प्रेषितांची कृत्ये 20:13-38
प्रेषितांची कृत्ये 20:13-38 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
तेथून आम्ही पुढे निघालो व अस्सा या नगरी समुद्रमार्गे निघालो, तेथे आम्ही पौलाला घेणार होतो, त्यानेच अशाप्रकारे योजना केली होती, ती म्हणजे त्याने स्वतः पायी जायचे. जेव्हा आम्हास तो अस्सा येथे भेटला, तेव्हा आम्ही त्यास जहजात घेतले आणि आम्ही मितुलेनेशहरास गेलो. दुसऱ्या दिवशी आम्ही जहाजाने मितुलेनाहून निघालो व खियास बेटावर आलो, मग दुसऱ्या दिवशी सामा बेट ओलांडले आणि एक दिवसानंतर मिलेत शहरास आलो. कारण पौलाने ठरवले होते की इफिस येथे थांबायचे नाही, आशियात त्यास जास्त वेळ थांबायचे नव्हते, तो घाई करीत होता कारण शक्य झाल्यास पन्नासाव्या दिवसाच्या सणासाठी त्यास यरूशलेम शहरात रहावयास हवे होते. मिलेताहून इफिस येथे निरोप पाठवून पौलाने तेथील मंडळीच्या वडीलजनांना बोलावून घेतले. जेव्हा ते आले, तेव्हा तो त्यांना म्हणाला, आशियात आलो त्या दिवसापासून मी तुमच्या सोबत असताना कसा राहिलो हे तुम्हास माहीत आहे. मी प्रभूची सेवा पूर्ण नम्रतेने व रडून केली, यहूदी लोकांनी केलेल्या कटामुळे निर्माण झालेल्या उपद्रवांना तोंड देत मी त्याची सेवा केली. जे काही तुमच्या चांगल्यासाठी होते ते तुम्हास सांगण्यासाठी कोणतीही कसर ठेवली नाही, हे तुम्हास माहीत आहे आणि या गोष्टी जाहीरपणे व घराघरातून सांगण्यासाठी मी कधीही मागेपुढे पाहिले नाही. पश्चात्ताप करून देवाकडे वळण्याविषयी आणि आपल्या प्रभू येशूवरील विश्वासाविषयी यहूदी व ग्रीक लोकांस सारखीच साक्ष दिली. आणि आता आत्म्याच्या आज्ञेने यरूशलेम शहरास चाललो आहे आणि तेथे माझ्याबाबतीत काय घडेल हे माहीत नाही. मला फक्त एकच गोष्ट माहीत आहे की प्रत्येक शहरात पवित्र आत्मा मला सावध करतो, तुरुंगवास व संकटे माझी वाट पाहत आहेत हे तो मला सांगतो. मी माझ्या जीवनाविषयी काळजी करीत नाही, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी माझे काम पूर्ण करणे, प्रभू येशूने जे काम मला दिले ते मला पूर्ण करायला पाहिजे ते काम म्हणजे देवाच्या कृपेबद्दल ची सुवार्ता लोकांस सांगितली पाहिजे. राज्याची घोषणा करीत ज्या लोकात मी फिरलो त्या तुम्हातील कोणालाही मी पुन्हा कधीही दिसणार नाही हे आता मला माहीत आहे. म्हणून मी तुम्हास जाहीरपणे सांगतो की, सर्वांच्या रक्तासंबंधाने मी निर्दोष असा आहे. देवाची संपूर्ण इच्छा काय आहे हे प्रकट करण्यास मी कधीही मागेपुढे पाहिलेले नाही. तुमची स्वतःची व देवाच्या सर्व लोकांची, ज्याना देवाने तुम्हास दिलेले आहे, त्यांची काळजी घ्या, कळपाची काळजी घेण्याचे काम पवित्र आत्म्याने तुम्हास दिलेले आहे, तुम्ही मंडळीसाठी मेंढपाळासारखे असले पाहिजे, ही मंडळी देवाने स्वतःचे रक्त देऊन