प्रेषितांची कृत्ये 19:17-28
प्रेषितांची कृत्ये 19:17-28 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
मग इफिसात राहणारे यहूदी व हेल्लेणी ह्या सर्वांना हे कळले, तेव्हा ते भयभीत झाले आणि प्रभू येशूच्या नावाचा महिमा झाला. विश्वास ठेवणार्या लोकांपैकी पुष्कळ जणांनी येऊन आपली कृत्ये उदारपणे पदरात घेतली. जादूटोणा करणार्यांपैकी बर्याच जणांनी आपली पुस्तके जमा करून सर्वांदेखत जाळून टाकली; आणि त्यांच्या किमतीची बेरीज केली तेव्हा ती पन्नास हजार रुपये झाली. ह्याप्रमाणे प्रभूच्या सामर्थ्याचे वचन वाढत जाऊन प्रबल झाले. हे झाल्यावर मासेदोनिया व अखया ह्या प्रांतांतून यरुशलेमेस जावे असा पौलाने आपल्या मनात निश्चय करून म्हटले, “तेथे गेल्यावर मला रोम शहरही पाहिले पाहिजे.” मग आपली सेवा करणार्यांपैकी तीमथ्य व एरास्त ह्या दोघांना मासेदोनियास पाठवून तो स्वतः काही दिवस आशिया प्रांतात राहिला. ह्या सुमारास त्या मार्गाविषयी बरीच खळबळ उडाली. कारण देमेत्रिय नावाचा कोणीएक सोनार अर्तमी देवीचे रुप्याचे देव्हारे करून कारागिरांना बराच कामधंदा मिळवून देत असे. त्याने त्यांना व तसल्याच इतर कारागिरांना एकत्र जमवून म्हटले, “गड्यांनो, ह्या धंद्यात आपल्याला पैसे मिळतात हे तुम्हांला ठाऊकच आहे. तुम्ही पाहता व ऐकता की, हातांनी केलेले देव हे देवच नाहीत असे ह्या पौलाने केवळ इफिसातच नव्हे तर बहुतेक सर्व आशिया प्रांतात बोलून व पुष्कळ लोकांच्या मनात भरवून त्यांना फितवले आहे. ह्यामुळे ह्या आपल्या धंद्याची बदनामी होण्याचा धोका आहे; इतकेच नव्हे, तर ज्या महादेवी अर्तमीची पूजा सर्व आशिया प्रांत किंबहुना जगसुद्धा करते तिचे देऊळ क:पदार्थ ठरण्याचा व तिचे स्वतःचे महत्त्व नष्ट होण्याचा धोका आहे.” हे ऐकल्यावर ते क्रोधाविष्ट होऊन ओरडू लागले की, “इफिसकरांची अर्तमी थोर!”
