प्रेषितांची कृत्ये 28:1-31
प्रेषितांची कृत्ये 28:1-31 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
जेव्हा आमचे पाय सुखरुपपणे तेथील जमीनीला लागले, तेव्हा आम्हास कळले की, त्या बेटाचे नाव मिलिता असे आहे. तेथील रहिवाश्यांनी आम्हास अतिशय ममतेने वागविले, त्यांनी एक शेकोटी पेटविली आणि आमचे स्वागत केले, कारण पाऊस पडू लागाला होता व थंडीही होती. पौलाने काटक्या गोळा केल्या आणि ते त्या शेकोटीत टाकू लागला, उष्णतेमुळे तेथून एक साप निघाला आणि त्याने पौलाच्या हाताला विळखा घातला. ते पाहून तेथील रहिवाशी एकमेकांना म्हणू लागले, “हा मनुष्य खुनी असला पाहिजे, समुद्रातून जरी हा वाचला असला तरी न्यायदेवताही याला जगू देत नाही.” परंतु पौलाने तो प्राणी शेकोटीत झटकून टाकला आणि पौलाला काही अपाय झाला नाही. त्या बेटावरील लोकांस पौलाचे अंग सुजून येईल किंवा पौल एकाएकी मरून पडेल असे वाटत होते, बराच वेळ वाट पाहूनही पौलाला काहीही विकार झाल्याचे दिसेना, तेव्हा त्या लोकांचे विचार पालटले आणि पौल देवच आहे असे ते म्हणू लागले. तेथून जवळच पुब्ल्य नावाच्या मनुष्याची शेती होती, पुब्ल्य हा त्या बेटाचा मुख्य अधिकारी होता, त्याने आम्हा सर्वांचे त्याच्या घरी स्वागत केले आणि तीन दिवस आमचा चांगला पाहुणचार केला. पुब्ल्याचे वडील तापाने व पोट खराब असल्यामुळे आजारी होते, त्यामुळे अंथरुणाला खिळून होते, पौल त्या आजारी व्यक्तीला भेटायला गेला प्रार्थना करून पौलाने आपला हात त्याच्यावर ठेवला आणि त्या मनुष्यास बरे केले. हे घडलेले पाहिल्यावर त्या बेटावरील इतर आजारी लोक पौलाकडे आले आणि बरे झाले. त्यांनी आम्हास सन्मानपूर्वक पुष्कळ वस्तू भेटीदाखल दिल्या आणि जेव्हा आम्ही परत प्रवासास निघालो तेव्हा आम्हास लागणाऱ्या अनेक गोष्टी पुरविल्या. आम्ही तेथे हिवाळ्यात राहिल्यावर आलेक्सांद्रा शहरातील एका जहाजातून पुढील प्रवासास निघालो, ते जहाज त्या बेटावर हिवाळाभर मुक्कामाला होते, त्या जहाजाच्या समोरील बाजूस जुळ्या भावाचे चिन्ह होते. मग आम्ही सुराकूस येथे जाऊन पोहचलो आणि तेथे तीन दिवस राहिलो. तेथून शिडे उभारून आम्ही निघालो आणि रेगियोन नगराला गेलो, तेथे एक दिवस मुक्काम केला, नंतर दक्षिणेकडील वारा सुटल्यावर दुसऱ्या दिवशी पुत्युलास गेलो. त्या शहरात आम्हास काही बंधुजन भेटले, त्यांच्या सांगण्यावरून आम्ही तेथे सात दिवस राहिलो, मग आम्ही रोम येथे जाऊन पोहचलो. तेथील बंधूनी आमच्याबद्दलची वार्ता ऐकली होती, ते आमच्या भेटीसाठी अप्पियाच्या बाजारपेठेपर्यंत आणि तीन धर्मशाळेपर्यंत आले, पौलाची त्यांची भेट झाल्यावर त्याने देवाचे उपकार मानले व त्यास धीर आला. आम्ही रोम येथे पोहोंचल्यावर पौलाला एकटे राहायला परवानगी मिळाली, परंतु त्याच्यावर देखरेख करण्यासाठी एक शिपाई ठेवण्यात आला. तीन दिवसानंतर पौलाने सर्व यहूदी पुढाऱ्यांना एकत्र बोलावले, जेव्हा