विकत घेतली. मला माहीत आहे की, मी गेल्यावर तुमच्यामध्ये भयंकर असे दुष्ट लांडगे येतील, ते कळपाला सोडणार नाहीत. तुमच्यामधूनसुद्धा लोक उठून शिष्यांना, चुकीचे असे शिकवून आपल्यामागे घेऊन जातील. यासाठी सावध राहा, तुम्हातील प्रत्येकाला गेले तीन वर्षे डोळ्यांत अश्रू आणून सावध करण्याचे मी कधीच थांबविले नाही हे आठवा. आणि आता मी तुम्हास देवाच्या व वचनाच्या कृपेच्या अधीन करतो, जी तुमची वाढ करण्यासाठी समर्थ आहे व सर्व पवित्र केलेल्यांमध्ये वतन द्यावयाला समर्थ आहे. मी कोणाच्याही सोन्याचा, चांदीचा व कपड्यांचा लोभ धरला नाही. मी आपल्या स्वतःच्या व माझ्याबरोबर राहणाऱ्यांच्या गरजा माझ्या हातांनी भागविल्या हे तुम्हास चांगले माहीत आहे. अशा रीतीने मी तुम्हास उदाहरण घालू दिले आहे की जे दुर्बल आहेत अशांना आपण स्वतः मेहनत करून मदत केली पाहिजे व प्रभू येशूचे शब्द लक्षात ठेवले पाहिजेत, तो स्वतः म्हणाला, “घेण्यापेक्षा देणे अधिक धन्यतेचे आहे.” आणि हे बोलल्यावर पौलाने गुडघे टेकले आणि प्रार्थना केली. तेव्हा प्रत्येकाला खूपच रडू आले, ते पौलाच्या गळ्यात पडले व त्याचे मुके घेत राहिले. ते पुन्हा त्यास कधीही पाहू शकणार नाहीत, या वाक्याने त्यांना फार दुःख झाले, मग ते त्यास जहाजापर्यंत निरोप देण्यास गेले.
प्रेषितांची कृत्ये 20:13-38 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
पौल अस्सोस नगराकडे पायी जाणार होता म्हणून त्याने असे ठरविले की, आम्ही तारवात बसून अस्सोसला पुढे जावे आणि तिथे पोहोचल्यावर त्याला तारवात घ्यावे. त्याप्रमाणे तो अस्सोस या ठिकाणी आम्हाला भेटला, तेव्हा त्याला तारवात घेऊन आम्ही पुढे मतुलेनास गेलो. दुसर्या दिवशी तारवात बसून आम्ही खियोस बंदर पार केले. त्यानंतरच्या पुढील दिवशी सामोस बंदर पार केले, मग दुसर्या दिवशी मिलेतास आलो. आशिया प्रांतामध्ये फार दिवस राहावे लागू नये म्हणून इफिस शहराच्या पुढे जाण्याचे पौलाने ठरविले होते, कारण शक्य झाल्यास पेन्टेकॉस्टच्या दिवसांच्या वेळी यरुशलेममध्ये पोहोचावे, या दृष्टीने तो घाई करीत होता. मिलेताहून पौलाने इफिस येथील मंडळीच्या वडीलजनांना निरोप पाठविला. ते आल्यानंतर त्याने त्यांना म्हटले, “मी आशियात आल्यानंतर पहिल्या दिवसापासून पूर्णवेळ तुम्हाबरोबर नेहमी कसा होतो व कसा राहिलो, याची तुम्हाला जाणीव आहे. म्हणजे फार नम्रतेने, आसवे गाळीत आणि माझ्या यहूदीयांच्या कटांमुळे मजवर आलेली अतिशय कठीण परीक्षा व संकटे सोशीत मी प्रभूची सेवा कशी केली, हे तुम्हाला माहीत आहे. जे तुमच्यासाठी हितकारक आहे, त्याचा प्रचार करण्यास उशीर अथवा कुरकुर केली नाही, परंतु लोकांमध्ये उघडपणे आणि घरोघरी जाऊन शिक्षण दिले. त्यांनी पश्चात्ताप करून परमेश्वराकडे वळणे आवश्यक आहे आणि आपल्या