प्रेषितांची कृत्ये 16:16-32
प्रेषितांची कृत्ये 16:16-32 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
मग असे झाले की, आम्ही प्रार्थनास्थळाकडे जात असता कोणीएक मुलगी आम्हांला आढळली. तिच्या अंगात येत असे. ती दैवप्रश्न सांगून आपल्या धन्यांना पुष्कळ मिळकत करून देत असे. ती पौलाच्या व आमच्या मागे येऊन मोठ्याने म्हणाली, “हे लोक परात्पर देवाचे दास आहेत; हे तुम्हांला तारणाचा मार्ग कळवतात.” असे ती पुष्कळ दिवस करत असे; मग पौलाला अतिशय वाईट वाटले व मागे वळून तो त्या पिशाच्चाला म्हणाला, “येशू ख्रिस्ताच्या नावाने मी तुला आज्ञा करतो की, तू हिच्यामधून निघून जा.” आणि ते तत्काळ निघून गेले. मग आपल्या मिळकतीची आशा गेली असे पाहून तिच्या धन्यांनी पौल व सीला ह्यांना धरून पेठेत अंमलदाराकडे ओढून नेले. आणि त्यांनी त्यांना अधिकार्यांपुढे उभे करून म्हटले, “हे लोक यहूदी असून आमच्या नगराला फार त्रास देतात, आणि आम्हा रोमी लोकांना जे परिपाठ स्वीकारायला व आचरायला योग्य नाहीत ते हे सांगतात.” तेव्हा लोक त्यांच्यावर उठले; आणि अधिकार्यांनी त्यांची वस्त्रे फाडून काढली व त्यांना छड्या मारण्याची आज्ञा दिली. मग पुष्कळ फटके मारल्यावर त्यांना बंदिशाळेत टाकून त्यांनी बंदिशाळेच्या नायकाला त्यांना बंदोबस्तात ठेवण्याचा हुकूम केला. त्याला असा हुकूम मिळाल्यावर त्याने त्यांना आतल्या बंदिखान्यात घालून त्यांचे पाय खोड्यांत अडकवले. मध्यरात्रीच्या सुमारास पौल व सीला हे प्रार्थना करत असता व गाणी गाऊन देवाची स्तुती करत असता बंदिवान त्यांचे ऐकत होते. तेव्हा एकाएकी असा मोठा भूमिकंप झाला की बंदिशाळेचे पाये डगमगले; सर्व दरवाजे लगेच उघडले व सर्वांची बंधने तुटली. तेव्हा बंदिशाळेच्या नायकाने जागे होऊन बंदिशाळेचे दरवाजे उघडे पाहिले; आणि बंदिवान पळून गेले आहेत असा तर्क करून तो तलवार उपसून आपला घात करणार होता. इतक्यात पौल मोठ्याने ओरडून म्हणाला, “तू स्वतःला काही अपाय करून घेऊ नकोस; कारण आम्ही सर्व जण येथेच आहोत.” मग दिवे आणवून तो आत धावत गेला, कापत कापत पौल व सीला ह्यांच्या पाया पडला, आणि त्यांना बाहेर काढून म्हणाला, “महाराज, माझे तारण व्हावे म्हणून मला काय केले पाहिजे?” ते म्हणाले, “प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेव म्हणजे तुझे व तुझ्या घराण्याचे तारण होईल.” त्यांनी त्याला व त्याच्या घरातील सर्वांना प्रभूचे वचन सांगितले.