सर्वजण जमा झाले तेव्हा पौल त्यांना म्हणाला, “बंधूंनो, आपल्या बांधवांविरुद्ध मी काहीही केलेले नाही, तरी मला यरूशलेम येथे पकडून रोमी लोकांच्या हाती कैदी म्हणून देण्यात आले. आणि जेव्हा त्यांनी माझी चौकशी केली, तेव्हा त्यांची मला सोडून देण्याची इच्छा होती, कारण मरणदंडाला योग्य असा कोणताही गुन्हा मी केला नव्हता. परंतु यहूदी लोकांनी जेव्हा माझ्या सुटकेला हरकत घेतली, तेव्हा कैसराकडे न्याय मागणे मला भाग पडले, याचा अर्थ असा नाही की, यहूदी लोकांविरुद्ध मला दोषारोप करण्याची इच्छा आहे. या कारणासाठी तुम्हास भेटण्याची आणि तुमच्याशी बोलण्याची मी इच्छा दाखविली, कारण इस्राएलाच्या आशेच्या निष्ठेमुळेच मी या साखळ्यांनी जखडलो गेलो आहे.” यहूदी पुढारी पौलाला म्हणाले, “आम्हास तुमच्याबाबत यहूदीयाहून कसलेही पत्र आलेले नाही, अगर तिकडून येणाऱ्या बंधुजनांपैकी एकाही भावाने तुमच्याविषयी वाईट कळविले अथवा बोललेले नाही.” परंतु तुमची मते काय आहेत हे समजून घेण्याची आमची इच्छा आहे, कारण या गटाविरुद्ध सगळीकडे लोक बोलतात हे आम्हास माहीत आहे. तेव्हा यहूदी लोकांनी एक बैठकीचा दिवस ठरवला, जेथे पौल राहत होता, तेथे ते मोठ्या संख्येने जमा झाले, तेव्हा पौलाने त्यांना समजावून सांगितले आणि देवाच्या राज्याविषयी आपली साक्ष दिली, मोशेच्या नियमशास्त्रापासून आणि संदेष्ट्यांच्यापासून फोड करून येशूविषयी त्यांची खात्री पटविण्याचा प्रयत्न केला, हे तो सकाळपासून संध्याकाळपर्यंत करीत होता. त्याने फोड करून सांगितलेल्या गोष्टीविषयी काही जणांची खात्री पटली, तर काहींनी तो बोलत असलेल्या गोष्टीवर विश्वास ठेवला नाही. पौल पुढील एक गोष्ट बोलला, त्यावरून मतभेद होऊन त्यांच्यापैकी काहीजण उठले आणि तेथून जाऊ लागले, पौल म्हणाला, “यशया संदेष्टयांच्या द्वारे पवित्र आत्मा आपल्या वाडवडिलांशी जे बोलला, ते खरोखरच किती खरे आहे! यशया म्हणाला होता.” या लोकांकडे तुम्ही जा आणि त्यांना सांगाः तुम्ही ऐकाल तर खरेपण तुम्हास समजणार नाही, तुम्ही पहाल तुम्हास दिसेल पण तुम्ही काय पाहत ते तुम्हास कळणार नाही. कारण या लोकांचे अंतःकरण जड झाले आहेत त्याच्या कानांनी त्यांना ऐकू येत नाही आणि त्यांनी आपले डोळे बंद केले आहेत नाही तर त्यांनी आपल्या डोळ्यांनी पाहिले असते आणि आपल्या कानांनी ऐकले असते आणि माझ्याकडे वळले असते आणि मी त्यांना बरे केले असते. म्हणून देवाचे हे तारण परराष्ट्रीयांकडे लोकांकडे पाठविण्यात आले आहे, हे तुम्हा यहूदी लोकांस कळावे, ते ऐकतील. तो असे बोलल्यावर यहूदी आपल्यामध्ये फार विवाद करीत निघाले. पूर्ण दोन वर्षे तो त्याच्या भाड्याच्या घरात राहिला, जे त्यास भेटायला येत, त्यांचे तो स्वागत करी. त्याने देवाच्या राज्याविषयी प्रचार केला, त्याने प्रभू येशूविषयी शिक्षण दिले, तो हे काम फार धैर्याने करीत असे आणि कोणीही त्यास बोलण्यात अडवू शकले नाही.
