प्रेषितांची कृत्ये 11:1-30
प्रेषितांची कृत्ये 11:1-30 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
यहूदी नसलेल्या लोकांनीसुद्धा देवाच्या वचनाचा स्वीकार केला आहे हे यहूदीया प्रांतातील प्रेषितांनी व बंधूनी ऐकले. पण जेव्हा पेत्र यरूशलेम शहरास आला, तेव्हा सुंता झालेला यहूदी विश्वासी गट त्याच्यावर टिका करू लागले. ते म्हणाले, “जे सुंता न झालेले व परराष्ट्रीय आहेत अशा विश्वास ठेवणाऱ्या लोकांच्या घरी तुम्ही गेला, एवढेच नव्हे तर तुम्ही त्यांच्यासह जेवणही केले.” म्हणून पेत्राने त्यांना सर्व घटना सविस्तर स्पष्ट करून सांगितल्या. पेत्र म्हणाला, मी यापो शहरात प्रार्थना करीत असताना मला तंद्री लागल्यासारखे झाले व मी एक दृष्टांत पाहिला की, मोठ्या चांदव्यासारखे चार कोपरे धरून सोडलेली एक चादर माझ्यापर्यंत आली. मी त्याच्याकडे न्याहाळून पाहून विचार करीत होतो, मी त्यामध्ये पृथ्वीवरील चार पायाचे प्राणी, जंगली पशू, सरपटणारे प्राणी आणि आकाशात उडणारे पक्षी मी त्यामध्ये पाहिले. एक वाणी माझ्याशी बोलताना मी ऐकली, “पेत्रा, ऊठ, मारून खा!” पण मी म्हणालो, “प्रभू, मी असे कधीही करणार नाही, मी अपवित्र किंवा अशुद्ध असे कधीच खाल्ले नाही.” आकाशातून त्या वाणीने पुन्हा उत्तर दिले, “देवाने या गोष्टी शुद्ध केल्या आहेत, त्यांना अशुद्ध म्हणू नकोस.” असे तीन वेळा घडले, मग ते सर्व पुन्हा वर आकाशात घेतले गेले. इतक्यात पाहा, तीन माणसे ज्या घरामध्ये आम्ही होतो त्यापुढे कैसरीयाहून माझ्याकडे पाठवलेली तीन माणसे येऊन उभी राहिली. आत्म्याने मला कोणत्याही प्रकारचा संशय न धरिता त्यांच्याबरोबर जाण्यास सांगितले, हे सहा बंधू जे येथे आहेत, तेही माझ्याबरोबर होते, आम्ही कर्नेल्याच्या घरी गेलो. कर्नेल्याने आपल्या घरात देवदूत उभा असलेला कसा दिसला हे आम्हास सांगितले, देवदूत कर्नेल्याला म्हणाला, “काही माणसे यापोस पाठव, शिमोन पेत्राला बोलावून घे. तो तुझ्याशी बोलेल, तो ज्या गोष्टी तुला सांगेल, त्यामुळे तुझे व तुझ्या कुटुंबाचे तारण होईल.” त्यानंतर मी माझ्या भाषणाला सुरुवात केली, सुरुवातीला ज्याप्रमाणे पवित्र आत्मा आपल्यावर आला तसाच तो त्यांच्यावरही आला. तेव्हा मला प्रभूचे शब्द आठवले, प्रभू म्हणाला होता, “योहान लोकांचा बाप्तिस्मा पाण्याने करीत असे हे खरे, पण तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याने होईल.” आपण प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला तेव्हा जसे आपणांस तसे त्यांसही देवाने सारखेच दान दिले, मग देवाला अडविणारा असा मी