प्रेषितांची कृत्ये 15:22-41
प्रेषितांची कृत्ये 15:22-41 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
तेव्हा पौल व बर्णबा ह्यांच्याबरोबर आपणातून निवडलेली माणसे म्हणजे बंधुजनांतील प्रमुख बर्शब्बा म्हटलेला यहूदा व सीला ह्यांना अंत्युखियास पाठवले तर बरे होईल असे सर्व मंडळीसह प्रेषित आणि वडील ह्यांना वाटले. त्यांच्या हाती त्यांनी असे लिहून पाठवलेः “अंत्युखिया, सिरीया व किलकिया येथील परराष्ट्रीयांतले बंधुजन ह्यांना प्रेषित व वडीलवर्ग या बंधुजनांचा सलाम. आमच्यापैकी काहींना जाऊन आपल्या बोलण्याने तुमचे जीव घोटाळ्यात पाडून त्रास दिला असे आमच्या कानी आले आहे; पण त्यांना आम्ही तसे करावयाला सांगितले नव्हते. म्हणून आमचे एकमत झाल्यावर आम्हास हे योग्य वाटले की, आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाकरिता जीवावर उदार झालेले आपले प्रिय बंधू बर्णबा व पौल ह्यांच्याबरोबर काही निवडलेले माणसे तुम्हाकडे पाठवावी. ह्याकरिता यहूदा व सीला ह्यांना आम्ही पाठवले आहे ते स्वतः या गोष्टी तुम्हास तोंडी सांगतील. कारण पुढे दिलेल्या जरुरीच्या गोष्टीशिवाय तुम्हावर जास्त ओझे लादू नये असे पवित्र आत्म्याला व आम्हास योग्य वाटले: त्या म्हणजे मूर्तीला अर्पिलेले पदार्थ, रक्त, गळा दाबून मारलेले प्राणी व जारकर्म ही तुम्ही वर्ज्य करावी; ह्यापासून स्वतःला जपाल तर तुमचे हित होईल, क्षेमकुशल असो.” त्यांना पाठवून दिल्यावर ते अंत्युखियास गेले आणि त्यांनी सर्व मंडळीला जमवून ते पत्र सादर केले. त्यातला बोध वाचून त्यांना आनंद झाला. यहूदा व सीला हे स्वतः संदेष्टे होते, म्हणून त्यांनी पुष्कळ बोलून बंधुजनांना बोध केला व स्थिरावले. तेथे ते काही दिवस राहील्यावर ज्यांनी त्यांना पाठवले होते त्यांच्याकडे जाण्यास बंधुजनांनी त्यांना शांतीने पाठवून दिले. परंतु सिलाला तेथे आणखी रहावयास बरे वाटले. आणि पौल व बर्णबा इतर पुष्कळ जणांबरोबर प्रभूचे वचन शिकवीत व सुवार्तेची घोषणा करीत अंत्युखियास राहीले. मग काही दिवसानंतर पौलाने बर्णबाला म्हणले “ज्या ज्या नगरात आपण प्रभूच्या वचनांची घोषणा केली तेथे पुन्हा जाऊन बंधुजनांना भेटून ते कसे आहेत हे पाहू या.” बर्णबाची इच्छा होती की, ज्याला मार्क म्हणत त्या योहानाला बरोबर घ्यावे. परंतु पौलाला वाटले की, पंफुलियाहून जो आपणाला सोडून गेला होता व आपल्याबरोबर काम करावयास आला नाही त्यास सोबतील घेणे योग्य नाही. ह्यावरून त्यांच्यामध्ये तीव्र मतभेद उपस्थित होऊन ते एकमेकांपासून वेगळे झाले आणि बर्णबा मार्काला घेऊन तारवात बसून कुप्रास गेला; पौलाने सीलाला निवडून घेतले आणि बंधुजनांनी त्यास प्रभूच्या कृपेवर सोपविल्यावर तो तेथून निघाला. आणि मंडळयाना स्थैर्य देत सिरीया व किलिकिया ह्यामधुन गेला.
