YouVersion लोगो
सर्च आयकॉन

२ राजे 19:1-37

२ राजे 19:1-37 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

हे ऐकून राजा हिज्कीयाने त्याच्या अंगावरची वस्त्रे फाडली आणि गोणताट घालून तो परमेश्वराच्या मंदिरात गेला. त्याने आपला घरकारभारी एल्याकीम व चिटणीस शेबना आणि वडिलधारे याजक यांना गोणताट पांघरलेले असे आमोजचा मुलगा यशया या संदेष्ट्यांकडे पाठवले. ते यशयाला म्हणाले, “हिज्कीया म्हणतो, ‘हा संकटाचा मानहानीचा व धिक्काराचा दिवस आहे. मूल जन्माला येत आहे पण प्रसूतीची शक्ती नसावी तसे झाले आहे. परमेश्वर तुझा देव कदाचित रब-शाकेचे सगळे शब्द ऐकेल, त्याचा स्वामी अश्शूराचा राजा याने त्यास जिवंत देवाची निंदा करायला पाठवले आहे. आणि जी वचने परमेश्वर तुझा देव याने ऐकली आहेत, त्यांचा कदाचित तो निषेध करील. म्हणून जे शेष राहिले आहेत त्याच्यासाठी प्रार्थना करा.” तेव्हा हिज्कीया राजाचे सेवक यशयाकडे गेले. आणि यशया त्यांना म्हणाला, “तुझ्या स्वामीला हा निरोप द्या; की परमेश्वर असे म्हणतो ‘माझ्यासाठी जे अपमानकारक उद्गार अश्शूरच्या राजाच्या सेनापतींनी काढले त्याने घाबरुन जाऊ नका.’ पाहा, मी आता त्याच्यात एक आत्मा घालीन आणि तो वर्तमान ऐकून स्वदेशी परत जाईल आणि आपल्या देशातच त्यास तलवारीने मरण येईल असे मी करणार.” नंतर रबशाके परत गेला तेव्हा त्यास अश्शूराचा राजा लिब्नाविरुध्द लढाई करताना आढळला, कारण तो लाखीशाहून निघून गेला असल्याचे त्याने ऐकले. मग कूशाचा राजा तिऱ्हाका आपल्याशी लढायला येत आहे असे सन्हेरीब याने ऐकले. तेव्हा त्याने राजा हिज्कीयाकडे पुन्हा दूताकरवी निरोप पाठवून म्हटले, यहूदाचा राजा हिज्कीयाला तुम्ही सांगा, “तुम्ही ज्या परमेश्वरावर विसंबून आहात तो, ‘अश्शूरचा राजाच्या हाती यरूशलेम दिले जाणार नाही, असे बोलून तुला न फसवो.’ अश्शूरच्या राजाने इतर देशांचे काय केले ते तुम्ही ऐकलेच आहे. आम्ही ते पूर्ण धुळीला मिळवले. तेव्हा तुम्हीच तेवढे वाचणार का? नाही. त्या राष्ट्राच्या देवतांनी त्यांचे रक्षण केले नाही. माझ्या पुर्वजांनी त्यांची धूळधाण केली. गोजान, हारान, रेसफ आणि तलस्सरातील एदेन हे त्यांनी नष्ट केले. हमाथ, अर्पद, सफरवाईम, हेना आणि इव्वा यांचे राजे कुठे आहेत? त्यांचा पार धुरळा उडाला आहे.” हिज्कीयाने जासूदांच्या हातून पत्र घेऊन ते वाचले. मग परमेश्वराच्या मंदिरात जाऊन परमेश्वरापुढे ते उघडून ठेवले. परमेश्वराची प्रार्थना करून हिज्कीया म्हणाला. “परमेश्वर देवा, करुबांच्यावर राजासनी बसणारा तूच इस्राएलचा देव आहेस. पृथ्वीच्या पाठीवरील सर्व राज्यांचा तू आणि एकमेव तूच नियंता आहेस. आकाश आणि पृथ्वीचा तू निर्माता