२ शमुवेल 7:8-16
२ शमुवेल 7:8-16 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
शिवाय दावीदाला हे ही सांग सर्वशक्तिमान परमेश्वर असे म्हणतो, “तू कुरणात मेंढरांमागे फिरत होतास तेव्हाच मी तुला निवडले. तेथून तुला काढून मी तुला इस्राएल लोकांचा राजा केले. तू जेथे जेथे गेलास तेथे तेथे मी तुला साथ दिली. तुझ्या शत्रूंचा तुझ्यासाठी पाडाव केला. पृथ्वीवरील इतर महान लोकांप्रमाणे मी तुला सुप्रसिद्ध करीन. माझ्या इस्राएल लोकांसाठी मी जागेची निवड केली. त्यांना राहायला हक्काची जागा दिली, त्यांना रुजवले त्यांना जागोजागी भटकंती करायला लागू नये म्हणून मी हे केले. इस्राएल लोकांवर मी, परमेश्वर, शास्ते नेमिले होते तेव्हापासून दुर्जनांनी त्यांना त्रास दिला तसे आता घडणार नाही. तुझ्या सर्व शंत्रूपासून मी तुला शांती देतो. मी तुला असे अभिवचन देतो की, तुझे घराणे कायमचे राजघराणे होईल. तुझे जीवन संपुष्टात आले, म्हणजे तुझ्या मृत्यूनंतर तुझ्या पूर्वजांशेजारी तुझे दफन होईल. पण मी तुझ्या पुत्रापैकीच एकाला राजा करीन. तो माझ्या नावाप्रीत्यर्थ मंदिर बांधील. त्याचे राज्य मी नेहमीसाठी मजबूत करीन. मी त्याचा पिता आणि तो माझा पुत्र असेल. त्याच्या हातून पाप घडले तर मी त्यास मनुष्याच्या काठीने आणि मनुष्यांच्या पुत्रांच्या चाबकांनी शासन घडवीन. पण माझे त्याच्यावरचे प्रेम खंडित होणार नाही. त्याच्यावर माझी कृपादृष्टी राहील. शौलावरील माझा लोभ आणि प्रेम संपुष्टात आले. मी तुझ्याकडे वळलो, तेव्हा तुझ्यासमोर मी त्यास दूर ढकलले. पण तुझ्या घराण्याच्या बाबतीत मी असे करणार नाही. राजसत्ता तुझ्याच वंशात चालू राहील याचा विश्वास बाळग. तुझे राज्य अबाधित राहील. तुझे राजासन टिकून राहील.”
२ शमुवेल 7:8-16 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
“तर आता माझा सेवक दावीदाला सांग, ‘सर्वसमर्थ याहवेह असे म्हणतात: मी तुला कुरणातून, कळप राखीत असताना आणले आणि माझ्या इस्राएली लोकांवर अधिपती म्हणून नेमले. जिथे कुठे तू गेलास तिथे मी तुझ्याबरोबर राहिलो आणि तुझ्या सर्व शत्रूंना तुझ्यापुढून छेदून टाकले. आता मी पृथ्वीवरील सर्वश्रेष्ठ पुरुषांच्या नावांप्रमाणे तुझे नाव महान करेन. आणि मी माझ्या इस्राएली लोकांसाठी एक ठिकाण नेमून देईन आणि त्यांना त्या ठिकाणी स्थापित करेन, यासाठी की त्यांना स्वतःचे घर असावे आणि त्यांना पुन्हा त्रास होऊ नये. आणि पूर्वीप्रमाणे दुष्ट लोकांनी त्यांचा छळ करू नये. मी माझ्या इस्राएली लोकांवर पुढारी नेमले तेव्हापासून त्यांनी तसेच केले आहे. मी तुलासुद्धा तुझ्या सर्व शत्रूंपासून विसावा देईन. “ ‘याहवेह असे जाहीर करतात, की याहवेह स्वतः तुझ्यासाठी घर स्थापित करतील: जेव्हा तुझे दिवस भरतील आणि तू आपल्या पूर्वजांबरोबर निजशील, तेव्हा मी तुझे संतान म्हणजे तुझ्या पोटचा वंश उभा करून त्याला तुझा उत्तराधिकारी बनवीन, मी त्याचे राज्य प्रस्थापित करेन. तोच माझ्या नावाकरिता घर बांधेल आणि मी त्याचे राजासन सर्वकाळासाठी स्थापित करेन. मी त्याचा पिता होईन आणि तो माझा पुत्र होईल. तो जेव्हा चूक करेल, तेव्हा मी त्याला मनुष्याच्या काठीने, मानवांच्या फटक्यांनी शिक्षा करेन. परंतु तुझ्यासमोरून काढून टाकलेल्या शौलावरची प्रीती मी जशी दूर केली, तशी तुझ्या संतानावरची माझी प्रीती काढून टाकली जाणार नाही. तुझे घराणे आणि तुझे राज्य माझ्यासमोर सर्वकाळ टिकून राहेल; तुझे राजासन सर्वकाळासाठी स्थापित केले जाईल.’ ”
२ शमुवेल 7:8-16 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तर आता माझा सेवक दावीद ह्याला सांग, सेनाधीश परमेश्वर म्हणतो, तू माझ्या प्रजेचा, इस्राएलांचा अधिपती व्हावे म्हणून मी तुला मेंढवाड्यातून मेंढराच्या मागे फिरत असताना आणले, जिकडे तू गेलास तिकडे मी तुझ्याबरोबर राहिलो, आणि तुझ्या सर्व शत्रूंचा तुझ्यापुढून उच्छेद केला; पृथ्वीवर जे पुरुष आजपर्यंत झाले आहेत त्यांच्या नावांप्रमाणे तुझे नाव मी थोर करीन. मी आपल्या इस्राएल लोकांसाठी एक स्थान नेमून देईन; मी तेथे त्यांना रुजवीन म्हणजे ते आपल्या स्थानी वस्ती करून राहतील व ते तेथून पुढे कधी ढळणार नाहीत. इस्राएल लोकांवर मी शास्ते नेमले होते त्यांच्या काळापासून जसे दुर्जन त्यांना त्रस्त करीत होते तसे ते ह्यापुढे करणार नाहीत; तुला मी शत्रूंपासून विसावा दिला आहे. परमेश्वर तुला म्हणत आहे की मी तुझे घराणे कायमचे स्थापीन. तुझे दिवस पुरे झाले आणि तू जाऊन आपल्या पितरांबरोबर निजलास म्हणजे तुझ्या पोटच्या वंशजाला तुझ्यामागून स्थापून त्याचे राज्य स्थिर करीन. तो माझ्या नामाप्रीत्यर्थ मंदिर बांधील, मी त्याचे राजासन कायमचे स्थापीन. मी त्याचा पिता होईन व तो माझा पुत्र होईल; त्याने अधर्म केल्यास, मनुष्य जशी दंडाने व मानवपुत्र जशी फटक्यांनी शिक्षा करतात तशी मी त्याला शिक्षा करीन; पण तुझ्यापुढून घालवून दिलेल्या शौलावरची कृपादृष्टी मी दूर केली तशी त्याच्यावरची माझी कृपादृष्टी दूर होणार नाही. तुझे घराणे व तुझे राज्य ही तुझ्यापुढे अढळ राहतील; तुझी गादी कायमची स्थापित होईल.”