प्रेषितांची कृत्ये 10:37-48
प्रेषितांची कृत्ये 10:37-48 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
सगळ्या यहूदीया प्रांतात काय घडले हे तुम्हा सर्वांना माहीत आहे, त्याची सुरुवात योहानाने लोकांस बाप्तिस्म्याविषयी गालील प्रांतात जो संदेश दिला, त्याने झाली. नासरेथच्या येशूविषयी तुम्हास माहिती आहे, देवाने त्यास पवित्र आत्म्याचा व सामर्थ्याचा अभिषेक केला, येशू सगळीकडे लोकांसाठी चांगल्या गोष्टी करीत गेला, जे लोक दुष्ट आत्म्याने पछाडले होते त्यांना येशूने बरे केले, कारण देव त्याच्याबरोबर होता. येशूने संपूर्ण यहूदीया प्रांतात आणि यरूशलेम शहरात जे जे केले त्या सर्व गोष्टी आम्ही पाहिल्या आणि आम्ही त्याचे साक्षीदार आहोत, पण येशूला मारण्यात आले, लाकडाच्या वधस्तंभावर त्यांनी त्यास टांगून मारले. परंतु देवाने तिसऱ्या दिवशी त्यास जिवंत केले देवाने येशूला लोकांस स्पष्ट पाहू दिले. परंतु सर्वच माणासांनी येशूला पाहिले नाही, देवाने त्यांना अगोदरच साक्षीदार म्हणून निवडले होते, त्यांनीच त्यास पाहिले, ते साक्षीदार आम्ही आहोत येशू मरणातून उठविला गेल्यानंतर आम्ही त्याच्याबरोबर अन्नपाणी सेवन केले. येशूने आम्हास ‘लोकांस उपदेश करायला सांगितले, जिवंतांचा आणि मरण पावलेल्यांचा न्याय करण्यासाठी देवाने त्यास आपल्याला आहे’ हे सांगण्यासाठी त्याने आम्हास आज्ञा केली. जो कोणी येशूवर विश्वास ठेवतो, त्यास क्षमा केली जाईल, येशूच्या नावामध्ये देव त्या व्यक्तीच्या पापांची क्षमा करील, सर्व संदेष्टे हे खरे आहे असे म्हणतात.” पेत्र हे बोलत असतानाच त्याचे बोलणे ऐकत बसलेल्या सर्व लोकांवर पवित्र आत्मा उतरला. यहूदी सुंता झालेले विश्वास ठेवणारे जे पेत्राबरोबर आले होते, ते चकित झाले, यहूदी नसलेल्या लोकांवरसुद्धा पवित्र आत्माच्या दानाचा वर्षाव झाला आहे, यामुळे ते चकित झाले. आणि यहूदी नसलेल्या लोकांस निरनिराळ्या भाषा बोलताना आणि देवाची स्तुती करताना यहूदी लोकांनी ऐकले. मग पेत्र म्हणाला, “या लोकांस पाण्याने बाप्तिस्मा देण्यास आपण नकार देऊ शकत नाही, ज्याप्रमाणे आम्हास मिळाला, त्याचप्रमाणे त्यांनाही पवित्र आत्मा मिळाला आहे.” म्हणून पेत्राने कर्नेल्य, त्याचे नातेवाईक आणि मित्र यांना येशू ख्रिस्ताच्या नावाने बाप्तिस्मा देण्याची आज्ञा केली, मग पेत्राने आणखी काही दिवस त्यांच्याबरोबर रहावे अशी त्या लोकांनी त्यास विनंती केली.
