२ राजे 2:1-17
२ राजे 2:1-17 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
आणि असे झाले की, एका वावटळीद्वारे परमेश्वर एलीयाला वर स्वर्गास घेणार होता, तेव्हा एलीया अलीशाबरोबर गिलगालहून निघाला. एलीया अलीशाला म्हणाला, “कृपाकरून तू येथेच थांब, कारण परमेश्वराने मला बेथेल येथे पाठवले आहे.” अलीशा म्हणाला, “परमेश्वर जिवंत आहे, व तू जिवंत आहे, मी तुला सोडणार नाही.” मग ते खाली बेथेलास गेले. तेव्हा बेथेल येथील संदेष्ट्यांचे पुत्र अलीशाकडे येऊन त्यास म्हणाले, “आज तुझ्या स्वामीला परमेश्वर तुझ्यापासून घेऊन जाणार आहे, हे तुला माहित आहे काय?” अलीशा म्हणाला, “होय, मला माहित आहे, पण या विषयी बोलू नका” एलीया अलीशाला म्हणाला, “कृपाकरून तू येथेच थांब, कारण परमेश्वराने मला यरीहो येथे पाठवले आहे.” पण अलीशा म्हणाला, “परमेश्वर जिवंत आहे व तू जिवंत आहे, मी तुला सोडणार नाही.” मग ते यरीहोस आले. तेव्हा यरीहो मधील संदेष्ट्यांचा समूह अलीशाकडे येऊन म्हणाली, “परमेश्वर तुझ्या स्वामीला आज तुझ्यापासून घेऊन जाणार आहे हे तुला माहित आहे काय?” अलीशा म्हणाला, “होय मला माहित आहे, पण या विषयी बोलू नका.” नंतर एलीया अलीशाला म्हणाला, “तू कृपाकरून येथेच थांब, कारण परमेश्वराने मला यार्देनेस पाठवले आहे.” अलीशा म्हणाला, “परमेश्वर जिवंत आहे व तू जिवंत आहे; मी तुला सोडणार नाही.” तेव्हा ते दोघे पुढे निघाले. नंतर संदेष्ट्याच्या मुलांतले पन्नास त्यांच्या विरूद्ध दिशेने लांब उभे राहिले व ते दोघे यार्देन जवळ उभे राहिले. तेव्हा एलीयाने आपला झगा काढला व त्याची घडी केली, आणि तो पाण्यावर आपटला. तेव्हा पाणी दोन्ही दिशेने दुभागले व ते दोघे कोरडया भूमीवरुन चालत नदी पार करून गेले. आणि असे झाले की, नदी ओलांडल्यावर एलीया अलीशाला म्हणाला, “परमेश्वराने मला येथून घेऊन जायच्या अगोदर मी तुझ्यासाठी काय करावे ते माग.” अलीशा म्हणाला, “कृपाकरून तुमच्या ठायी असलेल्या आत्म्याचा दुप्पट वाटा मला मिळावा.” एलीयाने उत्तर दिले, “ही तर फारच कठिण गोष्ट तू मागितलीस. तरीसुद्धा, तुझ्या जवळून मी घेतला जात असता, जर तुला मी दिसलो तर हे शक्य आहे. पण जर नाही, तर असे होणार नाही.” एलीया आणि अलीशा बोलत पुढे चालले होते, तेवढयात अग्नीचा रथ व अग्नीचे घोडे तेथे अवतीर्ण झाले आणि त्यांनी त्या दोघांना एकमेकांपासून दूर केले, आणि एका वावटळीमधून एलीया वर स्वर्गात गेला. अलीशा हे पाहून मोठ्याने ओरडला, “माझ्या बापा! माझ्या