२ शमुवेल 22:38-50
२ शमुवेल 22:38-50 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
शत्रूंचा नि:पात होईपर्यंत मला त्यांचा पाठलाग करायचा आहे. त्यांचा उच्छेद होई पर्यंत मी परतणार नाही. त्यांचा मी नाश केला. त्यांचा पराभव केला. आता ते शत्रू डोके वर काढू शकणार नाहीत. होय, ते माझ्या पायदळी तुडवले गेले. देवा, युध्दात तू मला वरचढ केलेस. शत्रूचा पाडाव केलास. त्यांना मला पाठ दाखवायला लावलेस, म्हणून मी त्यांच्यावर वार करू शकलो. शत्रू मदतीसाठी याचना करू लागले. पण कोणीही त्यांच्या मदतीला आले नाही. त्यांनी परमेश्वराचा धावाही केला त्यानेही त्यांच्याकडे पाठ फिरवली. माझ्या शत्रूची मी खांडोळी केली. जमिनीवरच्या धुळीसारखा त्यांचा मी भुगा केला. चिखल तुडवावा तसे मी त्यांना तुडवले. माझ्यावर जे चाल करून आले त्यांच्यापासून तू मला संरक्षण दिलेस. त्यांच्यावर राज्यकर्ता म्हणून मला नेमलेस. ज्यांना मी कधी बघितले नव्हते ती राष्ट्रे माझे दास झाली. आता दूर देशचे लोक माझे ऐकतात जेव्हा ते माझी आज्ञा ऐकतात, तात्काळ माझा शब्द मानतात. माझा त्यांना धाक वाटतो. भीतीने ते गर्भगळीत होतात. हे परदेशी लोक जिथे लपून बसले होते, ती जागा सोडून भीतीने थरथर कापत बाहेर येतात. परमेश्वर जिवंत आहे. माझ्या दुर्गाची मी स्तुती करतो देव महान आहे. तो माझा रक्षणकर्ता दुर्ग आहे. या देवानेच माझ्या शत्रूंना धडा शिकवला. लोकांस माझ्या शासनामध्ये ठेवले. देवा, तू माझे वैऱ्यांपासून रक्षण केलेस. मला विरोध करणाऱ्यांचा पाडाव करण्याचे सामर्थ्य मला दिलेस. दुष्टांपासून मला वाचवलेस. हे परमेश्वरा, म्हणून मी राष्ट्राराष्ट्रांमध्ये आभारपूर्वक तुझी स्तुतिस्तोत्रे गाईन. तुझे नामसंकीर्तन करीन.
२ शमुवेल 22:38-50 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
“मी माझ्या शत्रूंचा पाठलाग केला आणि त्यांचा नाश केला; त्यांचा नाश होईपर्यंत मी परतलो नाही. मी त्यांना पूर्णपणे तुडविले आणि ते उठू शकले नाही; ते माझ्या पायाखाली पडले. तुमच्या शक्तीने मला युद्धासाठी सुसज्ज केले; माझ्या शत्रूंना तुम्ही माझ्यासमोर लीन केले. तुम्ही माझ्या वैर्यांना पाठ दाखविण्यास भाग पाडले, आणि मी माझ्या शत्रूंचा नाश केला. त्यांनी साहाय्याची आरोळी केली, पण त्यांना वाचविण्यास कोणी नव्हते; त्यांनी याहवेहचा धावा केला, परंतु त्यांनी उत्तर दिले नाही. पृथ्वीच्या धुळीप्रमाणे मी त्यांचा भुगा केला; रस्त्यावरील चिखलाप्रमाणे त्यांना मी कुटून आणि तुडवून टाकले. “लोकांच्या हल्ल्यापासून तुम्ही माझी सुटका केली; राष्ट्रांचा प्रमुख म्हणून तुम्ही मला राखून ठेवले. ज्या लोकांची मला ओळख नव्हती ते आता माझी सेवा करतात, परदेशी माझ्यासमोर भीतीने वाकतात; माझे नाव ऐकताच ते माझी आज्ञा पाळतात. त्या सर्वांचे धैर्य खचून गेले, ते त्यांच्या गडातून थरथर कापत बाहेर येतात. “याहवेह जिवंत आहे! माझ्या खडकाची स्तुती असो! माझे परमेश्वर, खडक, माझे तारणकर्ता सर्वोच्च असोत! परमेश्वरच आहे जे माझ्यासाठी सूड घेतात, ते राष्ट्रांना माझ्या अधीन आणतात, ते मला माझ्या वैर्यांपासून मुक्त करतात. तुम्ही मला माझ्या वैर्यांपेक्षा उंचावले आहे; हिंसक मनुष्यापासून तुम्ही मला सोडविले. म्हणून हे याहवेह, राष्ट्रांमध्ये मी तुमची थोरवी गाईन; मी तुमच्या नावाची स्तुती गाईन.
२ शमुवेल 22:38-50 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
मी आपल्या वैर्यांच्या पाठीस लागून त्यांचा संहार केला, आणि त्यांचा नायनाट केल्याशिवाय परत फिरलो नाही. मी त्यांचा धुव्वा उडवला, मी त्यांना इतका मार दिला की त्यांना उठता येईना, त्यांना मी पायांखाली तुडवले. लढाईकरता तू मला सामर्थ्याचा कमरबंद बांधलास, माझ्यावर उठलेल्यास तू माझ्याखाली चीत केलेस. तू माझ्या वैर्यांना पाठ दाखवायला लावलेस. मी आपल्या द्वेष्ट्यांचा अगदी संहार केला. त्यांनी इकडेतिकडे पाहिले तरी त्यांना सोडवायला कोणी नव्हता; त्यांनी परमेश्वराचा धावा केला, तरी त्याने त्यांचे ऐकले नाही. तेव्हा भूमीवरच्या धुळीसारखे मी त्यांचे चूर्ण केले, रस्त्यावरील चिखलाप्रमाणे मी त्यांना तुडवून दाबून टाकले. माझ्या प्रजेच्या बखेड्यांपासून तू मला मुक्त केलेस; मी राष्ट्रांचा अधिपती व्हावे म्हणून तू माझे रक्षण केलेस; जे लोक माझ्या परिचयाचे नव्हते ते माझे अंकित झाले. परदेशीय लोकांनी माझे आर्जव केले; माझी कीर्ती त्यांच्या कानी पडताच ते मला वश झाले. परदेशीय लोक गलित झाले; ते आपल्या कोटातून कापत कापत बाहेर आले परमेश्वर जिवंत आहे; त्या माझ्या दुर्गाचा धन्यवाद होवो; माझा तारणदुर्ग जो देव त्याचा महिमा वाढो; त्याच देवाने मला सूड उगवू दिला, अन्य राष्ट्रांना माझ्या सत्तेखाली आणले. तोच मला माझ्या वैर्यांपासून सोडवतो, माझ्याविरुद्ध उठणार्यांवर तू माझे वर्चस्व करतोस, बलात्कारी माणसांपासून मला सोडवतोस. ह्यास्तव हे परमेश्वरा, मी राष्ट्रांमध्ये तुझी स्तुती करीन, तुझ्या नामाची स्तोत्रे गाईन.