प्रेषितांची कृत्ये 15:22-41 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
मग प्रेषित आणि वडीलजन व सर्व मंडळीने ठरविले की त्यांची काही निवडलेली माणसे अंत्युखियास पौल व बर्णबा यांच्याबरोबर पाठवावीत. त्यांनी यहूदाह ज्याला बारसब्बास असेही म्हणत असत व सीला यांना निवडले. हे दोघे विश्वासणार्यामधील पुढारी होते. त्यांनी आपल्याबरोबर नेलेल्या पत्राचा मजकूर असा होता: प्रेषित, वडीलजन आणि बंधुवर्ग यांच्याकडून, अंत्युखिया, सिरिया व किलिकिया येथील गैरयहूदी विश्वासणार्यांना: सलाम. आमच्यामधून काहीजण आमच्या परवानगीशिवाय तिथे येऊन तुम्हाला गोंधळात पाडत आहेत आणि त्यांच्या बोलण्याने तुमची मने विचलित करीत आहेत असे आमच्या ऐकण्यात आले आहे. तेव्हा आम्ही सर्वांनी ठरविले की आमचे प्रिय बंधू बर्णबा व पौल यांच्याबरोबर काही जणांना निवडून तुमच्याकडे पाठवावे. या लोकांनी आपला प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावासाठी आपले जीव धोक्यात घातले होते. यास्तव यहूदाह व सीला यांना पाठविले असून ते स्वतः आम्ही लिहिलेल्या या गोष्टी तुम्हाला तोंडी सांगतील. पवित्र आत्म्याला आणि आम्हाला हेच योग्य वाटले की, ज्या आवश्यक गोष्टींशिवाय तुमच्यावर ओझे टाकले जाऊ नये त्या अशा आहेत: मूर्तींना अर्पिलेले अन्न खाण्यापासून, रक्ताचे सेवन करण्यापासून, गळा दाबून मारलेल्या प्राण्यांचे मांस खाण्यापासून आणि वेश्यागमन यापासून तुम्ही स्वतःला दूर ठेवावे. या गोष्टी टाळण्याकडे तुम्ही लक्ष द्याल तर ते तुमच्या हिताचे होईल. निरोप द्यावा. ती माणसे तिथून खाली अंत्युखियात आली आणि तिथे पोहोचल्यावर त्यांनी सर्व मंडळीला एकत्र जमवून ते पत्र त्यांच्याकडे सोपविले. लोकांनी ते वाचले आणि त्यातील उत्तेजनपर संदेशाने ते आनंदित झाले. मग यहूदाह आणि सीला, जे स्वतः संदेष्टे होते, त्यांनी विश्वासणार्यांना पुष्कळ गोष्टी बोलण्याद्वारे उत्तेजित करून स्थिरावले. तिथे काही काळ राहिल्यानंतर, तेथील विश्वासणार्यांनी त्यांना शांतीचा आशीर्वाद देऊन, ज्यांनी त्यांना पाठविले होते त्यांच्याकडे परत पाठविले. परंतु सीला तिथेच राहिला. पौल व बर्णबा अंत्युखियामध्ये राहिले, तिथे ते व त्यांच्याबरोबर अनेकांनी शिक्षण दिले आणि प्रभूच्या वचनाची घोषणा केली. काही काळानंतर पौलाने बर्णबाला म्हटले, “आपण परत जावे व ज्या ज्या सर्व शहरांत जिथे आपण प्रभूच्या वचनाचा प्रचार केला होता, तेथील विश्वासणार्यांची भेट घेऊन त्यांची विचारपूस करावी.” बर्णबाला हवे होते की योहान, ज्याला मार्क असेही म्हणत, त्यालाही आपल्याबरोबर न्यावे. परंतु पौलाला त्याला बरोबर नेणे सुज्ञपणाचे वाटले नाही, कारण मार्क त्यांना पंफुल्यामध्ये सोडून गेला होता आणि या कार्यात पुढे जाण्यासाठी त्याने साथ दिली नव्हती. याबाबत त्यांचा मतभेद एवढा तीव्र झाला की त्यांनी एकमेकांची सोबत सोडली. बर्णबाने आपल्याबरोबर मार्कला घेतले आणि जहाजात बसून ते सायप्रसला गेले, परंतु पौलाने सीलाची निवड केली व त्यासह तो निघाला. विश्वासणार्यांनी त्यांना शाबासकी देऊन प्रभूच्या कृपेवर सोपविले. तो सिरिया व किलिकियामधून मंडळ्यांना बळकट करीत गेला.
