YouVersion लोगो
सर्च आयकॉन

प्रेषितांची कृत्ये 15:1-12

प्रेषितांची कृत्ये 15:1-12 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

तेव्हा काही जणानी यहूदीयाहून उतरून बंधुजनांना अशी शिकवण दिली की, मोशेने लावून दिलेल्या नियमाप्रमाणे तुमची सुंता झाल्याशिवाय तुमचे तारण होणे शक्य नाही. तेव्हा पौल व बर्णबा ह्यांचा त्यांच्याशी बराच मतभेद व वादविवाद झाल्यावर असे ठरविण्यात आले की, पौल व बर्णबा ह्यांनी व त्यांच्यापैकी इतर लोकांनी या वादाविषयी यरूशलेम शहरामधील प्रेषित व वडील ह्यांच्याकडे जावे. मग मंडळीने त्यांना पाठवल्यावर ते फेनीके व शोमरोन या शहरामधून गेले आणि परराष्ट्रीय देवाकडे वळल्याचे सविस्तर वर्तमान सांगून त्यांनी सर्व बंधुजनांना फार आनंदित केले. नंतर ते यरूशलेम शहरास आल्यावर तेथील मंडळी, प्रेषित व वडील ह्यांनी त्यांचे आगतस्वागत केले, तेव्हा आपण देवाच्या सहवासांत असतांना त्याने जे जे केले ते त्यांनी सांगितले. तरीही परूशी पंथातील कित्येक विश्वास ठेवणारे असे म्हणाले, त्यांची सुंता झालीच पाहिजे व मोशेचे नियमशास्त्र पाळावयाची त्यांना आज्ञा केलीच पाहीजे. मग प्रेषित व वडीलवर्ग या प्रकरणाचा विचार करावयास जमले. तेव्हा पुष्कळ वादविवाद झाल्यावर पेत्र उभा राहून त्यांना म्हणाला बंधुजनहो, तुम्हास ठाऊक आहे की, माझ्या तोडून सुवार्ता ऐकून परराष्ट्रीयांनी विश्वास ठेवावा म्हणून आरंभीचा दिवसांपासून तुम्हामध्ये देवाने माझी निवड केली. आणि हृदये जाणणाऱ्या देवाने जसा आपणास तसा त्यांनाही पवित्र आत्मा देऊन त्यांच्याविषयी साक्ष दिली. त्याने त्यांची अंतःकरणे विश्वासाने शुद्ध करून त्यांच्यामध्ये व आपल्यामध्ये काही भेद ठेवला नाही. असे असतांना जे जोखड आपले पूर्वज व आपण वाहावयास समर्थ नव्हतो ते शिष्यांच्या मानेवर घालू तुम्ही देवाची परीक्षा का पाहता? तर मग त्यांच्याप्रमाणेच आपले तारण प्रभू येशूच्या कृपेने होईल असा आपला विश्वास आहे. तेव्हा सर्व लोक गप्प राहीले आणि बर्णबा व पौल ह्यांनी आपल्या द्वारे देवाने परराष्ट्रीयामध्ये जी चिन्हे व अद्भूते केली त्यांचे केलेले वर्णन त्यांनी ऐकून घेतले.

