उपदेशक 5:10-20
उपदेशक 5:10-20 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
जो रुप्यावर प्रेम करतो तो रुप्याने समाधानी होत नाही. आणि जो संपत्तीवर प्रेम करतो त्यास नेहमीच अधिक हाव असते. हे सुद्धा व्यर्थ आहे. जशी समृद्धी वाढते, तर तिचे खाणारेही वाढतात. आपल्या डोळ्यांनी पाहण्याशिवाय तेथे मालकाला संपत्तीत काय लाभ आहे? काम करणाऱ्या मनुष्याची झोप गोड असते, तो थोडे खावो किंवा अधिक खावो, पण श्रीमंत मनुष्याची संपत्ती त्यास चांगली झोप येऊ देत नाही. जे मी भूतलावर पाहिले असे एक मोठे अरिष्ट आहे, ते म्हणजे धन्याने आपल्या अहितास आपले राखून ठेवलेले धन होय. जेव्हा श्रीमंत मनुष्य आपले धन अनिष्ट प्रसंगामुळे गमावतो, त्यामुळे त्याच्या स्वतःच्या मुलाला, ज्याला त्याने वाढवले आहे, त्यास द्यायला त्याच्या हातात काहीही राहत नाही. जसा मनुष्य आपल्या आईच्या उदरातून नग्न जन्मला, जसा तो आला तसाच, तो नग्न परत जाईल. आपल्या कामापासून आपल्या हातात काहीही घेऊन जाऊ शकत नाही. दुसरे एक मोठे अरिष्टच आहे तो जसा आला तसाच सर्वतोपरी परत जाईल, म्हणून जो कोणी वायफळ काम करतो त्यास काय लाभ मिळतो? तो त्याच्या आयुष्यभर अंधारात अन्न खातो आणि खिन्नतेने शेवटी तो आजारी आणि रागीट बनतो. मी पाहिले आहे ते पाहा; मनुष्याने खावे, प्यावे आणि देवाने त्याचे जे आयुष्य त्यास दिले आहे त्यातील सर्व दिवस तो ज्या उद्योगात भूतलावर श्रम करतो त्यामध्ये सुख भोगावे हे चांगले आणि मनोरम आहे, हे मनुष्यास नेमून दिलेले काम आहे. जर देवाने एखाद्याला संपत्ती, मालमत्ता आणि या गोष्टींचा उपभोग घेण्याची शक्ती दिली असेल तर त्याने त्याचा उपभोग घेतला पाहिजे. त्याच्याकडे ज्या गोष्टी आहेत त्यांचा स्विकार त्याने केला पाहिजे, आणि त्याचे कामही आनंदाने केले पाहिजे. ती देवाने दिलेली भेट आहे. मनुष्यास जगण्यासाठी खूप वर्षे नसतात. म्हणून त्याने आयुष्यभर या सगळ्या गोष्टींची आठवण ठेवली पाहिजे. देव त्यास त्याचे आवडते काम करण्यात गुंतवून ठेवील.
उपदेशक 5:10-20 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
ज्याला पैसा प्रिय वाटतो त्याची पैशाने तृप्ती होत नाही; जो विपुल धनाचा लोभ धरतो त्याला काही लाभ घडत नाही; हेही व्यर्थ! संपत्ती वाढली म्हणजे तिचा उपभोग घेणारेही वाढतात; डोळ्यांनी पाहण्यापलीकडे तिचा मालकाला काय लाभ होतो? कष्ट करणारा थोडे खावो की फार खावो, त्याची निद्रा गोड असते; पण धनिकाची धनाढ्यता त्याला झोप येऊ देत नाही. धनिक धन राखून ठेवतो ते त्याच्या हानीला कारण होते; हे एक मोठे अनिष्ट भूतलावर माझ्या दृष्टीस पडले आहे; त्याचे ते धन एखाद्या अनिष्ट प्रसंगामुळे विलयास जाते; आणि त्याला पुत्र झाला असता त्याच्या हाती काही येत नाही. तो मातेच्या उदरातून निघाला तसाच नग्न परत जाईल, आपल्या श्रमाचे काहीही फळ आपल्याबरोबर घेऊन जाणार नाही. तो जसा आला तसाच सर्वतोपरी परत जाईल, हेही एक मोठे अनिष्ट आहे; त्याने वायफळ उद्योग केला, त्याचा त्याला काय लाभ? तो सर्व आयुष्यभर अंधारात अन्न खातो; त्याला बहुत खेद, रोग व संताप ही होतात. मला जे बरे व मनोरम दिसून आले ते हे : मनुष्याने खावे, प्यावे व ह्या भूतलावर जे श्रम तो करतो त्या सर्वांत देवाने त्याला दिलेल्या आयुष्यभर सुख भोगावे; कारण एवढेच त्याच्या वाट्यास आहे. कोणा मनुष्याला देवाने धनसंपत्ती दिली असेल, तिचा उपभोग घेण्याची, आपला वाटा उचलण्याची व परिश्रम करताना आनंद पावण्याची शक्ती दिली असेल, तर ही देवाची देणगीच समजावी. त्याला आपल्या आयुष्याच्या दिवसांची फारशी चिंता वाटणार नाही; देव त्याच्या मनाच्या आनंदास अनुकूल असतो.