YouVersion लोगो
सर्च आयकॉन

आमोस 6:1-14

आमोस 6:1-14 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

“सीयोनेत सुखवस्तू असणारे व शोमरोनाच्या पर्वतावर निश्‍चिंत असणारे ह्यांना धिक्कार असो! प्रधान राष्ट्रांतल्या ज्या प्रमुखांकडे इस्राएलाचे घराणे धाव घेते त्याला धिक्कार असो! पलीकडे कालनेला जाऊन पाहा, व तेथून महान हमाथाला जा, पलिष्ट्यांच्या गथाला जा, ह्या राज्यांपेक्षा ती श्रेष्ठ आहेत काय? त्यांचा मुलूख तुमच्या मुलखापेक्षा मोठा आहे काय? अहो तुम्ही विपत्तीच्या दिवसाचा विचार लांबणीवर टाकता आणि बलात्काराचे आसन जवळ आणता. तुम्ही हस्तिदंती पलंगावर निजता व मंचकावर ताणून पडता; कळपातली कोकरे व गोठ्यातली वासरे खाता. तुम्ही वीणेच्या सुरावर काहीतरी गात असता; दाविदाप्रमाणे अनेक तंतुवाद्ये बनवता. तुम्ही घागरींच्या घागरी द्राक्षारस पिता, उत्तम तेलांनी आपणांस माखता, योसेफावरील आपत्तीबद्दल तुम्ही खेद करत नाही. ह्यास्तव ते आता बंदिवानांच्या अग्रभागी चालून बंदिवासात जातील; ख्यालीखुशाली करणार्‍यांचा गोंगाट नाहीसा होईल.” प्रभू परमेश्वराने स्वतःची शपथ वाहिली; परमेश्वर, सेनाधीश देव म्हणतो, “मी याकोबाच्या वैभवाचा तिरस्कार करतो, त्याच्या महालांचा मी तिटकारा करतो, हे नगर व त्यातील सर्व मी इतरांच्या हाती देईन.” मग असे होईल की एका घरात दहा माणसे असली तरी ती मरतील. एखाद्याचा नातलग त्याला उचलण्यासाठी आणि त्याला जाळण्यासाठी त्याची हाडे घरातून बाहेर नेण्यास येईल, तेव्हा तो घरातल्या अंतर्भागी असणार्‍याला विचारील की, “आणखी कोण तुझ्याबरोबर आहे काय?” तो म्हणेल, “नाही”; तेव्हा हा म्हणेल, “गप्प राहा! परमेश्वराचा नामोच्चार करायचा नाही.” कारण पाहा, परमेश्वर आज्ञा करील तेव्हा मोठ्या घरांना भगदाडे पाडण्यात येतील आणि लहान घरांना भेगा पाडण्यात येतील. घोडे खडकावर धावतात काय? कोणी तेथे बैल नेऊन नांगरतात काय? तुम्ही तर न्यायाऐवजी विष व नीतिमत्तेच्या फळाऐवजी कडूदवणा केला आहे. तुम्ही अस्तित्वात नसलेल्या गोष्टीबद्दल हर्ष करता; तुम्ही म्हणता, “आम्ही आपल्या सामर्थ्याने सत्ता संपादली नाही काय?” परमेश्वर, सेनाधीश देव म्हणतो, “पाहा, हे इस्राएलाच्या घराण्या, मी तुमच्यावर एक राष्ट्र उठवीन; ते हमाथाच्या सीमेपासून अराबाच्या ओहोळापर्यंत तुम्हांला पिडतील.”

सामायिक करा
आमोस 6 वाचा

आमोस 6:1-14 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

जे सीयोनमध्ये आरामात आहेत त्यांना, आणि जे शोमरोनाच्या पर्वतावर सुरक्षीत आहेत त्यांना हायहाय, जे राष्ट्रांतील प्रसिद्ध लोक आहेत, ज्यांच्याकडे इस्राएलाचे घराणे धाव घेते त्यांना, हायहाय. “कालनेला जाऊन पाहा, तेथून महानगरी ‘हमाथला’ जा, तेथून पलिष्ट्यांची नगरी गथला खाली जा. ते तुमच्या दोन्ही राज्यांपेक्षा चांगले आहेत काय? त्यांची सीमा तुमच्या सीमेपेक्षा मोठी आहे काय? तुम्ही जे वाईट दिवसास दूर करता, आणि हिंसाचाराचे आसन जवळ आणता, त्यांना हाय हाय. तुम्ही हस्तिदंती पलंगावर झोपता आणि आपल्या गाद्यांवर पसरता. तुम्ही कळपातील कोकरे, आणि गोठ्यातील वासरे खाता. ते वीणेच्या संगीतावर मूर्खासारखे गातात, आणि दाविदाप्रमाणे ते वाद्यांवर सराव करतात. ते प्यालांतून मद्य पितात आणि चांगल्या तेलाने आपणाला अभिषेक करतात. पण ते योसेफाचा नाश होत आहे, त्यावर शोक करीत नाहीत.” तर आता ते पाडाव होऊन पहिल्याने पाडाव झालेल्यांसहीत पाडावपणांत जातील, आणि ख्यालीखुशालीत वेळ घालवणाऱ्यांचा गोंधळ नष्ट होईल. सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो, प्रभू परमेश्वराने आपलीच शपथ वाहीली आहे की, “मी याकोबाच्या अभिमानाचा तिरस्कार करतो, त्याच्या किल्ल्यांचा मी तिटकारा करतो. म्हणून मी ती नगरी व त्यातील सर्वकाही शत्रूच्या हाती देईल.” त्यावेळी, कदाचित एका घरांत दहा लोक असतील, तर ते सर्व मरतील. प्रेते घेऊन जाळण्यासाठी एखादा नातेवाईक येईल. नातेवाईक घराच्या बाहेर हाडे नेण्यासाठी जाईल. घरात कदाचित् कोणी असेल तर, त्यास लोक विचारतील “तुझ्याजवळ आणखी कोणी आहे काय?” तो मनुष्य म्हणेल, नाही, मग तो त्यास म्हणेल, “गप्प राहा, आपण परमेश्वराच्या नावाचा उल्लेख करायचा नाही.” कारण पाहा! परमेश्वर आज्ञा देईल, तेव्हा मोठ्या घरांचे तुकडे तुकडे पडतील व लहान घरांचा भुगा-भुगा होईल. घोडे खडकावरून धावतात का? तेथे कोणी जमीन बैलांनी नांगरतात का? पण तुम्ही तर न्यायाचे विष केले, आणि चांगुलपणाचे फळ कडू केले आहे. तुम्ही ज्यात काहीच नाही त्यामध्ये आनंद करता, तुम्ही म्हणता, “आम्ही आमच्या बळावर सत्ता संपादन केली.” “पण हे इस्राएलाच्या घराण्या, पाहा, मी तुझ्याविरुध्द एका राष्ट्राला उठवीन, ते राष्ट्र तुमच्या संबंध देशाला लेबो-हमाथपासून अराबाच्या ओढ्यापर्यंतच्या सगळ्या प्रदेशाला दु:ख देईल.” सेनाधीश परमेश्वर देव, असे म्हणतो.

सामायिक करा
आमोस 6 वाचा