कलस्सै 2:6-19
कलस्सै 2:6-19 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तर ख्रिस्त येशू जो प्रभू, ह्याला जसे तुम्ही स्वीकारले तसे त्याच्यामध्ये चालत राहा; त्याच्यामध्ये मुळावलेले, रचले जात असलेले, तुम्हांला शिकवल्याप्रमाणे विश्वासात दृढ होत असलेले, आणि निरंतर उपकारस्तुती करणारे व्हा. ख्रिस्ताप्रमाणे नसलेले, तर माणसांच्या संप्रदायाप्रमाणे, जगाच्या प्राथमिक शिक्षणाप्रमाणे असलेले तत्त्वज्ञान व पोकळ भुलथापा ह्यांच्या योगाने तुम्हांला कोणी ताब्यात घेऊन जाऊ नये म्हणून लक्ष द्या; कारण ख्रिस्ताच्या ठायीच देवपणाची सर्व पूर्णता मूर्तिमान वसते, आणि जो सर्व सत्तेचे व अधिकाराचे मस्तक आहे त्याच्यामध्ये तुम्ही पूर्ण केलेले आहात. त्याच्या ठायी तुमची सुंताही झाली आहे, परंतु ती माणसांच्या हातून झालेली नाही, तर तुम्ही आपला दैहिक स्वभाव1 झुगारून दिल्याने ख्रिस्ताच्या सुंतेच्या द्वारे तुमची सुंता झाली. तुमचा बाप्तिस्मा झाला तेव्हा तुम्ही त्याच्याबरोबर पुरले गेलात, आणि ज्याने त्याला मेलेल्यांतून उठवले त्या देवाच्या कृतीवरील विश्वासाच्या द्वारे त्याच्याबरोबर उठवलेही गेलात. जे तुम्ही आपल्या अपराधांनी व देहस्वभावाची सुंता न झाल्याने मेलेले होता त्या तुम्हांला त्याने त्याच्याबरोबर जिवंत केले, त्याने आपल्या सर्व अपराधांची क्षमा केली; आपल्याविरुद्ध असलेले म्हणजे आपल्याला प्रतिकूल असलेले विधींचे ऋणपत्र त्याने खोडले व वधस्तंभाला खिळून त्याने ते रद्द केले. त्याने सत्ताधीशांना व अधिकार्यांना नाडून त्यांच्याविरुद्ध वधस्तंभावर जयोत्सव करून त्यांचे उघडउघड प्रदर्शन केले. तर मग खाण्यापिण्याविषयी, तसेच सण, अमावस्या किंवा शब्बाथ पाळण्याविषयी कोणाला तुमचा निर्णय करू देऊ नका. ह्या बाबी पुढे होणार्या गोष्टींच्या छाया आहेत; शरीर तर ख्रिस्ताचे आहे. लीन म्हणवून घेण्याच्या इच्छेने देवदूतांची उपासना करणार्या, स्वत:ला न दिसलेल्या गोष्टींवर अवलंबून राहणार्या व दैहिक बुद्धीने उगीचच गर्वाने फुगणार्या कोणा माणसाला तुम्हांला फसवून तुमच्या बक्षिसास मुकवू देऊ नका. असा माणूस मस्तकाला धरून राहत नाही; त्या मस्तकापासून सर्व शरीराला सांधे व बंधने ह्यांच्या योगे पुरवठा होत आहे व ते दृढ जडले जात असता त्याची ईश्वरी वृद्धी होते.
