प्रेषितांची कृत्ये 7:51-60
प्रेषितांची कृत्ये 7:51-60 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
अहो ताठ मानेच्या आणि हृदयांची व कानांची सुंता न झालेल्या, लोकांनो तुम्ही तर पवित्र आत्म्याला; सर्वदा विरोध करता जसे तुमचे पूर्वज तसेच तुम्हीही. ज्याचा पाठलाग तुमच्या पूर्वजांनी केला नाही असा संदेष्ट्यांमध्ये कोणी झाला का? ज्यांनी त्या नीतिमान पुरूषाच्या आगमनाविषयी पूर्वी सांगितले त्यांना त्यांनी जिवे मारले; आणि आता त्यास धरून देणारे व जिवे मारणारे तुम्ही निघाला आहात. अशा तुम्हास देवदूतांच्या योगे योजलेले नियमशास्त्र प्राप्त झाले होते, पण तुम्ही ते पाळले नाही.” त्याचे भाषण ऐकणाऱ्या सभेतील सभासदांच्या अंतःकरणास इतके झोंबले, ते दातओठ खाऊ लागले. परंतु पवित्र आत्म्याने पूर्ण होऊन त्याने आकाशाकडे निरखून पाहिले, तेव्हा देवाचे तेज व देवाच्या उजवीकडे येशू उभा असलेला त्याच्या दृष्टीस पडला. आणि त्याने म्हटले, “पाहा, आकाश उघडलेले व मनुष्याचा पुत्र देवाच्या उजवीकडे उभा असलेला मला दिसत आहे.” तेव्हा ते मोठ्याने ओरडून, व कान बंद करीत, एकजुटीने त्याच्या अंगावर धावून गेले; मग ते त्यास शहराबाहेर घालवून दगडमार करू लागले: आणि साक्षीदारांनी आपली वस्त्रे शौल नावाच्या एका तरूणाच्या पायाजवळ ठेवली. ते दगडमार करीत असता स्तेफन प्रभूचा धावा करीत म्हणाला, “हे प्रभू येशू, माझ्या आत्म्याचा स्वीकार कर.” मग गुडघे टेकून तो मोठ्याने ओरडला, “हे प्रभू, हे पाप त्यांच्याकडे मोजू नको.” असे बोलून, तो मरण पावला.
प्रेषितांची कृत्ये 7:51-60 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
“अहो ताठ मानेच्या लोकांनो! तुमची अंतःकरणे व कानांची सुंता अजूनही झालेली नाही. तुम्ही अगदी तुमच्या पूर्वजांसारखे आहात: तुम्ही नेहमी पवित्र आत्म्याला विरोध करता! तुमच्या पूर्वजांनी ज्याचा छळ केला नाही, असा एक तरी संदेष्टा आहे का? जो नीतिमान आहे व त्यांच्या आगमनाचे भविष्य वर्तविणार्यांना देखील तुम्ही जिवे मारले आणि आता तुम्ही त्यांचा विश्वासघात करून त्यांनाच जिवे मारले आणि देवदूतांद्वारे मिळालेल्या परमेश्वराच्या नियमांचाही तुम्ही जाणूनबुजून भंग केला.” सभागृहातील यहूदी पुढार्यांनी हे ऐकले तेव्हा ते भयंकर संतापले आणि त्याच्यावर दात खाऊ लागले. परंतु स्तेफन, पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाला व त्याने वर स्वर्गाकडे पाहून परमेश्वराचे गौरव बघितले आणि येशू परमेश्वराच्या उजवीकडे उभे आहेत असे त्याला दिसले. तो म्हणाला, “पाहा, मी स्वर्ग उघडलेला आणि मानवपुत्र परमेश्वराच्या उजवीकडे उभे असलेले मला दिसत आहे.” मग त्यांनी त्यांचे हात त्यांच्या कानांवर ठेऊन मोठ्याने आरोळ्या मारल्या आणि त्याच्या अंगावर तुटून पडले, त्यांनी स्तेफनाला शहराबाहेर ओढीत नेले आणि त्याला धोंडमार करू लागले. त्याचवेळी, इकडे साक्षीदारांनी काढून ठेवलेले त्यांचे अंगरखे शौल म्हटलेल्या एका तरुण माणसाच्या पायाजवळ ठेवले होते. ते स्तेफनाला दगडमार करीत असताना, स्तेफनाने प्रार्थना केली, “प्रभू येशू, माझ्या आत्म्याचा स्वीकार करा.” आणि मग गुडघ्यावर टेकून मोठ्याने ओरडून म्हणाला, “हे प्रभू, हे पाप त्यांच्या हिशेबी धरू नका.” असे बोलल्यानंतर तो मरण पावला.
