YouVersion लोगो
सर्च आयकॉन

2 थेस्सल 3:6-15

2 थेस्सल 3:6-15 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

बंधूनो, आम्ही आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने तुम्हास आज्ञा करतो की, अव्यवस्थितपणे वागणाऱ्या व चालणाऱ्या संप्रदायाप्रमाणे प्रत्येक बंधुपासून तुम्ही दूर व्हावे. आमचे अनुकरण कोणत्या रीतीने केले पाहिजे हे तुम्हा स्वतःला ठाऊक आहे; कारण आम्ही तुम्हामध्ये असताना अव्यवस्थितपणे वागलो नाही; आणि आम्ही कोणाचे अन्न फुकट खाल्ले नाही; परंतु तुम्हापैकी कोणावरही भार घालू नये म्हणून आम्ही रात्रंदिवस श्रम व कष्ट करून काम केले. तसा आम्हास अधिकार नाही असे नाही, पण आमचे अनुकरण करण्यासाठी आम्ही तुम्हास उदाहरण घालू द्यावे म्हणून असे केले. कारण आम्ही तुमच्याबरोबर होतो तेव्हा देखील आम्ही तुम्हास अशी आज्ञा केली होती की, कोणाला काम करण्याची इच्छा नसेल तर त्याने खाऊही नये. तरी तुमच्यामध्ये कित्येक अव्यवस्थितपणाने वागणारे असून ते काहीएक काम न करता लुडबुड करतात, असे आम्ही ऐकतो. अशा लोकांस आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने आज्ञा व उत्तेजन देतो की, त्यांनी स्वस्थपणे काम करून स्वतःचेच अन्न खावे. तुम्ही तर बंधूंनो, बरे करतांना खचू नका. या पत्रातील आमचे वचन जर कोणी मानीत नसेल तर तो मनुष्य लक्षात ठेवा आणि त्यास लाज वाटावी म्हणून त्याची संगत धरू नका; तरी त्यास शत्रू समजू नका, तर त्यास बंधू समजून त्याची कानउघडणी करा.

सामायिक करा
2 थेस्सल 3 वाचा

2 थेस्सल 3:6-15 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने आज्ञा करतो की, जो प्रत्येक विश्वासणारा बंधू आळशी आणि फूट पाडणारा आणि आमच्याद्वारे जे शिक्षण मिळाले त्याप्रमाणे जीवन न जगणारा त्यापासून दूर राहा. कारण तुम्हा स्वतःला आमचे अनुकरण कसे करायचे हे चांगले माहीत आहे. आम्ही तुम्हामध्ये राहात असताना आळशी नव्हतो. आम्ही कोणाचेही अन्न विकत घेतल्याशिवाय खाल्ले नाही; याउलट, तुमच्यातील कोणावरही आम्ही ओझे होऊ नये म्हणून आम्ही रात्रंदिवस परिश्रम आणि कष्ट केले. याचा अर्थ तुमच्यापासून मदत मिळण्याचा अधिकार आम्हाला नाही असे नाही, परंतु आम्ही हे यासाठी केले की तुम्ही आमचे अनुकरण करावे म्हणून आम्ही तुम्हाला आदर्श झालो. आम्ही तुम्हाजवळ होतो, तेव्हाही आम्ही तुम्हाला हाच नियम दिला होता: “जो कोणी काम करू इच्छित नाही, त्याने खाऊ नये.” तुमच्यापैकी काहींची जीवनशैली आळशी आहे आणि काही लोक व्यत्यय आणणारे व इतरांच्या कामात लुडबुड करतात असे आम्ही ऐकतो. अशा लोकांना आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने विनंती नव्हे, आज्ञा करतो की त्यांनी शांत व्हावे, आणि आपल्या अन्नासाठी श्रम करावेत. बंधू आणि भगिनींनो, तुम्ही सत्कृत्य करीत असताना खचून जाऊ नका. जो कोणी या पत्रात लिहिल्याप्रमाणे आमच्या बोधाचे पालन करणार नाही त्याची विशेष दखल घ्या व त्याला लाज वाटावी म्हणून त्याच्यापासून दूर राहा. त्याला शत्रूप्रमाणे लेखू नका, तर तुम्ही विश्वासी बंधुला द्याल त्याप्रमाणे त्याला ताकीद द्या.