प्रभू येशूंवर विश्वास ठेवावा याविषयी यहूदी व गैरयहूदी लोकांमध्ये मी घोषणा करीत आलो आहे. “आणि आता, जसे आत्म्याद्वारे मला यरुशलेमकडे जाण्यास भाग पाडले जात आहे. तिथे माझ्याबाबतीत काय होणार आहे याची मला जाणीव नाही. मला माहीत आहे की प्रत्येक शहरामध्ये तुरुंगवास व यातना यांना मला तोंड द्यावे लागणार आहे, असा इशारा पवित्र आत्मा मला देत आहे. तरीपण, माझे जीवन माझ्याकरिता मोलाचे नाही; माझे एकच ध्येय आहे की धाव संपविणे व जे कार्य प्रभू येशूंनी मला दिले आहे ते पूर्ण करणे म्हणजे परमेश्वराने जी कृपा केली आहे, त्याची शुभवार्ता इतरांना सांगणे हे होय. “आणि आता मला माहीत झाले आहे की ज्या तुम्हामध्ये मी परमेश्वराच्या राज्याचा प्रचार करीत फिरत होतो, त्या तुम्ही मला पुन्हा पाहणार नाही. यास्तव, मी आज तुम्हाला जाहीर करतो की तुमच्यापैकी कोणाच्याही रक्ताबाबत मी निर्दोष आहे. कारण परमेश्वराचे संपूर्ण मनोरथ सांगण्यास मी कधीही मागेपुढे पाहिले नाही. तुम्ही स्वतःवर आणि सर्व कळपावर लक्ष ठेवा, कारण पवित्र आत्म्याने तुम्हाला देखरेख करण्यासाठी नेमले आहे. परमेश्वराने स्वतःच्या रक्ताने ज्या मंडळीला विकत घेतले आहे, त्या परमेश्वराच्या मंडळीचे तुम्ही मेंढपाळ व्हा. मला हे माहीत आहे की मी गेल्यानंतर, क्रूर लांडगे येतील व तुम्हामध्ये शिरतील आणि ते कळपालाही सोडणार नाहीत. प्रत्यक्ष तुमच्या गटामधून काही माणसे उठतील व त्यांना अनुयायी मिळावेत व त्यांचे शिष्य व्हावेत म्हणून सत्य विपरीत करतील. म्हणून आता तुम्ही सावध राहा! मी तुमच्याबरोबर तीन वर्षे रात्रंदिवस आसवे गाळून तुम्हा प्रत्येकाला सावध राहण्याविषयी सूचना देण्याचे केव्हाही थांबविले नाही, याची आठवण ठेवा. “आणि आता मी तुम्हाला परमेश्वरावर व त्यांच्या कृपेच्या वचनांवर सोपवितो, ते वचन तुमची वृद्धी करण्यास आणि पवित्र केलेल्या सर्वांमध्ये वतन द्यावयास समर्थ आहे. मी कोणाच्याही सोन्याचा, रुप्याचा किंवा वस्त्रांचा लोभ धरला नाही. तुम्हा स्वतःस माहीत आहे की माझ्या या हातांनी माझ्या गरजा आणि माझ्याबरोबर असणार्यांच्याही गरजा भागविण्यासाठी कष्ट केले आहेत. मी केलेल्या सर्व गोष्टीत मी तुम्हाला निदर्शनास आणून दिले आहे की, अशाप्रकारे श्रम करून आपण अशक्तांना साहाय्य करावे व प्रभू येशू जे शब्द स्वतः बोलले होते ते स्मरणात ठेवा: ‘घेण्यापेक्षा देणे यात अधिक धन्यता आहे.’ ” पौलाचे बोलणे संपल्यावर त्याने सर्वांबरोबर गुडघे टेकले आणि प्रार्थना केली. तेव्हा त्या सर्वांनी फार मोठा आकांत केला व त्यांनी पौलाच्या गळ्यात मिठी मारून त्याची चुंबने घेतली. तुम्ही माझे तोंड पुन्हा पाहणार नाही हे जे वाक्य त्याने म्हटले होते, याचे त्या सर्वात जास्त दुःख झाले होते. मग त्यांनी त्याला तारवापर्यंत पोहोचविले.