प्रेषितांची कृत्ये 28:1-31 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
किनार्यावर सुरक्षित पोहोचल्यावर, आम्हाला समजले की त्या बेटाचे नाव मलता असे होते. त्या बेटावरील लोकांनी आम्हाला असाधारण दया दाखविली. त्यांनी आमच्यासाठी शेकोटी पेटवून आमचे स्वागत केले कारण पाऊस असून थंडी पडली होती. तेव्हा पौलाने काटक्या आणून शेकोटीवर ठेवल्या, इतक्यात उष्णता झाल्यामुळे एक विषारी साप बाहेर निघाला व पौलाच्या हाताला विळखा घालून राहिला. त्या बेटावरील लोकांनी त्या सर्पाला त्याच्या हाताला झोंबलेले पाहिले, तेव्हा ते एकमेकास म्हणाले, “हा मनुष्य खात्रीने खुनी असला पाहिजे; तो जरी समुद्रातून वाचला, तरी न्याय देवी त्याला जगू देणार नाही.” परंतु पौलाने तो साप झटकून अग्नीत टाकला आणि त्याला काहीच इजा झाली नाही. आता पौल सुजेल किंवा तत्काळ मरून पडेल अशी लोकांची अपेक्षा होती; परंतु पुष्कळ वेळ वाट पाहिल्यानंतर, काही विशेष झाले नाही हे दिसल्यावर, त्यांनी आपले मन बदलले आणि तो परमेश्वर असावा असे म्हणाले. जवळच त्या बेटाच्या पुबल्य नावाच्या मुख्याधिकाऱ्याची मालमत्ता होती. त्याने त्याच्या घरी आमचे स्वागत केले आणि तीन दिवस आदरातिथ्य केले. त्याचे वडील बिछान्यावर तापाने व जुलाबाने आजारी होते. पौल त्याला पाहावयास गेला आणि प्रार्थना केल्यानंतर त्याचे हात त्याच्यावर ठेऊन त्याला बरे केले. हे घडून आल्यावर, बेटावरील इतर आजारी माणसे त्याच्याकडे आली आणि बरी होऊन गेली. अनेक प्रकारे त्यांनी आमचा सन्मान केला आणि जेव्हा आम्ही समुद्रप्रवासाला निघण्यास तयार झालो, त्यांनी आम्हाला लागणार्या सर्व आवश्यक गोष्टींचा पुरवठा केला. तीन महिन्यानंतर आलेक्सांद्रियाचे जहाज हिवाळ्यासाठी थांबले होते त्याने आम्ही प्रवास सुरू केला. त्यावर त्याची निशाणी क्यास्टर व पोलक या जुळ्या दैवतांची मूर्ती बसवलेली होती. सुराकूस येथे आम्ही तीन दिवस राहिलो. तिथून आम्ही निघालो आणि रेगियमला पोहोचलो. दुसर्या दिवशी दक्षिणेकडील वारा वाहू लागल्यावर, तिथून आम्ही निघालो व एका दिवसाच्या प्रवासानंतर पुत्युलास जाऊन पोहोचलो. तिथे आम्हाला काही विश्वासी आढळले आणि त्यांनी आम्हाला त्यांच्याबरोबर एक आठवडाभर राहण्याची विनंती केली. मग आम्ही रोमला आलो. तेथील बंधुजनांनी आम्ही येणार असे ऐकले आणि ते प्रवास करून अप्पियाची पेठ व तीन उतार शाळा या ठिकाणी आम्हाला येऊन भेटले. त्यांना पाहून पौलाने परमेश्वराचे आभार मानले आणि त्याला प्रोत्साहन प्राप्त झाले. पुढे आम्ही रोममध्ये आल्यानंतर, पौलाला एकटे राहण्याची परवानगी देण्यात आली, मात्र पहारा करणारा एक सैनिक त्याच्याबरोबर