प्रेषितांची कृत्ये 7:51-60 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
अहो ‘ताठ मानेच्या’ आणि ‘हृदयांची व कानांची सुंता न झालेल्या लोकांनो,’ तुम्ही तर ‘पवित्र आत्म्याला’ सर्वदा ‘विरोध करता;’ जसे तुमचे पूर्वज तसेच तुम्हीही. ज्याचा पाठलाग तुमच्या पूर्वजांनी केला नाही असा संदेष्ट्यांमध्ये कोणी झाला का? ज्यांनी त्या नीतिमान पुरुषाच्या आगमनाविषयी पूर्वी सांगितले त्यांना त्यांनी जिवे मारले; आणि आता त्याला धरून देणारे व जिवे मारणारे तुम्ही निघाला आहात. अशा तुम्हांला देवदूतांच्या योगे योजलेले नियमशास्त्र प्राप्त झाले होते; पण तुम्ही ते पाळले नाही.” त्याचे हे भाषण ऐकणार्यांच्या अंतःकरणास इतके झोंबले की ते त्याच्यावर दातओठ खाऊ लागले. परंतु पवित्र आत्म्याने पूर्ण होऊन त्याने आकाशाकडे निरखून पाहिले तेव्हा देवाचे तेज व देवाच्या उजवीकडे येशू उभा असलेला त्याच्या दृष्टीस पडला; आणि त्याने म्हटले, “पाहा, आकाश उघडलेले व मनुष्याचा पुत्र देवाच्या उजवीकडे उभा असलेला मला दिसत आहे.” तेव्हा ते मोठ्याने ओरडून व कान बंद करून एकजुटीने त्याच्या अंगावर धावून गेले. मग ते त्याला शहराबाहेर घालवून दगडमार करू लागले; आणि साक्षीदारांनी आपली वस्त्रे शौल नावाच्या एका तरुणाच्या पायांजवळ ठेवली. ते दगडमार करत असता स्तेफन प्रभूचा धावा करत म्हणाला, “हे प्रभू येशू, माझ्या आत्म्याचा स्वीकार कर.” मग गुडघे टेकून तो मोठ्याने ओरडला, “हे प्रभू, हे पाप त्यांच्याकडे मोजू नकोस.” असे बोलून तो झोपी गेला.
प्रेषितांची कृत्ये 7:51-60 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
स्तेफन पुढे म्हणाला, “अहो ताठ मानेच्या आणि हृदयाची व कानांची सुंता न झालेल्या लोकांनो, तुम्ही तर पवित्र आत्म्याला नेहमी विरोध करता. जसे तुमचे पूर्वज, तसेच तुम्हीही. ज्याचा छळ तुमच्या पूर्वजांनी केला नाही, असा संदेष्ट्यांमध्ये कोणी झाला का? ज्यांनी त्या नीतिमान सेवकाच्या आगमनाविषयी पूर्वी सांगितले, त्यांना तुमच्या पूर्वजांनी ठार मारले आणि आता तुम्ही प्रत्यक्ष त्याला धरून देणारे व ठार मारणारे निघाला आहात. तुम्हांला देवदूतांच्याद्वारे नियमशास्त्र देण्यात आले होते, पण तुम्ही ते पाळले नाही.” त्याचे हे भाषण न्यायसभेच्या सदस्यांच्या अंतःकरणाला इतके झोंबले की, ते त्याच्यावर दातओठ खाऊ लागले. परंतु पवित्र आत्म्याने परिपूर्ण होऊन स्तेफनने आकाशाकडे पाहिले, तेव्हा देवाचे वैभव व देवाच्या उजवीकडे येशू उभा असलेला त्याच्या दृष्टीस पडला. स्तेफन म्हणाला, “पाहा, आकाश उघडलेले व मनुष्याचा पुत्र देवाच्या उजवीकडे उभा असलेला मला दिसत आहे!” ते मोठ्याने ओरडून व कान झाकून एकजुटीने त्याच्या अंगावर धावून गेले. ते त्याला शहराबाहेर घालवून दगड मारू लागले, साक्षीदारांनी त्यांचे कपडे शौल नावाच्या एका तरुणाच्या पायांजवळ ठेवले होते. ते दगड मारत असताना स्तेफन प्रभूचा धावा करत म्हणाला, “हे प्रभो येशू, माझ्या आत्म्याचा स्वीकार कर.” त्यानंतर गुडघे टेकून त्याने आर्त विनवणी केली, “हे प्रभो, हे पाप त्यांच्या लेखी मोजू नकोस!” ह्या प्रार्थनेनंतर त्याने प्राण सोडला.