YouVersion लोगो
सर्च आयकॉन

उपदेशक 2:1-11

उपदेशक 2:1-11 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

मी आपल्या मनात म्हटले, “आता ये, मी आनंदाद्वारे तुझी पारख करतो. म्हणून आनंदाचा उपभोग घे पण पाहा, हे सुद्धा केवळ तात्पुरत्या हवेच्या झुळकेसारखे आहे.” मी हास्याविषयी म्हटले, ते वेडेपण आहे. आणि आनंदाविषयी म्हटले, त्याचा काय उपयोग आहे? जे मनुष्यास चांगले, जे त्यांनी आकाशाखाली आपल्या आयुष्याचे सर्व दिवस करावे ते मी शोधून पाहीपर्यंत माझे मन मला ज्ञानाच्या योगाने वाट दाखवीत घेऊन जात असताही, मी आपली इच्छा द्राक्षरसाने कशी पुरी करावी आणि मूर्खपणाच्या आचारांचे अवलंबन कसे करता येईल याचा मी आपल्या मनाशी शोध केला. नंतर मी महान गोष्टी करायला सुरुवात केली. मी स्वतःसाठी घरे बांधली, आणि स्वत:साठी द्राक्षाचे मळे लावले. मी बागा लावल्या आणि मोठमोठे बगीचे केले. मी सर्व प्रकारची फळझाडे त्यामध्ये लावली. झाडे लावलेल्या वनास पाणी पुरवावे म्हणून मी आपणासाठी तलाव निर्माण केले. मी पुरुष आणि स्त्री गुलाम विकत घेतले. माझ्या महालातही गुलामांचा जन्म झाला. माझ्यापूर्वी यरूशलेमेत राज्य केलेल्या कोणाही राजाजवळ नव्हते एवढे अधिक गुरांचे आणि शेरडामेंढरांच्या कळपाचे मोठे धन मजजवळ होते. मी माझ्यासाठी सोने आणि चांदी, राजे व राष्ट्रे यांच्या संपत्तीचा संग्रह केला. माझ्यासाठी गाणे म्हणणारे स्त्री-पुरुष माझ्याजवळ होते आणि मानवजातीस आनंदीत करणारे सर्व होते जसे पुष्कळ स्त्रिया ठेवल्या. जे माझ्यापूर्वी यरूशलेमेत होते त्या सर्वापेक्षा अधिक धनवान व महान झालो आणि माझे ज्ञान माझ्याबरोबर कायम राहिले. जे काही माझ्या डोळ्यांनी इच्छिले, ते मी त्यांच्यापासून वेगळे केले नाही. मी माझे मन कोणत्याही आनंदापासून आवरले नाही, कारण माझ्या सर्व कष्टांमुळे माझे मन आनंदीत होत असे; आणि माझ्या सर्व परिश्रमाचे फळ आनंद हेच होते. नंतर मी आपल्या हाताने केलेली सर्व कामे जी मी पार पाडली होती, आणि कार्य साधायला मी जे श्रम केले होते त्याकडे पाहिले, परंतु पुन्हा सर्वकाही व्यर्थ होते आणि वायफळ प्रयत्न करणे असे होते; भूतलावर त्यामध्ये तेथे काही लाभ नाही.

सामायिक करा
उपदेशक 2 वाचा

उपदेशक 2:1-11 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

मग मी आपल्या मनात म्हटले, “चल, हास्यविनोदाने मी तुला अजमावून पाहतो; तर आता तू सुख भोगून घे;” पण हेही व्यर्थ. मी हास्यास म्हटले, “तू वेडे आहेस;” आणि विनोदास म्हटले, “तुझ्यापासून काय लाभ?” मानवपुत्रांनी आपल्या सार्‍या आयुष्यात ह्या भूतलावर2 काय केले असता त्यांचे हित होईल ह्याचा निर्णय समजावा म्हणून विवेकाने माझ्या मनाचे संयमन करून द्राक्षारसाने माझ्या शरीराची चैन कशी होईल आणि मूर्खपणाच्या आचारांचे अवलंबन कसे करता येईल ह्याचा मी आपल्या मनाशी शोध केला. मी मोठमोठी कामे हाती घेतली, आपल्यासाठी घरेदारे बांधली, द्राक्षांचे मळे लावले; मी आपल्यासाठी बागा व त्यांत हरतर्‍हेची फळझाडे लाववली; वृक्षांची लागवड केलेल्या वनास पाण्याचा पुरवठा करावा म्हणून मी तलाव करवले; मी दासदासी खरेदी केल्या; माझ्या घरात जन्मलेले दास माझे झाले होते; खिल्लारे व कळप ह्यांचे मोठे धन माझ्याजवळ होते, तेवढे माझ्यापूर्वी यरुशलेमेत कोणाजवळ नव्हते. मी सोन्यारुप्याचा आणि राजांजवळ असणार्‍या देशोदेशींच्या बहुमूल्य पदार्थांचा संचय केला; स्वतःसाठी गाणारे व गाणारणी मिळवल्या आणि मानवपुत्रांना रंजवणार्‍या अशा बहुत उपस्त्रिया मी ठेवल्या. असा मी थोर झालो; माझ्यापूर्वी यरुशलेमेत जे होऊन गेले त्यांच्यापेक्षा मी थोर झालो तरी माझा विवेक कायम होता. माझे नेत्र ज्याची म्हणून वांच्छा करीत ते मी त्यांच्यापासून वेगळे केले नाही; मी कोणत्याही आनंदाच्या विषयापासून आपले मन आवरले नाही; कारण ह्या सर्व खटाटोपाचा माझ्या मनास हर्ष होत असे; ह्या सर्व खटाटोपापासून माझ्या वाट्यास एवढेच आले. मग मी आपल्या हाताने केलेली सर्व कामे आणि परिश्रम ह्यांचे निरीक्षण केले; तर पाहा, सर्वकाही व्यर्थ व वायफळ उद्योग होता; भूतलावर हित असे कशातच नाही.

सामायिक करा
उपदेशक 2 वाचा