कलस्सै 2:6-19 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
आणि म्हणून, ख्रिस्त येशू जो प्रभू ह्याला तुम्ही जसे स्वीकारले आहे तसे तुम्ही त्याच्यात चाला. तुम्ही त्याच्यात मुळावलेले आणि त्याच्यावर उभारलेले व तुम्हास शिक्षण दिल्याप्रमाणे तुम्ही विश्वासात स्थिरावलेले होऊन, उपकारस्मरण करीत, त्यामध्ये वाढत जा. तुम्ही अशी काळजी घ्या की, कोणी मनुष्यांच्या संप्रदायास अनुसरून, जगाच्या मूलतत्त्वांस अनुसरून असणार्या तत्त्वज्ञानाने व त्याच्या पोकळ फसवेपणाने तुम्हास ताब्यात घेऊ नये; ते ख्रिस्ताला अनुसरून नाही. कारण ख्रिस्ताच्या ठायीच देवपणाची सर्व पूर्णता शरीरधारी होऊन त्याच्यात राहते. तो सर्व सत्ता व शक्ती ह्यांवर मस्तक असून त्याच्याठायी तुम्ही पूर्ण झाला आहा, आणि ख्रिस्ताच्या सुंताविधीने तुमचे पापमय दैहिक शरीर काढले जाऊन, कोणी हातांनी न केलेल्या सुंताविधीने तुमचीही त्यांच्यात सुंता झाली आहे. त्याच्याबरोबर तुम्ही बाप्तिस्म्यात पुरले गेला व ज्याने त्यास मरण पावलेल्यातून उठवले त्या देवाच्या कृतीवरील विश्वासाद्वारे तुम्ही त्यामध्येच त्याच्याबरोबर उठवले गेला, आणि तुम्ही जे तुमच्या अपराधांमुळे व देहस्वभावाची सुंता न झाल्यामुळे मरण पावलेले होता त्या तुम्हास देवाने त्याच्याबरोबर जिवंत केले आहे. त्याने आपल्या अपराधांची क्षमा केली आहे; आणि आपल्या आड येणारा जो नियमांचा हस्तलेख आपल्याविरुद्ध असलेले म्हणजे आपल्याला प्रतिकूल असलेले विधीचे ऋणपत्र त्याने खोडले व तो त्याने वधस्तंभाला खिळून ते त्याने रद्द केले. त्याने त्यावर सत्तांना व शक्तींना निःशस्त्र केले व त्यांच्यावर जय मिळवून त्यांचे उघड प्रदर्शन केले. म्हणून तुमच्या खाण्यापिण्यावरून, सण, अमावस्या किंवा शब्बाथ पाळण्यावरून कोणाला तुमचा न्याय करू देऊ नका. या गोष्टी तर येणार्या गोष्टींची छाया अशा आहेत; पण शरीर ख्रिस्ताचे आहे. लीन म्हणवून घेण्याच्या इच्छेने व देवदूतांची उपासना करणाऱ्या, स्वतःला दिसलेल्या गोष्टीवर अवलंबून राहणाऱ्या व दैहिक मनाने विनाकारण गर्वांने फुगणाऱ्या कोणा मनुष्यास तुम्हास तुमच्या बक्षिसास मुकवू देऊ नका; असा मनुष्य मस्तकाला धरून राहत नाही; त्या मस्तकापासून सर्व शरीराला सांधे व बंधने ह्यांच्या द्वारे पुरवठा होत आहे व ते दृढ जडले जात असता त्याची दैवी वाढ होते.
कलस्सै 2:6-19 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
तर जसे, तुम्ही ख्रिस्त येशूंना प्रभू म्हणून स्वीकारले तसेच त्यांच्यामध्ये आपले जीवन जगत राहा. त्यांच्यामध्ये मूळावलेले, बांधलेले, तुम्हाला शिकविलेल्या विश्वासात मजबूत असलेले आणि उपकारस्तुतिने भरून वाहणारे असा. हे लक्षात असू द्या की पोकळ व फसवे तत्वज्ञान जे ख्रिस्तावर नव्हे तर मानवी परंपरा आणि जगीक तत्वांवर आधारित आहे, याद्वारे कोणी तुम्हाला बंधनात पाडू नये म्हणून जपा. कारण ख्रिस्ताच्या ठायी दैवत्वाची सारी पूर्णता शरीररूपाने राहते; आणि ख्रिस्तामध्ये तुम्ही परिपूर्ण केलेले आहा. ते सर्व सत्ता व अधिकार यांचे मस्तक आहेत. त्यांच्यामध्ये तुमची सुंता झाली आहे, मानवी हाताने केलेली नव्हे तर, ख्रिस्ताद्वारे तुमची जी सुंता झाली आहे त्याद्वारे तुमचा दैहिक पापी मूळस्वभाव काढून टाकण्यात आला आहे. कारण तुम्ही बाप्तिस्म्यामध्ये त्यांच्यासह पुरला गेलात व ज्यांना त्यांनी मरणातून उठविले यांच्याबरोबर तुम्हीही परमेश्वराच्या कृतीवरील विश्वासाद्वारे उठविण्यात आला आहात. जेव्हा तुम्ही स्वतःच्या पातकांमध्ये व शारीरिक असुंतेमध्ये मृत होता, त्यावेळी परमेश्वराने ख्रिस्तामध्ये तुम्हाला जिवंत केले आणि आपल्या सर्व पातकांची क्षमा केली. आपल्याविरुद्ध असलेले व आपणास आरोपी ठरविणारे विधीलेख, त्यांनी आम्हापासून दूर करून क्रूसावर खिळयांनी ठोकून कायमचे रद्द केले, आणि सत्तांना आणि अधिकारांना हाणून पाडले व त्यांचे उघड प्रदर्शन करून क्रूसाद्वारे त्यांच्यावर विजय संपादन केला. तेव्हा खाणेपिणे, किंवा धार्मिक सण, किंवा नवा चंद्रोत्सव किंवा शब्बाथ, याविषयी कोणालाही तुमचा न्याय करू देऊ नका. हे सर्व केवळ येणार्या गोष्टींची छाया असे आहेत, पण खरी वास्तविकता ख्रिस्तामध्ये सापडते. जो कोणी व्यर्थ नम्रतेचा देखावा करण्यात संतोष पावतो आणि देवदूतांची उपासना करतो, त्यांनी तुम्हाला अपात्र ठरवू नये. असा मनुष्य पाहिलेल्या गोष्टींचे विस्तारपूर्वक वर्णन करतो आणि दैहिक विचारांनी, आत्मिक नसलेल्या हृदयाने उगीचच फुगून जातो. त्या लोकांचा त्यांच्या मस्तकाशी संबंध तुटला आहे, ज्या मस्तकाला संपूर्ण शरीर बळकटपणे एकत्रित जोडले जाते, सांधे व बंधने त्यांच्यापासून पुरवठा पावते व त्याची परमेश्वरामध्ये वाढ होते.
