YouVersion लोगो
सर्च आयकॉन

प्रेषितांची कृत्ये 27:9-20

प्रेषितांची कृत्ये 27:9-20 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

बराच वेळ वाया गेला होता आणि पुढील प्रवास करणे बरेच अवघड झाले होते, कारण एव्हाना यहूद्यांच्या उपासाचा काळही निघून गेला होता, तेव्हा पौलाने त्यांना सावधानतेचा इशारा दिला, पौल म्हणाला, “पुरुषांनो, मला वाटते, आपल्या प्रवासात जहाजातील मालाला आणि जहाजालाच नव्हे तर आपल्या जीवालाही धोका होईल.” परंतु पौलाच्या मताशी जहाजाचा कप्तान व मालक सहमत झाले नाहीत, उलट जहाजाच्या कप्तानाच्या व मालकाच्या बोलण्यावरच शताधिपतीचा जास्त विश्वास होता. परंतु हे सुरक्षित म्हंटलेले बंदर हिवाळ्यात मुक्काम करायला सोईचे नव्हते, म्हणून बहुमताने पुढे निघावे असे ठरले आणि फेनिकेला जाण्याचा प्रयत्न करावा आणि शक्य झाले तर तेथेच हिवाळा घालवावा असे ठरले. तेव्हा दक्षिणेकडून मंद वारे वाहू लागले, तेव्हा ते नांगर उचलून क्रेताच्या किनाऱ्याकिनाऱ्याने तारू हाकारीत जाऊ लागले, जहाजावरच्या लोकांस वाटू लागले की, अशाच प्रकारचे वारे आम्हास पाहिजे होते व तसेच ते वाहत आहे. परंतु लवकरच क्रेत बेटावरून ‘ईशान्येचे’ म्हंटलेले वादळी वारे वाहू लागले. आणि जहाज वादळी वाऱ्यात सापडले व त्यास पुढे जाता येईना, तेव्हा पुढे जाण्याचा प्रयत्न सोडून आम्ही वाऱ्याने जहाज भरकटू दिले. मग कौदा नावाच्या लहानशा बेटाच्या किनाऱ्याकिनाऱ्याने आम्ही जाऊ लागलो, मग थोड्या खटपटीनंतर जीवन रक्षक होडीवर उचलून घेतली. जीवन रक्षक होडी आत घेतल्यावर लोकांनी जहाज दोरखंडाने आवळून बांधले, जहाज वाळू असलेल्या सूर्ती नावाच्या उथळ जागी आदळेल या भीतीने त्यांनी शीड खाली काढले, तेव्हा वाऱ्याने ते भरकटू लागले. जोरदार वादळी वाऱ्याचे तडाखे खावे लागल्याने लोकांनी दुसऱ्या दिवशी जहाजावरील सामान बाहेर टाकून दिले. तिसऱ्या दिवशी जहाजाची काही सामग्री त्यांनी आपल्या हातांनी बाहेर काढून टाकली. बरेच दिवस आम्हास सूर्य किंवा तारे दिसले नाहीत, वादळ फारच भयंकर होते, आम्ही आमच्या तरण्याची सर्व आशा सोडून दिली, आम्ही मरणार असे आम्हास वाटू लागले.