प्रेषितांची कृत्ये 15:22-41 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तेव्हा पौल व बर्णबा ह्यांच्याबरोबर आपणांतून निवडलेली माणसे, म्हणजे बंधुजनांतील प्रमुख बसर्र्ब्बा म्हटलेला यहूदा व सीला ह्यांना अंत्युखियास पाठवले तर बरे होईल असे सर्व मंडळीसह प्रेषित आणि वडील ह्यांना वाटले; त्यांच्या हाती त्यांनी असे लिहून पाठवले : “अंत्युखिया, सूरिया व किलिकिया येथील परराष्ट्रीयांतले बंधुजन ह्यांना प्रेषित व वडीलवर्ग ह्या बंधुजनांचा सलाम. आमच्यापैकी काहींनी जाऊन आपल्या बोलण्याने (म्हणजे सुंता करून घ्यावी व नियमशास्त्र पाळावे असे सांगून) तुम्हांला घोटाळ्यात पाडून त्रास दिला असे आमच्या कानी आले आहे; पण त्यांना आम्ही तसे करायला सांगितले नव्हते. म्हणून आमचे एकमत झाल्यावर आम्हांला हे योग्य वाटले की, आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाकरता जिवावर उदार झालेले आपले प्रिय बंधू बर्णबा व पौल ह्यांच्याबरोबर काही निवडलेली माणसे तुमच्याकडे पाठवावीत. ह्याकरता यहूदा व सीला ह्यांना आम्ही पाठवले आहे; ते स्वतः ह्या गोष्टी तुम्हांला तोंडी सांगतील. कारण पुढे दिलेल्या जरुरीच्या गोष्टींशिवाय तुमच्यावर जास्त ओझे लादू नये असे पवित्र आत्म्याला व आम्हांला योग्य वाटले : त्या म्हणजे मूर्तीला अर्पण केलेले पदार्थ, रक्त, गळा दाबून मारलेले प्राणी व जारकर्म ही तुम्ही वर्ज्य करावीत; ह्यांपासून स्वत:ला जपाल तर तुमचे हित होईल. क्षेमकुशल असो.” त्यांना पाठवून दिल्यावर ते अंत्युखियास गेले आणि त्यांनी सर्व मंडळीला जमवून ते पत्र सादर केले. त्यातला बोध वाचून त्यांना आनंद झाला. यहूदा व सीला हे स्वत: संदेष्टे होते, म्हणून त्यांनी पुष्कळ बोलून बंधुजनांना बोध केला व स्थिरावले. तेथे ते काही दिवस राहिल्यावर ज्यांनी त्यांना पाठवले होते त्यांच्याकडे जाण्यास बंधुजनांनी त्यांना शांतीने पाठवून दिले. [परंतु सीलाला तेथे आणखी राहायला बरे वाटले.] आणि पौल व बर्णबा इतर पुष्कळ जणांबरोबर प्रभूचे वचन शिकवत व सुवार्तेची घोषणा करत अंत्युखियात राहिले. मग काही दिवसानंतर पौलाने बर्णबाला म्हटले, “ज्या ज्या नगरात आपण प्रभूच्या वचनाची घोषणा केली तेथे पुन्हा जाऊन बंधुजनांना भेटून ते कसे आहेत हे पाहू या.” बर्णबाची इच्छा होती की, ज्याला मार्कही म्हणत त्या योहानाला बरोबर घ्यावे. परंतु पौलाला वाटले की, पंफुल्याहून जो आपल्याला सोडून गेला होता व आपल्याबरोबर काम करण्यास आला नाही त्याला सोबतीस घेणे योग्य नाही. ह्यावरून त्यांच्यामध्ये तीव्र मतभेद उपस्थित होऊन ते एकमेकांपासून वेगळे झाले आणि बर्णबा मार्काला घेऊन तारवात बसून कुप्रास गेला; पण पौलाने सीलाला निवडून घेतले आणि बंधुजनांनी त्याला प्रभूच्या कृपेवर सोपवल्यावर तो तेथून निघाला. आणि मंडळ्यांना स्थैर्य देत देत सूरिया व किलिकिया ह्यांमधून गेला.