प्रेषितांची कृत्ये 20:13-38 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
आम्ही आधीच जाऊन तारवात बसून अस्साकडे गेलो, तेथे पोहचल्यावर पौलाला तारवात घ्यायचे होते; कारण त्याने तसे ठरवले होते व तो स्वतः पायवाटेने येणार होता. तो अस्सात आम्हांला भेटला, तेव्हा त्याला तारवात घेऊन आम्ही मितुलेनास आलो. तेथून तारवातून आम्ही दुसर्या दिवशी खियासमोर आलो, आणि त्याच्या पुढल्या दिवशी आम्ही सामा बंदर घेतले; मग [त्रोगुल्यात राहिल्यावर] त्याच्या पुढील दिवशी आम्ही मिलेतास आलो. आपल्याला आशिया प्रांतामध्ये फार दिवस राहावे लागू नये म्हणून इफिस बाजूला टाकून जाण्याचा पौलाने निश्चय केला होता; कारण कसेही करून पन्नासाव्या दिवसाच्या सणात1 आपण यरुशलेमेत असावे ह्यासाठी तो घाई करत होता. मग त्याने मिलेताहून इफिसास निरोप पाठवून मंडळीच्या वडिलांना बोलावून घेतले. ते त्याच्याजवळ आल्यावर त्याने त्यांना म्हटले : “मी आशिया प्रांतात पहिल्याने पाऊल टाकल्या दिवसापासून तुमच्याबरोबर नेहमी कसा होतो, म्हणजे फार नम्रतेने, आसवे गाळत आणि यहूद्यांच्या कटामुळे माझ्यावर आलेली संकटे सोसत मी प्रभूची सेवा कशी केली, हे तुम्हांला ठाऊक आहे; जे हितकारक ते तुम्हांला सांगण्यात आणि चार लोकांत व घरोघरी शिकवण्यात मी कसूर केली नाही. पश्चात्ताप करून देवाकडे वळणे व आपल्या प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणे ह्यासंबंधाने यहूदी व हेल्लेणी ह्यांना मी साक्ष देत होतो. पण आता पाहा, मी अंतर्यामी बद्ध होऊन यरुशलेमेस जात आहे. तेथे मला काय काय होईल ते माहीत नाही; केवळ इतके कळते की, बंधने व संकटे माझी वाट पाहत आहेत; ह्याविषयी पवित्र आत्मा मला नगरोनगरी साक्ष देत आहे. मी कशाचीही काळजी करीत नाही; मी आपल्या प्राणाची किंमत एवढीसुद्धा करत नाही, ह्यासाठी की, मी आपली धाव आणि देवाच्या कृपेची सुवार्ता निश्चितार्थाने सांगण्याची जी सेवा मला प्रभू येशूपासून प्राप्त झाली आहे ती शेवटास न्यावी. आणि आता पाहा, ज्यांच्यामध्ये मी देवाच्या राज्याची घोषणा करत फिरलो त्या तुमच्या कोणाच्याही दृष्टीस माझे तोंड पुन्हा पडणार नाही, हे मला ठाऊक आहे. म्हणून आजच्या दिवशी मी तुम्हांला खातरीपूर्वक सांगतो की, मी सर्वांच्या रक्ताविषयी निर्दोषी आहे; कारण देवाचा संपूर्ण मनोदय तुम्हांला सांगण्यास मी कसूर केली नाही. तुम्ही स्वतःकडे व ज्या कळपात पवित्र आत्म्याने तुम्हांला अध्यक्ष करून ठेवले त्या सर्वांकडे लक्ष द्या, ह्यासाठी की, देवाची जी मंडळी त्याने आपल्या रक्ताने स्वतःकरता मिळवली तिचे पालनपोषण तुम्ही