बापा! इस्राएलचा रथ आणि त्याचे घोडेस्वार!” त्याने एलीयाला पुन्हा पाहिले नाही. त्याने आपली वस्रे धरुन फाडली व त्याचे दोन तुकडे केले. त्याने एलीयाचा अंगरखा जो जमिनीवर पडला होता, उचलला, आणि परत यार्देनकाठी जाऊन उभा राहिला. त्याने एलीयाचा झगा जो खाली पडला होता, तो घेऊन पाण्यावर मारला आणि म्हटले, “परमेश्वर, एलीयाचा देव कोठे आहे?” त्याने जेव्हा पाण्यावर मारले, तेव्हा पाणी दोन्ही बाजूस दुभंगले आणि अलीशा पार गेला. तेव्हा यरीहो येथील संदेष्ट्यांचे पुत्र जे समोर होते ते त्यास पाहून म्हणाले, “एलीयाचा आत्मा अलीशावर आला आहे.” आणि ते त्यास भेटायला आले. त्यांनी त्यास जमिनीपर्यंत लवून नमन केले. ते त्यास म्हणाले, “आता पाहा, तुझ्या दासाकडे कडे पन्नास धष्टपुष्ट माणसे आहेत. त्यांना जाऊन तुझ्या स्वामीचा शोध घेऊ दे. कदाचित् परमेश्वराच्या आत्म्याने एलीयाला वर नेऊन कोठेतरी डोंगर किंवा दरीमध्ये टाकले असेल.” अलीशा म्हणाला, “नाही, त्यांना पाठवू नका.” पण अलीशाला लाज वाटेपर्यंत संदेष्ट्यांनी आग्रह धरला, तो म्हणाला, “त्यांना पाठवा.” मग त्यांनी पन्नास जणांना पाठवले, आणि त्यांनी एलीयाचा तीन दिवस शोध घेतला, पण ते त्यास शोधू शकले नाही.
२ राजे 2:1-17 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
जेव्हा याहवेहने एलीयाहला वावटळीद्वारे स्वर्गात घेऊन जाण्याचा समय आला. तेव्हा एलीयाह आणि अलीशा गिलगालहून निघाले होते. एलीयाहने अलीशाला म्हटले, “इथे थांब; याहवेहने मला बेथेलला पाठवले आहे.” परंतु अलीशा म्हणाला, “जिवंत याहवेहची शपथ आणि तुमच्या जीविताची शपथ मी आपणास सोडणार नाही.” तेव्हा ते दोघे खाली बेथेलला गेले. तिथे बेथेलातील संदेष्ट्यांचा एक समूह अलीशाकडे आला आणि विचारले, “आज याहवेह तुझ्या स्वामीला तुझ्यापासून घेऊन जाणार आहेत हे तुला ठाऊक आहे काय?” अलीशाने उत्तर दिले, “हो मला माहीत आहे, म्हणून शांत राहा.” नंतर एलीयाह त्याला म्हणाला, “अलीशा तू येथेच राहा; कारण याहवेह मला यरीहोस पाठवित आहे.” आणि त्याने म्हटले, “मी याहवेहची आणि आपल्या जीविताची शपथ घेऊन सांगतो, मी तुम्हाला सोडणार नाही.” तेव्हा ते दोघेही यरीहोला गेले. तिथे यरीहोच्या संदेष्ट्यांचा एक समूह अलीशास म्हणाला, “आज तुझ्या स्वामीला याहवेह तुझ्यापासून घेऊन जाणार आहेत हे तुला ठाऊक आहे काय?” त्याने उत्तर दिले, “हो मला माहीत आहे, म्हणून शांत राहा.” मग एलीयाह अलीशास म्हणाला, “तू येथेच राहा; कारण याहवेह मला यार्देनला पाठवित