2 पेत्र 3:1-18
2 पेत्र 3:1-18 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
प्रियजनहो, आता हे दुसरे पत्र मी तुम्हांला लिहीत आहे; ह्या दोन्हींमध्ये मी तुम्हांला आठवण देऊन तुमचे निर्मळ मन जागृत करत आहे; ह्यासाठी की, पवित्र संदेष्ट्यांनी पूर्वी सांगितलेल्या वचनांची आणि प्रभू व तारणारा ह्याने तुमच्या प्रेषितांच्या द्वारे दिलेल्या आमच्या आज्ञेची आठवण तुम्ही ठेवावी. प्रथम हे ध्यानात ठेवा की, स्वत:च्याच वासनांप्रमाणे चालणारे थट्टेखोर लोक शेवटल्या दिवसांत थट्टा करत येऊन म्हणतील, “त्याच्या येण्याचे वचन आता कोठे आहे? कारण वाडवडील निजले तेव्हापासून सर्वकाही उत्पत्तीच्या प्रारंभापासून होते तसेच चालू आहे.” कारण ते हे बुद्धिपुरस्सर विसरतात की, पूर्वी देवाच्या शब्दाने आकाश आणि पाण्यातून पाण्याच्या योगे घडलेली अशी पृथ्वी ही झाली; त्याच्या योगे तेव्हाच्या जगाचा पाण्याने बुडून नाश झाला; पण आताचे आकाश व पृथ्वी ही त्याच शब्दाने अग्नीसाठी राखलेली आहेत; म्हणजे न्यायनिवाड्याचा व भक्तिहीन लोकांच्या नाशाचा दिवस येईपर्यंत राखून ठेवलेली आहेत. तरी प्रियजनहो, ही एक गोष्ट तुम्ही विसरू नका की, प्रभूला एक दिवस हजार वर्षांसारखा आहे आणि ‘हजार वर्षे’ एका ‘दिवसासारखी’ आहेत. कित्येक लोक ज्याला विलंब म्हणून म्हणतात तसा विलंब प्रभू आपल्या वचनाविषयी करत नाही, तर तो तुमचे धीराने सहन करतो; कोणाचा नाश व्हावा अशी त्याची इच्छा नाही, तर सर्वांनी पश्चात्ताप करावा अशी आहे. तरी रात्री चोर येतो तसा प्रभूचा दिवस येईल; त्या दिवशी आकाश मोठा नाद करत नाहीसे होईल, सृष्टितत्त्वे तप्त होऊन लयास जातील, आणि पृथ्वी व तिच्यावरील गोष्टी उघडकीस येतील.1 तर ही सर्व अशी लयास जाणारी आहेत म्हणून पवित्र वर्तणुकीत व सुभक्तीत राहून देवाचा दिवस येण्याची वाट पाहत व तो दिवस लवकर यावा म्हणून खटपट करत तुम्ही कशा प्रकारचे लोक असावे बरे? त्या दिवसामुळे आकाश जळून लयास जाईल आणि सृष्टितत्त्वे तप्त होऊन वितळतील. तरी ज्यामध्ये नीतिमत्त्व वास करते असे ‘नवे आकाश’ व ‘नवी पृथ्वी’ ह्यांची त्याच्या वचनाप्रमाणे आपण वाट पाहत आहोत. म्हणून प्रियजनहो, ह्या गोष्टींची वाट पाहत असता तुम्ही त्याच्या दृष्टीने निष्कलंक व निर्दोष असे शांतीत असलेले त्याला आढळावे म्हणून होईल तितका प्रयत्न करा, आणि आपल्या प्रभूची सहनशीलता तारणच आहे असे समजा. आपला प्रिय बंधू पौल ह्याला देण्यात आलेल्या ज्ञानाप्रमाणे त्यानेही तुम्हांला असेच लिहिले आहे; आणि त्याने आपल्या सर्व पत्रांत ह्या गोष्टींचा उल्लेख केला आहे; त्यांत समजण्यास कठीण अशा काही गोष्टी आहेत. अज्ञानी व अस्थिर माणसे इतर शास्त्रलेखांचा जसा विपरीत अर्थ करतात तसा ह्यांचाही करतात; अशाने ते स्वतःच्या नाशाला कारणीभूत होतात. तर प्रियजनहो, ह्या गोष्टी तुम्हांला पूर्वीपासून कळत आहेत, म्हणून तुम्ही अनीतिमान लोकांच्या भ्रांतिप्रवाहात सापडून आपल्या स्थिरतेतून ढळू नये ह्यासाठी जपून राहा; आणि आपला प्रभू व तारणारा येशू ख्रिस्त ह्याच्या कृपेत व ज्ञानात2 वाढत जा. त्याला आता व अनंतकालपर्यंत गौरव असो. आमेन.