करावे. मी गेल्यावर कळपाची दयामाया न करणारे क्रूर लांडगे तुमच्यामध्ये शिरतील, हे मी जाणून आहे. तुमच्यापैकीही काही माणसे उठून शिष्यांना आपल्यामागे ओढून घेण्यासाठी विपरीत गोष्टी बोलतील. म्हणून मी तीन वर्षे रात्रंदिवस अश्रू गाळत प्रत्येकास बोध करण्यात खंड पडू दिला नाही ही आठवण ठेवून सावध राहा. आता बंधूंनो, मी तुम्हांला प्रभूकडे व त्याच्या कृपेच्या वचनाकडे सोपवतो; तो तुमची वाढ करण्यास व पवित्र केलेल्या सर्व लोकांमध्ये तुम्हांला वतन देण्यास समर्थ आहे. मी कोणाच्या सोन्याचा, रुप्याचा किंवा वस्त्राचा लोभ धरला नाही. माझ्या व माझ्या सोबत्यांच्या गरजा भागवण्याकरता ह्याच हातांनी श्रम केले, हे तुम्ही स्वतः जाणून आहात. सर्व गोष्टींत मी तुम्हांला कित्ता घालून दाखवले आहे की, तसेच तुम्हीही श्रम करून दुर्बळांना साहाय्य करावे, आणि ‘घेण्यापेक्षा देणे ह्यात जास्त धन्यता आहे,’ असे जे वचन प्रभू येशू स्वतः म्हणाला होता त्याची आठवण ठेवावी.” असे बोलल्यावर त्याने गुडघे टेकून त्या सर्वांबरोबर प्रार्थना केली. तेव्हा ते सर्व फार रडले व त्यांनी पौलाच्या गळ्यात गळा घालून त्याचे पुष्कळ मुके घेतले. ‘माझे तोंड तुमच्या दृष्टीस ह्यापुढे पडणार नाही,’ असे जे त्याने म्हटले होते त्यावरून त्यांना विशेष दु:ख झाले. मग त्यांनी त्याला तारवापर्यंत पोहचवले.
प्रेषितांची कृत्ये 20:13-38 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
आम्ही आधीच जाऊन तारवात बसून अस्सा या ठिकाणी गेलो, तेथे पोहचल्यावर पौलाला तारवात घ्यावयाचे होते कारण त्याने तसे ठरवले होते व तो स्वतः भूमार्गे येणार होता. तो अस्सा येथे आम्हांला भेटला, तेव्हा त्याला तारवात घेऊन आम्ही मितुलेन येथे आलो. तेथून तारवातून दुसऱ्या दिवशी आम्ही खिया येथे आलो, त्यानंतर तिसऱ्या दिवशी आम्ही सामा बंदर गाठले, मग त्याच्या पुढील दिवशी आम्ही मिलेत येथे आलो. आपणाला आशिया प्रांतांमध्ये फार दिवस राहावे लागू नये म्हणून इफिस येथे न थांबण्याचा पौलाने निश्चय केला होता कारण कसेही करून पेन्टेकॉस्टच्या सणात यरुशलेममध्ये असावे यासाठी तो घाई करत होता. त्याने मिलेतहून इफिसला निरोप पाठवून ख्रिस्तमंडळीच्या वडीलजनांना बोलावून घेतले. ते त्याच्याजवळ आल्यावर त्याने त्यांना म्हटले, “मी आशिया प्रांतात पहिल्याने पाऊल टाकल्या दिवसापासून माझा जीवनक्रम कसा होता, म्हणजे फार नम्रतेने, आसवे गाळीत आणि यहुदी लोकांच्या कटामुळे माझ्यावर आलेली संकटे सोशीत मी प्रभूची सेवा कशी केली, हे तुम्हांला ठाऊक आहे. जे हितकारक ते तुम्हांला सांगण्यात