YouVersion लोगो
सर्च आयकॉन

दानीएल 9:1-23

दानीएल 9:1-23 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

दारयावेश राजा जो अहश्वेरोशाचा पुत्र माद्य वंशातून आलेला तो अहश्वेरोश ज्यास खास्द्यांचा राजा करण्यात आले होते. दरयावेशाच्या कारकिर्दीच्या पहिल्या वर्षी मी दानीएल, परमेश्वराचे वचन असलेल्या पुस्तकाचा अभ्यास करत होतो, ते वचन जे यिर्मया संदेष्टयाच्याद्वारे प्राप्त झाले. माझ्या लक्षात असे आले की, यरूशलेमेच्या ओसाड दशेचा वेळ पुरा होण्यास सत्तर वर्षे लागतील. मी हे जाणून माझे मुख परमेश्वर देवाकडे वळवले, यासाठी की उपास करून व गोणताट व राख अंगावर घेऊन प्रार्थना व विनंत्या यांनी त्यास मागणे करावे. मी माझा देव, “परमेश्वराची प्रार्थना करून पापांची कबूली दिली. मी म्हणालो, हे थोर आणि भयावह देवा, तू महान आहे, जे तुझ्यावर प्रेम करतात व तुझ्या आज्ञा पालन करतात त्यांच्याशी तू आपला करार पाळतो. आम्ही पाप केले आणि आम्ही कुटीलतेने वागलो आणि बंड झालो तुझे नियम आणि तुझ्या निधीपासून वळलो. तुझे दास जे संदेष्टे तुझ्या नामाने आमचे राजे, सरदार वडिल आणि देशाचे सर्व लोक हयांच्याशी बोलले तेव्हा आम्ही ऐकले नाही. आमच्या देवा, हे परमेश्वरा धार्मिकता, न्यायत्व तुझे आहे तथापि आज आमची तोंडे लज्जीत झाली आहेत. यहूदाचे यरूशलेमेत राहणारे सर्व इस्राएलाचे सर्व निवासी त्यामध्ये आहेत, त्यांनी तुझ्या विरूद्ध केलेल्या अपराधामुळे, त्यांना तू सर्व देशात विखुरले होते कारण आम्ही तुझ्या विरोधात पाप केले. हे परमेश्वरा आमच्या तोंडाला काळे लागले आहे कारण आमचे राजे, आमचे सरदार आणि पूर्वज आम्ही सर्वांनी तुझ्या विरोधात पाप केले आहे. आमचा देव परमेश्वर दयेचा व क्षमेचा सागर आहे; आम्ही त्याच्याबरोबर फितुरी केली. आम्ही आपला देव परमेश्वर याची वाणी ऐकली नाही, तसेच जी त्याने आपल्या नियमशास्त्राद्वारे त्याच्या संदेष्ट्यांकडून दिली होती. सर्व इस्राएलाने तुझी वाणी नाकारून तुझ्या नियमाशास्त्राविरोधात पाप केले आहे. देवाचा सेवक मोशे यांच्याद्वारे लिहिलेल्या शापाचा आणि शपथेचा वर्षाव आमच्यांवर झाला आहे, कारण त्याच्या विरोधात पाप केले. परमेश्वराने आमच्या आणि आमच्या शासकाच्या विरोधात बोललेल्या वचनाची खात्री आमच्यावर अरिष्ट पाठवून केली आहे. यरूशलेमेवर जे संकट आले तसे आकाशाखाली कोठेही झाले नाही. मोशेच्या नियमशास्त्रात लिहील्याप्रमाणे ही सर्व विपत्ती आमच्यावर आली, तरी आम्ही पश्चाताप करून आपला देव परमेश्वर याच्या दयेची आणभाक केली नाही. म्हणून आता परमेश्वराने अरिष्टावर नजर ठेवून ते आम्हावर आणले आहे, कारण परमेश्वर आमचा देव जी सगळी कामे करतो त्यामध्ये तो न्यायी आहे; आणि आम्ही त्याचा शब्द मानला नाही. प्रभू आमच्या देवा, तू आपले लोक मिसर देशातून प्रतापी हाताने बाहेर आणले, आणि आज आहे त्याप्रमाणे आपणाला किर्ती प्राप्त करून घेतली आहे; आम्ही पाप केले आहे, आम्ही दुष्टाईने वागलो आहे. हे प्रभू, आपल्या सर्व न्यायकृत्याप्रमाणे यरूशलेम नगरीवरील, तुझ्या पवित्र पर्वतावरील, आपला क्रोध व संताप दूर कर; आमच्या पातकांमुळे व आमच्या पूर्वजांच्या दुष्कर्मांमुळे यरूशलेम व तुझे लोक आसपासच्या सर्वांना निंदेचे विषय झाले आहेत. हे आमच्या देवा, आपल्या सेवकाच्या प्रार्थना व विनविण्याकडे कान दे; प्रभू, तुझ्या ओसाड झालेल्या स्थानावर आपला प्रकाश पाड. देवा ऐक, देवा क्षमा कर, देवा लक्ष दे आणि कार्य कर तुझ्या नावासाठी उशीर करू नको, माझ्या देवा, कारण तुझ्या शहरास आणि तुझ्या लोकांस तुझे नाव दिले आहे. कारण आम्ही आपल्या न्यायीपणामुळे आपल्या विनंत्या तुझ्यापुढे ठेवतो असे नाही, तर तुझ्या अपार दयेमुळे त्या तुझ्यापुढे ठेवतो. हे प्रभू, ऐक, हे प्रभू, क्षमा कर, हे प्रभू, कान दे, आणि कार्य कर, उशीर करू नको; हे माझ्या देवा, तू आपणाकरता असे कर, कारण तुझ्या नगराला व तुझ्या लोकांस तुझे नाव आहे. आणि मी बोलत व प्रार्थना करीत असता आणि आपले पाप व आपले लोक इस्राएल यांचे पाप कबूल करीत असता, आणि आपल्या देवाच्या पवित्र पर्वताकरिता परमेश्वर माझा देव याच्यापुढे माझी विनंती सादर करीत होतो. मी प्रार्थना करत असता पहिल्याने ज्याला मी माझ्या दृष्टांतात पाहिले तो गब्रीएल तो संध्याकाळच्या यज्ञसमयी माझ्यासमीप आला. आणि तो मला समज देत असतांना माझ्याशी बोलत म्हणाला, दानीएला, तुला ज्ञान व समज देण्यासाठी मी आता निघून आलो आहे. तुझ्या विनंत्यांच्या आरंभी वचन निघाले, आणि ते प्रगट करायला मी आलो आहे, कारण तू फारच प्रिय आहेस; म्हणून या गोष्टीचा विचार कर आणि दृष्टांत समजून घे.

