अनुवाद 6:1-25
अनुवाद 6:1-25 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तुमचा देव परमेश्वर ह्याने जी आज्ञा आणि जे विधी व नियम तुम्हांला शिकवण्याची मला आज्ञा केली आहे ते हे : तुम्ही जो देश वतन करून घेण्यासाठी पैलतीरी जात आहात तेथे तुम्ही ते पाळावेत. त्याचे जे सर्व विधी व आज्ञा मी तुला सांगत आहे त्या तू व तुझे पुत्रपौत्र ह्यांनी तुझा देव परमेश्वर ह्याचे भय बाळगून पाळाव्यात म्हणजे तू दीर्घायू होशील. म्हणून, हे इस्राएला, श्रवण कर, आणि त्या काळजीपूर्वक पाळ म्हणजे तुझे कल्याण होईल; आणि तुझ्या पूर्वजांचा देव परमेश्वर ह्याने दुधामधाचे प्रवाह वाहत असलेला जो देश तुला देण्याचे वचन दिले आहे त्यात तू बहुगुणित होशील. हे इस्राएला, श्रवण कर; आपला देव परमेश्वर हा अनन्य परमेश्वर आहे; तू आपला देव परमेश्वर ह्याच्यावर पूर्ण मनाने, पूर्ण जिवाने व पूर्ण शक्तीने प्रीती कर. ज्या गोष्टी मी तुला आज बजावून सांगत आहे त्या तुझ्या हृदयात ठसव; आणि त्या तू आपल्या मुलाबाळांच्या मनावर बिंबव; आणि घरी बसलेले असताना, मार्गाने चालत असताना, निजताना, उठताना त्यांविषयी बोलत जा. त्या आपल्या हाताला चिन्हादाखल बांध आणि आपल्या डोळ्यांच्या मध्यभागी कपाळपट्टी म्हणून लाव. आपल्या दाराच्या चौकटींवर व आपल्या फाटकांवर त्या लिही. तुझा देव परमेश्वर ह्याने तुझ्या पूर्वजांना म्हणजे अब्राहाम, इसहाक व याकोब ह्यांना जो देश तुला देण्याचे वचन दिले आहे त्यात तो तुला घेऊन जाईल; जी मोठी व सुंदर नगरे तू स्वतः वसवलेली नाहीत, तू भरलेली नाहीत अशी उत्तम वस्तूंनी भरलेली घरे, तू खोदलेल्या नाहीत अशा खोदलेल्या विहिरी आणि तू लावलेले नाहीत असे द्राक्षमळे व जैतून वृक्ष हे सर्व तो तुला देईल; आणि तू त्यांचा उपभोग घेऊन तृप्त होशील. ज्या परमेश्वराने तुला मिसर देशातून, दास्यगृहातून बाहेर काढले त्याचा तुला विसर पडू नये म्हणून जप. तू आपला देव परमेश्वर ह्याचे भय बाळग, त्याची सेवा कर आणि त्याच्याच नावाने शपथ वाहा. तुम्ही अन्य देवांच्या म्हणजे सभोवतालच्या राष्ट्रांच्या देवांच्या मागे लागू नका; कारण तुझ्यामध्ये असणारा तुझा देव परमेश्वर ईर्ष्यावान देव आहे. तुझा देव परमेश्वर ह्याचा क्रोध तुझ्यावर भडकून त्याने तुझा संहार करून तुला पृथ्वीवरून नष्ट करावे असे न होवो. तुम्ही मस्सा येथे तुमचा देव परमेश्वर ह्याची परीक्षा पाहिली तशी पाहू नका. तुमचा देव परमेश्वर ह्याने दिलेल्या आज्ञा, निर्बंध व विधी जपून पाळा. परमेश्वराच्या दृष्टीने जे उचित व चांगले आहे तेच कर, म्हणजे तुझे कल्याण होईल; आणि जो उत्तम देश देण्याचे वचन परमेश्वराने तुझ्या पूर्वजांना दिले आहे त्यात तुझा प्रवेश होऊन त्याचे वतन तुला मिळेल; आणि परमेश्वराच्या सांगण्याप्रमाणे तुझे सर्व शत्रू तुझ्यापुढून घालवून देण्यात येतील. भविष्यकाळी तुझा मुलगा जेव्हा तुला विचारील की, ‘हे जे निर्बंध, विधी व नियम पाळण्याची आपला देव परमेश्वर ह्याने तुम्हांला आज्ञा केली आहे त्याचे प्रयोजन काय?’ तेव्हा तू आपल्या मुलाला सांग की, ‘आम्ही मिसर देशात फारोचे दास होतो, त्या वेळी परमेश्वराने पराक्रमी हाताने आम्हांला मिसर देशातून बाहेर काढले; परमेश्वराने आमच्यादेखत मिसर देश, फारो व त्याचे सर्व घराणे ह्यांच्याविरुद्ध मोठी व पीडादायक चिन्हे व चमत्कार दाखवले; आणि आपल्या पूर्वजांना शपथपूर्वक वचनाने देऊ केलेल्या देशात आम्हांला न्यावे म्हणून त्याने तेथून आम्हांला बाहेर काढले. आपण आपला देव परमेश्वर ह्याचे भय बाळगावे, आपले निरंतरचे कल्याण व्हावे आणि परमेश्वराने आपल्याला आजच्याप्रमाणेच जिवंत राखावे म्हणून त्याने हे सर्व विधी पाळण्याची आपल्याला आज्ञा दिली. आपण आपला देव परमेश्वर ह्याच्यासमोर त्याच्या सांगण्याप्रमाणे ही संपूर्ण आज्ञा काळजीपूर्वक पाळली तर ते आपले नीतिमत्त्व ठरेल.’