आहेस, परमेश्वरा, माझे म्हणणे ऐक आपले डोळे उघड आणि हे पत्र पाहा. सन्हेरीबची जिवंत परमेश्वराचा अवमान करणारी वचने पाहा. खरोखरच परमेश्वराचा अवमान करणारी वचने पाहा. खरोखरच परमेश्वरा असे घडले आहे. अश्शूरच्या राजाने ही सर्व राष्ट्रे नामशेष केली आहेत. तिथले दैवत त्याने आगीच्या भक्ष्यस्थानी टाकले. पण ते काही खरे देव नव्हते. मनुष्याने केलेल्या लाकडाच्या आणि दगडाच्या मूर्ती होत्या. म्हणून तर अश्शूरच्या राजाला त्या नष्ट करता आल्या. तेव्हा परमेश्वर देवा आता आम्हास या राजापासून वाचव. म्हणजे तूच खरा परमेश्वर आहेस हे जगातील सर्व राजांना कळेल.” आमोजचा मुलगा यशया याने हिज्कीयाला निरोप पाठवला की, “इस्राएलचा परमेश्वर देव असे म्हणतो, ‘अश्शूरचा राजा सन्हेरीब याच्या विषयी तू केलेले गाऱ्हाणे मी ऐकले आहे.” “सन्हेरीबबद्दल परमेश्वराचा असा निरोप आहे. सीयोनच्या (म्हणजेच यरूशलेमच्या) कुमारी कन्येने तुला तुच्छ लेखून तुझा अपमान केला आहे. यरूशलेम कन्या तुझी पाठ वळली की तुझा उपहास करते.” पण तू कोणाचा अपमान केलास? कोणाला दुर्भाषण केलेस? तू हे कोणाविरुध्द बोललास? इस्राएलच्या पवित्र परमेश्वराविरुध्द तू गेलास. त्याच्यापेक्षा वरचढ असल्याच्या आवेशात तू असा वागलास. परमेश्वराचा अवमान करायला तू दूत पाठवलेस. तू म्हणालास, “माझे बहुसंख्य रथ घेऊन मी या उंच पर्वतावर, लबानोनाच्या अंतर्भागात आलो आहे. त्यांचे उंच गंधसरु आणि उत्तम देवदारु मी तोडीन. लबानोन मध्ये सर्वात उंचावर असलेल्या घनदाट अरण्यात मी पोचलो आहे. मी विहिरी खणल्या आणि नव्या नव्या ठिकाणांचे पाणी प्यालो. मिसरमधील नद्या सुकवून तो प्रदेश मी पादाक्रांत केला.” तू असे म्हणालास खरा, पण परमेश्वर काय म्हणाला ते तू ऐकले नाहीस काय? “पूर्वी, फार पूर्वीच मी हे सर्व योजले होते आणि आता त्याप्रमाणेच घडत आहे. मजबूत नगर उद्ध्वस्त होऊन तिथे नुसती दगडांची रास उरली आहे, हे तुझ्याहातून घडले ते माझ्यामुळेच. तेथील लोक समर्थ नव्हते. ते घाबरलेले आणि गोंधळलेले होते. शेतातले गवत आणि पीक सरसकट कापले जावे तसे ते होते. घराच्या धाब्यावरच गवत पूर्ण वाढण्याआधीच करपून जावे तशी त्यांची स्थिती होती. तू कधी स्वस्थ बसतोस, कधी लढाईवर जातोस आणि कधी घरी परततोस, तसेच माझ्याविरुध्द कधी उठतोस ते मला माहित आहे. माझ्याविरुध्द तू उठलास, तुझे उन्मत्त बोलणे मी ऐकले. तेव्हा, मी आता तुझ्या नाकात वेसण घालतो आणि तोंडात लगाम अडकवतो. मग तुला माघारे वळवून ज्या रस्त्याने आलास त्याच वाटेने तुला परत फिरवतो.” “मी तुझ्या साहाय्यासाठी येणार आहे याची खात्री पटावी म्हणून हे चिन्ह देतो. या वर्षी आपोआप धान्य उगवेल ते तुम्ही खाल. दुसऱ्या वर्षी त्याच्या