असे. तीन दिवसानंतर पौलाने स्थानिक यहूदी पुढार्यांना एकत्र बोलाविले. ते आल्यावर तो म्हणाला: “माझ्या बंधूंनो, मी आपल्या लोकांविरुद्ध किंवा आपल्या पूर्वजांच्या रूढींचे उल्लंघन केलेले नाही, तरी यरुशलेममध्ये मला बंदिवान करून रोमी सरकारच्या हवाली केले. रोमी लोकांनी माझी तपासणी केली आणि मला सोडून देण्याची त्यांची इच्छा होती, कारण मरणदंडास पात्र असा गुन्हा मी केलेला नव्हता. परंतु यहूद्यांनी माझ्या सुटकेला विरोध केल्यामुळे, कैसराजवळ न्याय मागण्याशिवाय मला दुसरा पर्यायच राहिला नाही. मला खरोखरच माझ्या लोकांविरुद्ध आरोप करावयाचे नव्हते या कारणामुळे मी तुम्हाला आज येथे येण्याची विनंती केली की आपली प्रत्यक्ष भेट घ्यावी व आपल्याबरोबर बोलावे. कारण मी इस्राएलाच्या आशेमुळे या साखळीने बांधलेला आहे.” तेव्हा त्यांनी उत्तर दिले, “तुमच्यासंबंधात आम्हाला यहूदीयातून पत्रेही आली नाहीत आणि तिथून आलेल्या आमच्या बांधवांकडून काही अहवाल कळविण्यात आला नाही परंतु आम्हाला तुमचे विचार ऐकायला हवे आहेत, कारण या पंथाच्या विरुद्ध सर्वत्र लोक बोलत आहेत.” तेव्हा पौलाला भेटण्यासाठी त्यांनी एक दिवस ठरविला आणि फार मोठ्या संख्येने तो राहत होता त्या ठिकाणी आले. तो सकाळपासून संध्याकाळपर्यंत, धर्मशास्त्रातून म्हणजे मोशेचे नियमशास्त्र व संदेष्ट्यांचे ग्रंथ यामधून परमेश्वराच्या राज्याविषयी आणि येशूंविषयी शिक्षण देऊन प्रमाण पटवीत राहिला. ऐकणार्यांपैकी काहींनी खात्रीपूर्वक विश्वास ठेवला, परंतु काहींनी ठेवला नाही. त्यांचे एकमेकात एकमत होत नव्हते व पौलाचे शेवटचे निवेदन ऐकल्यावर ते उठून जाऊ लागले: पवित्र आत्म्याद्वारे यशायाह संदेष्ट्याने तुमच्या पूर्वजांना सत्य सांगितले ते असे: “ ‘ते नेहमी पाहत राहिले, तरी त्यांना दिसत नाही, ते नेहमी कानांनी ऐकत असले, तरी त्यांना ऐकू येत नाही व ते ग्रहण करत नाहीत. या लोकांचे अंतःकरण असंवेदनशील करा; त्यांचे कान मंद आणि त्यांचे डोळे बंद करा. नाहीतर ते त्यांच्या डोळ्यांनी पाहतील, त्यांच्या कानांनी ऐकतील, अंतःकरणापासून समजतील, आणि ते मागे वळतील आणि बरे होतील.’ “म्हणून तुम्हाला हे माहीत व्हावे की परमेश्वरापासून लाभणारे तारण गैरयहूदीयांसाठी देखील आहे व ते त्याचा स्वीकार करतील!” हे त्याने म्हटल्यानंतर, यहूदी तीव्रपणे त्यांच्यातच वादविवाद करून निघून गेले. पौल पुढे दोन वर्षापर्यंत भाड्याच्या घरात राहिला आणि तिथेच त्याला भेटण्यास येणार्यांचे तो स्वागत करीत असे. त्याने मोठ्या धैर्याने आणि कोणत्याही अडथळ्याशिवाय परमेश्वराच्या राज्याची घोषणा केली आणि प्रभू येशू ख्रिस्ताविषयीचे शिक्षण दिले!
