दानीएल 4:29-34
दानीएल 4:28-34 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
हे सर्व राजा नबुखद्नेस्सरासोबत बारा महिन्यात घडून आले तो बाबेलातील राजवाड्यात फिरत होता. “काय ही महान बाबेल नगरी, जी मी माझ्या राज निवासासाठी आणि माझ्या गौरवासाठी बांधली.” जेव्हा राजा हे बोलत होता. पाहा स्वर्गातून वाणी झाली, “राजा नबुखद्नेस्सरा, हे फर्मान ऐक, तुझ्या हातची राजसत्ता गेली आहे. तुला लोकातून काढून टाकण्यात येईल तुझी वस्ती वनपशूत होईल तुला बैलांसारखे गवत खावे लागेल आणि मानवी राज्यावर देवाची सत्ता आहे, तो ते पाहिजे त्यांना देतो, हे तुला ज्ञान होईपर्यंत सात वर्षे जातील.” हे फर्मान त्याच घटकेस नबुखद्नेस्सराचा विरोधात अमलात आले. त्यास मानसातून काढण्यात आले, त्याने बैलांसारखे गवत खाल्ले. त्याचे शरीर आकाशातल्या दवांनी भिजले त्याचे केस गरुडाच्या पिसाप्रमाणे वाढले आणि त्याची नखे पक्षाच्या नखांसारखी झाली. या दिवसाच्या शेवटी मी नबुखद्नेस्सराने माझे डोळे आकाशाकडे लावले, माझी बुद्धीमत्ता मला परत मिळाली, मी सर्वोच्च देवाचे आभार मानले, जो सदाजिवी देव त्याचा मी सन्मान केला आणि त्याची थोरवी गाईली, कारण त्याचे प्रभूत्व कायमचे आणि त्याचे राज्य पिढ्यानपिढ्या राहणारे आहे.
दानीएल 4:29-34 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
बारा महिने लोटल्यावर तो एकदा बाबेलच्या राजवाड्याच्या गच्चीवर फिरत होता. त्या वेळी राजा म्हणाला, “हे थोर बाबेल नगर राजनिवासासाठी माझ्याच पराक्रमाने व माझ्या प्रतापाच्या वैभवासाठी मी बांधले आहे ना!” हे शब्द राजाच्या मुखातून निघतात न निघतात तोच आकाशवाणी झाली की, “हे राजा, नबुखद्नेस्सरा, हे तुला विदित होवो की तुझ्या हातची राजसत्ता गेली आहे. तुला मनुष्यांतून घालवून देतील; तुझी वस्ती वनपशूंत होईल; तुला बैलाप्रमाणे गवत खावे लागेल; आणि मानवी राज्यावर परात्पर देवाची सत्ता आहे व तो ते पाहिजे त्याला देतो हे ज्ञान तुला होईपर्यंत तुझ्यावरून सात काळ जातील.” त्याच घटकेस हे नबुखद्नेस्सराच्या प्रत्ययास आले; त्याला मनुष्यांतून घालवून दिले व तो बैलाप्रमाणे गवत खाऊ लागला; त्याचे शरीर आकाशातल्या दहिवराने भिजू लागले; येथवर की त्याचे केस गरुडाच्या पिसांप्रमाणे वाढले आणि त्याची नखे पक्ष्यांच्या नखांसारखी झाली. हे दिवस संपल्यावर मी नबुखद्नेस्सराने आपले डोळे आकाशाकडे लावले; माझी बुद्धी मला परत आली; मी परात्पर देवाचा धन्यवाद केला, त्या सदा जिवंत असणार्या देवाचे स्तवन केले व त्याचा महिमा गाइला; कारण त्याचे प्रभुत्व सर्वकाळचे आहे, आणि त्याचे राज्य पिढ्यानपिढ्या राहणारे आहे.