YouVersion लोगो
सर्च आयकॉन

२ राजे 6:15-23

२ राजे 6:15-23 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

देवाच्या मनुष्याचा सेवक पहाटे उठला आणि बाहेर येऊन पाहतो तो, रथ व घोडे यांसह नगराभोवती सैन्य पसरलेले. अलीशाचा सेवक अलीशाला म्हणाला, “स्वामी, आता आपण काय करावे?” अलीशा म्हणाला, “घाबरु नको! त्याच्या सैन्यापेक्षा आपले सैन्य कितीतरी मोठे आहे!” आणि अलीशाने प्रार्थना केली. तो म्हणाला, “हे परमेश्वरा, माझ्या सेवकाचे डोळे उघड म्हणजे त्यास नीट दिसेल.” परमेश्वराने त्या सेवकाचे डोळे उघडले. तेव्हा त्यास अलीशाच्या भोवती अग्नीचे घोडे आणि रथ डोंगरावर पसरलेले दिसले. हे अग्नीरथ आणि अग्नीचे घोडे खाली अलीशाजवळ उतरले. अलीशाने परमेश्वराची प्रार्थना करून म्हटले, “तू या लोकांस आंधळे करून टाकावेस अशी मी तुला विनंती करतो.” अलीशाच्या या विनंतीनुसार परमेश्वराने अरामी सैन्याला आंधळे केले. अलीशा त्या अरामी सैन्याला म्हणाला, “हा रस्ता बरोबर नाही तसेच तुम्हास हवे ते नगरही हे नव्हे. माझ्या मागोमाग या म्हणजे तुम्ही ज्याच्या मागावर आहात तो मनुष्य मी तुम्हास दाखवतो.” अलीशाने मग त्या अरामी सैन्याला शोमरोनला नेले. ते शोमरोन येथे आले तेव्हा अलीशा म्हणाला, “परमेश्वरा, आता यांना दिसू दे. त्यांचे डोळे उघड.” परमेश्वराने मग त्यांचे डोळे उघडले. तेव्हा त्या सैन्याला आपण शोमरोनामध्ये असल्याचे कळले. इस्राएलच्या राजाने हे अरामी सैन्य पाहिले. राजा अलीशाला म्हणाला, “बाबा, मी यांना मारु का? त्यांना ठार करु का?” अलीशा म्हणाला, “नाही, यांना मारु नको. लढाईत ज्यांना पकडून आणले त्यांना तलवारीने किंवा धनुष्यबाणाने मारायचे नसते. या अरामी सैन्याला खायला प्यायला दे. थोडी भाकर आणि पाणी दे मग त्यांना आपल्या धन्याकडे परत जाऊ दे. इस्राएलच्या राजाने या सैन्याच्या जेवणाची व्यवस्था केली. मग त्या अरामी सैन्याचे खाणेपिणे झाल्यावर राजाने त्यांना परत पाठवले. ते सैन्य आपल्या राजाकडे परत आले. मग पुन्हा अरामी सैन्याच्या टोळ्या इस्राएलावर आल्या नाहीत.”

सामायिक करा
२ राजे 6 वाचा

२ राजे 6:15-23 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

सकाळी देवाच्या माणसाचा सेवक उठून बाहेर आला तेव्हा सैन्याने घोडे व रथ ह्यांसह नगराला वेढा दिला आहे असे त्याच्या दृष्टीस पडले. तो आपल्या धन्याला म्हणाला, “स्वामी, हायहाय! आता आपण काय करावे?” तो म्हणाला, “भिऊ नकोस; त्यांच्या पक्षाचे आहेत त्यांच्याहून अधिक आपल्या पक्षाचे आहेत.” अलीशाने प्रार्थना केली की, “हे परमेश्वरा, ह्याचे डोळे उघड, ह्याला दृष्टी दे.” परमेश्वराने त्या तरुणाचे डोळे उघडले, तो पाहा, अलीशाच्या सभोवतालचा डोंगर अग्नीचे घोडे व रथ ह्यांनी व्यापून गेला आहे असे त्याला दिसले. अरामी लोक अलीशावर चालून आले तेव्हा त्यांनी परमेश्वराची प्रार्थना केली की, “ह्या लोकांना आंधळे कर.” अलीशाच्या म्हणण्याप्रमाणे त्याने त्यांना आंधळे केले. अलीशा त्यांना म्हणाला, “हा रस्ता नव्हे तो रस्ता व हे नव्हे ते शहर; माझ्यामागून या म्हणजे ज्या मनुष्याचा तुम्ही शोध करत आहात त्याच्याकडे मी तुम्हांला घेऊन जाईन.” मग तो त्यांना शोमरोनात घेऊन गेला. ते शोमरोनात आल्यावर अलीशा म्हणाला, “परमेश्वरा, ह्या लोकांचे डोळे उघड, ह्यांना दिसू दे.” परमेश्वराने त्यांचे डोळे उघडले. त्यांना दिसू लागले तेव्हा आपण शोमरोनामध्ये आहोत असे त्यांना दिसले. त्यांना पाहून इस्राएलाचा राजा अलीशाला म्हणाला, “बाबा, मी ह्यांना मारून टाकू काय?” त्याने म्हटले, “ह्यांना मारू नकोस; तलवार व धनुष्य ह्यांनी पाडाव केलेल्यांना तू मारून टाकत असतोस काय? ह्यांच्यापुढे अन्नपाणी वाढ; ह्यांना खाऊनपिऊन आपल्या धन्याकडे परत जाऊ दे.” मग त्याने त्यांना मोठी मेजवानी दिली; त्यांचे खाणेपिणे आटोपल्यावर त्याने त्यांना निरोप दिला; आणि ते आपल्या धन्याकडे गेले. अरामी लोकांच्या टोळ्या इस्राएल देशावर पुन्हा आल्या नाहीत.

सामायिक करा
२ राजे 6 वाचा