प्रेषितांची कृत्ये 28:1-31 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
असे आम्ही निभावल्यावर त्या बेटाचे नाव मिलिता आहे असे आम्हांला समजले. तेथील बर्बर1 लोकांनी आमच्यावर विशेष उपकार केले; म्हणजे पाऊस व गारठा असल्यामुळे त्यांनी शेकोटी पेटवून आम्हा सर्वांचा पाहुणचार केला. तेव्हा पौलाने काटक्यांची मोळी आणून शेकोटीवर घातली. इतक्यात उष्णता झाल्यामुळे एक साप बाहेर निघून त्याच्या हातास झोंबून राहिला. ते जिवाणू त्याच्या हाताला लटकलेले पाहून बर्बर1 लोक एकमेकांना म्हणू लागले, “खरेच, हा माणूस घातकी आहे; हा समुद्रातून वाचला तरी न्यायदेवता त्याला जगू देत नाही.” त्याने तर ते जिवाणू विस्तवात झटकून टाकले आणि त्याला काही इजा झाली नाही. तो सुजेल किंवा एकाएकी मरून पडेल ह्याची ते वाट पाहत होते; पण बराच वेळ वाट पाहिल्यावर त्याला काही विकार झाला नाही असे पाहून ते आपले मत बदलून म्हणाले, ‘हा कोणी देव आहे.’ इकडे त्या बेटावरील पुब्ल्य नावाच्या मुख्य अधिकार्याच्या जमिनी आसपास होत्या; त्याने आमचे आगतस्वागत करून तीन दिवस आदराने आमचा पाहुणचार केला. तेव्हा असे झाले की, पुब्ल्याचा बाप तापाने व आवरक्ताने आजारी पडला होता; त्याच्याकडे आत जाऊन पौलाने प्रार्थना केली व त्याच्यावर हात ठेवून त्याला बरे केले. हे झाल्यावर त्या बेटामध्ये ज्या दुसर्या लोकांना रोग होते तेही त्याच्याकडे येऊन बरे होऊन जात. तेव्हा त्यांनी आमचा नाना प्रकारे सन्मान केला आणि आम्ही हाकारून निघालो तेव्हा आमच्या गरजेचे पदार्थ त्यांनी जहाजावर भरले. ह्याप्रमाणे तीन महिन्यांनंतर आलेक्सांद्रियाचे दयस्कुरै2 ह्या निशाणीचे एक तारू हिवाळा घालवण्याकरता त्या बेटाजवळ राहिले होते, त्यात बसून आम्ही निघालो. मग सुराकूस येथे वरवा करून आम्ही तीन दिवस राहिलो. तेथून वळसा घेऊन आम्ही रेगियोनास आलो; आणि एक दिवसानंतर दक्षिणेचा वारा सुटल्यावर दुसर्या दिवशी आम्ही पुत्युलास पोहचलो. तेथे आम्हांला बंधुजन भेटले; त्यांनी आपल्या येथे सात दिवस राहण्याची आम्हांला विनंती केली; अशा रीतीने आम्ही रोम शहरास आलो. तेथील बंधुजन आमच्याविषयी ऐकून अप्पियाची पेठ व तीन उतारशाळा येथपर्यंत आम्हांला सामोरे आले; त्यांना पाहून पौलाने देवाची उपकारस्तुती करून धैर्य धरले. आम्ही रोम शहरात गेल्यावर [शताधिपतीने बंदिवानांना सेनापतीच्या स्वाधीन केले, पण] पौलाला त्याच्यावर पहारा करणार्या शिपायाबरोबर वेगळे राहण्याची परवानगी मिळाली. मग असे झाले की, तीन दिवसांनंतर पौलाने यहूद्यांची जी मुख्य माणसे होती त्यांना एकत्र बोलावले. ते एकत्र जमल्यावर तो त्यांना