आहेत.” आणि त्याने उत्तर दिले, “मी याहवेहची आणि आपल्या जीविताची शपथ घेऊन सांगतो कीस मी तुम्हाला सोडणार नाही.” मग ते दोघेही पुढे चालले. संदेष्ट्यांच्या सभेतील पन्नास लोकांचा समूह त्यांच्याजवळ आला आणि दूर थांबला व जिथे एलीयाह आणि अलीशा यार्देनजवळ थांबले होते, त्या दिशेने तोंड करून उभा राहिला. तिथे एलीयाहने आपल्या झग्याची घडी केली आणि ती पाण्यावर मारली. तेव्हा पाणी उजवीकडे आणि डावीकडे दुभंगले आणि ते दोघे कोरड्या भूमीवरून चालत पैलतीराला गेले. ते पार गेल्यावर एलीयाह अलीशाला म्हणाला, “मला तुझ्यापासून घेतले जाण्यापूर्वी मी तुझ्यासाठी काय करावे ते मला सांग?” “अलीशाने उत्तर दिले, तुमच्यामध्ये असलेल्या आत्म्याचा दुप्पट वाटा मला मिळावा.” एलीयाह म्हणाला, “तू एक कठीण गोष्ट मागितली आहेस; तरी देखील जेव्हा तू मला तुझ्यापासून दूर जात असताना पाहिलेस, तर ते तुझे होईल; अन्यथा ते होणार नाही.” ते एकत्र असे बोलत चालत असताना, अचानक अग्नीचे रथ आणि अग्नीचे घोडे प्रगट झाले आणि त्या दोघांना एकमेकांपासून वेगळे केले आणि वावटळीद्वारे एलीयाह स्वर्गात वर घेतला गेला. अलीशाने हे पाहिले आणि आरोळी मारली, “हे माझ्या पित्या! माझ्या पित्या! अहो इस्राएलांच्या रथांनो आणि इस्राएलांच्या सारथ्यांनो!” आणि अलीशा त्यांना पुन्हा पाहू शकला नाही. तेव्हा अलीशाने आपला झगा फाडला आणि त्याचे दोन तुकडे केले. तेव्हा अलीशाने एलीयाहच्या अंगावरून पडलेला झगा उचलला आणि तो यार्देन काठी परत गेला आणि उभा राहिला. त्याने एलीयाहच्या अंगावरून पडलेला झगा घेतला आणि पाण्यावर मारला. “एलीयाहचा याहवेह परमेश्वर कुठे आहेत?” जेव्हा त्याने झग्याने पाण्यावर मारले तेव्हा पाणी हे उजवीकडे आणि डावीकडे दुभंगले आणि अलीशा पैलतीरावर गेला. यरीहोतील संदेष्ट्यांचा एक समूह, जो हे पाहत होता म्हणाला, “एलीयाहचा आत्मा अलीशावर उतरला आहे.” ते त्याला भेटण्यास गेले आणि भूमीपर्यंत लवून त्याला नमन केले. ते त्याला म्हणाले, “पाहा, तुमच्या सेवकांकडे पन्नास बळकट पुरुष आहेत. त्यांना जाऊ द्या आणि तुमच्या स्वामीचा शोध घेऊ द्या. याहवेहच्या आत्म्याने त्यांना एखाद्या पर्वतशिखरावर, नाहीतर एखाद्या दरीत नेऊन टाकले असेल.” अलीशा म्हणाला, “नको, त्यांना पाठवू नका.” परंतु त्यांनी त्याला लाज वाटेपर्यंत आग्रह केला. तेव्हा तो म्हणाला, “त्यांना पाठवा.” आणि त्यांनी पन्नास पुरुषांना पाठविले, ज्यांनी त्याचा तीन दिवस शोध घेतला, परंतु ते त्याला शोधू शकले नाही.
