प्रेषितांची कृत्ये 7:17-29
प्रेषितांची कृत्ये 7:17-29 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मग देवाने अब्राहामाला जे अभिवचन दिले होते ते पूर्ण होण्याचा समय जसजसा जवळ आला, तसतसे ते लोक मिसर देशात वाढून संख्येने पुष्कळ झाले. योसेफाची माहिती नसलेला असा दुसरा राजा मिसर देशाच्या गादीवर बसेपर्यंत असे चालले. हाच राजा आपल्या लोकांबरोबर कपटाने वागला आणि त्यांची बालके जगू नयेत, म्हणून ती बाहेर टाकून देण्यास त्याने त्यांना भाग पाडले असे त्याने आपल्या पूर्वजांना छळले. त्या काळात मोशेचा जन्म झाला, तो देवाच्या दृष्टीने अतिशय सुंदर होता; त्याचे पालनपोषण तीन महिने पर्यंत त्याच्या पित्याच्या घरी झाले. मग त्यास बाहेर टाकून देण्यात आले असता, फारोच्या कन्येने त्यास घेउन आपला मुलगा म्हणून त्यास वाढवले. मोशेला मिसरी लोकांचे सर्व ज्ञान शिकला; आणि तो भाषणात व कामात पराक्रमी होता. मग तो जवळ जवळ चाळीस वर्षाचा झाला, तेव्हा आपले बांधव म्हणजे इस्राएलाचे संतान ह्यांची भेट घ्यावी असे त्याच्या मनात आले. तेव्हा मोशेने इस्राएलातील कोणाएकावर अन्याय होत आहे, असे पाहून या जाचलेल्या मनुष्याचा कैवार घेतला आणि मिसऱ्याला मारून त्याचा सूड घेतला: तेव्हा देव त्याच्या हातून त्याच्या बांधवाची सुटका करत आहे हे त्यांना समजले असेल असे त्यास वाटले होते, पण ते त्यांना समजले नाही. मग दुसऱ्या दिवशी कोणी इस्राएली भांडत असता तो त्यांच्यापुढे आला व त्यांचा समेट करू लागला; तो म्हणाला, ‘गृहस्थांनो, तुम्ही बांधव; आहात एकमेकांवर अन्याय का करता?’ तेव्हा जो आपल्या शेजाऱ्यावर अन्याय करत होता, तो त्यास ढकलून देऊन म्हणाला, ‘तुला आमच्यावर अधिकारी व न्यायाधीश कोणी केले? काल तू मिसऱ्याला ठार मारले, तसे मलाही मारायला पाहतोस काय?’ हे शब्द ऐकताच मोशे पळून गेला आणि मिद्यान देशात परदेशी होऊन राहिला; तेथे त्यास दोन पुत्र झाले.
प्रेषितांची कृत्ये 7:17-29 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
“अब्राहामाला दिलेले परमेश्वराचे वचन पूर्ण करण्याचा काळ जवळ आला, त्यावेळेस इजिप्तमध्ये आपल्या लोकांची संख्या खूपच झपाट्याने वाढलेली होती. नंतर ‘एक नवीन राजा इजिप्तच्या गादीवर आला. त्याच्या दृष्टीने योसेफ कोणीही नव्हता.’ हा राजा आपल्या लोकांशी दगाबाजीने व निष्ठुरपणाने वागला व त्याने त्यांची नवजात बालके जगू नयेत, म्हणून त्यांना बाहेर फेकण्यास भाग पाडले. “याच सुमारास मोशेचा जन्म झाला आणि तो असाधारण बालक होता. तीन महिने त्याच्या घरातील लोकांनी त्याची काळजी घेतली, त्याला बाहेर ठेवले असताना, फारोहच्या कन्येने त्याला घेतले आणि स्वतःचा पुत्र म्हणून त्याचे पालनपोषण करून त्याला वाढवले. मोशेला इजिप्तमधील सर्व विद्यांचे शिक्षण मिळाले व तो एक प्रभावी वक्ता आणि कृतीतही प्रभावी झाला. “जेव्हा मोशे चाळीस वर्षाचा झाला, त्यावेळी त्याने आपल्या इस्राएली बांधवांना भेटण्याचे मनात ठरविले. तिथे त्याने पाहिले की, एका इस्राएली मनुष्यास इजिप्तचा मनुष्य अन्यायाने वागवित आहे, म्हणून मोशेने त्याचे रक्षण करण्यास त्या इजिप्तच्या माणसाची हत्या करून त्याचा सूड घेतला. मोशेला वाटले की त्याच्या बांधवांस समजेल की परमेश्वर त्यांची सुटका करण्यासाठी त्याचा उपयोग करून घेत आहे, परंतु ते त्यांना समजले नाही. दुसर्या दिवशी मोशेला दोन इस्राएली माणसे एकमेकांशी भांडताना दिसले. त्यांचा समेट करीत तो त्यांना म्हणाला, ‘गृहस्थांनो, तुम्ही भाऊबंद आहात; तुम्ही एकमेकांबरोबर का भांडत आहात?’ “परंतु जो मनुष्य दुसर्यावर अन्याय करीत होता, त्याने मोशेला बाजूला होण्यास सांगितले. ‘तुला आमच्यावर अधिकारी व न्यायाधीश कोणी नेमले? काल जसे तू इजिप्त देशाच्या मनुष्याला मारून टाकलेस, तसे मलाही ठार करणार आहेस काय?’ जेव्हा मोशेने हे ऐकले तेव्हा तो मिद्यानी लोकांच्या देशात पळून गेला व तिथे तो परकीय म्हणून राहिला आणि तिथे त्याला दोन पुत्र झाले.