अनुवाद 6:1-25 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
तुमचा देव परमेश्वर ह्याने तुम्हास सांगण्यासाठी सांगितलेले विधी, नियम व आज्ञा दिल्या त्या या आहेत. जो प्रदेश तुम्ही वतन करून घेण्यासाठी यार्देनेच्या पैलतीरी जात आहात तेथे हे नियम पाळा. तुम्ही, तुमची मुले व नातवंडे या सर्वांनी आमरण आपला देव परमेश्वर याचे भय धरावे. त्याने घालून दिलेले नियम पाळावे, म्हणजे तुम्ही दीर्घायुषी व्हाल. इस्राएल लोकहो, काळजीपूर्वक ऐका व हे नियम पाळा. मग तुमचे कल्याण होईल. तुम्ही बहुगुणित व्हाल आणि तुमच्या देशात दुधामधाचे पाट वाहतील. परमेश्वर देवाने कबूल केल्याप्रमाणे सर्वकाही मिळेल. हे इस्राएल लोकहो, ऐका! परमेश्वर हाच आपला देव आहे. परमेश्वर एकच आहे. आणि आपला देव परमेश्वर ह्यावर संपूर्ण अंत:करणाने, संपूर्ण मनाने व संपूर्ण शक्तीने प्रेम करा. मी आज दिलेल्या आज्ञा तुमच्या कायम लक्षात असू द्या. त्या आपल्या मुलाबाळांनाही शिकवा. घरी-दारी, झोपता उठता त्याविषयी बोलत राहा. त्या लिहून आठवणीसाठी हाताला चिन्हादाखल बांधा व कपाळावर चिकटवा. दरवाजाच्या खांबांवर व फाटकांवर त्या लिहून ठेवा. अब्राहाम, इसहाक आणि याकोब या तुमच्या पूर्वजांना तुम्हास हा देश देण्याचे तुमचा देव परमेश्वर ह्याने वचन दिले होते. तो तुम्हास मिळेल. तुम्ही स्वत: वसवलेली नाहीत अशी मोठी, समृध्द नगरे तो तुम्हास देईल. उत्तम वस्तूंनी भरलेली घरे परमेश्वर तुम्हास देईल. तुम्हास खोदाव्या न लागलेल्या विहिरी परमेश्वर तुम्हास देईल. तुम्ही लागवड न केलेले द्राक्षांचे आणि जैतून वृक्षांचे मळे तुम्हास देईल. आणि मुबलक अन्नधान्याने तुम्ही तृप्त व्हाल. पण सावध राहा! परमेश्वरास विसरु नका. मिसरमध्ये तुम्ही गुलाम होता पण तेथून त्याने तुम्हास बाहेर आणले. तुमचा देव परमेश्वर याचे भय धरा व त्याचीच सेवा करा. शपथ घेताना त्याच्या नावाने शपथ वाहा, खोट्या देवांच्या नावाने वाहू नका. तुमच्या आसपासच्या राष्ट्रांतील लोकांच्या दैवतांच्या नादी लागू नका. कारण तुमच्यामध्ये असणारा तुमचा देव परमेश्वर ईर्ष्यावान आहे. त्याच्या लोकांनी इतर दैवतांची पूजा केलेली परमेश्वरास आवडत नाही. भलत्याच दैवतांची तुम्ही पूजा केल्यास त्याचा कोप होईल. त्या क्रोधाने तो तुम्हास पृथ्वीच्या पाठीवरुन नष्ट करील. मस्सा येथे तुम्ही आपला देव परमेश्वर याची परीक्षा पाहिलीत, तसे इथे करु नका. तुमचा देव परमेश्वर ह्याने दिलेल्या आज्ञा कटाक्षाने पाळा. त्याच्या शिकवणीचे व नियमांचे पालन करा. उचित आणि चांगले आहे तेच करा. त्यानेच परमेश्वर प्रसन्न होतो. त्याने तुमचे कल्याण होईल. परमेश्वराने जो चांगला प्रदेश तुम्हास द्यायचे तुमच्या पूर्वजांना कबूल केले आहे, त्यामध्ये तुमचा प्रवेश होऊन त्याचे वतन तुम्हास मिळेल. परमेश्वराने कबूल केल्याप्रमाणे, तुम्ही आपल्या शत्रूंना हुसकावून लावाल. आपल्या परमेश्वर देवाने जी शिकवण दिली, विधी नियम सांगितले त्याचा अर्थ काय असे पुढे तुमची मुले विचारतील. तेव्हा त्यांना सांगा की आम्ही मिसरमध्ये फारोचे गुलाम होतो. परंतु परमेश्वराने आपल्या प्रचंड सामर्थ्याने आम्हास तेथून बाहेर आणले. परमेश्वराने मिसरी लोक, फारो व त्याचे कुटुंब यांच्याविरूद्ध मोठे प्रभावी चमत्कार करून दाखवले ते आम्ही प्रत्यक्ष पाहिले आहेत. आपल्या पूर्वजांना कबूल केलेला प्रदेश आपल्याला द्यायला त्याने आम्हांला मिसरमधून बाहेर आणले. ही सर्व शिकवण पाळायची आज्ञा परमेश्वराने आम्हास दिली आहे. आपण आपला देव परमेश्वर ह्याचे भय बाळगावे. मग तो आपल्याला कायम जिवंत ठेवील व आपले भले करील. जर आपण काळजीपूर्वक आपला देव परमेश्वर याचे सर्व नियम पाळले तर ते आपले नीतिमत्व ठरेल.