२ राजे 2:1-17 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
परमेश्वराने एलीयाला वावटळीच्या द्वारे स्वर्गात घेऊन जाण्याची वेळ आली तेव्हा एलीया अलीशाबरोबर गिलगाल येथून चालला होता. एलीया अलीशाला म्हणाला, “परमेश्वर मला बेथेल येथे पाठवत आहे; तर तू येथेच थांब.” अलीशा म्हणाला, “परमेश्वराच्या व आपल्या जीविताची शपथ, मी आपणाला कधी सोडणार नाही.” मग ते बेथेल येथे गेले. बेथेलातल्या संदेष्ट्यांचे शिष्य अलीशाकडे येऊन त्याला म्हणाले, “आज परमेश्वर तुझ्या धन्याला तुझ्या शिरावरून घेऊन जाणार आहे हे तुला ठाऊक आहे काय?” त्याने म्हटले, “मला ठाऊक आहे, पुरे करा.” एलीया त्याला म्हणाला, “अलीशा, परमेश्वर मला यरीहोला पाठवत आहे तर तू येथे थांब.” तो म्हणाला, “परमेश्वराच्या व आपल्या जीविताची शपथ, मी आपणाला सोडणार नाही.” मग ते यरीहोस गेले. यरीहोतील संदेष्ट्यांचे शिष्य अलीशाकडे येऊन त्याला म्हणाले, “आज परमेश्वर तुझ्या धन्याला तुझ्या शिरावरून घेऊन जाणार आहे हे तुला ठाऊक आहे काय?” त्याने म्हटले, “मला ठाऊक आहे, पुरे करा.” एलीया त्याला म्हणाला, “परमेश्वर मला यार्देनेकडे पाठवत आहे. तू येथेच थांब.” तो म्हणाला, “परमेश्वराच्या व आपल्या जीविताची शपथ, मी आपणाला सोडणार नाही.” मग ते दोघे पुढे चालले. संदेष्ट्यांचे पन्नास शिष्य येऊन त्यांच्यासमोर दूर उभे राहिले; आणि ते दोघे यार्देनेतीरी उभे राहिले. एलीयाने आपला झगा काढून त्याची वळकटी करून ती पाण्यावर मारली तेव्हा पाणी दुभंगले; मग ते दोघे कोरड्या भूमीवरून पलीकडे गेले. ते पलीकडे गेल्यावर एलीया अलीशाला म्हणाला, “मला तुझ्यापासून नेण्यात येण्यापूर्वी मी तुझ्यासाठी काय करू ते मला सांग.” अलीशा म्हणाला, “आपल्या ठायी असलेल्या आत्म्याचा दुप्पट वाटा माझ्या ठायी यावा.” एलीया म्हणाला, “तू अवघड गोष्ट मागतोस, पण मला तुझ्यापासून घेऊन जातील त्या वेळी मी तुला दिसलो तर तू मागतोस ते तुला प्राप्त होईल, न दिसलो तर प्राप्त होणार नाही.” ते बोलत चालले असता पाहा, एकाएकी एक अग्निरथ व एक अग्निवारू दृष्टीस पडले व त्यांनी त्या दोघांना अलग केले; आणि एलीया वावटळीतून स्वर्गास गेला. ते पाहून अलीशा मोठ्याने म्हणाला, “माझ्या बापा! माझ्या बापा! इस्राएलाच्या रथांनो! इस्राएलाच्या राउतांनो!” तो पुन्हा त्याच्या नजरेस पडला नाही; तेव्हा त्याने आपली वस्त्रे फाडून त्यांचे दोन-दोन तुकडे केले. एलीयाचा जो झगा त्याच्या अंगावरून खाली पडला होता तो त्याने उचलून घेतला आणि तो परत जाऊन यार्देनेच्या तीरावर उभा राहिला. एलीयाच्या अंगावरून पडलेला झगा पाण्यावर मारून तो म्हणाला, “एलीयाचा देव परमेश्वर कोठे आहे?” त्याने तो पाण्यावर मारताच पाणी दुभंगले आणि अलीशा पलीकडे गेला. यरीहो येथल्या संदेष्ट्यांचे शिष्य त्याला लांबून पाहून म्हणाले, “एलीयाचा आत्मा अलीशाच्या ठायी उतरला आहे.” त्यांनी सामोरे येऊन त्याला जमिनीपर्यंत लवून नमन केले. ते त्याला म्हणाले, “ऐका, आपल्या सेवकांजवळ पन्नास बळकट पुरुष आहेत; त्यांना आपल्या स्वामीचा शोध करण्यास जाऊ द्या; परमेश्वराच्या आत्म्याने त्याला उचलून एखाद्या पर्वतावर अथवा एखाद्या खोर्यात टाकले असेल.” तो म्हणाला, “कोणालाही पाठवू नका.” त्यांनी त्याला एवढा आग्रह केला की त्यांची त्याला भीड पडून तो म्हणाला, “पाठवा.” त्यांनी पन्नास पुरुष पाठवले. त्यांनी त्याचा तीन दिवस शोध केला, पण त्यांना तो सापडला नाही.