2 पेत्र 3:1-18 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
प्रियजनहो, आता हे दुसरे पत्र मी तुम्हास लिहित आहे, या दोन्हीमध्ये मी तुम्हास आठवण देऊन तुमचे निर्मळ मन जागृत करीत आहे. ह्यासाठी की, पवित्र संदेष्ट्यांनी अगोदर सांगितलेल्या वचनांची आणि जो आपला प्रभू व तारणारा आहे त्याने तुमच्या प्रेषिताद्वारे दिलेल्या आज्ञेची आठवण तुम्ही ठेवावी. प्रथम हे ध्यानात ठेवा की, स्वतःच्या वासनेप्रमाणे चालणारे, थट्टाखोर लोक शेवटल्या दिवसात थट्टा करीत येऊन म्हणतील, त्याच्या येण्याचे वचन कोठे आहे? कारण पूर्वज निजले तेव्हापासून सर्व गोष्टी जश्या उत्पत्तीच्या प्रारंभापासून होते तसेच चालू आहे. कारण ते हे जाणूनबुजून विसरतात की, देवाच्या शब्दाने आकाश आणि पाण्यातून पाण्याच्या योगे घडलेली अशी पृथ्वी ही झाली. त्याच्यायोगे, तेव्हाच्या जगाचा पाण्याने बुडून नाश झाला. पण, आताचे आकाश व पृथ्वी ही त्याच शब्दाने अग्नीसाठी राखलेली असून, ती न्यायानिवाडाच्या व भक्तीहीन लोकांच्या नाशाचा दिवस येईपर्यंत राखून ठेवलेली आहेत. पण प्रियजनहो, ही एक गोष्ट तुम्ही विसरू नये की, प्रभूला एक दिवस हजार वर्षांसमान आणि हजार वर्षे एका दिवसासमान आहेत. कित्येक लोक ज्याला उशीर म्हणतात तसा उशीर प्रभू आपल्या वचनाविषयी करीत नाही. तर तो तुमच्याविषयी फार सहनशील आहे. कोणाचा नाश व्हावा अशी त्याची इच्छा नाही, तर सर्वांनी पश्चात्ताप करावा अशी आहे. तरी चोर येतो तसा प्रभूचा दिवस येईल; त्यादिवशी आकाश मोठा नाद करीत नाहीसे होईल, सृष्टितत्त्वे तापून विरघळतील आणि पृथ्वी तिच्यावरील कामे जळून जातील. या सर्व गोष्टी जर लयास जाणार आहेत म्हणून तुम्ही पवित्र आचरणात व सुभक्तीत राहून देवाचा दिवस येण्याची वाट पाहत व तो दिवस लवकर यावा म्हणून खटपट करीत तुम्ही कशा प्रकारचे लोक असावे बरे? देवाच्या त्या दिवसामुळे आकाश जळून लयास जाईल आणि सृष्टितत्त्वे अत्यंत तापून वितळतील. तरी ज्यामध्ये नीतिमत्त्व राहते, असे नवे आकाश व नवे पृथ्वी त्याच्या वचनाप्रमाणे आपण वाट पाहत आहोत. म्हणून प्रियजनहो, या गोष्टींची वाट पाहता असता, तुम्ही त्याच्या