इसमापेक्षा सहनशील मनाचा इसम बरा. मन उतावळे होऊ देऊन रागावू नकोस; कारण राग मूर्खांच्या हृदयात वसतो. “ह्या दिवसांपेक्षा पूर्वीचे दिवस बरे होते, हे का?” असे म्हणू नकोस; हे तुझे विचारणे शहाणपणाचे नव्हे. वतनाबरोबर शहाणपण असल्यास बरे; भूतलावर जन्म पावलेल्यांना1 ते विशेष हितावह आहे. ज्ञान आश्रय देणारे आहे व पैसाही आश्रय देणारा आहे; तरी ज्ञानापासून असा लाभ होतो की ज्याच्याजवळ शहाणपण असते त्याच्या जीविताचे ते रक्षण करते. देवाची करणी पाहा; त्याने जे वाकडे केले आहे ते कोणाच्याने सरळ करवेल? संपत्काली आनंद कर; विपत्काली विवेकाने वाग; कारण मनुष्याच्या मागे काय होईल हे त्याला कळू नये म्हणून देवाने सुखदुःखे शेजारी-शेजारी ठेवली आहेत. एखादा नीतिमान मनुष्य नीतीचे र्आचरण करीत असतो तरी तो नष्ट होतो; आणि एखादा दुष्ट मनुष्य अनीतीचे आचरण करीत असताही दिर्घायू होतो; हे सर्व मी आपल्या व्यर्थ गेलेल्या दिवसांत पाहिले आहे.