कलस्सै 2:6-19 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
ज्याअर्थी तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला स्वीकारले आहे त्याअर्थी तुम्ही त्याच्यामध्ये मार्गक्रमण करा. त्याच्यामध्ये रुजलेले, रचले जात असलेले, तुम्हांला शिकविल्याप्रमाणे विश्वासात दृढ होत असलेले आणि निरंतर कृतज्ञता व्यक्त करणारे व्हा. ख्रिस्ताकडून नव्हे तर मानवी परंपरांकडून व विश्वावर सत्ता चालविणाऱ्या आत्म्यांकडून येणाऱ्या मानवी शहाणपणाच्या निरर्थक भूलथापांनी तुम्हांला कोणी गुलामगिरीत टाकू नये म्हणून सावध राहा; कारण ख्रिस्तामध्ये म्हणजेच त्याच्या मानवतेत देवपणाची सर्व पूर्णता वसते आणि त्याच्यामध्ये तुम्हांला परिपूर्ण जीवन देण्यात आले आहे. तो सर्व आध्यात्मिक सत्ता व अधिकार यांचा प्रमुख आहे. ख्रिस्तामध्ये तुमची सुंतादेखील झाली आहे, परंतु ती माणसांच्या हातून झालेली नाही, तर दैहिक पापी स्वभावापासून तुमची मुक्तता केल्याने ख्रिस्ताकडून झाली आहे. तुमचा बाप्तिस्मा झाला, तेव्हा तुम्ही त्याच्याबरोबर पुरले गेला आणि ज्याने त्याला मेलेल्यांतून उठविले त्या देवाच्या सामर्थ्यशाली कृतीवरील विश्वासाद्वारे त्याच्याबरोबर उठवलेही गेलात. तुम्ही एके काळी आपल्या अपराधांनी व देहस्वभावाची सुंता न झाल्याने मेला होता. त्याने आपल्या सर्व अपराधांबद्दल क्षमा करून आपल्याला ख्रिस्ताबरोबर जिवंत केले. आपल्याविरुद्ध असलेली ऋणपत्रिका त्याने खोडली व त्याच्या क्रुसावर चढवून त्याने ती पूर्णपणे रद्द केली आणि त्या क्रुसावर ख्रिस्ताने स्वतःला सत्ताधीशांपासून व अधिकाऱ्यांपासून मुक्त केले. त्याच्या जयोत्सवाच्या मिरवणुकीत त्यांना बंदिवान म्हणून घेऊन जाताना त्याने त्यांचे उघडउघड प्रदर्शन केले. तर मग खाण्यापिण्याविषयी, किंवा सण, किंवा नवचंद्रोत्सव किंवा साबाथ पाळण्याविषयी कोणाला तुमच्यासाठी नियम करू देऊ नका. ह्या बाबी पुढे होणाऱ्या गोष्टींची केवळ छाया आहेत; ख्रिस्त हेच वास्तव आहे. आपल्याला झालेल्या खास दृष्टान्तामुळे जो खोट्या नम्रतेचा व देवदूतांच्या उपासनेचा आग्रह धरीत असतो अशा माणसाला तुम्हांला दोषी ठरवू देऊ नका. असा मनुष्य विनाकारण मानवी विचारसरणीने गर्वाने फुगलेला असतो. शरीराचे मस्तक असलेल्या ख्रिस्ताला त्याने सोडून दिलेले असते. ख्रिस्ताच्या नियंत्रणाखाली सर्व शरीर सांधे व मज्जा यांच्यायोगे दृढ जोडले जाते व त्याची ईश्वरी इच्छेनुसार वाढ होत जाते.