बियाणातून उगवेल ते खाल. पण तिसऱ्या वर्षी मात्र तुम्ही स्वत: पेरणी कराल त्यातून धान्य काढा. द्राक्षाची लागवड करा आणि द्राक्षे खा.” यहूदाच्या घराण्यातील उरल्यासुरल्या लोकांचा वंश वाढेल. कारण काहीजण बचावतील. ते यरूशलेमेतून बाहेर पडतील. सीयोन डोंगरातून काहीजण येतील. परमेश्वराच्या तीव्र आवेशामुळे असे घडेल. “अश्शूरच्या राजाबद्दल परमेश्वर असे म्हणतो, तो या शहरात पाऊल टाकणार नाही या नगरावर तो बाण सोडणार नाही आपल्या ढाली तो येथे आणणार नाही. या शहरच्या तटबंदीवर हल्ला करण्यासाठी तो कचऱ्याचे ढीग रचणार नाही. तो आल्या वाटेने परत जाईल. या शहरात तो येणार नाही असे परमेश्वर म्हणतो. या नगराचे रक्षण करून त्यास मी वाचवीन. माझ्यासाठी आणि माझा सेवक दावीद याच्यासाठी मी हे करीन.” त्या रात्री परमेश्वराचा दूत बाहेर पडला आणि त्यांने अश्शूरांच्या छावणीतली एक लक्ष पंच्याऐंशी हजार माणसे मारली. सकाळी लोक उठून पाहतात तर सर्वत्र प्रेतांचा खच पडलेला. तेव्हा अश्शूरचा राजा सन्हेरीब निनवे येथे, जिथे तो अगोदर होता तिथे निघून गेला. एक दिवस सन्हेरीब आपले दैवत निस्रोख याच्या देवळात पूजा करत होता. तेव्हा त्याचीच मुले अद्रम्मेलेक आणि शरेसर यांनी त्यास तलवारीने मारले. मग ते अरारात देशात निघून गेले. सन्हेरीबच्या जागी त्याचा मुलगा एसरहद्दोन राज्य करु लागला.

सामायिक करा
२ राजे 19 वाचा

२ राजे 19:1-37 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

जेव्हा हिज्कीयाह राजाने हे ऐकले, तेव्हा त्याने आपली वस्त्रे फाडली आणि तो गोणपाट नेसून याहवेहच्या मंदिरात गेला. त्याने राजवाड्याचा कारभारी एल्याकीम, चिटणीस शेबना आणि वडील याजक यांना गोणपाट नेसून आमोजाचा पुत्र यशायाह संदेष्ट्याकडे पाठविले. ते त्याला म्हणाले, “हिज्कीयाह असे म्हणतो: आजचा दिवस क्लेश, शिक्षा व अपमानाचा दिवस आहे, कारण लेकरे होण्याची वेळ आली परंतु ते प्रसवण्याची शक्ती नाही. कदाचित याहवेह तुमचे परमेश्वर सेनाप्रमुखाचे सर्व शब्द ऐकतील, त्याचा स्वामी अश्शूरच्या राजाने आपल्या जिवंत परमेश्वराची निंदा करण्यास पाठविले आहे आणि हे शब्द ऐकून याहवेह तुमचे परमेश्वर त्याचा निषेध करतील. म्हणून जे थोडके उरलेले आहेत त्यांच्यासाठी प्रार्थना करा.” जेव्हा हिज्कीयाह राजाचे अधिकारी यशायाहकडे आले, यशायाह त्यांना म्हणाला, “तुमच्या धन्याला सांगा, ‘याहवेह असे म्हणतात: तुम्ही जे ऐकले आहे त्यामुळे घाबरून जाऊ नका—त्या शब्दांनी अश्शूरच्या राजाच्या सेवकांनी माझी निंदा केली आहे. ऐका! जेव्हा तो एक ठराविक अहवाल ऐकेल, तेव्हा मी त्याला त्याच्या स्वतःच्या देशात परत जाण्याची इच्छा व्हावी असे करेन आणि तिथे तो तलवारीने वधला जाईल असे मी करेन.’ ” जेव्हा सेनाप्रमुखाने ऐकले की अश्शूरच्या राजाने लाखीश सोडले आहे, तेव्हा त्याने आपला तळ उठविला आणि राजा लिब्नाह येथे युद्ध करताना त्याला आढळला. आता सन्हेरीबला बातमी मिळाली की कूशाचा राजा तिर्‍हाकाह त्याच्याशी युद्ध करण्याच्या तयारीत आहे. म्हणून त्याने पुन्हा हिज्कीयाहकडे असे सांगत दूत पाठवले: “यहूदीयाचा राजा हिज्कीयाहला हे सांगा: ‘अश्शूरच्या राजाच्या हाती यरुशलेम दिले जाणार नाही’ असे म्हणून तुम्ही ज्या देवावर अवलंबून आहात त्याला तुमची फसवणूक करू देऊ नका. अश्शूरच्या राजाने सर्व राष्ट्रांचा नाश कसा केला, हे तुम्ही ऐकलेच आहे. मग तुमची सुटका होईल काय? माझ्या पूर्वीच्या राजांनी ज्या राष्ट्रांचा; म्हणजे गोजान, हारान, रेसफ तलास्सारतील एदेन यांचा नाश केला, त्यांना त्यांच्या दैवतांनी वाचविले होते काय? हमाथ नगरीचा राजा किंवा अर्पादचा राजा हे कुठे आहेत? सफरवाईम, हेना व इव्वाह यांचे राजे कुठे आहेत?” हिज्कीयाहला दूताद्वारे पत्र मिळाले आणि त्याने ते वाचले. त्यानंतर त्याने जाऊन याहवेहच्या मंदिरात याहवेहसमोर ते उघडून ठेवले. आणि हिज्कीयाहने याहवेहला प्रार्थना केली: “अहो याहवेह इस्राएलांचे परमेश्वर, करुबांच्या सिंहासनावर आरूढ असलेल्या परमेश्वरा, पृथ्वीवरील सर्व राष्ट्रांचे तुम्ही एकमेव परमेश्वर आहात. स्वर्ग व पृथ्वी तुम्हीच उत्पन्न केली आहे. हे याहवेह, आपले कान लावा आणि ऐका; याहवेह, आपले डोळे उघडा आणि पाहा; आणि जिवंत परमेश्वराचा उपहास करण्यास पाठविलेले सन्हेरीबचे शब्द ऐका. “हे याहवेह, हे खरे आहे की अश्शूरच्या राजांनी या राष्ट्रांचा आणि त्यांच्या भूमीचा नाश केला आहे. आणि त्यांनी त्यांची दैवते अग्नीत फेकून दिली आहेत, कारण त्या मूर्ती परमेश्वर नव्हत्या. ते तर मनुष्याने घडविलेले लाकूड आणि दगड होते. आता हे याहवेह, आमच्या परमेश्वरा, त्याच्या तावडीतून आम्हाला सोडवा, म्हणजे याहवेह केवळ तुम्हीच परमेश्वर आहात, हे पृथ्वीवरील सर्व राज्यांना कळेल.” मग आमोजाचा पुत्र यशायाहने हिज्कीयाह राजाला हा संदेश पाठविला: “इस्राएलचे परमेश्वर याहवेह म्हणतात: अश्शूरचा राजा सन्हेरीबविषयीची तुझी प्रार्थना मी ऐकली आहे. त्याच्याविरुद्ध बोललेले याहवेहचे वचन हे आहे: “सीयोनाची कुमारी कन्या तुझा उपहास आणि तिरस्कार करते. यरुशलेम कन्या तुझे पलायन बघून आपले डोके हालविते. तू कोणाचा उपहास व निंदा केलीस? तू कोणाविरुद्ध उंच आवाजात बोललास व गर्विष्ठपणाने कोणाकडे नजर उचलून बघितलेस? इस्राएलाच्या पवित्र परमेश्वराविरुद्ध तू हे केलेस! तुझे दूत पाठवून तू प्रभूची चेष्टा केली. आणि तू म्हणतोस, ‘मी माझ्या अनेक रथांनी उंचच उंच पर्वतावर चढून गेलो, लबानोनच्या सर्वात उंच पर्वतावर गेलो. मी तिचे सर्वात उंच देवदारू तोडले, निवडक गंधसरू तोडले. मी तिच्या दुर्गम भागात पोहोचलो तिच्या अत्यंत उत्तम जंगलात गेलो. अनेक परकीय देशात मी विहिरी खणल्या आणि तेथील पाणी प्यालो. माझ्या पावलाच्या तळव्याने मी मिसरचे सर्व झरे आटवून टाकले.’ ” “ ‘हे तू ऐकले नव्हते काय? याचा निश्चय मी फार पूर्वीच केलेला होता. या घटना मी प्राचीन काळातच योजून ठेवल्या होत्या; आता मी त्या अंमलात आणल्या आहेत, जी तटबंदीची शहरे तू उद्ध्वस्त करून त्यांचा दगडांचा ढिगारा केलास. त्यांच्या लोकांची शक्ती कमी होत गेली, ते निराश व लज्जित झालेले आहेत. ते शेतातील पिकासारखे, कोवळी पाने आलेल्या रोपासारखे, छतावर उगविलेल्या गवतासारखे, पूर्ण वाढण्याआधीच उन्हाने करपून गेलेले होते. “ ‘परंतु मी जाणतो तू कुठे आहेस तू कधी जातो व येतो आणि तू माझ्यावर कसा संतापतोस. कारण तू माझ्यावर संतापतो व तुझा उन्मत्तपणा माझ्या कानावर आल्यामुळे, मी तुझ्या नाकात वेसण अडकवेन व तुझ्या तोंडात लगाम घालेन आणि मग तू आलास त्याच वाटेने तुझ्याच देशात तुला परत नेईन.’ “हिज्कीयाह, तुझ्यासाठी हे चिन्ह असेल: “या वर्षी तुम्ही आपोआप उगविलेले धान्य खाल, तरी पुढील वर्षी त्यातूनच उगविलेले खाल. परंतु तिसऱ्या वर्षी पेरणी व कापणी कराल, द्राक्षमळे लावाल व त्याची फळे खाल. पुन्हा एकदा यहूदीया राज्यातील अवशिष्ट लोक जमिनीत रुजाल आणि फलद्रृप व्हाल. यरुशलेममधून अवशिष्ट लोक येतील, सीयोन पर्वतातून वाचलेल्याची टोळी येईल. सर्वसमर्थ याहवेहच्या आवेशाने हे सर्व घडून येईल. “म्हणून अश्शूरच्या राजाविषयी याहवेह असे म्हणतात: “ ‘तो या शहरात प्रवेश करणार नाही किंवा एखादा बाणही सोडणार नाही. तो या ठिकाणी ढाल घेऊन येणार नाही किंवा तटबंदीबाहेर मोर्चे बांधणार नाही. ज्या रस्त्याने तो आला, त्याच रस्त्याने तो परत जाईल; तो या शहरात प्रवेश करणार नाही, असे याहवेह घोषित करतात. माझ्याकरिता आणि माझा सेवक दावीदाच्या स्मरणार्थ, मी या यरुशलेम नगराचे रक्षण करेन!’ ” त्या रात्री याहवेहच्या दूताने अश्शूर सैनिकांच्या छावणीत एक लक्ष पंचाऐंशी हजार सैनिक ठार केले. दुसर्‍या दिवशी सकाळी लोक उठून पाहतात—तर त्यांच्या सर्व बाजूला प्रेते पसरलेली होती. म्हणून अश्शूरचा राजा सन्हेरीबने छावणी उठविली व तो माघारी परतला. तो निनवेहला परत गेला व तिथेच राहिला. एके दिवशी, तो निस्रोख या त्याच्या दैवताच्या मंदिरात पूजा करीत असताना, त्याचे पुत्र अद्राम्मेलेक व शरेसर यांनी तलवारीने त्याचा वध केला व ते अरारात देशात पळून गेले. नंतर त्याचा वारस म्हणून त्याचा पुत्र एसरहद्दोन राजा झाला.

