२ राजे 20:1-6
२ राजे 20:1-6 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
त्या दिवसांत हिज्कीया आजारी पडून मरायला टेकला. तेव्हा आमोजाचा पुत्र यशया संदेष्टा त्याच्याकडे येऊन त्याला म्हणाला, “परमेश्वर म्हणतो, आपल्या घराची निरवानिरव कर, कारण आता तू मरणार, जगणार नाहीस.” तेव्हा त्याने आपले तोंड भिंतीकडे फिरवून परमेश्वराची प्रार्थना केली; तो म्हणाला, “हे परमेश्वरा, मी तुझ्यासमोर सत्यतेने व सात्त्विक मनाने वागलो आहे आणि तुझ्या दृष्टीने जे योग्य तेच करत आलो आहे ह्याचे स्मरण कर अशी तुला मी विनंती करतो.” असे म्हणून हिज्कीया मनस्वी रडला. तेव्हा नगराच्या मधल्या चौकात यशया जाऊन पोहचतो तोच त्याला परमेश्वराचा संदेश आला तो हा : “परत जाऊन माझ्या लोकांचा नायक हिज्कीया ह्याला सांग, तुझा पूर्वज दावीद ह्याचा देव परमेश्वर म्हणतो, मी तुझी प्रार्थना ऐकली आहे, तुझे अश्रू पाहिले आहेत; मी तुला बरे करतो. तू आजपासून तिसर्या दिवशी परमेश्वराच्या मंदिरी जाशील. मी तुझे आयुष्य पंधरा वर्षांनी वाढवतो; मी तुला व ह्या नगराला अश्शूराच्या राजाच्या हातातून सोडवीन; माझ्यासाठी व माझा सेवक दावीद ह्याच्यासाठी मी ह्या नगराचे संरक्षण करीन.”
२ राजे 20:1-6 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
याच सुमारास हिज्कीया आजारी पडून मरणास टेकला. तेव्हा आमोजचा मुलगा यशया हा संदेष्टा त्याच्याकडे येऊन म्हणाला, “परमेश्वराचे म्हणणे आहे, ‘तुझ्या घराची तू व्यवस्था कर, कारण तू मरणार, वाचणार नाहीस.” तेव्हा हिज्कीयाने आपले तोंड भिंतीकडे वळवले आणि परमेश्वराची प्रार्थना करून तो म्हणाला. “परमेश्वरा, मी तुझी मन:पूर्वक सेवा केली आहे हे लक्षात असू दे. तुझ्या दृष्टीने जे उचित तेच मी केले.” तेव्हा हिज्कीया फार रडला. यशया मधला चौक ओलांडून शहराच्या बाहेर जाण्यापूर्वी पुन्हा त्यास परमेश्वराचे शब्द ऐकू आले. परमेश्वर म्हणाला, “पुन्हा मागे फिर आणि माझ्या प्रजेचा नेता हिज्कीया याच्याशी बोल.” त्यास म्हणावे, “तुझा पूर्वज दावीद याचा परमेश्वर देव म्हणतो: तुझी प्रार्थना मी ऐकली आहे आणि तुझे अश्रू पाहिले आहेत. तेव्हा मी तुला बरे करतो, तिसऱ्या दिवशी तू परमेश्वराचे मंदिर चढून जाशील. तुला मी आणखी पंधरा वर्ष आयुष्य दिले आहे. अश्शूरच्या राजाच्या हातून तुझी आणि या नगराची मी सोडवणूक करीन. या नगराचे मी रक्षण करीन स्वत:साठी तसेच माझा सेवक दावीद याला मी दिलेल्या वचनासाठी मी हे करीन.”