प्रेषितांची कृत्ये 15:22-41 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
पौल व बर्णबा ह्यांच्याबरोबर आपणांतून निवडलेली माणसे म्हणजे बंधुजनांतील अत्यंत आदरणीय समजल्या जाणाऱ्या बर्शब्बा म्हटलेल्या यहुदा व सीला ह्यांना अंत्युखियास पाठवले तर बरे होईल, असे सर्व ख्रिस्तमंडळीसह प्रेषित आणि वडीलजन ह्यांना वाटले. त्यांच्या हाती त्यांनी असे पत्र लिहून पाठवले: अंत्युखिया, सूरिया व किलिकिया येथील यहुदीतरांतले बंधुजन ह्यांना प्रेषित व वडीलवर्ग ह्या बंधुजनांचा नमस्कार. आमच्यापैकी काहींनी जाऊन त्यांच्या बोलण्याने तुमच्या मनात संदेह निर्माण करून तुम्हांला त्रास दिला, असे आमच्या कानी आले आहे, पण त्यांना आम्ही तसे करावयाला सांगितले नव्हते. म्हणून आमचे एकमत झाल्यावर आम्हांला हे योग्य वाटले की, आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाकरता जिवावर उदार झालेले आपले प्रिय बंधू बर्णबा व पौल ह्यांच्याबरोबर काही निवडलेली माणसे तुमच्याकडे पाठवावीत. ह्याकरता यहुदा व सीला ह्यांना आम्ही पाठविले आहे. ते स्वतः आम्ही इथे लिहिलेल्या गोष्टी तुम्हांला तोंडी सांगतील; कारण पुढे दिलेल्या जरूरीच्या गोष्टींशिवाय तुमच्यावर जास्त ओझे लादू नये, असे पवित्र आत्म्याला व आम्हांला योग्य वाटले: त्या गोष्टी म्हणजे मूर्तीला अर्पिलेले पदार्थ, रक्त, गळा दाबून मारलेले प्राणी व जारकर्म हे तुम्ही वर्ज्य करावे, ह्यांपासून स्वतःला दूर ठेवाल तर तुमचे हित होईल. तुमचे कल्याण असो. त्यांना पाठवून दिल्यावर ते अंत्युखियास गेले आणि त्यांनी सर्व श्रद्धावंतांना जमवून ते पत्र सादर केले. त्यातला प्रोत्साहनात्मक संदेश वाचून त्यांना आनंद झाला. यहुदा व सीला हे स्वतः संदेष्टे होते म्हणून त्यांनी बराच वेळ बोलून बंधुजनांस धैर्य व शक्ती देणारा बोध केला. ते काही दिवस तेथे राहिल्यावर ज्यांनी त्यांना पाठवले होते, त्यांच्याकडे बंधुजनांनी त्यांना शांतीने पाठवून दिले. परंतु सीलाला तेथे आणखी राहावयास बरे वाटले. पौल व बर्णबा इतर पुष्कळ जणांबरोबर प्रभूचे वचन शिकवीत व शुभवर्तमानाची घोषणा करीत अंत्युखियात राहिले. काही दिवसानंतर पौलने बर्णबाला म्हटले, “ज्या ज्या नगरात आपण प्रभूच्या वचनाची घोषणा केली, त्या त्या नगरांत पुन्हा जाऊन बंधुजनांना भेटून ते कसे आहेत, ते पाहू या.” बर्णबाची इच्छा होती की, योहान ऊर्फ मार्कलाही बरोबर घ्यावे. परंतु पौलाला वाटले की, पंफुल्याहून जो आपल्याला सोडून गेला होता व आपल्याबरोबर काम करावयास आला नाही त्याला सोबतीस घेणे योग्य नाही. ह्यावरून त्यांच्यामध्ये तीव्र मतभेद निर्माण होऊन ते एकमेकांपासून वेगळे झाले आणि बर्णबा योहान ऊर्फ मार्कला घेऊन तारवात बसून कुप्र येथे गेला. पौलाने सीलाला निवडून घेतले आणि बंधुजनांनी त्याला प्रभूच्या हाती सोपविल्यावर तो तेथून निघाला. तो ख्रिस्तमंडळ्यांना स्थिर करीत सूरिया आणि किलिकिया या प्रदेशातून गेला.