सामायिक करा
२ राजे 19 वाचा

२ राजे 19:1-37 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

हे ऐकून हिज्कीयाने आपली वस्त्रे फाडली व गोणपाट नेसून तो परमेश्वराच्या मंदिरात गेला. तेव्हा खानगी कारभारी एल्याकीम, चिटणीस शेबना व याजकांपैकी वृद्ध लोक ह्यांना गोणपाट नेसलेले असे आमोजाचा पुत्र यशया संदेष्टा ह्याच्याकडे त्याने पाठवले. ते जाऊन त्याला म्हणाले, “हिज्कीया असे म्हणतो की आजचा दिवस क्लेश, शिक्षा व अपमान ह्यांचा आहे, कारण मुले जन्मायला आली पण प्रसवण्याची शक्ती नाही. जिवंत देवाचा उपमर्द करण्यासाठी अश्शूराच्या राजाने रब-शाके ह्याच्याबरोबर जो निरोप पाठवला त्याचे शब्द आपला देव परमेश्वर कदाचित ऐकेल, व आपला देव परमेश्वर ते शब्द ऐकून त्याला शिक्षा करील, म्हणून जे काही शेष उरले आहे त्यासाठी आपण रदबदली करा.” ह्याप्रमाणे हिज्कीया राजाचे सेवक यशया ह्याच्याकडे आले. तेव्हा यशया त्यांना म्हणाला, “आपल्या धन्याला असे सांगा, परमेश्वर म्हणतो, ‘अश्शूराच्या राजाच्या सेवकांनी ज्या शब्दांनी माझा उपमर्द केला आहे ते शब्द तू ऐकले आहेत; त्यांनी तू घाबरू नकोस. पाहा, मी त्याच्या ठायी अशी काही प्रेरणा करीन की तो काही अफवा ऐकून आपल्या देशाला परत जाईल व त्याच्याच देशात तो तलवारीने पडेल असे मी करीन.”’ नंतर रब-शाके परत गेला तेव्हा अश्शूरचा राजा लिब्ना नगराशी लढताना त्याला आढळला; कारण लाखीशाहून त्याने तळ उठवला अशी त्याला खबर लागली होती. मग “कूशाचा राजा तिर्‍हाका तुझ्याशी लढायला निघाला आहे” असे कोणी बोलताना त्याने ऐकले; हे ऐकून त्याने हिज्कीयाला जासुदांच्या हाती सांगून पाठवले की, “तुम्ही हिज्कीया राजाकडे जाऊन सांगा, ज्या तुझ्या देवावर तू भिस्त ठेवतोस तो, ‘अश्शूराच्या राजाच्या हाती यरुशलेम लागणार नाही, असे बोलून तुला न फसवो. अश्शूराच्या राजांनी सर्व देशांचे काय केले ते पाहा; त्यांचा विध्वंस कसा केला हे तू ऐकले आहेच; तर तू सुटणार काय? गोजान, हारान, रेसफ व तलस्सार येथे राहणारे एदेनी लोक ह्यांचा माझ्या वाडवडिलांनी विध्वंस केला, त्यांचा त्या राष्ट्रांच्या देवांनी बचाव केला काय? हमाथाचा राजा, अर्पादाचा राजा, आणि सफरवाईम, हेना व इव्वा ह्यांचे राजे हे कोठे आहेत?”’ हिज्कीयाने जासुदांच्या हातून हे पत्र घेऊन वाचले; मग हिज्कीया परमेश्वराच्या मंदिरात गेला आणि ते त्याने परमेश्वरापुढे उघडून ठेवले. हिज्कीयाने परमेश्वराची प्रार्थना केली की, “हे परमेश्वरा, इस्राएलाच्या देवा, करूबारूढ असलेल्या देवा, तूच काय तो पृथ्वीवरील सर्व राज्यांचा देव आहेस; तूच आकाश व पृथ्वी ही निर्माण केली. हे परमेश्वरा, कान लावून ऐक; हे परमेश्वरा, तू डोळे उघडून पाहा आणि सन्हेरिबाने तुझा म्हणजे जिवंत देवाचा उपमर्द करण्यासाठी जो निरोप पाठवला आहे त्याचे शब्द ऐक. हे परमेश्वरा, खरोखर अश्शूराच्या राजांनी सर्व राष्ट्रे व त्यांच्या जमिनी ओसाड केल्या आहेत; त्यांचे देव त्यांनी अग्नीत टाकले आहेत; कारण ते देव नव्हते, ते माणसांच्या हातांनी घडलेले काष्ठ व पाषाण होते म्हणून त्यांनी त्यांचा नाश केला. आता परमेश्वरा, आमच्या देवा, त्याच्या हातातून आम्हांला