कोण? जेव्हा त्यांनी या गोष्टी ऐकल्या, तेव्हा ते शांत राहिले, त्यांनी देवाची स्तुती केली आणि म्हणाले, “तर मग देवाने परराष्ट्रीयांसही जीवन मिळावे म्हणून पश्चात्तापबुद्धी दिली आहे.” स्तेफन मारला गेल्यानंतरच्या काळात जो छळ झाला, त्यामुळे विश्वास ठेवणारे यरूशलेम शहरापासून दूर ठिकाणी फेनीके प्रांत, कुप्र बेट व अंत्युखिया शहरापर्यंत पांगले गेले, विश्वास ठेवणाऱ्यांनी या ठिकाणी फक्त यहूदी लोकांसच सुवार्ता सांगितली. यातील काही विश्वास ठेवणारे कुप्र व कुरेने येथे राहणारे होते, जेव्हा हे लोक अंत्युखियात आले, तेव्हा त्यांनी या ग्रीक लोकांस येशूविषयीची सुवार्ता सांगितली. प्रभू विश्वास ठेवणाऱ्यांना मदत करीत होता आणि बऱ्याच मोठ्या गटाने विश्वास ठेवला व ते प्रभूला अनुसरू लागले. याविषयीची बातमी यरूशलेम शहरातील विश्वास ठेवणाऱ्या मंडळीच्या कानावर आली, म्हणून यरूशलेम शहरातील विश्वास ठेवणाऱ्यांनी बर्णबाला अंत्युखियाला पाठवले. बर्णबा चांगला मनुष्य होता, तो पवित्र आत्म्याने आणि विश्वासाने पूर्णपणे भरलेला होता, जेव्हा बर्णबा अंत्युखियाला गेला, तेव्हा त्याने पाहिले की, देवाने या लोकांवर खूप कृपा केली आहे, त्यामुळे बर्णबाला खूप आनंद झाला, अंत्युखियातील सर्व विश्वास ठेवणाऱ्यांना त्याने उत्तेजन दिले, त्याने त्यांना सांगितले, कधीही तुमचा विश्वास गमावू नका, नेहमी प्रभूची आज्ञा अंतःकरणापासून पाळा. तो चागंला मनुष्य होता आणि पवित्र आत्म्याने व विश्वासाने पूर्ण होता; तेव्हा प्रभूला पुष्कळजण मिळाले. जेव्हा बर्णबा तार्सास गेला तेव्हा तो शौलाचा शोध घेत होता. जेव्हा बर्णबाने त्यास शोधले तेव्हा त्याने शौलाला आपल्यासह अंत्युखियाला आणले, शौलाने व बर्णबाने वर्षभर तेथे मंडळीत राहून पुष्कळ लोकांस शिकवले, अंत्युखियामध्ये येशूच्या अनुयायांना ‘ख्रिस्ती’ हे नाव पहिल्यांदा मिळाले. याच काळात काही संदेष्टे यरूशलेम शहराहून अंत्युखियास आले. यांच्यापैकी एकाचे नाव अगब होते, अंत्युखियात तो उभा राहिला आणि बोलू लागला, पवित्र आत्म्याच्या साहाय्याने तो म्हणाला, फार वाईट काळ सर्व पृथ्वीवर येत आहे, लोकांस खायला अन्न मिळणार नाही, क्लौदिया राजा राज्य करीत होता तेव्हा त्याच्या काळात हे घडले. विश्वास ठेवणाऱ्यांनी ठरवले की, यहूदीया येथील आपल्या बंधू व भगिनींना जास्तीत जास्त मदत पाठविण्याचा प्रयत्न करावा प्रत्येक शिष्याने जास्तीत जास्त मदत पाठवण्याचे ठरवले. त्यांनी पैसे गोळा करून बर्णबा व शौल यांच्याकडे दिले, मग बर्णबा व शौल यांनी ते पैसे यहूदीयातील वडीलजनांकडे पाठवून दिले.