प्रेषितांची कृत्ये 16:16-32 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मग असे झाले की, आम्ही प्रार्थना स्थळाकडे जात असता कोणीएक दुष्ट आत्मा लागलेली मुलगी आम्हास आढळली, तिच्या अंगात येत असे, ती दैवप्रश्न सांगून आपल्या धन्यांना पुष्कळ मिळकत करून देत असे. ती पौलाच्या व आमच्या मागे येऊन मोठ्याने म्हणाली, “हे लोक परात्पर देवाचे दास आहेत, हे आपणाला तारणाचा मार्ग कळवितात.” असे ती पुष्कळ दिवस करीत असे; मग पौलाला अतिशय वाईट वाटले व मागे वळून तो त्या दुष्ट आत्म्याला म्हणाला, “येशू ख्रिस्ताच्या नावाने मी तुला आज्ञा करतो की, तू हिच्यामधून निघून जा.” आणि ते तत्काळ निघून गेले. मग आपल्या मिळकतीची आशा गेली असे पाहून तिच्या धन्यांनी पौल व सीला ह्यांना धरून पेठेत अधिकाऱ्यांकडे ओढून नेले. आणि त्यांनी त्यांना अधिकाऱ्यांपुढे उभे करून म्हटले, “हे लोक यहूदी असून आमच्या नगराला त्रास देतात. आणि आम्हा रोमन लोकांस जे परिपाठ स्वीकारावयाला व आचरावयाला योग्य नाहीत ते हे सांगतात.” तेव्हा लोक त्यांच्यावर उठले आणि अधिकाऱ्यांनी त्यांची वस्त्रे फाडून काढली व त्यांना छड्या मारावयाची आज्ञा दिली. मग पुष्कळ फटके मारल्यावर त्यांना बंदिशाळेत टाकून त्यांनी बंदिशाळेचे नायकाला त्यांना बंदोबस्तात ठेवण्याचा हुकूम केला. त्यास असा हुकूम मिळाल्यावर त्यांने त्यांना आतल्या बंदिखान्यात घालू त्यांचे पाय खोडयात अडकवले. मध्यरात्रीच्या सुमारास पौल व सीला हे प्रार्थना करीत असता व गाणे गाऊन देवाची स्तुती करीत असता बंदिवान त्यांचे ऐकत होते. तेव्हा एकाएकी असा मोठा भूमिकंप झाला की बंदिशाळेचे पाये डगमगले, सर्व दरवाजे लागलेच उघडले व सर्वांची बंधने तुटली. तेव्हा बंदिशाळेच्या नायकाने जागे होऊन बंदिशाळेचे दरवाजे उघडे पाहिले; आणि बंदिवान पळून गेले आहेत असा तर्क करून तो तलवार उपसून आपला घात करणार होता. इतक्यात पौल मोठ्याने ओरडून म्हणाला तू स्वतःला काही अपाय करून घेऊ नकोस; कारण आम्ही सर्वजण येथेच आहोत. मग दिवे आणवून तो आत धावत गेला, कांपत कांपत पौल व सीला ह्यांच्या पाया पडला. आणि त्यांना बाहेर काढून म्हणाला “साहेब, माझे तारण व्हावे म्हणून मला काय केले पाहीजे?” ते म्हणाले, “प्रभू येशूवर विश्वास ठेव म्हणजे तुझे व तुझ्या घराण्याचे तारण होईल.” त्यांनी त्यास व त्याच्या घरांतील सर्वांना प्रभूचे वचन सांगितले.
प्रेषितांची कृत्ये 16:16-32 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
एकदा आम्ही प्रार्थना स्थळाकडे जात असताना, आम्हाला एक गुलाम मुलगी भेटली जिच्यामध्ये अशुद्ध आत्मा असून त्याच्या साहाय्याने ती भविष्य सांगत असे. भविष्यकथन करून ती आपल्या धन्यांना खूप पैसा मिळवून देत असे. ती पौलाच्या आणि आमच्यामागे येऊन मोठ्याने म्हणाली, “हे लोक परात्पर परमेश्वराचे सेवक आहेत आणि तारण कसे मिळेल याचा मार्ग हे तुम्हाला सांगत आहेत.” असे ती पुष्कळ दिवस करत होती. शेवटी पौल अत्यंत त्रस्त झाला आणि तिच्याकडे वळून तिच्यातील आत्म्याला म्हणाला, “मी येशू ख्रिस्ताच्या नावाने तुला आज्ञा करतो की तिच्यातून बाहेर नीघ!” आणि त्या क्षणी तो आत्मा तिच्यातून निघून गेला. आपल्याला जे धन मिळत होते ते आता मिळणार नाही असे पाहून तिच्या धन्यांनी, पौल व सीलाला पकडून अधिकार्यांना तोंड देण्याकरिता बाजारपेठेत ओढत नेले. त्यांनी त्यांना न्यायाधीशापुढे आणले व ते म्हणाले, “ही यहूदी माणसे आमच्या शहरात गोंधळ माजवीत आहेत आम्ही रोमी लोकांनी जे नियम स्वीकारणे व आचरणे योग्य नाहीत, अशा नियमांची ते वकिली करत आहेत.” मग पौल व सीलावर हल्ला करण्यात लोकसमूह सामील झाला, तेव्हा न्यायाधीशांनी त्यांचे कपडे काढून त्यांना फटके मारण्याचा हुकूम दिला. त्यांना निष्ठुरपणे पुष्कळ फटके मारल्यानंतर तुरुंगात टाकण्यात आले आणि तुरुंगाच्या पहारेकर्याला त्यांच्यावर बंदोबस्ताने पहारा ठेवण्याचा हुकूम देण्यात आला. असा हुकूम मिळाल्यावर त्यांना आतील कोठडीत ठेऊन त्यांचे पाय लाकडी खोड्यांत अडकविण्यात आले. मध्यरात्रीच्या सुमारास पौल व सीला प्रार्थना करीत असताना आणि परमेश्वराचे गीत गात असताना इतर कैदी ते ऐकत होते. अचानक तीव्र भूकंपाने तुरुंगाचा पाया डळमळला. एकाएकी तुरुंगाचे सर्व दरवाजे उघडले गेले आणि सर्व कैद्यांचे साखळदंड मोकळे झाले. तुरुंगाचा नायक झोपेतून जागा झाला आणि तुरुंगाचे सर्व दरवाजे सताड उघडे पाहून, सर्व कैदी पळून गेलेले असावेत असे समजून तो तलवार उपसून स्वतःला ठार करणार होता. परंतु पौल ओरडून म्हणाला, “तू स्वतःला इजा करू नकोस! आम्ही सर्व येथेच आहोत!” तुरुंगाच्या नायकाने दिवे मागविले व तो धावत आला आणि पौल आणि सीला यांच्यापुढे थरथर कापत पालथा पडला. त्याने त्यांना बाहेर आणले आणि विचारले, “महाराज, माझे तारण व्हावे, म्हणून मी काय करावे?” त्यांनी सांगितले, “प्रभू येशूंवर विश्वास ठेव, म्हणजे तुझे व तुझ्या घराण्याचे तारण होईल.” तेव्हा त्यांनी त्याला व त्याच्या घराण्यातील सर्वांना प्रभूचे वचन सांगितले.