सामायिक करा
2 थेस्सल 3 वाचा

2 थेस्सल 3:6-15 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

बंधुजनहो, आम्ही आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने तुम्हांला आज्ञा करतो की, अव्यवस्थितपणे वागणार्‍या व आमच्यापासून प्राप्त झालेल्या संप्रदायांप्रमाणे न चालणार्‍या प्रत्येक बंधूपासून तुम्ही दूर व्हावे. आमचे अनुकरण कोणत्या रीतीने केले पाहिजे हे तुम्हा स्वतःला ठाऊक आहे; कारण आम्ही तुमच्यामध्ये असताना अव्यवस्थितपणे वागलो नाही; आणि आम्ही कोणाचे अन्न फुकट खाल्ले नाही; परंतु तुमच्यापैकी कोणावरही भार घालू नये म्हणून आम्ही रात्रंदिवस श्रम व कष्ट करून काम केले. तसा आम्हांला अधिकार नाही असे नाही, पण आमचे अनुकरण करण्यासाठी आम्ही तुम्हांला कित्ता घालून द्यावा म्हणून असे केले. कारण आम्ही तुमच्याबरोबर होतो तेव्हादेखील आम्ही तुम्हांला अशी आज्ञा केली होती की, कोणाला काम करण्याची इच्छा नसेल तर त्याने खाऊही नये. तरी तुमच्यामध्ये कित्येक अव्यवस्थितपणाने वागणारे असून ते काहीएक काम न करता लुडबुड करतात, असे ऐकतो. अशा लोकांना आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने आज्ञा व बोध करतो की, त्यांनी स्वस्थपणे काम करून स्वत:चेच अन्न खावे. तुम्ही तर बंधूंनो, बरे करताना खचू नका. ह्या पत्रातील आमचे वचन जर कोणी मानत नसेल तर तो मनुष्य लक्षात ठेवा आणि त्याला लाज वाटावी म्हणून त्याची संगत धरू नका. तरी त्याला शत्रू समजू नका, तर त्याला बंधू समजून त्याची कानउघाडणी करा.

सामायिक करा
2 थेस्सल 3 वाचा

2 थेस्सल 3:6-15 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)

बंधुजनहो, आम्ही आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने तुम्हांला आज्ञा करतो की, आळशीपणाने वागणाऱ्या व आमच्यापासून प्राप्त झालेल्या परंपरेप्रमाणे न चालणाऱ्या प्रत्येक बंधूपासून तुम्ही दूर राहावे. आमचे अनुकरण कोणत्या प्रकारे केले पाहिजे, हे स्वतः तुम्हांला ठाऊक आहे. आम्ही तुमच्यामध्ये असताना आळशीपणाने वागलो नाही, कोणाचे अन्न फुकट खाल्ले नाही, तुमच्यापैकी कोणावरही भार घालू नये म्हणून आम्ही रात्रंदिवस श्रम व कष्ट करून काम केले. तसा आम्हांला अधिकार नाही असे नाही, पण आमचे अनुकरण करण्यासाठी आम्ही तुम्हांला कित्ता घालून द्यावा, म्हणून असे केले. आम्ही तुमच्याबरोबर होतो, तेव्हादेखील आम्ही तुम्हांला आज्ञा दिली होती की, जो काम करायला तयार नसतो, त्याने खाऊ नये. तुमच्यामध्ये कित्येक आळशीपणाने वागणारे असून ते मुळीच काम न करता लुडबूड करतात, असे ऐकतो, म्हणून आम्ही हे सांगत आहोत. अशा लोकांना आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने आज्ञा व बोध करतो की, त्यांनी व्यवस्थितपणे जीवन जगून आपली उपजीविका मिळविण्यासाठी काम करावे. बंधूंनो, तुम्ही मात्र सत्कृत्ये करताना थकून जाऊ नका. ह्या पत्रातील आमचा बोध जर कोणी मानत नसेल, तर तो मनुष्य लक्षात ठेवा आणि त्याला लाज वाटावी म्हणून त्याची संगत धरू नका, मात्र त्याला शत्रू मानू नका, तर त्याला बंधू मानून समज द्या.

सामायिक करा
2 थेस्सल 3 वाचा