YouVersion लोगो
सर्च आयकॉन

दानीएल 1:14-21

दानीएल 1:14-21 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

मग तो कारभारी हे करण्यास मान्य झाला दहा दिवसानी त्याने त्यांची पाहणी केली. दहा दिवसाच्या शेवटी त्यांचे बाह्यरुप जे राजाचे मिष्ठान्न खात अधिक निरोगी आणि धष्टपुष्ट दिसू लागले. मग कारभाऱ्याने त्यांचे मिष्ठान्न आणि त्यांचा द्राक्षरस काढून त्यास फक्त शाकभोजन दिले. मग या चार तरुणास देवाने ज्ञान आणि सर्व प्रकारच्या शास्त्रांचा समज आणि शहाणपण दिले, आणि दानीएलास सर्व प्रकारचे स्वप्न व दृष्टांत उलगडत असत. राजाने ठरवून दिलेल्या काळाच्या समाप्तीनंतर प्रमुख अधिकारी त्यांना नबुखद्नेस्सर राजासमोर घेऊन आला. राजा त्यांच्याशी बोलला, त्या सर्व समुदायामध्ये दानीएल हनन्या, मीशाएल, व अजऱ्या यांच्या तोडीचा दुसरा कोणीच नव्हता. ते राजासमोर त्याच्या सेवेस राहू लागले. ज्ञानाच्या आणि शहाणपणाच्या बाबतीत राजाने त्यांना जे काही विचारले त्यामध्ये ते, सर्व जादूगार, भूतविद्या करणारे हयांच्यापेक्षा ते दहापट उत्तम असे संपूर्ण राज्यात राजाला आढळून आले. कोरेश राजाच्या कारकिर्दीत पहिल्या वर्षापर्यंत दानीएल तेथे राहीला.

सामायिक करा
दानीएल 1 वाचा

दानीएल 1:14-21 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

तो हे करण्यास सहमत झाला आणि त्याने त्यांना दहा दिवस पारखून पाहिले. दहा दिवसानंतर राजाचे भोजन खाणार्‍या तरुणापेक्षा ते स्वस्थ आणि धष्टपुष्ट दिसू लागले. म्हणून कारभाऱ्याने त्यांच्यासाठी नेमलेले भोजन आणि जे द्राक्षारस पीत होते ते काढून घेतले आणि त्याऐवजी डाळी देऊ लागला. परमेश्वराने या चार तरुणांना सर्वप्रकारच्या साहित्याचे ज्ञान आणि समज दिली. दानीएलला सर्व प्रकारची स्वप्ने व दृष्टान्त समजत असत. राजाने नेमून दिलेल्या वेळेनंतर प्रमुख अधिकार्‍याने त्यांना बाबेलचा राजा नबुखद्नेस्सरपुढे त्याच्या सेवेसाठी प्रस्तुत केले. राजा त्यांच्यासोबत बोलला आणि त्या सर्वांमध्ये दानीएल, हनन्याह, मिशाएल व अजर्‍याह यांच्यासारखे कोणीही सापडले नाही; म्हणून त्यांना राजाच्या सेवेसाठी निवडण्यात आले. बुद्धीच्या आणि शहाणपणाच्या प्रत्येक बाबतीत ज्याबद्दल जेव्हा राजाने त्यांना विचारले, त्याला ते त्याच्या संपूर्ण राज्यातील सर्व जादूगार आणि ज्योतिषीच्या सल्ल्यापेक्षा दसपटीने चांगले आहेत, असे आढळून आले. आणि कोरेश राजाच्या कारकिर्दीच्या पहिल्या वर्षापर्यंत दानीएल राजाचा सल्लागार या पदावर होता.

सामायिक करा
दानीएल 1 वाचा

दानीएल 1:14-21 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

त्याने त्यांची ही विनंती ऐकून दहा दिवस त्यांच्यावर हा प्रयोग केला. दहा दिवसांनंतर राजघरचे अन्न खाणार्‍या सर्व तरुणांपेक्षा त्यांचे चेहरे अधिक सुरूप दिसून ते अंगानेही अधिक धष्टपुष्ट झाले. तेव्हा तो कारभारी त्यांचे नेमलेले अन्न व द्राक्षारस देण्याचे बंद करून त्यांना शाकान्न देऊ लागला. ह्या चौघां तरुणांना देवाने सर्व विद्या व ज्ञान ह्यांत निपुण व प्रवीण केले; दानीएल हा सर्व दृष्टान्त व स्वप्ने ह्यांचा उलगडा करण्यात तरबेज झाला. नबुखद्नेस्सर राजाने त्यांना आपल्यासमोर हजर करण्याची मुदत ठरवली होती ती संपल्यावर खोजांच्या सरदाराने त्याच्यासमोर त्यांना हजर केले. तेव्हा राजाने त्यांच्याशी संभाषण केले; त्या सर्वांमध्ये दानीएल, हनन्या, मीशाएल व अजर्‍या ह्यांच्या तोडीचे दुसरे कोणी दिसून आले नाहीत; म्हणून ते राजाच्या हुजुरास राहू लागले. ज्ञानाच्या व विवेकाच्या बाबतींत राजा त्यांना जे काही विचारी त्यांत ते त्याच्या अवघ्या राज्यात असलेल्या सर्व ज्योतिष्यांपेक्षा व मांत्रिकांपेक्षा दसपट हुशार आहेत असे त्याला दिसून येई. दानीएल हा कोरेश राजाच्या कारकिर्दीच्या पहिल्या वर्षापर्यंत तेथे राहिला.

सामायिक करा
दानीएल 1 वाचा