सोडव, म्हणजे पृथ्वीवरील सर्व राष्ट्रे जाणतील की तूच काय तो परमेश्वर देव आहेस.” तेव्हा आमोजाचा पुत्र यशया ह्याने हिज्कीयाला सांगून पाठवले की, “परमेश्वर इस्राएलाचा देव असे म्हणतो, अश्शूरचा राजा सन्हेरीब ह्याच्याविषयी तू माझी प्रार्थना केलीस ती मी ऐकली आहे. तर त्याच्याविषयी परमेश्वर जे वचन बोलला आहे ते हे : सीयोनाची कुमारी तुला तुच्छ लेखते व तुझा उपहास करते; यरुशलेमेची कन्या तुला पाठमोरे पाहून, आपले मस्तक हालवते. तू कोणाची निंदा केलीस? कोणाच्या विरुद्ध दुर्भाषण केलेस? कोणाच्या विरुद्ध ताठ्याने बोललास? कोणावर आपल्या भुवया चढवल्या? इस्राएलाचा जो पवित्र त्यावर! तू आपल्या जासुदांच्या द्वारे प्रभूची निंदा करून म्हणालास, ‘मी आपल्या बहुत रथांनिशी पर्वतांच्या माथ्यावर लबानोनाच्या अगदी मध्यापर्यंत चढून आलो आहे; मी त्याचे उंच गंधसरू व निवडक देवदारू तोडीन; त्याच्या अत्यंत दूरच्या उच्च स्थानी त्याच्या फळझाडांच्या राईत प्रवेश करीन. मी खणून परस्थलांचे पाणी प्यालो; माझ्या पायांच्या तळव्यांनी मिसर देशाचे सर्व जलप्रवाह मी सुकवून टाकीन.’ तुझ्या कानावर हे आले नाही काय की मी पूर्वी प्राचीन काळी योजले असून आता प्रत्ययास आणले की तटबंदी नगरांचा विध्वंस करून त्यांचे ढीग करण्यात यावेत? ह्यासाठी त्यांतील रहिवासी बलहीन झाले, ते भयभीत व फजीत झाले; शेतातील हिरवे गवत, धाब्यांवरचे गवत, वाढ पुरी होण्यापूर्वी करपलेले धान्य ह्यांसारखे ते झाले. तुझे बसणेउठणे, तुझे जाणेयेणे व तुझा माझ्यावरचा संताप मला ठाऊक आहे. माझ्यावरच्या तुझ्या संतापामुळे व माझ्या कानावर आलेल्या तुझ्या उन्मत्तपणामुळे मी तुझ्या नाकात वेसण व तुझ्या तोंडात लगाम घालून ज्या वाटेने तू आलास तिनेच तुला परत लावीन. आता तुला हे चिन्ह देतो : यंदा तुम्ही आपोआप उगवलेले खाल; पुढल्या वर्षी त्याचा खोंडवा फुटेल तो खाल; तिसर्‍या वर्षी तुम्ही पेरा, कापा, द्राक्षांचे मळे लावा व त्यांचे फळ खा. यहूदा वंशातील निभावलेला शेष पुन्हा खाली मूळ धरील आणि वर फळ देईल. कारण यरुशलेमेतून शेष निघेल व सीयोन डोंगरातून निभावलेले निघतील. परमेश्वराची आस्था हे सिद्धीस नेईल. ह्यासाठी अश्शूराच्या राजाविषयी परमेश्वर म्हणतो की तो ह्या नगरात प्रवेश करणार नाही, त्यावर एकही बाण सोडणार नाही; तो ढाल घेऊन त्याच्याशी सामना करणार नाही आणि त्यावर मोर्चा लावणार नाही. ज्या वाटेने तो आला तिनेच तो परत जाईल; त्याचा ह्या नगरात प्रवेश होणार नाही, असे परमेश्वर म्हणतो. मी आपल्यासाठी व माझा सेवक दावीद ह्याच्यासाठी ह्या नगराचा उद्धार होईल असे ह्याचे संरक्षण करीन.” त्या रात्री असे झाले की परमेश्वराच्या देवदूताने जाऊन अश्शूरी गोटातले एक लक्ष पंचाऐंशी हजार लोक मारले; पहाटेस लोक उठून पाहतात तर सर्व प्रेतेच प्रेते! मग अश्शूराचा राजा सन्हेरीब तळ उठवून माघारा चालता झाला आणि निनवेत जाऊन राहिला. तेथे तो आपला देव निस्रोख ह्याच्या देवळात जाऊन पूजा करत असता त्याचे मुलगे अद्रम्मेलेक व शरेसर ह्यांनी त्याचा तलवारीने वध केला आणि ते अराराट देशात पळून गेले; मग एसर-हद्दोन त्याच्या जागी राजा झाला.

सामायिक करा
२ राजे 19 वाचा