प्रेषितांची कृत्ये 19:17-28 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
इफिस येथे राहणाऱ्या सर्व यहूदी व ग्रीक लोकांस हे समजले, तेव्हा सर्वांना भीती वाटली आणि लोक प्रभू येशूच्या नावाचा अधिकच आदर करू लागले. पुष्कळसे विश्वास ठेवणारे पापकबुली देऊ लागले व ज्या वाईट गोष्टी त्यांनी केल्या होत्या, त्या सांगू लागले. काही विश्वास ठेवणाऱ्यांनी जादूची कामे केली होती, या विश्वास ठेवणाऱ्यांनी आपली सर्व जादूची पुस्तके लोकांसमोर आणली आणि जाळली, त्या पुस्तकांची किंमत पन्नास हजार चांदीच्या नाण्यांइतकी भरली. अशा रीतीने प्रभूच्या वचनाचा दूरवर प्रसार झाला व ते फार परिणामकारक ठरले. या गोष्टी घडल्यानंतर पौलाला पवित्र आत्म्याने सुचवले की, मासेदोनिया व अखया या प्रांतांतून प्रवास करीत पुढे यरूशलेम शहरास जायचे आहे, तो म्हणाला, “मी तेथे गेल्यांनतर मला रोम शहरही पाहिलेच पाहिजे.” म्हणून त्याचे दोन मदतनीस तीमथ्य व एरास्त यांना त्याने मासेदोनियाला पाठवून दिले आणि त्याने आणखी काही काळ आशियात घालविला. याकाळामध्ये ‘त्या मार्गाविषयी’ मोठा गोंधळ उडाला. देमेत्रिय नावाचा एक मनुष्य होता, तो सोनार होता, तो अर्तमी देवीचे देव्हारे बनवीत असे, जे कारागीर होते त्यांना यामुळे खूप पैसे मिळत. त्या सर्वांना व या धंद्याशी संबंध असलेल्या सर्वांना त्याने एकत्र केले आणि तो म्हणाला, लोकहो, तुम्हास माहीत आहे की, या धंद्यापासून आपल्याला चांगला पैसा मिळतो. पण पाहा तो पौल नावाचा मनुष्य काय करीत आहे तो काय म्हणत आहे ते ऐका! पौलाने पुष्कळ लोकांस प्रभावित केले आहे व बदलले आहे, त्याने हे इफिसमध्ये व सगळ्या आशियामध्ये केले आहे, तो म्हणतो, मनुष्यांच्या हातून बनवलेले देव खरे देव नाहीत. ह्यामुळे या आपल्या धंद्याची बदनामी होण्याचा धोका आहे; इतकेच नव्हे तर ज्या महादेवी अर्तमीची पूजा सर्व आशिया प्रांत किंबहूना जगसुद्धा करते तिचे देऊळ निरुपयोगी ठरण्याचा व तिचे स्वतःचे महत्त्व नष्ट होण्याचा धोका आहे. जेव्हा त्यांनी हे ऐकले तेव्हा ते फार रागावले आणि मोठ्याने ओरडून म्हणू लागले, “इफिसकरांची अर्तमी थोर आहे.”
प्रेषितांची कृत्ये 19:17-28 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
या घटनेची वार्ता लागलीच सर्व इफिसमध्ये राहणारे यहूदी व ग्रीक यांना कळाली, तेव्हा त्या सर्वांमध्ये भीती निर्माण झाली आणि प्रभू येशूंचे नाव अत्यंत आदरणीय मानले गेले. ज्या अनेकांनी विश्वास ठेवला होता ते आता पुढे आले आणि जे काही त्यांनी केले होते त्याची जाहीर कबुली दिली. अनेक लोक जे जादूटोणा करीत होते, त्यांनी त्यांची पुस्तके एकत्रित आणली आणि ती सर्व लोकांसमोर जाळून टाकली. त्यांनी त्या पुस्तकांची किंमत केली, तेव्हा ती पन्नास हजार चांदीची नाणी एवढी झाली. या रीतीने प्रभुचे वचन वाढत जाऊन प्रबळ झाले. हे सर्व झाल्यानंतर, मासेदोनिया व अखया या प्रांतातून यरुशलेमला जावे, असे पौलाने आपल्या मनात ठरविले व म्हटले, “तेथे गेल्यानंतर, मी रोम या ठिकाणी सुद्धा भेट दिली पाहिजे.” त्याने आपले दोन मदतनीस, तीमथ्य व एरास्त यांना मासेदोनियास पुढे पाठविले आणि तो आणखी काही काळ आशिया प्रांतात राहिला. त्याच सुमारास, या मार्गाविषयी फार मोठी खळबळ उडाली. देमेत्रिय नावाचा चांदीचा कारागीर होता, ज्याने अर्तमीसच्या चांदीच्या मूर्त्या तयार करून तेथील कारागिरांना पुष्कळ उद्योग मिळवून दिला होता. एकदा त्याने या सारखाच व्यवसाय करणार्या कारागिरांनाही एकत्र बोलावले आणि तो त्यांना म्हणाला: “माझ्या मित्रांनो, या धंद्यात आपल्याला चांगला फायदा होत आहे, हे आपल्याला माहितच आहे. तुम्ही पाहता व ऐकता की इफिसातच केवळ नव्हे तर बहुतेक सर्व आशिया देशातील बहुसंख्य लोकांची या पौलाने खात्री पटवली आहे व त्यांना चुकीची कल्पना करून दिली आहे. तो म्हणतो की मानवी हातांनी तयार केलेली दैवते मुळीच परमेश्वर नाहीत. आता यामध्ये धोका हा आहे की, आपल्या धंद्याचे चांगले नाव नाहीसे होईल, इतकेच नव्हे तर महादेवी अर्तमीसच्या मंदिराची सुद्धा अपकीर्ती होईल आणि ही देवता, जिची उपासना सर्व आशियामध्ये व जगामध्ये केली जाते, तिचे दैवी वैभव लुटून नेले जाईल.” त्यांनी हे ऐकले, तेव्हा ते क्रोधाविष्ट झाले व मोठमोठ्याने ओरडू लागले: “इफिसकरांची अर्तमीस थोर आहे!”