प्रेषितांची कृत्ये 11:1-30 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
गैरयहूदी लोकांनीही परमेश्वराचे वचन ग्रहण केले हे प्रेषितांच्या आणि यहूदीया प्रांतातील विश्वासणार्यांच्या कानी गेले. मग पेत्र वर यरुशलेमला गेला, त्यावेळी सुंता झालेल्या विश्वासणार्यांनी त्याच्यावर टीका केली ते म्हणाले, “तू असुंती लोकांच्या घरी गेलास आणि त्यांच्याबरोबर भोजन केले.” त्यावर पेत्राने सुरुवातीपासून, सर्वगोष्टी सविस्तर सांगितल्या: तो म्हणाला, “मी योप्पा शहरात प्रार्थना करीत असताना, माझे देहभान सुटले तेव्हा मी दृष्टान्त पाहिला. त्यामध्ये मोठ्या चादरी सारखे काहीतरी चारही कोपरे धरून आकाशातून खाली सोडले जात आहे आणि मी जिथे होतो तिथे ते खाली आले. मी त्यामध्ये डोकावून पाहिले मला पृथ्वीवरील चतुष्पाद प्राणी, श्वापदे, सरपटणारे जीवजंतू व आकाशातील पाखरे दिसली. तेव्हा एक वाणी माझ्याशी बोलताना मी ऐकली, ‘पेत्रा, ऊठ व मारून खा.’ “मी उत्तर दिले, ‘प्रभू खात्रीने नाही! कारण अस्वच्छ व अशुद्ध असे कधीही माझ्या तोंडात गेलेले नाही.’ “स्वर्गातून दुसर्या वेळेस वाणी ऐकू आली, ‘परमेश्वराने जे शुद्ध केले आहे, ते अशुद्ध असे म्हणू नकोस.’ असे तीन वेळा झाले आणि ते सर्व परत स्वर्गाकडे घेतले गेले. “नेमक्या याच वेळी कैसरीयाहून मजकडे पाठविलेली तीन माणसे मी राहत होतो त्या घराच्या समोर येऊन उभी राहिली. तेव्हा आत्मा मला म्हणाला त्यांच्याबरोबर जाण्यास संकोच करू नको. मजबरोबर सहा बंधूही सोबतीला होते आणि आम्ही त्या मनुष्याच्या घरी प्रवेश केला. त्याने आम्हाला सांगितले की परमेश्वराचा दूत त्याच्या घरात प्रकट झाला आणि म्हणाला, ‘योप्पा येथे शिमोन ज्याला पेत्र म्हणतात त्याला बोलावून घे. तो तुला संदेश सांगेल त्याद्वारे तुझे आणि तुझ्या सर्व घराण्याचे तारण होईल.’ “मी बोलण्यास सुरुवात केली, तेव्हाच पवित्र आत्मा त्यांच्यावर उतरला, जसा तो सुरुवातीला आपल्यावर उतरला होता. तेव्हा मला आठवण झाली की, प्रभू येशूंनी काय सांगितले होते: ‘योहानाने पाण्याने बाप्तिस्मा केला, परंतु तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याने होईल.’ म्हणून जर परमेश्वराने तेच दान त्यांना दिले, जे आपण प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला तेव्हा आपल्याला मिळाले, तर परमेश्वराला विरोध करणारा मी कोण?” त्यांनी हे ऐकले, तेव्हा त्यांच्याकडे आणखी काही प्रश्न राहिले नाहीत आणि ते परमेश्वराची स्तुती करू लागले व म्हणाले, “तर आता परमेश्वराने गैरयहूदीयांनाही पश्चात्ताप करण्याची संधी दिली आहे ज्यामुळे त्यांना जीवन प्राप्त होईल.” स्तेफनाचा वध झाल्यानंतर छळामुळे जे इतरत्र पांगले होते ते प्रवास करीत फेनिके, सायप्रस व अंत्युखिया येथे गेले व त्यांनी केवळ यहूदीयांनाच वचन सांगितले. तरी, सायप्रस व कुरेने, येथून अंत्युखिया येथे गेलेल्या काही लोकांनी प्रभू येशूंविषयीची शुभवार्ता ग्रीक लोकांनाही सांगितली. तेव्हा प्रभूचे सामर्थ्य त्यांच्यावर होते, म्हणून लोकांनी मोठ्या संख्येने विश्वास ठेवला आणि ते प्रभूकडे वळले. यरुशलेम येथे असलेल्या मंडळीने जेव्हा ही बातमी ऐकली, तेव्हा त्यांनी बर्णबाला अंत्युखियास पाठविले. जेव्हा तो तिथे आला आणि परमेश्वराच्या कृपेमुळे जे काही झाले होते ते पाहून तो आनंदित झाला आणि त्या सर्वांनी पूर्ण मनाने प्रभूबरोबर एकनिष्ठ राहावे असे त्याने त्या सर्वांना उत्तेजन दिले. बर्णबा एक चांगला मनुष्य होता, तो पवित्र आत्म्याने भरलेला आणि विश्वासात परिपूर्ण असा होता आणि फार मोठ्या संख्येने लोकांना प्रभूकडे आणले. त्यानंतर शौलाचा शोध घेण्यासाठी बर्णबा पुढे तार्ससला गेला, जेव्हा तो त्याला भेटला, त्याने त्याला अंत्युखिया येथे आणले. बर्णबा व शौल दोघेही वर्षभर मंडळ्यांमध्ये अनेक लोकांना भेटून शिक्षण देत राहिले. अंत्युखिया मध्येच शिष्यांना ख्रिस्ती हे नाव प्रथम मिळाले. याकाळात काही संदेष्टे यरुशलेमकडून खाली अंत्युखियास आले. त्यांच्यामधील अगब नावाचा एकजण उभा राहिला आणि आत्म्याच्या साहाय्याने त्याने असे भविष्य सांगितले की, सर्व रोमी साम्राज्यात मोठा दुष्काळ पडणार आहे. (क्लौडियसच्या कारकिर्दीत हे झाले.) तेव्हा शिष्यांनी असे ठरविले की, प्रत्येकांनी त्यांच्या ऐपतीप्रमाणे यहूदीयामध्ये राहणार्या बंधू भगिनींना मदत करावी. त्याप्रमाणे त्यांनी केले, त्यांच्या देणग्या तेथील वडीलमंडळींना पाठविण्यासाठी त्यांनी शौल व बर्णबाच्या स्वाधीन केल्या.
