YouVersion लोगो
सर्च आयकॉन

२ शमुवेल 15:1-12

२ शमुवेल 15:1-12 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

यानंतर अबशालोमने स्वत:साठी रथ आणि घोड्यांची तयारी केली, तो रथातून जात असताना पन्नास माणसे त्याच्यापुढे धावत असत. रोज लवकर ऊठून सकाळीच तो वेशीपाशी जाई. आपल्या अडचणी घेऊन निवाड्यासाठी राजाकडे जायला निघालेल्या लोकांस भेटून त्यांच्याशी बोलत असे. चौकशी करून तो विचारी, तू कोणत्या शहरातून आलास? तो सांगत असे, मी इस्राएलच्या अमुक वंशातला. तेव्हा अबशालोम म्हणे, तुमचे म्हणणे खरे आहे, पण राजा तुमच्या अडचणीत लक्ष घालणार नाही. अबशालोम पुढे म्हणे, मला कोणी येथे न्यायाधीश म्हणून नेमले तर किती बरे होईल. तसे झाले तर फिर्याद घेऊन येणाऱ्या प्रत्येकाला मी मदत करू शकेन. यांच्या प्रकरणांना मी न्याय देऊ शकेन. अशावेळी कोणी त्याच्याजवळ येऊन त्यास आभिवादन करू लागला, तर अबशालोम त्या मनुष्यास मित्रासारखी वागणूक देई. आपला हात पुढे करून तो त्यास स्पर्श करी त्याचे चुंबन घेई. राजा दावीदाकडे न्याय मागण्यासाठी आलेल्या सर्व इस्राएलांना त्याने अशाच प्रकारची वागणुक देऊन सर्व इस्राएलांची मने जिंकली. पुढे चार वर्षानी अबशालोम राजा दावीदाला म्हणाला, हेब्रोनमध्ये मी परमेश्वरास नवस बोललो होतो. तो फेडण्यासाठी मला जाऊ द्या. अराममधील गशूर येथे राहत असताना मी तो बोललो होतो, परमेश्वराने मला पुन्हा यरूशलेमेला नेले, तर मी परमेश्वराच्या सेनेला वाहून घेईन असे मी बोललो होतो. तेव्हा राजा दावीदाने त्यास निश्चिंत होऊन जाण्यास सांगितले. अबशालोम हेब्रोन येथे आला. पण त्याने इस्राएलच्या सर्व वंशामध्ये हेर पाठवून लोकांस कळवले रणशिंग फुंकल्याचे ऐकल्यावर अबशालोम हेब्रोनचा राजा झाला आहे असा तुम्ही घोष करा. अबशालोमने स्वत:बरोबर दोनशे माणसे घेतली यरूशलेम सोडून ती त्याच्या बरोबर निघाली. पण त्यांना त्याच्या बेताची कल्पना नव्हती. अहिथोफेल हा तेव्हा दावीदाचा एक सल्लागार होता. हा गिलो या गावाचा होता. यज्ञ करत असताना अबशालोमने अहिथोफेलला गिलोहून बोलावून घेतले. सर्व काही अबशालोमच्या योजने प्रमाणे सुरळीत चालले होते. त्यास अधिकाधिक पाठिंबा मिळत होता.

सामायिक करा
२ शमुवेल 15 वाचा

२ शमुवेल 15:1-12 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

ह्यानंतर असे झाले की अबशालोमाने आपल्यासाठी रथ, घोडे व आपल्यापुढे दौडण्यासाठी पन्नास माणसे ठेवली. अबशालोम नित्य पहाटेस उठून वेशीकडे जाणार्‍या रस्त्यात उभा राही आणि कोणी फिर्यादी दाद मागण्यासाठी राजाकडे आला म्हणजे त्याला बोलावून “तू कोणत्या नगराचा आहेस,” असे विचारी; तेव्हा तो म्हणे, “तुझा दास इस्राएलाच्या अमुक अमुक वंशातला आहे.” तेव्हा अबशालोम त्याला म्हणे, “पाहा, तुझे प्रकरण चांगले व वाजवी आहे; पण तुझे ऐकून घेण्यासाठी राजाच्या वतीने कोणी मनुष्य नेमलेला नाही.” अबशालोम त्याला आणखी म्हणे, “मला ह्या देशात न्यायाधीश केले असते तर किती बरे झाले असते? एखाद्याने आपला कज्जा किंवा प्रकरण माझ्याकडे आणले असते तर मी त्याला न्याय दिला असता.” एखादा त्याला मुजरा करायला जवळ येई तेव्हा तो आपला हात पुढे करून त्याला धरून त्याचे चुंबन घेई. इस्राएलातले जे जे लोक राजाकडे न्याय मागण्यासाठी येत त्या सर्वांशी तो असाच वागे; ह्या प्रकारे अबशालोमाने इस्राएल लोकांची मने हरण केली. चार वर्षे संपल्यावर अबशालोम राजाला म्हणाला, “मला परवानगी असावी, म्हणजे परमेश्वराला मी जो नवस केला आहे तो हेब्रोन येथे जाऊन फेडीन. मी अरामातील गशूर येथे राहत होतो तेव्हा आपल्या दासाने असा नवस केला होता की, परमेश्वराने मला यरुशलेमेत माघारी नेले तर मी परमेश्वराप्रीत्यर्थ अर्पणे करीन.” राजा त्याला म्हणाला, “खुशाल जा.” मग तो उठून हेब्रोनास गेला. अबशालोमाने इस्राएलाच्या सर्व वंशांकडे हेर पाठवून जाहीर केले की, “रणशिंगाचा शब्द तुम्ही ऐकाल तेव्हा असा घोष करा की, अबशालोम हेब्रोनास राजा झाला आहे.” अबशालोमाच्या सांगण्यावरून त्याच्याबरोबर दोनशे पुरुष गेले. ते भोळ्या भावाने गेले; त्यांना काहीएक ठाऊक नव्हते. यज्ञ करीत असताना अबशालोमाने दाविदाचा मंत्री गिलोनी अहीथोफेल ह्याला त्याचे नगर गिलो येथून बोलावून आणले. बंड वाढत गेले व अबशालोमाकडे लोक एकसारखे जमत गेले.

सामायिक करा
२ शमुवेल 15 वाचा