म्हणाला, “बंधुजनहो, मी आपल्या लोकांविरुद्ध किंवा पूर्वजांच्या संप्रदायांविरुद्ध काही केले नसता मला यरुशलेमेत बंदिवान करून रोमी लोकांच्या हाती देण्यात आले. त्यांनी चौकशी केल्यावर माझ्याकडे मरणदंडास पात्र असा काही गुन्हा नसल्यामुळे ते मला सोडू पाहत होते. परंतु यहूद्यांनी विरोध केल्यामुळे कैसराजवळ न्याय मागणे मला भाग पडले; तरी मला आपल्या राष्ट्रावर काही दोषारोप करायचा होता असे नाही. ह्याकरता तुमची भेट घेऊन तुमच्याबरोबर भाषण करावे म्हणून तुम्हांला बोलावले; कारण इस्राएलाच्या आशेमुळे मी ह्या साखळीने बांधलेला आहे.” त्यांनी त्याला म्हटले की, ‘आपल्यासंबंधाने यहूदीयाहून आम्हांला काही पत्रे आली नाहीत, किंवा बंधुजनांपैकी कोणी येथे येऊन आपणाविषयी काही प्रतिकूल बातमी आणली नाही अथवा काही सांगितले नाही; तरी आपले विचार काय आहेत ते आपणापासून ऐकून घ्यावे हे आम्हांला योग्य वाटते; कारण ह्या पंथाविषयी म्हटले तर लोक त्याविरुद्ध सर्वत्र बोलतात, हे आम्हांला ठाऊक आहे.” तेव्हा त्यांनी त्याला एक दिवस नेमून दिल्यावर त्या दिवशी पुष्कळ लोक त्याच्या बिर्हाडी आले; त्यांना देवाच्या राज्याविषयी साक्ष देण्याकरता आणि येशूविषयी मोशेच्या नियमशास्त्रावरून व संदेष्ट्यांच्या लेखांवरून खातरी करण्याकरता तो सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्या विषयाची फोड करत होता. त्याने जे सांगितले त्यावरून कित्येकांची खातरी झाली तर कित्येक विश्वास ठेवीनात. त्यांचे आपसांत एकमत न झाल्यामुळे ते उठून जाऊ लागले, तेव्हा पौलाने त्यांना एक वचन सांगितले : “पवित्र आत्मा यशया संदेष्ट्याच्या द्वारे तुमच्या पूर्वजांबरोबर बोलला ते ठीक बोलला; ते असे की, ‘ह्या लोकांकडे जाऊन सांग की, तुम्ही ऐकाल तर खरे, परंतु तुम्हांला समजणार नाही; व पाहाल तर खरे, परंतु तुम्हांला दिसणार नाही; कारण ह्या लोकांचे अंतःकरण जड झाले आहे; ते कानांनी मंद ऐकतात; आणि त्यांनी आपले डोळे मिटून घेतले आहेत; ह्यासाठी की, त्यांनी डोळ्यांनी पाहू नये, कानांनी ऐकू नये, मनाने समजू नये, त्यांनी वळू नये, आणि मी त्यांना बरे करू नये.’ म्हणून तुम्हांला ठाऊक असो की, ‘हे देवाने सिद्ध केलेले तारण परराष्ट्रीयांकडे’ पाठवले आहे; आणि ते ते श्रवण करतील.” [तो असे बोलल्यावर यहूदी आपसांत बराच वादविवाद करत निघून गेले.] तो आपल्या भाड्याच्या घरात पुरी दोन वर्षे राहिला, आणि जे त्याच्याकडे येत असत त्या सर्वांचे तो स्वागत करत असे. कोणापासून अडथळा न होता तो पूर्ण धैर्याने देवाच्या राज्याची घोषणा करत असे, आणि प्रभू येशू ख्रिस्ताविषयीच्या गोष्टी शिकवत असे.