प्रेषितांची कृत्ये 11:1-30 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
प्रेषितांनी व यहूदीया प्रांतात असलेल्या बंधुजनांनी असे ऐकले की, परराष्ट्रीयांनीही देवाचे वचन ग्रहण केले. मग पेत्र यरुशलेमेस गेला तेव्हा सुंता झालेले लोक त्याच्याबरोबर वाद घालू लागले की, “सुंता न झालेल्या माणसांकडे जाऊन त्यांच्याबरोबर तुम्ही जेवलात.” तेव्हा पेत्राने अनुक्रमाने सविस्तर सांगण्यास सुरुवात केली : “मी यापो नगरात प्रार्थना करत होतो; तेव्हा देहभान सुटून मी असा एक दृष्टान्त पाहिला की, एक पात्र उतरले, व ते मोठ्या चांदव्यासारखे चार कोपरे धरून आकाशातून सोडलेले असे माझ्यापर्यंत आले. त्याच्याकडे मी न्याहाळून पाहत होतो तेव्हा पृथ्वीवरले चतुष्पाद, श्वापदे, सरपटणारे जीव व आकाशातील पाखरे माझ्या दृष्टीस पडली. आणि मी अशी वाणी माझ्याबरोबर बोलताना ऐकली की, ‘पेत्रा, ऊठ; मारून खा.’ परंतु मी म्हणालो, “नको, नको, प्रभू; कारण निषिद्ध किंवा अशुद्ध असे काही माझ्या तोंडात अजून कधी गेले नाही. मग दुसर्यांदा आकाशातून वाणी होऊन ती मला म्हणाली, ‘देवाने जे शुद्ध केले आहे ते तू निषिद्ध मानू नकोस.’ असे तीनदा झाले; नंतर ती अवघी पुन्हा आकाशात वर ओढली गेली. इतक्यात पाहा, ज्या घरात आम्ही होतो त्याच्यापुढे कैसरीयातून माझ्याकडे पाठवलेली तीन माणसे येऊन उभी राहिली. तेव्हा आत्म्याने मला सांगितले की, ‘काही संशय न धरता त्यांच्याबरोबर जा.’ मग हे सहा बंधूही माझ्याबरोबर आले आणि आम्ही त्या माणसाच्या घरी गेलो. त्याने आम्हांला सांगितले की, ‘मी आपल्या घरी देवदूत उभा राहिलेला पाहिला. तो म्हणाला, यापोस कोणाला तरी पाठवून पेत्र म्हटलेल्या शिमोनास बोलावून आण; ज्यांच्या योगे तुझे व तुझ्या सर्व कुटुंबाचे तारण होईल अशा गोष्टी तो तुला सांगेल.’ मी बोलू लागलो तेव्हा, जसा आरंभी आपल्यावर तसा त्यांच्यावरही पवित्र आत्मा उतरला. तेव्हा प्रभूने सांगितलेली गोष्ट मला आठवली, ती अशी की, ‘योहानाने पाण्याने बाप्तिस्मा केला हे खरे; परंतु तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याने होईल.’ जेव्हा आपण प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला तेव्हा जसे आपणांस तसे त्यांनाही देवाने सारखेच दान दिले; तर मग देवाला अडवणारा असा मी कोण?” हे ऐकून ते उगे राहिले आणि देवाचा गौरव करत बोलले, “तर मग देवाने परराष्ट्रीयांनाही जीवन मिळावे म्हणून पश्चात्तापबुद्धी दिली आहे.” स्तेफनावरून उद्भवलेल्या छळामुळे ज्यांची पांगापांग झाली होती ते फेनिके, कुप्र व अंत्युखिया येथपर्यंत फिरून यहूद्यांना मात्र देवाचे वचन सांगत असत. तरी त्यांच्यापैकी कित्येक कुप्री व कुरेनेकर होते; ते अंत्युखियात येऊन प्रभू येशूची