YouVersion लोगो
सर्च आयकॉन

अनुवाद 13:1-9

अनुवाद 13:1-9 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

स्वप्नांचा अर्थ सांगणारा एखादा संदेष्टा तुमच्याकडे एखाद्या वेळी येईल. आपण काही चिन्ह, किंवा चमत्कार दाखवतो असे तो म्हणेल. कदाचित् त्या चिन्हाचा तुम्हास पडताळा येईल किंवा चमत्कार खराही ठरेल. मग तो, तुम्हास अपरिचित अशा इतर दैवतांची सेवा करायला सुचवेल. तरी त्या संदेष्टयाचे किंवा स्वप्न पाहणाऱ्याचे ऐकू नका. कारण तुम्ही आपला देव परमेश्वर ह्यांच्यावर संपूर्ण मनाने व संपूर्ण जिवाने प्रीती करता कि नाही हे पाहण्यासाठी तुमचा देव परमेश्वर तुमची परीक्षा पाहत असेल. तेव्हा तुम्ही आपल्या परमेश्वर देवालाच अनुसरा. त्याचे भय बाळगा त्याच्या आज्ञा पाळा. त्याची वाणी ऐका, त्याची सेवा करा आणि त्यालाच बिलगूण राहा. तसेच त्या संदेष्ट्याला किंवा स्वप्न सांगणाऱ्याला ठार मारा. कारण तुमचा देव परमेश्वर याने तुम्हास मिसर देशात तुम्ही गुलाम होता तेव्हा तेथून सोडवले आहे. परमेश्वर देवाने आज्ञा देऊन नेमून दिलेल्या जीवनमार्गापासून हा मनुष्य तुम्हास दूर नेतो म्हणून आपल्यामधून तुम्ही या दुष्टाईचे निर्मूलन करा. तुमच्या निकटची एखादी व्यक्ती हळूच तुम्हास दुसऱ्या दैवताच्या भजनी लावायचा प्रयत्न करील. ही व्यक्ती म्हणजे तुमचा सख्खा भाऊ, मुलगा, मुलगी, प्रिय पत्नी, किंवा जिवलग मित्रही असू शकतो. तो म्हणेल, चल आपण या दुसऱ्या दैवताची पूजा करु. तुझ्या किंवा तुझ्या पूर्वजांच्या ऐकण्यातही नसलेले हे दैवत असेल (मग ते देव तुमच्या भोवताली जवळपास किंवा लांब राहणारे आसपासच्या किंवा दुरच्या राष्ट्राचे असोत.) त्या व्यक्तीच्या म्हणण्याला मान्यता देऊ नका. त्याचे ऐकू नका. त्याची गय येऊ देऊ नका. त्यास मोकळा सोडू नका. तसेच त्यास लपवू नका. त्यास ठार करा. त्यास दगडांनी मारा. पहिला दगड तुम्ही उचला आणि मारायला सुरूवात करा. मग इतर जण त्यास दगडांनी मारतील.

सामायिक करा
अनुवाद 13 वाचा

अनुवाद 13:1-9 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

तुमच्यामध्ये एखादा संदेष्टा अथवा स्वप्न पाहणारा प्रकट झाला व त्याने तुम्हांला काही चिन्ह अथवा चमत्कार दाखवला, आणि त्या चिन्हाचा किंवा त्या चमत्काराचा तुम्हांला प्रत्यय आला, आणि तुम्हांला अपरिचित अशा अन्य देवांना अनुसरून त्यांची सेवा करण्याचे त्याने तुम्हांला सुचवले, तरी त्या संदेष्ट्याचे किंवा त्या स्वप्न पाहणार्‍याचे तुम्ही ऐकू नका; कारण तुम्ही आपला देव परमेश्वर ह्याच्यावर संपूर्ण मनाने व संपूर्ण जिवाने प्रीती करता की नाही हे पाहण्यासाठी तुमचा देव परमेश्वर तुमची ही अशी परीक्षा पाहत आहे. तुम्ही आपला देव परमेश्वर ह्याला अनुसरावे, त्याचे भय बाळगावे, त्याच्या आज्ञा पाळाव्यात, त्याची वाणी ऐकावी, त्याची सेवा करावी आणि त्यालाच चिकटून राहावे. त्या संदेष्ट्याला किंवा स्वप्न पाहणार्‍याला जिवे मारावे; कारण तुमचा देव परमेश्वर ज्याने तुम्हांला मिसर देशातून बाहेर आणले व दास्यगृहातून सोडवले, त्या तुमच्या परमेश्वर देवाने नेमून दिलेला मार्ग तुम्ही सोडावा म्हणून तो तुम्हांला फितवतो. अशा प्रकारे तुम्ही आपल्यामधून ह्या दुष्टाईचे निर्मूलन करावे. तुझा भाऊ म्हणजे तुझा सहोदर, तुझा मुलगा, तुझी मुलगी, तुझी प्राणप्रिय स्त्री, तुझा जिवलग मित्र ह्यांच्यापैकी कोणी तुला व तुझ्या पूर्वजांना अपरिचित अशा अन्य देवांना अनुसरून त्यांची सेवा करण्याची गुप्तपणे फूस लावू लागला म मग ते देव पृथ्वीच्या ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत पसरलेल्या, आसपासच्या किंवा दूरदूरच्या राष्ट्रांचे असोत म तर तू त्याच्या म्हणण्यास होकार देऊ नयेस आणि त्याचे ऐकू नयेस; त्याच्यावर दयादृष्टी करू नयेस, त्याची गय करू नयेस अथवा त्याला लपवून ठेवू नयेस; त्याला अवश्य ठार मारावेस; त्याला जिवे मारण्यासाठी त्याच्यावर तुझा हात प्रथम पडावा आणि मग इतर सर्व लोकांचे हात पडावेत.

सामायिक करा
अनुवाद 13 वाचा