प्रेषितांची कृत्ये 10:37-48 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
योहानाने बाप्तिस्म्याबद्दल संदेश दिला त्यानंतर गालीलापासून सुरुवात होऊन संपूर्ण यहूदीयामध्ये काय घडून आले हे तुम्हाला चांगले माहीत आहे, कशाप्रकारे परमेश्वराने नासरेथ येथील येशूंना पवित्र आत्म्याचा व सामर्थ्याचा अभिषेक केला आणि ते सत्कर्मे करीत व सैतानाच्या सत्तेखाली असलेल्या सर्वांस बरे करीत फिरत होते, कारण परमेश्वर त्यांच्याबरोबर होते. “त्या यहूदीयांच्या देशामध्ये व यरुशलेममध्ये त्यांनी ज्या सर्वगोष्टी केल्या त्यांचे आम्ही साक्षी आहोत. त्यांनी त्यांना क्रूसावर खिळून मारले, परंतु परमेश्वराने तीन दिवसानंतर त्यांना मरणातून पुन्हा जिवंत केले व लोकांसमोर प्रकट केले. जरी ते सर्व लोकांसमोर प्रकट झाले नाहीत, परंतु जे साक्षीदार ज्यांना परमेश्वराने पूर्वीच निवडून ठेवले होते त्या आम्हाला मरणातून उठल्यानंतर ते प्रकट झाले व त्यांनी आमच्याबरोबर खाणेपिणे केले. त्यांनी आम्हाला अशी आज्ञा केली आहे की, लोकांस उपदेश करा व साक्ष द्या, परमेश्वराने नेमलेले जिवंतांचे व मेलेल्यांचे न्यायाधीश ते हेच आहे. सर्व संदेष्ट्यांनी येशूंबद्दल अशी साक्ष दिली आहे की जो प्रत्येकजण त्यांच्यावर विश्वास ठेवतो त्याला त्यांच्या नावाने पापक्षमा मिळते.” पेत्र हे वचन बोलत असतानाच, सर्व संदेश ऐकणार्यांवर पवित्र आत्मा उतरला. पेत्राबरोबर आलेले विश्वासीजण ज्यांची सुंता झाली होती ते आश्चर्यचकित झाले, कारण त्यांनी पाहिले की गैरयहूदी लोकांवरसुद्धा पवित्र आत्मा ओतून दिला आहे. कारण त्यांनी त्यांना अन्य भाषांमधून बोलताना आणि परमेश्वराची स्तुती करताना ऐकले. मग पेत्र म्हणाला, “तर त्यांचा पाण्याने बाप्तिस्मा करण्यास काही हरकत नाही कारण पवित्र आत्मा आपल्याला मिळाला, तसा त्यांनाही मिळालेला आहे.” मग त्याने आज्ञा केली की येशू ख्रिस्ताच्या नावात त्यांचा बाप्तिस्मा करावा. मग पेत्राने त्यांच्याबरोबर काही दिवस रहावे म्हणून त्यांनी त्याला विनंती केली.
प्रेषितांची कृत्ये 10:37-48 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
योहानाने बाप्तिस्म्याची घोषणा केल्यानंतर गालीलापासून प्रारंभ होऊन सर्व यहूदीयामध्ये घडलेली गोष्ट तुम्हांला तर माहीतच आहे. नासोरी येशूला देवाने पवित्र आत्म्याचा व सामर्थ्याचा अभिषेक केला; तो सत्कर्मे करत व सैतानाच्या सत्तेखाली असलेल्या सर्वांना बरे करत फिरला; कारण देव त्याच्याबरोबर होता. आणि त्याने यहूद्यांच्या देशात व यरुशलेमेत जे काही केले त्या सर्वांचे साक्षी आम्ही आहोत. त्यांनी त्याला खांबावर टांगून मारले; पण त्याला देवाने तिसर्या दिवशी उठवले व त्याने प्रकट व्हावे असे केले. तरी हे प्रकटीकरण सर्व लोकांना नव्हे, पण जे साक्षी देवाने पूर्वी निवडले त्या आम्हांला केले; त्या आम्ही तो मेलेल्यांतून उठल्यानंतर त्याच्याबरोबर खाणेपिणे केले. त्याने आम्हांला अशी आज्ञा केली की, ‘लोकांना उपदेश करा व अशी साक्ष द्या की, देवाने नेमलेला असा जिवंताचा व मेलेल्यांचा न्यायाधीश तो हाच आहे.’ त्याच्यावर विश्वास ठेवणार्या प्रत्येकाला त्याच्या नावाने पापांची क्षमा मिळेल अशी साक्ष सर्व संदेष्टे त्याच्याविषयी देतात.” पेत्राचे हे भाषण चालू असतानाच वचन ऐकणार्या सर्वांवर पवित्र आत्मा उतरला. मग परराष्ट्रीयांवरही पवित्र आत्म्याच्या दानाचा वर्षाव झाला आहे असे पाहून पेत्राबरोबर आलेल्या विश्वास ठेवणार्या व सुंता झालेल्या सर्व लोकांना आश्चर्य वाटले. कारण त्यांनी त्यांना अनेक भाषांतून बोलताना व देवाची थोरवी गाताना ऐकले. तेव्हा पेत्राने म्हटले, “आम्हांला मिळाला तसा पवित्र आत्मा ज्यांना मिळाला आहे त्यांचा बाप्तिस्मा होऊ नये म्हणून कोणाच्याने पाण्याची मनाई करवेल?” मग ‘प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात त्यांचा बाप्तिस्मा व्हावा’ अशी त्याने आज्ञा केली. तेव्हा काही दिवस राहावे म्हणून त्यांनी त्याला विनंती केली.
प्रेषितांची कृत्ये 10:37-48 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
योहानने बाप्तिस्मा घोषित केल्यानंतर गालीलपासून प्रारंभ होऊन तो संदेश सर्व यहुदियामध्ये पसरला. नासरेथकर येशूला देवाने पवित्र आत्म्याचा व सामर्थ्याचा अभिषेक केला. तो सत्कर्मे करत व सैतानाच्या सत्तेखाली असलेल्या सर्वांना बरे करत फिरला कारण देव त्याच्याबरोबर होता. त्याने यहुदी लोकांच्या देशात व यरुशलेम नगरात जे काही केले त्या सर्वांचे आम्ही साक्षीदार आहोत. त्यांनी त्याला क्रुसावर चढवून मारले. परंतु त्याला देवाने तिसऱ्या दिवशी उठवले व त्याला प्रकट केले. पण ते प्रकटीकरण सर्व लोकांसमोर न करता जे साक्षीदार देवाने पूर्वी निवडले होते त्या आम्हांसमोर केले; तो मेलेल्यांतून उठल्यानंतर त्याच्याबरोबर आम्ही खाणेपिणे केले. त्याने आम्हांला अशी आज्ञा केली की, लोकांना घोषणा करुन सांगा व अशी साक्ष द्या की, देवाने नेमलेला असा जिवंतांचा व मेलेल्यांचा न्यायाधीश तो हाच आहे. त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाला त्याच्या नावाने पापांची क्षमा मिळेल, अशी साक्ष सर्व संदेष्ट्ये त्याच्याविषयी देतात.” पेत्राचे हे भाषण चालू असतानाच वचन ऐकणाऱ्या सर्वांमध्ये पवित्र आत्मा उतरला. यहुदीतरांवरही पवित्र आत्म्याच्या दानांचा वर्षाव झाला आहे, असे पाहून पेत्राबरोबर आलेल्या व सुंता झालेल्या श्रद्धावंत लोकांना आश्चर्य वाटले; कारण त्यांनी त्यांना अपरिचित भाषांतून बोलताना व देवाची थोरवी गाताना ऐकले. पेत्राने म्हटले, “आम्हांला मिळाला तसा पवित्र आत्मा ज्यांना मिळाला आहे त्यांना पाण्याने बाप्तिस्मा दिला जाऊ नये अशी कोण मनाई करेल?” येशू ख्रिस्ताच्या नावात त्यांना बाप्तिस्मा दिला जावा, अशी त्याने आज्ञा केली. त्यांनी त्याला विनंती केली की, त्याने काही दिवस त्यांच्याबरोबर राहावे.