दृष्टीने निर्दोष व निष्कलंक असे शांतीत असलेले आढळावे म्हणून होईल तितका प्रयत्न करा. आणि आपल्या प्रभूची सहनशीलता हे तारणच आहे असे समजा. आपला प्रिय बंधू पौल ह्याला देण्यात आलेल्या ज्ञानाप्रमाणे त्यानेही तुम्हास असेच लिहिले आहे. आणि त्याने आपल्या सर्व पत्रांत या गोष्टींचा उल्लेख केला आहे. त्यामध्ये समजण्यास कठिण अशा काही गोष्टी आहेत आणि जे अशिक्षित व अस्थिर माणसे इतर शास्त्रलेखांचा जसा विपरीत अर्थ करतात तसा ह्यांचाहि करतात; अशाने आपल्या स्वतःच्या नाशाला कारणीभूत होतात. तर प्रियजनहो, तुम्हास या गोष्टी तुम्हास पूर्वीपासून कळत आहेत, म्हणून तुम्ही अनीतिमान लोकांच्या भ्रांतीप्रवाहात सापडून आपल्या स्थिरतेतून ढळू नये ह्यासाठी जपून राहा. आणि आपला प्रभू व तारणारा येशू ख्रिस्त ह्याच्या कृपेत व ज्ञानात वाढत जा. त्यास आता आणि सर्वकाळपर्यंत गौरव असो. आमेन.
2 पेत्र 3:1-18 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
प्रिय मित्रांनो, आता माझे हे तुम्हाला दुसरे पत्र आहे. या दोन्ही पत्राद्वारे मी तुम्हाला आठवण देऊन तुमच्या विचारांना हितकारक होतील अशा गोष्टींना चालना देत आहे. माझी इच्छा आहे की, पवित्र संदेष्ट्यांनी पूर्वी सांगितलेल्या वचनांची आणि आमचा प्रभू आणि तारणारा यांनी तुमच्या प्रेषितांद्वारे दिलेल्या आज्ञेची तुम्ही आठवण ठेवावी. सर्वात प्रथम तुम्ही हे समजून घ्या की, शेवटल्या दिवसात थट्टा करणारे येतील, थट्टा करतील आणि त्यांच्या स्वतःच्या वाईट वासनांच्या मागे लागतील. ते म्हणतील, “त्यांच्या येण्याचे दिलेले ‘येत आहे’ हे वचन आता कोठे आहे? आमचे पूर्वज मरण पावले, तरी सर्वकाही उत्पत्तीच्या प्रारंभापासून होते तसेच चालू आहे.” परंतु ते बुद्धिपुरस्सर हे विसरतात की, फार पूर्वी परमेश्वराच्या शब्दाने आकाशमंडळ अस्तित्वात आले आणि पृथ्वी पाण्यातून व पाण्याद्वारे घडविली गेली. याच पाण्यामुळे त्यावेळेच्या जगाचा महाप्रलयाने नाश झाला होता. आता अस्तित्वात असलेले आकाश व पृथ्वी ही त्याच परमेश्वराच्या शब्दाने अग्नीत नष्ट करण्यासाठी राखलेली आहेत, अनीतिमान लोकांच्या न्यायाच्या दिवसासाठी आणि