प्रेषितांची कृत्ये 27:9-20 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

बराच वेळ व्यर्थ गेलेला होता आणि समुद्रावरून जाणे धोक्याचे झाले होते आणि आता प्रायश्चित्ताचा दिवस होऊन गेला होता. तेव्हा पौलाने अधिकार्‍यांना इशारा दिला, तो म्हणाला, “माणसांनो, आपला हा जलप्रवास भीषण आहे कदाचित आपले तारू फुटेल, मालाची हानी होईल आणि आपले जीवसुद्धा धोक्यात येतील.” परंतु शताधिपतीने, पौलाच्या सूचनेपेक्षा तांडेल व तारवाचा कप्तान यांचा सल्ला स्वीकारला. कारण हे बंदर खुले असून हिवाळा घालविण्यासाठी सुरक्षित नव्हते, म्हणून बहुतेकांनी सल्ला दिला की, प्रवास पुढे चालू ठेवावा आणि जमल्यास फेनिके बंदरात जाऊन तिथे हिवाळा घालवावा. ते बंदर क्रेता या ठिकाणी होते, दक्षिण-पश्चिम आणि उत्तर-पश्चिम अशा दोन्ही दिशांकडे या बंदराचे तोंड होते. जेव्हा दक्षिणी वारा मंद गतीने वाहू लागला, तेव्हा त्यांना वाटले की आता योग्य संधी आहे; म्हणून त्यांनी नांगर उचलला आणि क्रेताच्या काठाकाठाने ते प्रवास करू लागले. ते फारसे दूर गेलेही नव्हते तोच, युरकुलोन नावाचा ईशान्येकडील तुफानी वारा बेटावरून अतिशय झपाट्याने वाहू लागला. या वादळामध्ये तारू सापडले आणि वारा नेईल तिकडे तारू वाहत जाऊ लागले. आम्हीही तारू वार्‍याबरोबर वाहू दिले. आम्ही कौदा नावाच्या एका लहान बेटाजवळून जात असताना, मोठ्या प्रयासाने जीवनरक्षक होडी तारवाला बांधू शकलो, मग ती होडीवर घेतल्यानंतर, तारवाचा खालील भाग मजबूत करण्यासाठी दोरांनी आवळून बांधले. कारण त्यांना असे भय वाटू लागले की तारू सुर्तीच्या किनार्‍यावर जाऊन वाळूत रुतून बसेल. म्हणून त्यांनी जहाजाचे शीड उतरविले आणि जहाजाला वाहवत जाऊ दिले. दुसर्‍या दिवशी समुद्र अधिकच खवळला. तेव्हा तारू हलके करण्यासाठी खलाशी तारवातील माल समुद्रात टाकू लागले. तिसर्‍या दिवशी त्यांनी तारवाची अवजारे आपल्या हाताने टाकून दिली. त्या तुफानी वादळाचा भयंकर जोर होता आणि अनेक दिवस सूर्याचे व तार्‍यांचे दर्शनही आम्हास घडले नाही. शेवटी आता आमचा जीव वाचेल अशी सर्व आशा आम्ही सोडून दिली.

प्रेषितांची कृत्ये 27:9-20 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

तेव्हा फार दिवस झाल्यामुळे आणि तितक्यात उपासाचे दिवसही होऊन गेल्यामुळे त्या वेळेस समुद्रावरून जाणे संकटाचे होते, म्हणून पौल त्यांना असे सुचवत होता की, “अहो गृहस्थांनो, ह्या जलप्रवासात केवळ मालाचे आणि तारवाचे नुकसान नव्हे, तर आपल्या जिवांचेही हाल होऊन मोठी हानी होईल असे मला दिसते.” तथापि शताधिपतीने पौलाच्या म्हणण्यापेक्षा तांडेल व तारवाचा धनी ह्यांच्याकडे अधिक लक्ष दिले. ते बंदर हिवाळ्यात राहायला सोईचे नव्हते म्हणून बहुतेकांनी मसलत दिली की, तेथून निघावे आणि साधेल तर क्रेतातील फेनिके बंदरात जाऊन तेथे हिवाळा घालवावा; हे नैऋत्याभिमुख व वायव्याभिमुख आहे. मग दक्षिणेचा वारा मंद वाहत असल्यामुळे आपला बेत सिद्धीस गेलाच असे समजून, ते तेथून नांगर उचलून काठाकाठाने क्रेताच्या बाजूने गेले. परंतु थोड्या वेळानंतर युरकुलोन नावाचा तुफानी वारा तिकडून सुटला; त्यात तारू सापडून वार्‍याच्या तोंडी ठरेना, म्हणून आम्ही त्याच्या स्वाधीन होऊन वाहवत चाललो. मग कौदा नावाच्या एका लहान बेटावरून जाताना आम्ही मोठ्या प्रयासाने होडी आपल्या स्वाधीन करून घेतली. ती वर घेतल्यावर त्यांनी साहित्यांची योजना करून तारू खालून आवळून बांधले; आणि आपण सुर्ती नावाच्या भाटीवर जाऊन आदळू असे त्यांना भय वाटले म्हणून त्यांनी शीड उतरले; मग ते तसेच वाहवत गेले. तेव्हा वादळाने आमचे फार हाल होऊ लागल्यामुळे ते दुसर्‍या दिवशी भरगत टाकून देऊ लागले; आणि तिसर्‍या दिवशी त्यांनी आपल्या हातांनी तारवाचे अवजार टाकून दिले. मग पुष्कळ दिवस सूर्य व तारेही दिसले नाहीत आणि तुफानाचा जोर आम्हांला फारच भासला; त्यामुळे शेवटी आमची तरण्याची आशा हळूहळू सोडून द्यावी लागली.

