आमोस 9:11-15
आमोस 9:11-15 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
त्या दिवशी दाविदचा मंडप जो पडला आहे, मी तो पुन्हा उभारीन. मी त्यांच्या भिंतीतील भगदाडे बुजवीन आणि जे उद्ध्वस्त झोलेले आहे, ते मी पुन्हा बांधीन. मी त्या पुरातन दिवसात होत्या, तशाच पुन्हा बांधीन. “ह्यासाठी की त्यांनी अदोमाच्या उरलेल्यांना, आणि ज्या राष्ट्रांना माझे नाव ठेवले आहे, त्या सर्व राष्ट्रांना, आपल्या ताब्यात घ्यावे.” परमेश्वर जो हे करतो तो असे म्हणतो. परमेश्वर म्हणतो, “असे दिवस येत आहेत की,” नांगरणी करणारा कापणी करणाऱ्याला, द्राक्षे तुडविणारा बी पेरणाऱ्याला, गाठील. आणि पर्वत गोड द्राक्षरस गळू देतील आणि सर्व टेकड्या पाझरतील. मी माझ्या लोकांस, इस्राएलाला, कैदेतून सोडवून परत आणीन, ते उद्ध्वस्त झालेली गावे पुन्हा बांधतील, आणि त्यामध्ये वस्ती करतील. ते द्राक्षांचे मळे लावतील. आणि त्यापासून मिळणारा द्राक्षरस पितील. ते बागा लावतील व त्यापासून मिळणारे पीक खातील. मी त्यांना त्यांच्या देशात रुजवीन आणि मी त्यांना दिलेल्या भूमीतून ते पुन्हा उपटले जाणार नाहीत. परमेश्वर तुझा देव असे म्हणतो.
आमोस 9:11-15 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
दाविदाचा पडलेला डेरा त्या दिवशी मी उभारीन व त्याची भगदाडे बुजवीन; त्याचे जे कोसळले आहे ते मी उभारीन; तो पूर्वकाली होता तसा तो बनवीन; मग ते अदोमाच्या अवशेषाचा व ज्यांना माझे नाव ठेवले आहे त्या सर्व राष्ट्रांचा ताबा घेतील,” असे हे कृत्य करणारा परमेश्वर म्हणतो. पाहा, परमेश्वर म्हणतो “असे दिवस येत आहेत की नांगरणारा कापणी करणार्याला गाठील व द्राक्षे तुडवणारा बी पेरणार्याला गाठील; डोंगरांवरून नवा द्राक्षारस वाहील व सर्व टेकड्यांना पाझर फुटतील. मी आपल्या सर्व इस्राएल लोकांचा बंदिवास पालटीन; ते ओसाड झालेली नगरे बांधतील व त्यांत वस्ती करतील; ते द्राक्षीचे मळे लावतील व त्यांचा द्राक्षारस पितील; ते बाग लावतील व त्यांची फळे खातील. मी त्यांना त्यांच्या भूमीत रुजवीन व जी भूमी मी त्यांना दिली आहे तिच्यातून त्यांना ह्यापुढे उपटून टाकण्यात येणार नाही,” असे परमेश्वर तुझा देव म्हणतो.