प्रेषितांची कृत्ये 28:1-31 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
असे आम्ही निभावल्यावर त्या बेटाचे नाव मिलिता आहे, असे आम्हांला समजले. तेथील लोकांनी आमच्यावर विशेष उपकार केले, म्हणजे पाऊस व गारठा असल्यामुळे त्यांनी शेकोटी पेटवून आम्हा सर्वांचा पाहुणचार केला. पौलने काटक्यांची मोळी आणून शेकोटीवर घातली. इतक्यात उष्णता झाल्यामुळे एक साप बाहेर निघून त्याच्या हातास झोंबून राहिला. तो साप त्याच्या हाताला लटकलेला पाहून तेथील रहिवासी एकमेकांना म्हणू लागले, “खरेच, हा माणूस खुनी आहे, हा समुद्रातून वाचला तरी न्यायदेवता त्याला जगू देणार नाही.” त्याने तर तो साप विस्तवात झटकून टाकला. पौलाला काही इजा झाली नाही. त्याला सूज येईल अथवा तो एकाएकी मरून पडेल ह्याची ते वाट पाहत होते, पण बराच वेळ वाट पाहिल्यावर त्याला काही विकार झाला नाही, असे पाहून ते आपले मत बदलून म्हणाले, “हा कोणी देव आहे.” तिकडे त्या बेटावरील पुब्ल्य नावाच्या मुख्य अधिकाऱ्याच्या जमिनी आसपास होत्या. त्याने आमचे स्वागत करून आदराने आमचा पाहुणचार तीन दिवस केला. तेव्हा असे झाले की, पुब्ल्यचा बाप तापाने व आंवरक्ताने आजारी पडला होता. त्याच्याकडे जाऊन पौलाने प्रार्थना केली व त्याच्यावर हात ठेवून त्याला बरे केले. हे झाल्यावर त्या बेटामध्ये ज्या दुसऱ्या लोकांना रोग होते तेही त्याच्याकडे येऊन बरे झाले. तेव्हा त्यांनी आमचा नाना प्रकारे सन्मान केला आणि आम्ही जहाजाने जायला निघालो तेव्हा आमच्या गरजेच्या वस्तू त्यांनी जहाजावर भरल्या. ह्याप्रमाणे तीन महिन्यांनंतर आलेक्सांद्रियातील दयस्कुरै (जुळी दैवते) ह्या नावाचे जे तारू हिवाळा घालविण्याकरता त्या बेटाजवळ थांबले होते, त्यात बसून आम्ही निघालो. सुराकूस शहरात पोहोचल्यावर आम्ही तीन दिवस तिथे राहिलो. तेथून वळसा घेऊन आम्ही रेगियोना ह्या ठिकाणी आलो. दक्षिणेचा वारा सुटल्यावर दुसऱ्या दिवशी आम्ही पुत्युल नगरास पोहचलो. तेथे आम्हांला बंधुजन भेटले, त्यांनी त्यांच्याबरोबर सात दिवस राहावयाचे आम्हांला आमंत्रण दिले, अशा रितीने आम्ही रोम शहराजवळ आलो. तेथले बंधुजन आमच्याविषयी ऐकून अप्पियाची बाजारपेठ व तीन उतारशाळा नावाच्या ठिकाणापर्यंत आम्हांला सामोरे आले, त्यांना पाहून पौलने देवाचे आभार मानले, त्याला बराच धीर आला. आम्ही रोम शहरात गेल्यावर रोमन अधिकाऱ्याने बंदिवानांना सेनापतीच्या स्वाधीन केले, पण पौलाला त्याच्यावर पहारा करणाऱ्या शिपायांबरोबर वेगळे राहण्याची परवानगी मिळाली. तीन दिवसांनंतर पौलाने यहुदी लोकांची जी मुख्य माणसे होती त्यांना एकत्र बोलावले. ते एकत्र जमल्यावर तो त्यांना