प्रेषितांची कृत्ये 16:16-32 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
आम्ही प्रार्थनास्थळाकडे जात असता एक तरुण दासी आम्हांला आढळली. तिच्या अंगात येत असे. ती भविष्य वर्तवून आपल्या धन्याला पुष्कळ मिळकत करून देत असे. ती पौलाच्या व आमच्या मागे येऊन ओरडून म्हणत असे, “हे लोक परात्पर देवाचे दास आहेत! हे तुम्हांला तारणाच्या मार्गाविषयी सांगतात!” असे ती पुष्कळ दिवस करीत असे. शेवटी पौलाला या गोष्टीचा वीट आल्यामुळे मागे वळून तो त्या पिशाच्चाला म्हणाला, “येशू ख्रिस्ताच्या नावाने मी तुला हुकूम करतो, तू हिच्यामधून निघून जा” आणि ते तत्काळ निघून गेले. आपल्या मिळकतीची संधी गेली, असे पाहून तिच्या धन्याने पौल व सीला ह्यांना धरून चौकात अधिकाऱ्यांसमोर ओढून नेले. त्यांनी त्यांना रोमन अधिकाऱ्यापुढे उभे करून म्हटले, “हे लोक यहुदी असून आमच्या शहराला फार त्रास देतात. आम्हा रोमन लोकांना बेकायदेशीर वाटतात व आम्ही ज्या रूढी स्वीकारुन पाळू शकत नाही अशा हे शिकवत असतात.” तेव्हा लोक त्यांच्यावर खवळले आणि अधिकाऱ्यांनी त्यांची वस्त्रे फाडून काढली व त्यांना चाबकाने मारण्याचा आदेश दिला. पुष्कळ मारहाण केल्यानंतर त्यांना तुरुंगात टाकून त्यांनी तुरुंगाधिकाऱ्याला त्यांना बंदोबस्तात ठेवण्याचा हुकूम केला. त्याला असा हुकूम मिळाल्यावर तुरुंगाधिकाऱ्याने त्यांना आतल्या बंदिखान्यात घालून त्यांचे पाय खोड्यांत अडकविले. मध्यरात्रीच्या सुमारास पौल व सीला हे प्रार्थना करत असता व गाणी गाऊन देवाची स्तुती करत असता इतर बंदिवान त्यांचे ऐकत होते. तेव्हा एकाएकी भयंकर भूकंप झाला आणि तुरुंगाचा पाया डगमगला. सर्व दरवाजे तत्काळ उघडले व सर्वांच्या बेड्या तुटल्या. तुरुंगाच्या अधिकाऱ्याने जागे होऊन जेव्हा तुरुंगाचे दरवाजे उघडे पाहिले, तेव्हा बंदिवान पळून गेले आहेत असा तर्क करून तो तलवार उपसून स्वतःचा घात करण्याच्या बेतात होता. इतक्यात पौल मोठ्याने ओरडून म्हणाला, “तू स्वतःला काही अपाय करून घेऊ नकोस! आम्ही सर्व जण येथेच आहोत.” दिवे मागवून तो तुरुंगाधिकारी आत धावत गेला; कापत कापत पौल व सीला यांच्या पाया पडला आणि त्यांना बाहेर काढून म्हणाला, “महाराज, माझे तारण व्हावे म्हणून मी काय केले पाहिजे?” त्यांनी उत्तर दिले, “प्रभू येशूवर विश्वास ठेव म्हणजे तुझे व तुझ्या घराण्याचे तारण होईल.” नंतर त्यांनी त्याला व त्याच्या घरातील सर्वांना प्रभूचे वचन सांगितले.