YouVersion लोगो
सर्च आयकॉन

दानीएल 6:10-23

दानीएल 6:10-23 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

या फर्मानावर सही झाली हे दानीएलास जेव्हा माहित झाले, तेव्हा तो आपल्या घरी गेला, त्याच्या खोलीच्या खिडक्या यरूशलेमेच्या दिशेने उघडत होत्या, तेथे तो गुडघ्यावर आला आणि त्याने प्रार्थना करून देवास धन्यवाद दिला. हे तो दररोज दिवसातून तिनवेळा करत असे. नंतर ही मानसे ज्यांनी हा कट रचला होता त्यांनी दानीएलास प्रार्थना करीत असताना पाहिले. नंतर ते राजाकडे जावून त्याच फर्मानाविषयी त्यास म्हणाले, “महाराज आपण हे फर्मान काढले ना, ज्यात लिहीले आहे पुढील तीस दिवस जो कोणी तुमच्याशिवाय दुसऱ्या देवाची किंवा मनुष्याची आराधना करील त्यास सिंहाच्या गुहेत टाकण्यात यावे” राजा म्हणाला “मेदी व पारसी ह्यांच्या न बदलणाऱ्या कायद्याप्रमाणे हे निश्चित ठरले आहे.” तेव्हा ते राजास म्हणाले, “तो मनुष्य दानीएल जो यहूद्यांपैकी एक आहे तो आपणास व आपल्या फर्मानास न जुमानता दिवसातून तीन वेळा आपल्या देवाजवळ प्रार्थना करतो.” हे शब्द ऐकून राजा अती खिन्न झाला आणि दानीएलाचा बचाव कसा करावा याचा विचार करू लागला त्यासाठी सुर्यास्तापर्यंत तो खटपट करत राहीला. तेव्हा हा कट करणारे लोक राजासमोर जमले व त्यास म्हणाले, राजा हे लक्षात घे, मेदी व पारसी याच्या कायद्याप्रमाणे राजाचे फर्मान किंवा कायदा बदलता येत नाही. नंतर राजदेशानुसार दानीएलास आणून सिंहाच्या गुहेत टाकले राजा दानीएलास म्हणाला, “ज्या देवाची तू सेवा करतोस तो तुला सोडवो.” त्यांनी एक मोठा दगड आणून गुहेच्या दारावर ठेवला, मग राजाने आपली आणि सरदाराची मुद्रा घेवून त्यावर शिक्का मारला तो यासाठी की दानीएलाच्या बाबतीत काही फेरबदल करता येणार नाही. नंतर राजा त्याच्या महलात गेला. ती रात्र तो न जेवता असाच राहिला, त्याच्यासमोर वाद्ये आणली नाहीत, त्याची झोप उडून गेली. मग मोठ्या पहाटे राजा उठला आणि त्वरीत सिंहाच्या गुहेजवळ गेला. गुहेजवळ येताच तो दु:खीस्वराने दानीएलास हाक मारू लागला तो म्हणाला, दानीएला जिवंत देवाच्या सेवका, तुझा देव ज्याची तू नित्य सेवा करतोस त्यास सिंहापासून तुला सोडवता आले काय? दानीएल राजास म्हणाला, “महाराज चिरायू असा माझ्या देवाने त्याचा दिव्यदूत पाठवून सिंहाची तोंडे बंद केली त्यांनी मला इजा केली नाही. त्याच्यासमोर आणि आपल्यासमोर मी निर्दोष ठरलो व महाराज आपलाही मी काही अपराध केला नाही.” नंतर राजाने आनंदी होऊन आज्ञा केली की, “दानीएलास गुहेतून बाहेर काढा” मग दानीएलास बाहेर काढले त्याच्या शरीरावर इजा नव्हती कारण त्याने आपल्या देवावर विश्वास ठेवला.