सामायिक करा
दानीएल 9 वाचा

दानीएल 9:1-23 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

मेदी वंशातला अहश्वेरोशाचा पुत्र दारयावेश खास्द्यांच्या देशावर राजा होता त्याच्या कारकिर्दीच्या पहिल्या वर्षी मी दानीएल शास्त्रग्रंथावरून समजलो की, यरुशलेमेच्या ओसाड दशेचा काळ पुरा होण्यास सत्तर वर्षे लागतील, असे परमेश्वराचे वचन यिर्मया संदेष्ट्याला प्राप्त झाले होते. हे जाणून मी आपले मुख प्रभू देवाकडे लावून प्रार्थना, विनवण्या, उपास, गोणताट नेसणे व अंगावर राख उधळणे हे चालू केले. मी आपला देव परमेश्वर ह्याची प्रार्थना करून पापांगीकार केला तो असा : “हे प्रभो, हे थोर व भयावह देवा, जे तुझ्यावर प्रेम करतात व तुझ्या आज्ञा पाळतात त्यांच्याबरोबर तू आपला करार पाळून त्यांच्यावर दया करतोस; आम्ही पाप केले, कुटिलतेने वागलो, दुष्टतेचे वर्तन केले; फितुरी झालो, तुझे विधी व तुझे निर्णय ह्यांपासून आम्ही परावृत्त झालो. तुझे सेवक जे संदेष्टे त्यांनी तुझ्या नामाने आमचे राजे, सरदार, वडील व देशाचे सर्व लोक ह्यांना सांगितले तेही आम्ही ऐकले नाही. हे प्रभो, न्यायत्व काय ते तुझ्याच ठायी आहे; परंतु आमच्या तोंडाला आजच्याप्रमाणे काळोखी लागली आहे; यहूदाचे लोक, यरुशलेमनिवासी लोक आणि जवळ व दूर राहणारे सर्व इस्राएल लोक ह्यांनी तुझ्याविरुद्ध पाप केल्यामुळे तू त्यांना निरनिराळ्या देशात हाकून लावलेस, त्या सगळ्यांच्या तोंडांना काळोखी लागली आहे. हे प्रभो, आमच्या तोंडांस, आमचे राजे, आमचे सरदार, आमचे वडील ह्यांच्या तोंडांस काळोखी लागली आहे. कारण आम्ही तुझ्याविरुद्ध पाप केले आहे. आमचा देव प्रभू दयेचा व क्षमेचा सागर आहे; आम्ही त्याच्याबरोबर फितुरी केली आणि आमचा देव परमेश्वर ह्याने आपले सेवक जे संदेष्टे ह्यांच्या द्वारे आमच्यापुढे ठेवलेल्या त्याच्या नियमशास्त्राप्रमाणे वर्तण्यासंबंधाने आम्ही त्याची वाणी ऐकली नाही. सर्व इस्राएल लोकांनी तुझ्या नियमशास्त्राचे उल्लंघन केले आहे; त्यांनी पराङ्मुख होऊन तुझी वाणी ऐकली नाही; म्हणून आमच्यावर शापाचा वर्षाव झाला आहे; देवाचा सेवक मोशे ह्याच्या नियमशास्त्रात लिहिलेल्या शपथेप्रमाणे झाले आहे. कारण आम्ही त्याच्याविरुद्ध पाप केले आहे. त्याने आमच्यावर मोठे अरिष्ट आणले; जी वचने तो आमच्याविरुद्ध व आमचा न्याय करणार्‍या न्यायधीशांविरुद्ध बोलला ती त्याने प्रत्ययास आणून दिली