प्रेषितांची कृत्ये 15:1-12 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

यहूदीया येथून काही माणसे अंत्युखियास आली व विश्वासणार्‍यांना शिकवू लागली: “मोशेने शिकविलेल्या नियमशास्त्राप्रमाणे जोपर्यंत तुमची सुंता होत नाही, तोपर्यंत तुमचे तारण होणे शक्य नाही.” पौल आणि बर्णबाचा त्यांच्याबरोबर प्रखर मतभेद व वादविवाद झाला. शेवटी पौल आणि बर्णबाबरोबर इतर काही विश्वासणार्‍यांची नेमणूक करण्यात आली व या प्रश्नांसंबंधी यरुशलेम येथे प्रेषित व वडीलजनांना भेटावे म्हणून त्यांना पाठविण्यात आले. नंतर मंडळीने त्यांना निरोप देऊन पाठविले आणि जसे ते फेनिके आणि शोमरोनामधून प्रवास करीत गेले, गैरयहूदीयांचे कसे परिवर्तन झाले हे त्यांनी तेथील लोकांना सांगितले. या बातमीने सर्व विश्वासणार्‍यांना अतिशय आनंदित केले. जेव्हा ते यरुशलेममध्ये आले, तेथील मंडळी, प्रेषित व वडीलजनांनी त्यांचे स्वागत केले आणि परमेश्वराने जे सर्वकाही त्यांच्या सेवेद्वारे केले होते, याची सविस्तर माहिती पौल व बर्णबाने त्यांना दिली. परूशी लोकांच्या पंथातील काही विश्वासू सभासद उठून उभे राहिले व म्हणाले, “गैरयहूदी लोकांची सुंता झालीच पाहिजे व मोशेच्या नियमशास्त्राचे पालन करणे त्यांना आवश्यक आहे.” प्रेषित आणि पुढारी या प्रश्नावर विचारविनिमय करण्यासाठी एकत्रित भेटले. बरीच चर्चा झाल्यानंतर, पेत्र उभा राहिला व त्यांना उद्देशून म्हणाला: “बंधूंनो, हे आपणा सर्वांस माहीत आहे की गैरयहूदीयांनी विश्वास ठेवावा व माझ्याद्वारे शुभवार्तेचा संदेश त्यांना कळावा यासाठी फार काळापूर्वी परमेश्वराने माझी निवड केली होती. परमेश्वर अंतःकरणे ओळखतो, त्यांनी आपल्याप्रमाणेच गैरयहूदी लोकांनाही पवित्र आत्मा देऊन त्यांचाही स्वीकार केला आहे, असे स्पष्ट दाखविले आहे. त्याने त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये कसलाही भेदभाव केलेला नाही, कारण त्याने त्यांची मने विश्वासाद्वारे शुद्ध केली आहेत. तेव्हा आता, जे जू आपल्याला व आपल्या पूर्वजांना वाहवयास अशक्य होते, ते गैरयहूद्यांना वाहवयास लावून तुम्ही जणू परमेश्वराची परीक्षा पाहता काय? नाही! आमचा विश्वास आहे की प्रभू येशूंच्या कृपेद्वारे आपल्याप्रमाणे त्यांनाही तारण मिळाले आहे.” तेव्हा बर्णबा व पौल यांच्याद्वारे गैरयहूदी लोकांमध्ये परमेश्वराने जी चिन्हे व अद्भुते केली यांचे वर्णन ऐकत असताना सर्व सभा स्तब्ध राहिली.

प्रेषितांची कृत्ये 15:1-12 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

तेव्हा काही जणांनी यहूदीयाहून उतरून बंधुजनांना अशी शिकवण दिली की, “मोशेने लावून दिलेल्या परिपाठाप्रमाणे तुमची सुंता झाल्यावाचून तुमचे तारण होणे शक्य नाही.” तेव्हा पौल व बर्णबा ह्यांचा त्यांच्याशी बराच मतभेद व वादविवाद झाल्यावर असे ठरवण्यात आले की, पौल व बर्णबा ह्यांनी व त्यांच्यापैकी इतर काहींनी ह्या वादासंबंधाने यरुशलेमेतले प्रेषित व वडीलवर्ग ह्यांच्याकडे जावे. मग मंडळीने त्यांची बोळवण केल्यावर ते फेनिके व शोमरोन ह्यांमधून गेले, आणि परराष्ट्रीय देवाकडे वळल्याचे सविस्तर वर्तमान सांगून त्यांनी सर्व बंधुजनांना फार आनंदित केले. नंतर ते यरुशलेमेस पोहचल्यावर तेथील मंडळी, प्रेषित व वडीलवर्ग ह्यांनी त्यांचे आगतस्वागत केले. तेव्हा आपण देवाच्या सहवासात असताना देवाने जे जे केले ते त्यांनी सांगितले. तरीपण परूशी पंथातील कित्येक विश्वास ठेवणारे पुढे होऊन म्हणाले, “त्यांची सुंता झालीच पाहिजे व मोशेचे नियमशास्त्र पाळण्याची त्यांना आज्ञा केलीच पाहिजे.” मग प्रेषित व वडीलवर्ग ह्या प्रकरणाचा विचार करण्यास जमले. तेव्हा पुष्कळ वादविवाद झाल्यावर पेत्र उभा राहून त्यांना म्हणाला, “बंधुजनहो, तुम्हांला ठाऊक आहे की, माझ्या तोंडून सुवार्ता ऐकून परराष्ट्रीयांनी विश्वास ठेवावा म्हणून आरंभीच्या दिवसांपासून तुमच्यामध्ये देवाने माझी निवड केली. आणि हृदये जाणणार्‍या देवाने जसा आपल्याला तसा त्यांनाही पवित्र आत्मा देऊन त्यांच्याविषयी साक्ष दिली. त्याने त्यांची अंत:करणे विश्वासाने शुद्ध करून त्यांच्यामध्ये व आपल्यामध्ये काही भेद ठेवला नाही. असे असताना जे जोखड आपले पूर्वज व आपणही वाहण्यास समर्थ नव्हतो ते शिष्यांच्या मानेवर घालून तुम्ही देवाची परीक्षा का पाहता? तर मग त्यांच्याप्रमाणेच आपलेही तारण प्रभू येशूच्या कृपेने होईल असा आपला विश्वास आहे. तेव्हा सर्व लोक गप्प राहिले, आणि बर्णबा व पौल ह्यांनी आपल्या द्वारे देवाने परराष्ट्रीयांमध्ये जी जी चिन्हे व अद्भुते केली त्यांचे केलेले वर्णन त्यांनी ऐकून घेतले.