सुवार्ता हेल्लेणी लोकांनाही सांगू लागले. तेव्हा प्रभूचा हात त्यांच्याबरोबर होता आणि पुष्कळ लोक विश्वास धरून प्रभूकडे वळले. त्यांच्याविषयीचे वर्तमान यरुशलेमेतल्या मंडळीच्या कानी आले तेव्हा त्यांनी बर्णबाला अंत्युखियास पाठवले. तो तेथे पोहचल्यावर देवाची कृपा पाहून हर्षित झाला; आणि त्याने त्या सर्वांना बोध केला की, ‘दृढ निश्चयाने प्रभूला बिलगून राहा.’ तो चांगला मनुष्य होता, आणि पवित्र आत्म्याने व विश्वासाने पूर्ण होता; तेव्हा प्रभूला पुष्कळ जण मिळाले. नंतर तो शौलाचा शोध करण्यास तार्सास गेला. त्याचा शोध लागल्यावर त्याने त्याला अंत्युखियास आणले. मग असे झाले की, त्यांनी तेथे वर्षभर मंडळीमध्ये मिळूनमिसळून बर्याच लोकांना शिकवले; आणि शिष्यांना ‘ख्रिस्ती’ हे नाव पहिल्यांदा अंत्युखियात मिळाले. त्या दिवसांत यरुशलेमेहून अंत्युखियास संदेष्टे आले. तेव्हा त्यांच्यातील अगब नावाच्या मनुष्याने उठून आत्म्याच्या योगे सुचवले की, सर्व जगात मोठा दुष्काळ पडणार आहे. हा दुष्काळ क्लौद्याच्या वेळेस पडला. तेव्हा प्रत्येक शिष्याने निश्चय केला की, यहूदीयात राहणार्या बंधुजनांच्या मदतीकरता यथाशक्ती काही पाठवावे; त्याप्रमाणे त्यांनी केले, म्हणजे ते बर्णबा व शौल ह्यांच्या हाती वडीलवर्गाकडे1 पाठवून दिले.
प्रेषितांची कृत्ये 11:1-30 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
प्रेषितांनी व यहुदिया प्रांतांत असलेल्या बंधुजनांनी असे ऐकले की, यहुदीतरांनीही देवाचे वचन स्वीकारले आहे. पेत्र यरुशलेम येथे गेला, तेव्हा सुंता झालेले लोक त्याच्याबरोबर वाद घालू लागले की, “सुंता न झालेल्या माणसांकडे जाऊन त्यांच्याबरोबर तुम्ही भोजन घेतले.” पेत्राने अनुक्रमाने सविस्तर सांगण्यास सुरुवात केली: “मी यापो नगरात प्रार्थना करत होतो, तेव्हा देहभान सुटून मी असा एक दृष्टान्त पाहिला की, एक पात्र उतरले व ते मोठ्या चादरीसारखे चार कोपरे धरून आकाशांतून सोडलेले असे माझ्यापर्यंत आले. त्याच्याकडे मी न्याहाळून पाहून विचार करत होतो तो पृथ्वीवरचे चतुष्पाद, श्वापदे, सरपटणारे जीव व आकाशातले पक्षी माझ्या दृष्टीस पडले. मी अशी वाणीही माझ्याबरोबर बोलताना ऐकली की, ‘पेत्र, ऊठ, मारून खा.’ परंतु मी म्हणालो, ‘नको नको, प्रभो, कारण निषिद्ध किंवा अशुद्ध असे काही माझ्या तोंडात अजून कधी गेले नाही.’ दुसऱ्यांदा आकाशातून वाणी होऊन ती मला म्हणाली, ‘देवाने जे शुद्ध केले आहे ते तू निषिद्ध मानू नकोस.’ असे तीनदा झाले, नंतर सर्व काही पुन्हा आकाशात वर ओढले गेले. इतक्यात ज्या घरात आम्ही होतो त्या घरापुढे कैसरियामधून माझ्याकडे पाठवलेली तीन माणसे येऊन उभी राहिली. तेव्हा पवित्र आत्म्याने मला सांगितले, ‘काही संशय न धरता त्यांच्याबरोबर जा.’ ते सहा बंधूही माझ्याबरोबर आले आणि आम्ही कर्नेल्यच्या घरी गेलो. त्याने आम्हांला सांगितले, “मी माझ्या घरी देवदूत उभा राहिलेला पाहिला. तो म्हणाला, ‘यापो येथे कोणाला पाठवून पेत्र म्हटलेल्या शिमोनला बोलावून आण. ज्यांच्या योगे तुझे व तुझ्या सर्व कुटुंबाचे तारण होईल, अशा गोष्टी तो तुला सांगेल’. मी बोलू लागलो तेव्हा, जसा आरंभी आपल्यावर उतरला तसा त्यांच्यावरही पवित्र आत्मा उतरला. तेव्हा प्रभूने सांगितलेली गोष्ट मला आठवली. ती अशी की, ‘योहान पाण्याने बाप्तिस्मा देत असे हे खरे, परंतु तुम्हांला बाप्तिस्मा पवित्र आत्म्याने दिला जाईल.’ जेव्हा आपण प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला, तेव्हा जसे आपणांस तसेच त्यांनाही देवाने सारखेच दान दिले, तर मग देवाला अडविणारा असा मी कोण?” हे ऐकून त्यांनी टीका करणे बंद केले आणि देवाचा गौरव करीत ते म्हणाले, “तर मग देवाने यहुदीतरांनाही जीवन मिळावे म्हणून पश्चात्तापबुद्धी दिली आहे.” स्तेफनवरून उद्भवलेल्या संकटामुळे ज्यांची पांगापांग झाली होती, त्यांच्यापैकी काही जण फेनीके, कुप्र व अंत्युखिया येथपर्यंत फिरून फक्त यहुदी लोकांना देवाचे वचन सांगत होते. परंतु कुप्र व कुरेनेकर येथील कित्येकांनी अंत्युखियात जाऊन प्रभू येशूचे शुभवर्तमान ग्रीक लोकांनाही सांगितले. त्या वेळी प्रभूचे सामर्थ्य त्यांच्याबरोबर होते आणि पुष्कळ लोक विश्वास धरून प्रभूकडे वळत होते. त्यांच्याविषयीचे वृत्त यरुशलेममधील ख्रिस्तमंडळीच्या कानी आले, तेव्हा त्यांनी बर्णबाला अंत्युखियास पाठवले. तेथे पोहचल्यावर देवाची कृपा पाहून तो हर्षित झाला. त्याने त्या सर्वांना बोध केला, “दृढ निश्चयाने प्रभूला बिलगून राहा.” बर्णबा चांगला मनुष्य होता आणि पवित्र आत्म्याने व विश्वासाने पूर्ण होता. तेव्हा पुष्कळ जण प्रभूला मिळाले. नतंर तो शौलाचा शोध करावयाला तार्स येथे गेला. त्याचा शोध लागल्यावर त्याने त्याला अंत्युखियाला आणले. त्याने तेथे वर्षभर ख्रिस्तमंडळीमध्ये मिसळून बऱ्याच लोकांना प्रबोधन केले. श्रद्धावंतांना ख्रिस्ती हे नाव पहिल्याने अंत्युखियात मिळाले. त्या दिवसांत यरुशलेमहून अंत्युखियास काही संदेष्टे आले. त्यांच्यातील अगब नावाच्या मनुष्याने उठून पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने सुचविले, “सर्व जगात भीषण दुष्काळ पडणार आहे.” (हा दुष्काळ क्लौद्य सम्राटाच्या राजवटीत झाला.) हे ऐकून प्रत्येक शिष्याने निश्चय केला की, यहुदियात राहणाऱ्या बंधुजनांच्या मदतीकरता यथाशक्ति साहाय्य पाठवावे. त्याप्रमाणे त्यांनी केले, म्हणजे त्यांचे दान त्यांनी बर्णबा व शौल ह्यांच्याद्वारे ख्रिस्तमंडळीच्या वडिलांकडे पाठवून दिले.