२ शमुवेल 24:1-10
२ शमुवेल 24:1-10 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
इस्राएलवर परमेश्वराचा पुन्हा एकदा कोप झाला. आणि त्याने दावीदाला इस्राएलांविरुध्द चेतवले. दावीद म्हणाला, “आधी इस्राएल आणि यहूदा यांची शिरगणती करा.” राजा दावीद सेनापती यवाबाला म्हणाला, “दानपासून बैर-शेबापर्यंत इस्राएलच्या झाडून सर्व वंशातील लोकांची मोजदाद करा, म्हणजे मग मला लोकसंख्या किती आहे ते कळेल.” पण यवाब राजाला म्हणाला, “आपले लोक कितीही असोत देव परमेश्वर त्यांना शतगुणित करो. तुम्हास हे सर्व पाहायला मिळो पण तुम्हास असे का करावेसे वाटते?” पण राजा दावीदाचे शब्द यवाबाच्या शब्दांपेक्षा प्रभावी ठरले. आणि त्यांनी यवाबाला आणि इतर सैन्याधिकाऱ्यांना इस्राएल प्रजेची मोजदाद करण्यास सांगितले. तेव्हा ते सर्व या कामाला लागले. यार्देन ओलांडून त्यांनी अरोएर येथे तळ दिला. ही जागा नगराच्या उजवीकडे होती. (नगर याजेरच्या वाटेवर, गादच्या खोऱ्याच्या मध्यावर आहे.) तेथून ते गिलादला आणि पुढे तहतीम होदशी या प्रदेशात गेले. दान्यान आणि तिथून वळसा घेऊन सीदोन येथे गेले. सोर (तायर) हा गड आणि हिव्वी व कनानी यांची नगरे इकडे ते गेले. तेथून यहूदा देशाच्या दक्षिण दिशेला बैर-शेबा इथपर्यंत गेले. सगळा देश पालथा घालून ते नऊ महिने वीस दिवसानी यरूशलेम येथे पोहोचले. यवाबाने प्रजेच्या मोजदादीची यादी राजाला दिली. इस्राएलमध्ये तलवारधारी पुरुष आठ लक्ष होते. यहूदात ही संख्या पाच लक्ष होती. हे काम पार पाडल्यावर मात्र दावीदाला मनोमन लाज वाटली. तो परमेश्वरास म्हणाला, “माझ्याहातून हे मोठे पाप घडले आहे. या माझ्या अपराधाबद्दल मला क्षमा कर. माझा हा मोठाच मूर्खपणा झाला आहे.
२ शमुवेल 24:1-10 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
परमेश्वराचा कोप इस्राएलावर पुनरपि झाला, आणि इस्राएल व यहूदा ह्यांची गणती करण्याची प्रेरणा देवाने त्यांच्याविरुद्ध दाविदाला केली. त्या वेळी राजाबरोबर सेनापती यवाब होता; त्याला राजाने सांगितले की, “दानापासून बैर-शेब्यापर्यंतच्या सर्व इस्राएल वंशांमध्ये फिरून तुम्ही लोकांची मोजदाद करा म्हणजे त्यांची संख्या मला कळेल.” यवाब राजाला म्हणाला, “आपले लोक कितीही असोत, आपला देव परमेश्वर त्यांना शतगुणित करो आणि माझे स्वामीराजे आपल्या डोळ्यांनी ते पाहोत; पण माझ्या स्वामीराजांना ही हौस का वाटावी?” तथापि राजाच्या म्हणण्यापुढे यवाब व सैन्याचे सरदार ह्यांचे काही चालेना, आणि यवाब व सैन्यांचे सरदार राजापुढून इस्राएल लोकांची मोजदाद करण्यासाठी निघून गेले. त्यांनी यार्देनेपलीकडे जाऊन गादातील खोर्याच्या मध्यभागी असलेल्या अरोएर नगराच्या दक्षिणेस डेरे दिले; तेथून ते याजेराकडे गेले. मग ते गिलाद व तहतीम होदशी ह्या प्रदेशांत गेले; पुढे दान्यान येथे गेले; तेथून वळसा घेऊन ते सीदोनास गेले. नंतर ते सोर नावाचा दुर्ग आणि हिव्वी व कनानी ह्यांची सर्व नगरे येथे गेले; तेथून यहूदा देशाच्या दक्षिण दिशेस बैर-शेबा येथवर गेले. ते देशभर चहूकडे फिरून नऊ महिने वीस दिवसांच्या अंती यरुशलेमेस आले. तेव्हा यवाबाने प्रजेच्या मोजदादीची यादी राजाला दिली : धारकरी योद्धे इस्राएलात आठ लक्ष व यहूदात पाच लक्ष भरले. प्रजेची मोजदाद केल्यावर दाविदाचे मन त्याला खाऊ लागले. दावीद परमेश्वराला म्हणाला, “हे जे मी केले त्यात मी मोठे पाप केले आहे; तर हे परमेश्वरा, आपल्या सेवकाला दोषमुक्त कर, कारण मी मोठा मूर्खपणा केला आहे.”