प्रेषितांची कृत्ये 28:23-30
प्रेषितांची कृत्ये 28:23-30 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तेव्हा त्यांनी त्याला एक दिवस नेमून दिल्यावर त्या दिवशी पुष्कळ लोक त्याच्या बिर्हाडी आले; त्यांना देवाच्या राज्याविषयी साक्ष देण्याकरता आणि येशूविषयी मोशेच्या नियमशास्त्रावरून व संदेष्ट्यांच्या लेखांवरून खातरी करण्याकरता तो सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्या विषयाची फोड करत होता. त्याने जे सांगितले त्यावरून कित्येकांची खातरी झाली तर कित्येक विश्वास ठेवीनात. त्यांचे आपसांत एकमत न झाल्यामुळे ते उठून जाऊ लागले, तेव्हा पौलाने त्यांना एक वचन सांगितले : “पवित्र आत्मा यशया संदेष्ट्याच्या द्वारे तुमच्या पूर्वजांबरोबर बोलला ते ठीक बोलला; ते असे की, ‘ह्या लोकांकडे जाऊन सांग की, तुम्ही ऐकाल तर खरे, परंतु तुम्हांला समजणार नाही; व पाहाल तर खरे, परंतु तुम्हांला दिसणार नाही; कारण ह्या लोकांचे अंतःकरण जड झाले आहे; ते कानांनी मंद ऐकतात; आणि त्यांनी आपले डोळे मिटून घेतले आहेत; ह्यासाठी की, त्यांनी डोळ्यांनी पाहू नये, कानांनी ऐकू नये, मनाने समजू नये, त्यांनी वळू नये, आणि मी त्यांना बरे करू नये.’ म्हणून तुम्हांला ठाऊक असो की, ‘हे देवाने सिद्ध केलेले तारण परराष्ट्रीयांकडे’ पाठवले आहे; आणि ते ते श्रवण करतील.” [तो असे बोलल्यावर यहूदी आपसांत बराच वादविवाद करत निघून गेले.] तो आपल्या भाड्याच्या घरात पुरी दोन वर्षे राहिला, आणि जे त्याच्याकडे येत असत त्या सर्वांचे तो स्वागत करत असे.
प्रेषितांची कृत्ये 28:23-30 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
तेव्हा यहूदी लोकांनी एक बैठकीचा दिवस ठरवला, जेथे पौल राहत होता, तेथे ते मोठ्या संख्येने जमा झाले, तेव्हा पौलाने त्यांना समजावून सांगितले आणि देवाच्या राज्याविषयी आपली साक्ष दिली, मोशेच्या नियमशास्त्रापासून आणि संदेष्ट्यांच्यापासून फोड करून येशूविषयी त्यांची खात्री पटविण्याचा प्रयत्न केला, हे तो सकाळपासून संध्याकाळपर्यंत करीत होता. त्याने फोड करून सांगितलेल्या गोष्टीविषयी काही जणांची खात्री पटली, तर काहींनी तो बोलत असलेल्या गोष्टीवर विश्वास ठेवला नाही. पौल पुढील एक गोष्ट बोलला, त्यावरून मतभेद होऊन त्यांच्यापैकी काहीजण उठले आणि तेथून जाऊ लागले, पौल म्हणाला, “यशया संदेष्टयांच्या द्वारे पवित्र आत्मा आपल्या वाडवडिलांशी जे बोलला, ते खरोखरच किती खरे आहे! यशया म्हणाला होता.” या लोकांकडे तुम्ही जा आणि त्यांना सांगाः तुम्ही ऐकाल तर खरेपण तुम्हास समजणार नाही, तुम्ही पहाल तुम्हास दिसेल पण तुम्ही काय पाहत ते तुम्हास कळणार नाही. कारण या लोकांचे अंतःकरण जड झाले आहेत त्याच्या कानांनी त्यांना ऐकू येत नाही आणि त्यांनी आपले डोळे बंद केले आहेत नाही तर त्यांनी आपल्या डोळ्यांनी पाहिले असते आणि आपल्या कानांनी ऐकले असते आणि माझ्याकडे वळले असते आणि मी त्यांना बरे केले असते. म्हणून देवाचे हे तारण परराष्ट्रीयांकडे लोकांकडे पाठविण्यात आले आहे, हे तुम्हा यहूदी लोकांस कळावे, ते ऐकतील. तो असे बोलल्यावर यहूदी आपल्यामध्ये फार विवाद करीत निघाले. पूर्ण दोन वर्षे तो त्याच्या भाड्याच्या घरात राहिला, जे त्यास भेटायला येत, त्यांचे तो स्वागत करी.