नाशासाठी ती राखून ठेवलेली आहेत. प्रिय मित्रांनो, एक गोष्ट तुम्ही विसरू नका: प्रभुसाठी एक दिवस हजार वर्षांसारखा आहे आणि हजार वर्षे एका दिवसासारखी आहेत. कित्येक लोक ज्याला संथपणा म्हणतात, तसे प्रभू आपल्या वचनाविषयी करीत नाहीत, तर ते तुमच्याबरोबर सहनशीलतेने वागतात. कोणाचाही नाश व्हावा, अशी त्यांची इच्छा नाही, तर प्रत्येकाने पश्चात्ताप करावा अशी त्यांची इच्छा आहे. परंतु चोर येतो तसा प्रभुचा दिवस येईल, त्या दिवशी आकाश कर्कश नाद करीत नाहीसे होईल, मूलतत्त्वे तप्त होऊन लयास जातील आणि पृथ्वी व तिच्यावरील सर्वगोष्टी प्रकट होतील. ज्याअर्थी सर्वकाही अशा रीतीने नष्ट होणार आहे, त्याअर्थी तुम्ही कशाप्रकारचे लोक असणे आवश्यक आहे? तुम्ही पवित्र आणि सुभक्तीत जीवन जगले पाहिजे. तो परमेश्वराचा दिवस लवकर यावा म्हणून तुम्ही त्याकडे लक्ष देत आहात, त्या दिवशी आकाश अग्नीत जळून विलयास जाईल, आणि त्यातील मूलतत्वे उष्णतेने वितळतील. परंतु ज्यामध्ये नीतिमत्त्व वास करते, असे नवे आकाश व नवी पृथ्वी यांची परमेश्वराच्या वचनाप्रमाणे आपण वाट पाहत आहोत. तर मग, प्रिय मित्रांनो, या गोष्टीची वाट पाहत असता तुम्ही त्यांच्या दृष्टीने निष्कलंक व निर्दोष असे त्यांच्याबरोबर शांतित असलेले असे त्यांना आढळून यावे म्हणून प्रत्येक प्रकारे प्रयत्न करा. आपल्या प्रभुची सहनशीलता ही तारणाचीच संधी आहे असे समजा. आपला प्रिय बंधू पौल याला देण्यात आलेल्या ज्ञानाप्रमाणे त्यानेही तुम्हाला असेच लिहिले आहे हे तारणच आहे असे समजा. या विषयाचे वर्णन करून तो त्याच्या सर्व पत्रात त्याचप्रकारे लिहितो. त्याच्या पत्रातील काही गोष्टी समजावयास कठीण अशा आहेत. अज्ञानी व अस्थिर माणसे इतर धर्मशास्त्रलेखांचा जसा विपरीत अर्थ करतात तसा या पत्राचाही करतात. अशाने ते स्वतःच्या नाशाला कारणीभूत होतात. प्रिय मित्रांनो, तुम्हाला अगोदरच इशारा देऊन ठेवला आहे, म्हणून तुम्ही अनीतिमान लोकांच्या चुकीच्या प्रवाहात सापडून आपल्या सुरक्षित स्थितीतून ढळू नये यासाठी जपून राहा. परंतु आपले प्रभू आणि तारणारे येशू ख्रिस्त यांच्या कृपेत आणि ज्ञानात वाढत राहा.
