उपदेशक 3:9-22
उपदेशक 3:9-22 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
काम करणारा जे श्रम करतो त्यास त्यामध्ये काय लाभ मिळतो? देवाने मानवजातीला जे कार्य पूर्ण करण्यास दिले ते मी पाहिले आहे. देवाने आपल्या समयानुसार प्रत्येक गोष्ट अनुरूप अशी बनवली आहे. त्याने त्याच्या मनात अनंतकालाविषयीची कल्पना निर्माण केली आहे. तरी देवाचा आदिपासून अंतापर्यंतचा कार्यक्रम मनुष्य समजू शकत नाही. त्यांनी जिवंत असेपर्यंत आनंदीत रहावे व चांगले ते करीत रहावे याहून त्यास काही उत्तम नाही असे मला समजले. आणि प्रत्येक मनुष्याने खावे, प्यावे आणि त्याच्या सर्व कामातून आनंद कसा मिळवावा हे देवाचे दान आहे. देव जे काही करतो ते सर्वकाळ राहणार आहे असे मी समजतो. त्याच्यात अधिक काही मिळवू शकत नाही आणि त्याच्यातून काही कमीही करू शकत नाही. कारण लोकांनी त्याच्याजवळ आदराने यावे म्हणून देवाने हे सारे केले आहे. जे काही अस्तित्वात आहे ते यापूर्वीच अस्तित्वात होते. आणि जे काही अस्तित्वात यावयाचे आहे ते यापूर्वीच अस्तित्वात होते. देव मानवजातीला दडलेल्या गोष्टी शोधण्यास लावतो. आणि पृथ्वीवर न्यायाचे स्थान बघितले तर तेथे दुष्टता अस्तित्वात होती. आणि नीतिमत्वाच्या स्थानात पाहिले तर तेथे नेहमी दुष्टता सापडते. मी आपल्या मनात म्हटले, देव प्रत्येक गोष्टीचा व प्रत्येक कामाचा योग्यसमयी सदाचरणी आणि दुष्ट लोकांचा न्याय करील. मी माझ्या मनात म्हटले, देव मानवजातीची पारख करतो यासाठी की आपण पशुसारखे आहोत हे त्यास दाखवून द्यावे. जे मानवजातीस घडते तेच पशुसही घडते. जसे पशू मरतात तसे लोकही मरतात. ते सर्व एकाच हवेतून श्वास घेतात, पशुपेक्षा मानवजात वरचढ नाही. सर्वकाही केवळ व्यर्थ नाही काय? सर्व काही एकाच स्थानी जातात. सर्वकाही मातीपासून आले आहेत आणि सर्वकाही पुन्हा मातीस जाऊन मिळतात. मानवजातीचा आत्मा वर जातो आणि पशुचा आत्मा खाली जमिनीत जातो की काय हे कोणाला माहीत आहे? मग मी पाहिले की, मनुष्याने आपल्या कामात आनंद करावा यापेक्षा काही उत्तम नाही. कारण हा त्याचा वाटा आहे. कारण तो मरून गेल्यावर जे काही होईल ते पाहायला त्यास कोण परत आणील?
उपदेशक 3:9-22 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
मनुष्य ज्यासाठी कष्ट करतो त्यात त्याला काय लाभ? मानवपुत्रांना जे कष्ट देव भोगण्यास लावत असतो ते मी पाहिले आहेत. आपापल्या समयी होणारी हरएक वस्तू त्याने सुंदर बनवली आहे; त्याने मनुष्याच्या मनात अनंतकालाविषयीची कल्पना उत्पन्न केली आहे; तरी देवाचा आदिपासून अंतापर्यंतचा कार्यक्रम मनुष्याला उमगत नाही. मनुष्याने आमरण सुखाने राहावे व हित साधावे यापरते इष्ट त्याला काही नाही हे मला कळून आले आहे. तरी प्रत्येक मनुष्याने खावे, प्यावे व आपला सर्व उद्योग करून सुख मिळवावे हीही देवाची देणगी आहे. मला हेदेखील समजून आले की देव जे काही करतो ते सर्वकाळ राहणार; ते अधिक करता येत नाही व उणे करता येत नाही; मनुष्याने त्याचे भय धरावे म्हणून देव असा क्रम चालवतो. जे काही होत आहे ते पूर्वीच होऊन चुकले आहे; आणि जे काही होणार आहे ते आधीच होऊन चुकले आहे; आणि देव गत गोष्टी पुन्हा आपल्यापुढे आणतो. शिवाय ह्या भूतलावर न्यायाचे स्थान पाहावे तर तेथे दुष्टता आहे; नीतीचे स्थान पाहावे तर तेथे दुराचार आहे. मी आपल्या मनात म्हटले, देव नीतिमानाचा आणि दुष्टाचा न्याय करील; कारण हरएक गोष्टीचा व हरएक कामाचा नेमलेला समय आहे. मी आपल्या मनात म्हटले, देव हे असे मानवपुत्राकरता करतो, ते ह्या हेतूने की त्यांना कसोटीस लावावे आणि आपण केवळ पशू आहोत हे त्यांना कळून यावे. मानवपुत्रावर प्रसंग येतात तसेच पशूंवर येतात; दोघांवरही एकच प्रसंग येतो; हा मरतो तसाच तोही मरतो; त्या सर्वांचा प्राण सारखाच आहे; पशूंपेक्षा मनुष्य काही श्रेष्ठ नाही; कारण सर्वकाही व्यर्थ आहे! सर्व एकाच स्थानी जातात; सर्वांची उत्पत्ती मातीपासून आहे व सर्व पुन्हा मातीस मिळतात. मानवपुत्राचा प्राण वर जातो आणि पशूचा प्राण खाली जमिनीत जातो की काय हे कोणास ठाऊक? ह्यावरून मी असा विचार केला की मनुष्याने आपले व्यवसाय करून सुख मिळवावे, ह्यापरते इष्ट त्याला काही नाही. त्याच्या वाट्यास एवढेच आहे; त्याच्यामागे जे काही होणार ते त्याने पाहावे म्हणून त्याला परत कोण आणील?