म्हणाला, बंधुजनहो, “मी आपल्या लोकांविरुद्ध किंवा पूर्वजांच्या चालीरीतींविरुद्ध काही केले नसता मला यरुशलेममध्ये बंदिवान करून रोमन लोकांच्या हाती देण्यात आले. त्यांनी चौकशी केल्यावर मी मरणदंडास पात्र असा काही गुन्हा केला नाही, हे कळल्यावर ते मला सोडू पाहत होते, परंतु यहुदी लोकांनी विरोध केल्यामुळे कैसरजवळ न्याय मागणे मला भाग पडले, तरी मला आपल्या राष्ट्रावर काही दोषारोप ठेवायचा नाही. ह्याकरता तुमची भेट घेऊन तुमच्याबरोबर बोलावे म्हणून तुम्हांला बोलावले. इस्राएली लोकांनी ज्याची आशा बाळगली आहे त्याच्यासाठी मी अशा प्रकारे साखळीने बांधलेला आहे.” त्यांनी त्याला म्हटले, “आपल्यासंबंधाने यहुदियातून आम्हांला काही पत्रे आली नाहीत किंवा बंधुजनांपैकी कोणी येथे येऊन आपणांविषयी काही प्रतिकूल वृत्तांत आणला नाही अथवा काही सांगितलेही नाही. तरी आपले विचार काय आहेत, ते आपणांकडून ऐकून घ्यावे हे आम्हांला योग्य वाटते कारण ह्या पंथाविषयी म्हटले तर लोक त्याविरुद्ध सर्वत्र बोलतात, हे आम्हांला ठाऊक आहे.” म्हणून त्यांनी त्याला एक दिवस नेमून दिल्यावर त्या दिवशी पुष्कळ लोक त्याच्या मुक्कामी आले. त्यांना देवाच्या राज्याविषयी साक्ष देण्याकरता आणि येशूविषयी मोशेच्या नियमशास्त्रावरून व संदेष्ट्यांच्या लेखांवरून त्यांची खातरी करण्याकरता तो सकाळपासून संध्याकाळपर्यंत स्पष्टीकरण करत होता. त्याने जे सांगितले त्यावरून कित्येकांची खातरी झाली तर काही लोकांनी विश्वास ठेवला नाही. त्यांचे आपसात एकमत न झाल्यामुळे ते उठून जाऊ लागले, तेव्हा पौलाने त्यांना एक वचन सांगितले: “पवित्र आत्मा यशया संदेष्ट्याद्वारे तुमच्या पूर्वजांबरोबर बोलला ते ठीक बोलला. ते असे की, ह्या लोकांकडे जाऊन सांग की, ‘तुम्ही ऐकाल तर खरे, परंतु तुम्हांला समजणार नाही व पाहाल तर खरे, परंतु तुम्हांला आकलन होणार नाही. कारण ह्या लोकांचे अंतःकरण जड झाले आहे. ते कानांनी मंद ऐकतात आणि त्यांनी आपले डोळे मिटून घेतले आहेत, ह्यासाठी की, त्यांनी डोळ्यांनी पाहू नये, कानांनी ऐकू नये, मनाने समजू नये, त्यांचे परिवर्तन होऊ नये आणि मी त्यांना बरे करू नये’. म्हणून तुम्हांला ठाऊक असू द्या की, देवाने सिद्ध केलेल्या तारणाचा संदेश यहुदीतरांकडे पाठवला आहे आणि ते तो ऐकतील.” तो असे बोलल्यावर यहुदी लोक आपसात बराच वादविवाद करत निघून गेले. पौल आपल्या भाड्याच्या घरात पूर्ण दोन वर्षे राहिला आणि जे त्याच्याकडे येत असत, त्या सर्वांचे तो स्वागत करत असे. तो उघडपणे पूर्ण धैर्याने कोणापासून अडथळा न होता देवाच्या राज्याची घोषणा करत असे आणि प्रभू येशू ख्रिस्ताविषयीच्या गोष्टी शिकवत असे.