सामायिक करा
दानीएल 6 वाचा

दानीएल 6:10-23 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

ह्या फर्मानावर सही झाली आहे असे दानिएलाने ऐकले तेव्हा तो आपल्या घरी गेला; त्याच्या खोलीतल्या खिडक्या यरुशलेमेच्या दिशेकडे असून उघड्या होत्या; त्याने आपल्या नित्यक्रमाप्रमाणे दिवसातून तीनदा गुडघे टेकून प्रार्थना केली व आपल्या देवाचा धन्यवाद केला. त्या वेळी ती माणसे जमावाने आली तेव्हा दानीएल आपल्या देवाची प्रार्थना व विनंती करत आहे असे त्यांना आढळून आले. तेव्हा ते राजाजवळ जाऊन त्याने फिरवलेल्या द्वाहीविषयी त्याला म्हणाले, “महाराज, तीस दिवसपर्यंत जो कोणी आपणाशिवाय कोणा देवाची अथवा मनुष्याची आराधना करील त्याला सिंहाच्या गुहेत टाकावे अशी द्वाही आपण फिरवली ना?” राजाने उत्तर दिले की, “मेदी व पारसी ह्यांच्या न पालटणार्‍या कायद्याप्रमाणे हे निश्‍चित ठरवले आहे.” तेव्हा ते राजाला म्हणाले, “महाराज, पकडून आणलेल्या यहूद्यांपैकी तो दानीएल आपणाला व आपण सही केलेल्या द्वाहीला जुमानत नाही; तर तो नित्य तीनदा प्रार्थना करतो.” हे शब्द ऐकून राजा फार खिन्न झाला, आणि दानिएलाचा बचाव करण्याचा तो विचार करू लागला; त्याचा बचाव करावा म्हणून त्याने सूर्य मावळेपर्यंत प्रयत्न केला. मग ती सर्व माणसे राजाकडे जमावाने आली व त्याला म्हणाली, “हे राजा हे लक्षात आण : मेदी व पारसी ह्यांचा असा शिरस्ता आहे की राजाने केलेल्या द्वाह्या किंवा नियम पालटता येत नाहीत.” त्यावर राजाज्ञेवरून दानिएलास आणवून सिंहाच्या गुहेत टाकले. राजा दानिएलास म्हणाला, “ज्या देवाची तू नित्य सेवा करतोस तो तुला सोडवील.” त्यांनी एक शिला आणून गुहेच्या दारावर ठेवली; आणि राजाने आपल्या मुद्रेचा व आपल्या सरदारांच्या मुद्रांचा तिच्यावर शिक्का केला; तो अशासाठी की दानिएलाच्या बाबतीत काहीएक फेरबदल होऊ नये. नंतर राजा आपल्या महालात गेला, त्याने ती रात्र उपाशीच काढली; त्याच्यासमोर वाद्ये आणली नाहीत; त्याची झोप उडाली. मग राजा मोठ्या पहाटेस उठून त्वरेने सिंहाच्या गुहेनजीक गेला. तो गुहेजवळ दानिएलाकडे जाऊन शोकस्वराने ओरडून म्हणाला, “हे दानिएला, जिवंत देवाच्या सेवका, ज्या देवाची सेवा तू नित्य करतोस त्याला सिंहापासून तुला सोडवता आले आहे काय?” दानीएल राजाला म्हणाला, “महाराज, चिरायू असा. माझ्या देवाने आपला दिव्यदूत पाठवून सिंहांची तोंडे बंद केली आहेत. त्यांनी मला काहीएक उपद्रव केला नाही; कारण त्या देवासमोर मी निरपराधी ठरलो; व महाराज आपलाही मी काही अपराध केला नाही.” तेव्हा राजाने अत्यंत हर्षित होऊन आज्ञा केली की, “दानिएलास गुहेतून बाहेर काढा.” त्याला गुहेतून बाहेर काढले तेव्हा त्याला काही इजा झाल्याचे दिसून आले नाही, कारण त्याचा आपल्या देवावर भरवसा होता.

सामायिक करा
दानीएल 6 वाचा