प्रेषितांची कृत्ये 19:17-28 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
इफिस येथे राहणारे यहुदी व ग्रीक ह्या सर्वांना हे कळले, तेव्हा ते भयभीत झाले आणि प्रभू येशूच्या नावाचा महिमा वाढला. विश्वास ठेवणाऱ्या लोकांपैकी पुष्कळ जणांनी येऊन आपली पापे उघडपणे पदरात घेतली. जादूटोणा करणाऱ्यांपैकी बऱ्याच जणांनी आपली पुस्तके जमा करून सर्वांदेखत ती जाळून टाकली आणि त्यांच्या किंमतीची बेरीज केली तेव्हा ती पन्नास हजार चांदीच्या नाण्यांइतकी झाली. ह्याप्रमाणे प्रभूच्या सामर्थ्याने वचन पसरत जाऊन प्रबल झाले. हे झाल्यावर मासेदोनिया व अखया ह्या प्रांतांतून यरुशलेम येथे जावे असे पौलाने आपल्या मनात ठरवून म्हटले, ‘तेथे गेल्यावर मला रोम शहरही पाहिले पाहिजे.’ त्याची सेवा करणाऱ्यांपैकी तीमथ्य व एरास्त ह्या दोघांना मासेदोनियात पाठवून तो स्वतः काही दिवस आशिया प्रांतात राहिला. ह्या सुमारास प्रभूच्या मार्गाविषयी इफिस येथे बराच तणाव निर्माण झाला. देमेत्रिय नावाचा एक सोनार अर्तमी देवीच्या मंदिराच्या रुप्याच्या प्रतिकृती करून कारागिरांना बराच कामधंदा मिळवून देत असे. त्याने त्यांना व तसल्याच इतर कारागिरांना एकत्र जमवून म्हटले, “गड्यांनो, ह्या धंद्यात आपल्याला पैसे मिळतात हे तुम्हांला ठाऊकच आहे. तुम्ही पाहता व ऐकता की, हाताने केलेले देव हे देवच नाहीत, असे त्या पौलाने केवळ इफिस येथेच नव्हे तर बहुतेक सर्व आशिया प्रांतात सांगून व पुष्कळ लोकांच्या मनात भरवून त्यांना फितविले आहे. ह्यामुळे ह्या आपल्या धंद्याची बदनामी होण्याचा धोका आहे. इतकेच नव्हे तर ज्या महादेवी अर्तमीची पूजा सर्व आशिया प्रांत किंबहुना जगसुद्धा करते, तिचे मंदिर निरुपयोगी ठरण्याचा व तिचे स्वतःचे महत्त्व नष्ट होण्याचा धोका आहे.” हे ऐकल्यावर ते क्रोधाविष्ट होऊन ओरडू लागले, “इफिसकरांची अर्तमी थोर आहे!”