प्रेषितांची कृत्ये 28:23-30 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
तेव्हा पौलाला भेटण्यासाठी त्यांनी एक दिवस ठरवला आणि फार मोठ्या संख्येने तो राहत होता त्याठिकाणी आले. तो सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत, धर्मशास्त्रातून म्हणजे मोशेचे नियमशास्त्र व संदेष्ट्यांचे ग्रंथ यामधून परमेश्वराच्या राज्याविषयी आणि येशूंविषयी शिक्षण देऊन प्रमाण पटवीत राहिला. ऐकणार्यांपैकी काहींनी खात्रीपूर्वक विश्वास ठेवला, परंतु काहींनी ठेवला नाही. त्यांचे आपआपसात एकमत होत नव्हते व पौलाचे शेवटचे निवेदन ऐकल्यावर ते उठून जाऊ लागले: यशया संदेष्टा म्हणाला की, “पवित्र आत्म्याने तुमच्या पूर्वजांना सत्य सांगितले ते असे की: “ ‘या लोकांकडे जा आणि त्यांना सांग, “ते कानांनी ऐकत असले, तरी त्यांना काही समजणार नाही; तुम्ही पाहत राहाल पण तुम्हाला त्याचे ज्ञान होणार नाही.” कारण या लोकांचे हृदय कठीण झाले आहे; त्यांना कानाने क्वचितच ऐकू येते, आणि त्यांनी डोळे मिटून घेतले आहेत. अन्यथा ते आपल्या डोळ्यांनी पाहतील, कानाने ऐकतील, हृदयाने समजून घेतील व माझ्याकडे वळतील व मी त्यांना बरे करीन.’ “म्हणून तुम्हाला हे माहीत व्हावे की परमेश्वरापासून लाभणारे तारण गैरयहूदीयांसाठी देखील आहे व ते त्याचा स्वीकार करतील!” हे त्याने म्हटल्यानंतर, यहूदी जोरदारपणे त्यांच्यातच वादविवाद करून निघून गेले. पौल पुढे दोन वर्षापर्यंत भाड्याच्या घरात राहिला आणि तेथेच त्याला भेटण्यास येणार्यांचे तो स्वागत करीत असे.
प्रेषितांची कृत्ये 28:23-30 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
म्हणून त्यांनी त्याला एक दिवस नेमून दिल्यावर त्या दिवशी पुष्कळ लोक त्याच्या मुक्कामी आले. त्यांना देवाच्या राज्याविषयी साक्ष देण्याकरता आणि येशूविषयी मोशेच्या नियमशास्त्रावरून व संदेष्ट्यांच्या लेखांवरून त्यांची खातरी करण्याकरता तो सकाळपासून संध्याकाळपर्यंत स्पष्टीकरण करत होता. त्याने जे सांगितले त्यावरून कित्येकांची खातरी झाली तर काही लोकांनी विश्वास ठेवला नाही. त्यांचे आपसात एकमत न झाल्यामुळे ते उठून जाऊ लागले, तेव्हा पौलाने त्यांना एक वचन सांगितले: “पवित्र आत्मा यशया संदेष्ट्याद्वारे तुमच्या पूर्वजांबरोबर बोलला ते ठीक बोलला. ते असे की, ह्या लोकांकडे जाऊन सांग की, ‘तुम्ही ऐकाल तर खरे, परंतु तुम्हांला समजणार नाही व पाहाल तर खरे, परंतु तुम्हांला आकलन होणार नाही. कारण ह्या लोकांचे अंतःकरण जड झाले आहे. ते कानांनी मंद ऐकतात आणि त्यांनी आपले डोळे मिटून घेतले आहेत, ह्यासाठी की, त्यांनी डोळ्यांनी पाहू नये, कानांनी ऐकू नये, मनाने समजू नये, त्यांचे परिवर्तन होऊ नये आणि मी त्यांना बरे करू नये’. म्हणून तुम्हांला ठाऊक असू द्या की, देवाने सिद्ध केलेल्या तारणाचा संदेश यहुदीतरांकडे पाठवला आहे आणि ते तो ऐकतील.” तो असे बोलल्यावर यहुदी लोक आपसात बराच वादविवाद करत निघून गेले. पौल आपल्या भाड्याच्या घरात पूर्ण दोन वर्षे राहिला आणि जे त्याच्याकडे येत असत, त्या सर्वांचे तो स्वागत करत असे.