प्रेषितांची कृत्ये 27:11-13
प्रेषितांची कृत्ये 27:11-13 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तथापि शताधिपतीने पौलाच्या म्हणण्यापेक्षा तांडेल व तारवाचा धनी ह्यांच्याकडे अधिक लक्ष दिले. ते बंदर हिवाळ्यात राहायला सोईचे नव्हते म्हणून बहुतेकांनी मसलत दिली की, तेथून निघावे आणि साधेल तर क्रेतातील फेनिके बंदरात जाऊन तेथे हिवाळा घालवावा; हे नैऋत्याभिमुख व वायव्याभिमुख आहे. मग दक्षिणेचा वारा मंद वाहत असल्यामुळे आपला बेत सिद्धीस गेलाच असे समजून, ते तेथून नांगर उचलून काठाकाठाने क्रेताच्या बाजूने गेले.
प्रेषितांची कृत्ये 27:11-13 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
परंतु पौलाच्या मताशी जहाजाचा कप्तान व मालक सहमत झाले नाहीत, उलट जहाजाच्या कप्तानाच्या व मालकाच्या बोलण्यावरच शताधिपतीचा जास्त विश्वास होता. परंतु हे सुरक्षित म्हंटलेले बंदर हिवाळ्यात मुक्काम करायला सोईचे नव्हते, म्हणून बहुमताने पुढे निघावे असे ठरले आणि फेनिकेला जाण्याचा प्रयत्न करावा आणि शक्य झाले तर तेथेच हिवाळा घालवावा असे ठरले. तेव्हा दक्षिणेकडून मंद वारे वाहू लागले, तेव्हा ते नांगर उचलून क्रेताच्या किनाऱ्याकिनाऱ्याने तारू हाकारीत जाऊ लागले, जहाजावरच्या लोकांस वाटू लागले की, अशाच प्रकारचे वारे आम्हास पाहिजे होते व तसेच ते वाहत आहे.
प्रेषितांची कृत्ये 27:11-13 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
परंतु शताधिपतीने, पौलाच्या सूचनेपेक्षा तांडेल व तारवाचा कप्तान यांचा सल्ला अधिक स्वीकारला. कारण हे बंदर खुले असून हिवाळा घालविण्यासाठी सुरक्षित नव्हते, म्हणून बहुतेकांनी सल्ला दिला की, प्रवास पुढे चालू ठेवावा आणि जमल्यास फेनिके बंदरात जाऊन तेथे हिवाळा घालवावा. ते बंदर क्रेत या ठिकाणी होते, दक्षिण-पश्चिम आणि उत्तर-पश्चिम अशा दोन्ही दिशांकडे या बंदराचे तोंड होते. जेव्हा दक्षिणी वारा मंद गतीने वाहू लागलेला होता तेव्हा त्यांना वाटले की आता योग्य संधी आहे; म्हणून त्यांनी नांगर उचलला आणि क्रेताच्या काठाकाठाने ते प्रवास करू लागले.
प्रेषितांची कृत्ये 27:11-13 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
सैन्याधिकाऱ्याने पौलाच्या म्हणण्यापेक्षा कप्तान व तारवाचा मालक ह्यांच्याकडे अधिक लक्ष दिले. ते बंदर हिवाळ्यात राहावयाला सोयीचे नव्हते म्हणून बहुतेकांनी तेथून निघावे आणि साधेल तर फैनिके बंदरात जाऊन तेथे हिवाळा घालवावा, अशी इच्छा प्रदर्शित केली. क्रेतमधील ह्या बंदराचे तोंड नैऋत्य व वायव्य दिशांकडे होते. दक्षिणेचा वारा मंद वाहत असल्यामुळे आपला बेत सिद्धीस जाईल, असे समजून ते तेथून नांगर उचलून क्रेतच्या बाजूने किनाऱ्याAकिनाऱ्याने गेले.