आहेत; यरुशलेमेवर जशी विपत्ती आली तशी सर्व जगावर कधी आली नाही. मोशेच्या नियमशास्त्रात लिहिल्याप्रमाणे ही सर्व विपत्ती आमच्यावर आली आहे; तरी आपल्या अधर्मापासून परावृत्त व्हावे व तुझ्या सत्याचा उमज पडावा म्हणून आम्ही आमचा देव परमेश्वर ह्याची काकळूत केली नाही; ह्यास्तव परमेश्वराने विपत्तीवर नजर ठेऊन ती आमच्यावर आणली आहे; कारण आमचा देव परमेश्वर जी काही कृत्ये करतो ती न्याय्य आहेत, पण आम्ही त्याची वाणी ऐकली नाही. आता हे प्रभो, आमच्या देवा, तू आपल्या सामर्थ्यवान हाताने मिसर देशातून आपल्या लोकांना बाहेर आणले व आजच्याप्रमाणे आपला महिमा वाढवला. आम्ही पाप केले आहे; आम्ही दुराचरण केले आहे. हे प्रभो, आपल्या सर्व न्यायकृत्यांप्रमाणे यरुशलेम नगरीवरील, तुझ्या पवित्र पर्वतावरील, आपला क्रोध व संताप दूर कर; आमच्या पातकांमुळे व आमच्या पूर्वजांच्या दुष्कर्मांमुळे यरुशलेम व तुझे लोक आसपासच्या सर्वांना निंदेचे विषय झाले आहेत. ह्यास्तव आता, हे आमच्या देवा, आपल्या सेवकाच्या प्रार्थना व विनवण्या ऐक; तुझ्या ओसाड पडलेल्या पवित्र-स्थानावर आपला मुखप्रकाश पाड; हे प्रभो, तू आपल्याप्रीत्यर्थ हे कर. हे माझ्या देवा, कान दे, ऐक; आपले नेत्र उघडून आमचा झालेला विध्वंस पाहा व तुझे नाम ज्या नगरास दिले आहे ते पाहा; आम्ही आपल्या विनवण्या आमच्या नीतिमत्तेस्तव नव्हे, तर तुझ्या विपुल करुणांस्तव तुझ्यापुढे मांडतो. हे प्रभू, ऐक; हे प्रभू, क्षमा कर; हे प्रभू, ऐक, कार्य कर; विलंब लावू नकोस; हे माझ्या देवा, तुझे नगर व तुझे लोक ह्यांना तुझे नाम दिले आहे; म्हणून तुझ्याचप्रीत्यर्थ हे मागतो.” मी बोलत व प्रार्थना करीत असता, माझे पाप व माझे लोक इस्राएल ह्यांचे पाप कबूल करीत असता आणि माझ्या देवाच्या पवित्र पर्वतासाठी माझा देव परमेश्वर ह्याच्याकडे विनवणी करीत असता, असे प्रार्थनेचे शब्द मी बोलत असता जो पुरुष गब्रीएल, दृष्टान्ताच्या आरंभी मी अगदी व्याकूळ असता माझ्या दृष्टीस पडला होता, तो संध्याकाळच्या यज्ञसमयी माझ्यासमीप आला. त्याने माझ्याशी संभाषण करून मला समज दिली. तो म्हणाला, “हे दानिएला, मी तुला बुद्धी देऊन चतुर करण्यासाठी आलो आहे. तुझ्या प्रार्थनांना आरंभ होताच आज्ञा झाली, ती तुला सांगण्यास मी आलो आहे; कारण तू परमप्रिय आहेस; तर ह्या गोष्टींचा विचार कर व हा दृष्टान्त समजून घे.

सामायिक करा
दानीएल 9 वाचा