2 पेत्र 3:1-18 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
प्रियजनहो, आता हे दुसरे पत्र मी तुम्हांला लिहिले आहे. ह्या दोन्ही पत्रांमध्ये मी तुम्हांला ह्या गोष्टींची आठवण देऊन तुमच्या मनामध्ये निर्मळ विचार जागृत करीत आहे. ह्यासाठी की, पवित्र संदेष्ट्यांनी पूर्वी सांगितलेल्या वचनांची आणि प्रभू आणि तारणारा ह्याने प्रेषितांद्वारे दिलेल्या आज्ञेची आठवण तुम्ही ठेवावी. सर्वप्रथम हे ध्यानात ठेवा की, स्वतःच्याच वासनांप्रमाणे चालणारे व उपहास करणारे लोक शेवटच्या दिवसात चेष्टा करीत म्हणतील, “त्याच्या येण्याचे वचन आता कोठे आहे? कारण वाडवडील निधन पावले, तरी सर्व काही उत्पत्तीच्या प्रारंभापासून होते तसेच चालू आहे!” ते हे बुद्धिपुरस्सर विसरतात की, पूर्वी देवाच्या शब्दाने आकाश व पृथ्वी ही निर्माण झाली. पृथ्वी पाण्यातून व पाण्याच्या योगे घडविली गेली. तेव्हाच्या जगाचा पुराच्या पाण्याने नाश झाला. पण आताचे आकाश व पृथ्वी ही त्याच देवाच्या शब्दाने अग्नीत नष्ट करण्यासाठी राखलेली आहेत; म्हणजे न्यायनिवाड्याचा व अधार्मिक लोकांच्या नाशाचा दिवस येईपर्यंत ती राखून ठेवलेली आहेत. परंतु प्रियजनहो, एक गोष्ट तुम्ही विसरू नका! प्रभूला एक दिवस हजार वर्षांसारखा आहे आणि हजार वर्षे एका दिवसासारखी आहेत. कित्येक लोक ज्याला विलंब म्हणतात, तसा विलंब प्रभू आपल्या वचनाविषयी करीत नाही, तर तो तुमचे धीराने सहन करतो. कोणाचा नाश व्हावा, अशी त्याची इच्छा नाही, तर सर्वांनी पश्चात्ताप करावा अशी त्याची इच्छा आहे. मात्र चोर येतो तसा प्रभूचा दिवस येईल, त्या दिवशी आकाश कर्कश नाद करीत नाहीसे होईल, मूलतत्त्वे तप्त होऊन लयास जातील आणि पृथ्वी व तिच्यावरील सर्व गोष्टी उघडकीस येतील. ही सर्व अशी लयास जाणार आहेत, म्हणून पवित्र व धार्मिक जीवन जगून देवाचा दिवस येण्याची वाट पाहणारे व तो दिवस लवकर यावा म्हणून सर्वतोपरी प्रयत्न करणारे तुम्ही असावे. त्या दिवसामुळे आकाश जळून लयास जाईल आणि मूलतत्त्वे तप्त होऊन वितळतील. परंतु ज्यामध्ये नीतिमत्त्व वास करते, असे नवे आकाश व नवी पृथ्वी ह्यांची देवाच्या वचनाप्रमाणे आपण वाट पाहत आहोत. म्हणून प्रियजनहो, ह्या गोष्टीची वाट पाहत असता तुम्ही त्याच्या दृष्टीने निष्कलंक व निर्दोष असे त्याच्याबरोबर शांतीत असलेले त्याला आढळावे म्हणून होईल तितके प्रयत्न करा. आपल्या प्रभूची सहनशीलता ही तारणाचीच संधी आहे असे समजा. आपला प्रिय बंधू पौल ह्याला देण्यात आलेल्या ज्ञानाप्रमाणे त्यानेही तुम्हांला असेच लिहिले आहे. त्याने आपल्या सर्व पत्रांत ह्या गोष्टीचा उल्लेख केला आहे. त्यात समजावयास कठीण अशा काही गोष्टी आहेत. अज्ञानी व अस्थिर माणसे इतर धर्मशास्त्रलेखांचा जसा विपरीत अर्थ करतात, तसा ह्याचाही करतात. अशाने ते स्वतःच्या नाशाला कारणीभूत होतात. परंतु प्रियजनहो, ह्या गोष्टी तुम्हांला पूर्वीपासून कळत आहेत, म्हणून तुम्ही अनीतिमान लोकांच्या भ्रांतिप्रवाहात सापडून आपल्या स्थिरतेतून ढळू नये ह्यासाठी जपून राहा. आपला प्रभू व तारणारा येशू ख्रिस्त ह्यांच्या कृपेत व ज्ञानात वाढत जा. त्याला आता व अनंतकालपर्यंत गौरव असो. आमेन.