प्रेषितांची कृत्ये 7:17-29 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
मग देवाने अब्राहामाला जे अभिवचन दिले होते ते पूर्ण होण्याचा समय जसजसा जवळ आला तसतसे ते लोक मिसर देशात ‘वाढून संख्येने पुष्कळ झाले. योसेफाची माहिती नसलेला असा दुसरा राजा मिसर देशाच्या गादीवर बसेपर्यंत’ असे चालले. तो राजा आपल्या ‘लोकांबरोबर कपटाने वागला’ आणि त्यांची बालके ‘जगू’ नयेत म्हणून ती बाहेर टाकून देण्यास त्याने त्यांना भाग पाडले; असे त्याने आपल्या पूर्वजांना ‘छळले’. त्याच काळात मोशेचा जन्म झाला. तो देवाच्या दृष्टीने अतिशय सुंदर होता; त्याचे पालनपोषण ‘तीन महिनेपर्यंत’ त्याच्या पित्याच्या घरी झाले; मग त्याला बाहेर टाकून देण्यात आले असता फारोच्या कन्येने त्याला घेऊन आपला पुत्र म्हणून त्याचे संगोपन केले. मोशेला मिसरी लोकांच्या सर्व विद्यांचे शिक्षण मिळाले आणि तो भाषणात व कृतीत पराक्रमी होता. मग तो जवळ जवळ चाळीस वर्षांचा झाला तेव्हा ‘आपले बांधव म्हणजे इस्राएलाचे संतान’ ह्यांची भेट घ्यावी असे त्याच्या मनात आले. तेव्हा मोशेने त्यांच्यातील कोणाएकावर अन्याय होत आहे असे पाहून ह्या जाचलेल्या माणसाचा कैवार घेतला आणि ‘मिसर्याला मारून’ त्याचा सूड उगवला. तेव्हा देव त्याच्या हातून त्याच्या बांधवांची सुटका करत आहे हे त्यांना समजले असेल असे त्याला वाटले होते, पण ते त्यांना समजले नाही. मग दुसर्या दिवशी कोणी भांडत असता तो त्यांच्यापुढे येऊन उभा राहिला व त्यांची समजूत घालण्याकरता त्यांना म्हणाला, ‘गृहस्थांनो, तुम्ही भाऊबंद आहात; एकमेकांवर अन्याय का करता?’ तेव्हा ‘जो आपल्या शेजार्यावर अन्याय करत होता तो’ त्याला ढकलून देऊन म्हणाला, ‘तुला आमच्यावर अधिकारी व न्यायाधीश कोणी केले? काल तू मिसर्याला ठार मारले तसे मलाही मारायला पाहतोस काय?’ हे शब्द ऐकताच मोशे परत गेला आणि मिद्यान देशात उपरा झाला; तेथे त्याला दोन मुलगे झाले.
प्रेषितांची कृत्ये 7:17-29 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
देवाने अब्राहामला जे अभिवचन दिले होते ते पूर्ण होण्याची वेळ जसजशी जवळ आली तसतशी त्या लोकांची मिसर देशातील संख्या वाढली. योसेफची माहिती नसलेला दुसरा राजा मिसर मध्ये राज्य करु लागेपर्यंत असे चालले. तो राजा आपल्या लोकांबरोबर कपटाने वागला आणि त्याने त्यांचे लहान मुलगे जगू नयेत म्हणून त्यांना टाकून देण्यास त्यांना भाग पाडले. अशा प्रकारे त्याने आपल्या पूर्वजांना छळले. ह्याच राजाच्या काळात मोशेचा जन्म झाला. तो देवाच्या दृष्टीने अतिशय सुंदर होता. तीन महिनेपर्यंत त्याचे पालनपोषण त्याच्या वडिलांच्या घरी झाले. मग त्याला बाहेर टाकून देण्यात आले असता फारोच्या कन्येने त्याला घेऊन आपला मुलगा म्हणून त्याचे संगोपन केले. मोशेला मिसरी लोकांच्या सर्व विद्यांचे शिक्षण मिळाले आणि तो भाषणात व कृतीत पराक्रमी झाला. तो चाळीस वर्षांचा झाला, तेव्हा आपले बांधव म्हणजे इस्राएली लोक ह्यांची भेट घ्यावी, असे त्याच्या मनात आले. मोशेने त्यांतील कोणा एकावर एका मिसरी माणसाच्या हातून अन्याय होत असलेला पाहून त्या माणसाचा कैवार घेतला आणि मिसरी माणसाला ठार करून त्याचा सूड उगवला. देव त्याच्या हाताने त्याच्या बांधवांची सुटका करणार आहे, हे त्यांना समजेल असे त्याला वाटले होते, पण ते त्यांना समजले नाही. दुसऱ्या दिवशी दोन इस्राएली माणसे आपसात भांडत असता तो त्यांच्यापुढे येऊन उभा राहिला व त्यांची समजूत घालण्याकरता त्यांना म्हणाला, “तुम्ही भाऊबंद आहात. एकमेकांवर अन्याय का करता?’ तेव्हा जो आपल्या सहकाऱ्यावर अन्याय करत होता, तो त्याला ढकलून देऊन म्हणाला, ‘तुला आमच्यावर अधिकारी व न्यायाधीश म्हणून कोणी नेमले? काल तू मिसरी माणसाला ठार मारले, तसे मलाही मारावयाला पाहतोस काय?’ हे शब्द ऐकताच मोशे पळून गेला आणि मिद्यान लोकांच्या देशात उपरी झाला. तेथे त्याला दोन मुलगे झाले.