प्रेषितांची कृत्ये 27:9-20 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)

फार दिवस झाल्यामुळे आणि तितक्यात उपवासकाळ येऊन गेल्यामुळे त्या वेळेस समुद्रावरून जाणे धोक्याचे होते म्हणून पौलाने त्यांना सुचवले, “अहो गृहस्थांनो, ह्या जलप्रवासात केवळ मालाचे आणि तारवाचे नुकसान नव्हे, तर आपल्या जिवाचेही हाल होऊन मोठी हानी होईल, असे मला दिसते.” सैन्याधिकाऱ्याने पौलाच्या म्हणण्यापेक्षा कप्‍तान व तारवाचा मालक ह्यांच्याकडे अधिक लक्ष दिले. ते बंदर हिवाळ्यात राहावयाला सोयीचे नव्हते म्हणून बहुतेकांनी तेथून निघावे आणि साधेल तर फैनिके बंदरात जाऊन तेथे हिवाळा घालवावा, अशी इच्छा प्रदर्शित केली. क्रेतमधील ह्या बंदराचे तोंड नैऋत्य व वायव्य दिशांकडे होते. दक्षिणेचा वारा मंद वाहत असल्यामुळे आपला बेत सिद्धीस जाईल, असे समजून ते तेथून नांगर उचलून क्रेतच्या बाजूने किनाऱ्याAकिनाऱ्याने गेले. परंतु थोड्या वेळानंतर युरकुलोन नावाचा तुफानी वारा त्या बेटाच्या बाजूने सुटला. त्यात तारू सापडून वाऱ्याच्या तोंडी ठरेना म्हणून आम्ही त्याच्या स्वाधीन होऊन वाहवत जाऊ लागलो. पुढे कौदा नावाच्या एका लहान बेटावरून जाताना आम्ही महत्प्रयासाने होडी सुरक्षित करून घेतली. ती वर घेतल्यावर त्यांनी दोरांनी तारू खालून आवळून बांधले. आपण सुर्ती किनाऱ्याच्या भाटीवर जाऊन आदळू असे त्यांना भय वाटले म्हणून त्यांनी शीड उतरले, मग तारू तसेच वाहवत गेले. भन्नाट वादळाने आमचे फार हाल होऊ लागल्यामुळे ते दुसऱ्या दिवशी तारवातील सामान फेकून देऊ लागले आणि तिसऱ्या दिवशी त्यांनी आपल्या हातांनी तारवाचे अवजार फेकून दिले. पुष्कळ दिवस सूर्य व तारेही दिसले नाहीत, तुफानाचा जोर आम्हांला फारच भासला, त्यामुळे शेवटी आम्ही वाचण्याची आशा हळूहळू सोडून दिली.