आणि चारचौघात व घरोघरी शिकविण्यात मी कसूर केली नाही. पश्चात्ताप करून देवाकडे वळणे व आपल्या प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणे ह्यासंबंधाने यहुदी व ग्रीक ह्यांना मी साक्ष देत होतो. आता मी अंतर्यामी पवित्र आत्म्यापुढे आज्ञाधारक होऊन यरुशलेमला जात आहे. तेथे माझे काय होईल, ते माहीत नाही. केवळ इतके कळते की, तुरुंगवास व संकटे माझी वाट पाहत आहेत. ह्याविषयी पवित्र आत्मा मला प्रत्येक शहरात सावध करीत आहे. परंतु मी तर माझा प्राण कवडीमोल मानतो. माझी धाव आणि देवाच्या कृपेचे शुभवर्तमान घोषित करण्याची जी सेवा मला प्रभू येशूकडून प्राप्त झाली आहे ती मी पूर्ण करावी, एवढीच माझी इच्छा आहे. मी तुमच्यामध्ये देवराज्याची घोषणा करत फिरलो, येथून पुढे मी तुमच्या दृष्टीस पडणार नाही, हे मला ठाऊक आहे. म्हणून आजच्या दिवशी मी आवर्जून सांगतो, जर तुमचे तारण झाले नाही तर त्याला मी जबाबदार नाही कारण देवाचा संपूर्ण मनोदय तुम्हांला सांगण्यास मी कसूर केली नाही. म्हणून तुम्ही स्वतःकडे व ज्या कळपात पवित्र आत्म्याने तुम्हांला मेंढपाळ नेमले आहे त्या सर्वांकडे लक्ष द्या, ह्यासाठी की, देवाची जी ख्रिस्तमंडळी त्याने आपल्या रक्ताने स्वतःकरिता मिळवली तिचे पालन तुम्ही करावे. मी गेल्यावर कळपाला दयामाया न दाखवणारे क्रूर लांडगे तुमच्यामध्ये शिरतील, हे मी जाणून आहे. तुमच्यापैकी काही माणसे उठून शिष्यांना आपल्यामागे ओढून घेण्यासाठी विपरीत गोष्टी बोलतील. मी तीन वर्षे रात्रंदिवस अश्रू गाळत प्रत्येकास बोध करण्यात खंड पडू दिला नाही, ही आठवण ठेवून सावध राहा. आता मी तुम्हांला प्रभूकडे व त्याच्या कृपेच्या वचनाकडे सोपवितो, तो तुमची वाढ करावयास व पवित्र केलेल्या सर्व लोकांमध्ये तुम्हांला वतन द्यावयास समर्थ आहे. मी कोणाच्या सोन्याचा, रुप्याचा किंवा वस्त्रांचा लोभ धरला नाही. माझ्या व माझ्या सहकाऱ्यांच्या गरजा भागविण्याकरता ह्याच हातांनी मी श्रम केले, हे तुम्ही स्वतः जाणून आहात. सर्व गोष्टींत मी कित्ता घालून दिला आहे. तसेच तुम्हीही श्रम करून दुर्बलांना साहाय्य करावे आणि ‘घेण्यापेक्षा देण्यात जास्त धन्यता आहे’, असे जे शद्ब प्रभू येशू स्वतः म्हणाला होता त्याची आठवण ठेवावी.” असे बोलल्यावर पौलाने गुडघे टेकून त्या सर्वांबरोबर प्रार्थना केली. ते सर्व फार रडले व त्यांनी पौलाच्या गळ्यात गळा घालून त्याचे पुष्कळ मुके घेतले. ‘ह्यापुढे मी तुमच्या दृष्टीस पडणार नाही’, असे जे त्याने म्हटले होते त्यावरून त्यांना विशेष दुःख झाले. त्यानंतर त्यांनी त्याला तारवापर्यंत पोहचविले.