२ शमुवेल 10:9-14
२ शमुवेल 10:9-14 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
अम्मोन्यांनी पुढून तसेच मागून आपल्याला घेरले आहे हे यवाबाने पाहिले तेव्हा त्याने इस्राएलातील उत्तम योद्ध्यांची निवड केली त्यांना अराम्यांच्या विरूद्ध लढायला सज्ज केले. मग आपला भाऊ अबीशय याच्या हवाली आणखी काही मनुष्यांना करून अम्मोन्याचा सामना करायला सांगितले. यवाब अबीशयला म्हणाला, अरामी मला भारी पडत आहेत असे दिसले, तर तू माझ्या मदतीला ये. जर अम्मोनी प्रबल आहेत असे लक्षात आले तर मी तुझ्या मदतीला येईन. हिम्मत बाळग आपल्या लोकांसाठी, देवाच्या नगरांसाठी आपण पराक्रमाची शिकस्त करू. परमेश्वर त्यास योग्य वाटेल तसे करील. यानंतर यवाबाने आपल्या लोकांसह अराम्यांवर चढाई केली. अरामी लोकांनी त्यांच्या समोरून पळ काढला. अराम्यांनी पलायन केलेले पाहताच, अम्मोनीही अबीशय समोरून पळून गेले आणि आपल्या नगरात परतले. अम्मोन्यांबरोबरच्या या लढाई नंतर यवाब यरूशलेमेला परतला.
२ शमुवेल 10:9-14 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
आपल्या मागे व पुढे व्यूह रचला आहे हे यवाबाने पाहून इस्राएली लढवय्यांपैकी निवडक शिपाई घेऊन त्यांना अराम्यांसमोर उभे केले; वरकड लोक त्याने आपला भाऊ अबीशय ह्याच्या हाती दिले, व त्याने अम्मोन्यांसमोर त्यांची व्यूहरचना केली. तो म्हणाला, “अरामी माझ्याहून प्रबल होऊ लागले तर तू माझे साहाय्य कर, पण अम्मोनी तुझ्याहून प्रबल झाले तर मी तुझे साहाय्य करीन. हिंमत धर, आपण आपल्या लोकांसाठी आणि आपल्या देवाच्या नगरांसाठी लढाईची शिकस्त करू, मग परमेश्वर त्याच्या मर्जीस येईल तसे करो.” मग यवाब व त्याच्याबरोबरचे लोक अराम्यांशी युद्ध करायला जवळ गेले, तेव्हा ते त्याच्यापुढून पळून गेले; अरामी पळून गेले हे पाहून अम्मोनी लोकही अबीशय ह्याच्यापुढून पळून जाऊन नगरात शिरले. तेव्हा यवाब अम्मोन्यांशी लढण्याचे सोडून यरुशलेमेस परत आला.