YouVersion लोगो
सर्च आयकॉन

अनुवाद 6:4-17

अनुवाद 6:4-17 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

हे इस्राएला, श्रवण कर; आपला देव परमेश्वर हा अनन्य परमेश्वर आहे; तू आपला देव परमेश्वर ह्याच्यावर पूर्ण मनाने, पूर्ण जिवाने व पूर्ण शक्तीने प्रीती कर. ज्या गोष्टी मी तुला आज बजावून सांगत आहे त्या तुझ्या हृदयात ठसव; आणि त्या तू आपल्या मुलाबाळांच्या मनावर बिंबव; आणि घरी बसलेले असताना, मार्गाने चालत असताना, निजताना, उठताना त्यांविषयी बोलत जा. त्या आपल्या हाताला चिन्हादाखल बांध आणि आपल्या डोळ्यांच्या मध्यभागी कपाळपट्टी म्हणून लाव. आपल्या दाराच्या चौकटींवर व आपल्या फाटकांवर त्या लिही. तुझा देव परमेश्वर ह्याने तुझ्या पूर्वजांना म्हणजे अब्राहाम, इसहाक व याकोब ह्यांना जो देश तुला देण्याचे वचन दिले आहे त्यात तो तुला घेऊन जाईल; जी मोठी व सुंदर नगरे तू स्वतः वसवलेली नाहीत, तू भरलेली नाहीत अशी उत्तम वस्तूंनी भरलेली घरे, तू खोदलेल्या नाहीत अशा खोदलेल्या विहिरी आणि तू लावलेले नाहीत असे द्राक्षमळे व जैतून वृक्ष हे सर्व तो तुला देईल; आणि तू त्यांचा उपभोग घेऊन तृप्त होशील. ज्या परमेश्वराने तुला मिसर देशातून, दास्यगृहातून बाहेर काढले त्याचा तुला विसर पडू नये म्हणून जप. तू आपला देव परमेश्वर ह्याचे भय बाळग, त्याची सेवा कर आणि त्याच्याच नावाने शपथ वाहा. तुम्ही अन्य देवांच्या म्हणजे सभोवतालच्या राष्ट्रांच्या देवांच्या मागे लागू नका; कारण तुझ्यामध्ये असणारा तुझा देव परमेश्वर ईर्ष्यावान देव आहे. तुझा देव परमेश्वर ह्याचा क्रोध तुझ्यावर भडकून त्याने तुझा संहार करून तुला पृथ्वीवरून नष्ट करावे असे न होवो. तुम्ही मस्सा येथे तुमचा देव परमेश्वर ह्याची परीक्षा पाहिली तशी पाहू नका. तुमचा देव परमेश्वर ह्याने दिलेल्या आज्ञा, निर्बंध व विधी जपून पाळा.

सामायिक करा
अनुवाद 6 वाचा

अनुवाद 6:4-17 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

हे इस्राएल लोकहो, ऐका! परमेश्वर हाच आपला देव आहे. परमेश्वर एकच आहे. आणि आपला देव परमेश्वर ह्यावर संपूर्ण अंत:करणाने, संपूर्ण मनाने व संपूर्ण शक्तीने प्रेम करा. मी आज दिलेल्या आज्ञा तुमच्या कायम लक्षात असू द्या. त्या आपल्या मुलाबाळांनाही शिकवा. घरी-दारी, झोपता उठता त्याविषयी बोलत राहा. त्या लिहून आठवणीसाठी हाताला चिन्हादाखल बांधा व कपाळावर चिकटवा. दरवाजाच्या खांबांवर व फाटकांवर त्या लिहून ठेवा. अब्राहाम, इसहाक आणि याकोब या तुमच्या पूर्वजांना तुम्हास हा देश देण्याचे तुमचा देव परमेश्वर ह्याने वचन दिले होते. तो तुम्हास मिळेल. तुम्ही स्वत: वसवलेली नाहीत अशी मोठी, समृध्द नगरे तो तुम्हास देईल. उत्तम वस्तूंनी भरलेली घरे परमेश्वर तुम्हास देईल. तुम्हास खोदाव्या न लागलेल्या विहिरी परमेश्वर तुम्हास देईल. तुम्ही लागवड न केलेले द्राक्षांचे आणि जैतून वृक्षांचे मळे तुम्हास देईल. आणि मुबलक अन्नधान्याने तुम्ही तृप्त व्हाल. पण सावध राहा! परमेश्वरास विसरु नका. मिसरमध्ये तुम्ही गुलाम होता पण तेथून त्याने तुम्हास बाहेर आणले. तुमचा देव परमेश्वर याचे भय धरा व त्याचीच सेवा करा. शपथ घेताना त्याच्या नावाने शपथ वाहा, खोट्या देवांच्या नावाने वाहू नका. तुमच्या आसपासच्या राष्ट्रांतील लोकांच्या दैवतांच्या नादी लागू नका. कारण तुमच्यामध्ये असणारा तुमचा देव परमेश्वर ईर्ष्यावान आहे. त्याच्या लोकांनी इतर दैवतांची पूजा केलेली परमेश्वरास आवडत नाही. भलत्याच दैवतांची तुम्ही पूजा केल्यास त्याचा कोप होईल. त्या क्रोधाने तो तुम्हास पृथ्वीच्या पाठीवरुन नष्ट करील. मस्सा येथे तुम्ही आपला देव परमेश्वर याची परीक्षा पाहिलीत, तसे इथे करु नका. तुमचा देव परमेश्वर ह्याने दिलेल्या आज्ञा कटाक्षाने पाळा. त्याच्या शिकवणीचे व नियमांचे पालन करा.

सामायिक करा
अनुवाद 6 वाचा

अनुवाद 6:4-17

अनुवाद 6:4-17 MARVBSIअनुवाद 6:4-17 MARVBSIअनुवाद 6:4-17 MARVBSIअनुवाद 6:4-17 MARVBSIअनुवाद 6:4-17 MARVBSI
सामायिक करा
पूर्ण धडा वाचा