प्रेषितांची कृत्ये 15:1-12 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)

काही जणांनी यहुदियाहून उतरून बंधुजनांस अशी शिकवण दिली, “मोशेने नेमून दिलेल्या परिपाठाप्रमाणे तुमची सुंता झाल्यावाचून तुमचे तारण होणे शक्य नाही.” तेव्हा पौल व बर्णबा ह्यांचा त्यांच्याशी तीव्र मतभेद व वादविवाद झाल्यावर असे ठरविण्यात आले की, पौल व बर्णबा ह्यांनी व त्यांच्यापैकी इतर काहींनी ह्या वादासंबंधाने यरुशलेममधले प्रेषित व वडीलवर्ग ह्यांच्याकडे जावे. मग ख्रिस्तमंडळीने त्यांना निरोप दिल्यावर ते फेनिके व शोमरोन यांमधून गेले आणि यहुदीतर लोक देवाकडे वळल्याचे सविस्तर वर्तमान सांगून त्यांनी सर्व बंधुजनांना फार आनंदित केले. नंतर ते यरुशलेमला पोहचल्यावर तेथील ख्रिस्तमंडळी, प्रेषित व वडीलवर्ग ह्यांनी त्यांचे स्वागत केले. तेव्हा आपण देवाच्या सहवासात असताना त्यांनी जे जे केले, ते त्यांनी सांगितले. तरी पण परुशी पंथातील कित्येक विश्वास ठेवणारे पुढे होऊन म्हणाले की, त्यांची सुंता झालीच पाहिजे व मोशेचे नियमशास्त्र पाळावयाची त्यांना आज्ञा केलीच पाहिजे. प्रेषित व वडीलवर्ग ह्या गोष्टींविषयी विचार करावयास जमले. पुष्कळ वादविवाद झाल्यावर पेत्र उभा राहून त्यांना म्हणाला, “बंधुजनहो, तुम्हांला ठाऊक आहे की, माझ्या तोंडून शुभवर्तमान ऐकून यहुदीतरांनी विश्वास ठेवावा म्हणून आरंभीच्या दिवसांपासून देवाने तुमच्यामधून माझी निवड केली. हृदय जाणणाऱ्या देवाने जसा आपणांस तसा त्यांनाही पवित्र आत्मा देऊन त्यांच्याविषयी साक्ष दिली आहे. त्याने त्यांची अंतःकरणे विश्वासाने शुद्ध करून त्यांच्यामध्ये व आपल्यामध्ये काही भेद ठेवला नाही. असे असताना जे जोखड आपले पूर्वज व आपणही वाहावयास समर्थ नव्हतो ते शिष्यांच्या मानेवर घालून तुम्ही देवाची परीक्षा का पाहता? तर मग जसे त्यांचे तसे आपलेही तारण प्रभू येशूच्या कृपेने झाले आहे, असा आपला विश्वास आहे.” सर्व लोक गप्प राहिले आणि बर्णबा व पौल ह्यांनी आपल्याद्वारे देवाने यहुदीतरांमध्ये जे चमत्कार व अद्भूत गोष्टी केल्या त्यांचे केलेले वर्णन त्यांनी ऐकून घेतले.