२ करिंथ 6:1-13
२ करिंथ 6:1-13 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
म्हणून त्याच्याबरोबर काम करणारे आम्हीदेखील तुम्हास अशी विनंती करतो की, तुम्ही देवाच्या कृपेचा स्वीकार व्यर्थ होऊ देऊ नका. कारण तो म्हणतो, ‘मी अनुकूल समयी तुझे ऐकले, आणि तारणाच्या दिवशी तुझे सहाय्य केले.’ पाहा, आता अनुकूल समय आहे, पाहा, आता तारणाचा दिवस आहे. या सेवेला दोष लावला जाऊ नये म्हणून आम्ही, कशात कोणाला, अडखळण्यास कारण होत नाही. उलट सर्व स्थितीत देवाचे सेवक म्हणून, आम्ही आमच्याविषयीची खातरी पटवून देतो; आम्ही पुष्कळ सोशिकपणाने संकटात, आपत्तीत व दुःखात; फटक्यांत, बंदिवासांत व दंगलीत; कष्टांत, जागरणांत व उपासांत; शुद्धतेने व ज्ञानाने, सहनशीलतेने व ममतेने, पवित्र आत्म्याने व निष्कपट प्रीतीने; खरेपणाच्या वचनाने व देवाच्या सामर्थ्याने, उजव्या हातात व डाव्या हातात नीतिमत्त्वाची शस्त्रे बाळगून, गौरवाने व अपमानाने, अपकीर्तीने व सत्कीर्तीने, आम्ही आपली लायकी पटवून देतो. आमच्याविषयी खातरी पटवतो. फसव्या आणि तरी खरे आहोत, अपरिचित आहोत आणि सुपरीचित आहोत, मरत आहोत आणि बघा, आम्ही जिवंत आहोत. जणू शिक्षा भोगीत होतो आणि तरी मरण पावलो नाही. आम्ही दुःखीत, तरी सदोदित आनंद करणारे, आम्ही दरिद्री, तरी पुष्कळांना धनवान करणारे, आमच्याजवळ काही नसलेले आणि तरी सर्व असलेले असे आढळतो. अहो करिंथकर बंधूंनो, तुमच्यासाठी आम्ही तोंड उघडले आहे आणि आमचे अंतःकरण मोठे झाले आहे. आमच्यात तुम्ही संकुचित झाला नाही, पण तुम्ही स्वतःच्या कळवळ्याविषयी संकुचित झाला आहात. आता तुम्हीही असलीच फेड करून तुमचेही अंतःकरण मोठे करा. हे मी तुम्हास मुले म्हणून सांगतो.
२ करिंथ 6:1-13 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
परमेश्वराचे सहकारी या नात्याने आम्ही तुम्हाला विनवितो की परमेश्वराची कृपा व्यर्थ होऊ देऊ नका. कारण ते म्हणतात, “माझ्या कृपेच्या समयी तुमची विनवणी माझ्या कानी आली. तारणाच्या दिवशी, मी तुम्हाला साहाय्य केले.” मी तुम्हाला सांगतो, आताच परमेश्वराच्या कृपेचा समय आहे आणि आजच तारणाचा दिवस आहे. आम्ही कोणाच्याही मार्गात अडखळण होत नाही, जेणेकरून आम्ही करीत असलेली सेवा दोषी ठरविली जाऊ नये. आम्ही परमेश्वराचे सेवक या नात्याने सर्वप्रकारे आमची योग्यता पटवून देण्याचा प्रयत्न करतो: मोठ्या धैर्याने, दुःख, ओझे व संकटे आम्ही सहन करतो. आम्हाला मारहाण, तुरुंग, दंगल, कष्ट, जागरणे आणि उपवास; शुद्धतेने, बुद्धीने, धीराने आणि दयेने; पवित्र आत्म्याने आणि खर्या प्रीतीने भरलेले; सत्याचे भाषण, आणि परमेश्वराचे सामर्थ्य; उजव्या आणि डाव्या हातात नीतिमत्वाची शस्त्रे धारण करून करीत असतो. गौरव आणि अपमान, वाईट अहवाल आणि चांगला अहवाल; प्रामाणिक परंतु लबाड समजण्यात आलेले; प्रसिद्ध तरी अप्रसिद्ध, मृत्यूच्या समीप परंतु जिवंत; घायाळ केलेले परंतु मृत्यूपासून राखलेले व्यथित परंतु सतत आनंदित; गरीब परंतु इतरांना धनवान बनविणारे; मालकीचे काहीही नाही आणि तरी सर्वकाही असल्यासारखे असे आहोत. करिंथकरांनो आम्ही तुमच्यापासून काहीच न लपविता आमचे हृदय तुमच्यासमोर मोकळे केले आहे. आमची प्रीती तोकडी नाही पण तुमची प्रीतीच संकुचित आहे. तुम्ही माझी स्वतःची मुले आहात असे समजून मी बोलत आहे. तुमची अंतःकरणेसुद्धा संपूर्णपणे उघडी करा.
२ करिंथ 6:1-13 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
आम्ही त्याच्यासह कार्य करता करता विनंती करतो की, तुम्ही देवाच्या कृपेचा स्वीकार व्यर्थ होऊ देऊ नये; (कारण तो म्हणतो : “अनुकूल समयी मी तुझे ऐकले, व तारणाच्या दिवशी मी तुला साहाय्य केले.” पाहा, आताच ‘समय अनुकूल आहे;’ पाहा, आताच ‘तारणाचा दिवस’ आहे.) आम्ही करत असलेल्या सेवेत काही दोष दिसून येऊ नये म्हणून आम्ही कोणत्याही प्रकारे अडखळण्यास कारण होत नाही; तर सर्व गोष्टींत देवाचे सेवक म्हणून आम्ही आपली लायकी पटवून देतो; फार धीराने, संकटांत, विपत्तींत, पेचप्रसगांत, फटके खाण्यात, बंदिवासांत, दंग्याधोप्यांत, काबाडकष्टांत, जागरणांत, उपवासांत; तसेच शुद्धतेने, ज्ञानाने, सहनशीलतेने, ममतेने; पवित्र आत्म्याने, निष्कपट प्रीतीने, सत्याच्या वचनाने, देवाच्या सामर्थ्याने; आणि उजव्या व डाव्या हातातील नीतिमत्त्वाच्या शस्त्रास्त्रांनी, गौरवाने व अपमानाने, अपकीर्तीने व सत्कीर्तीने, आम्ही आपली लायकी पटवून देतो; फसवणारे मानलेले तरी आम्ही खरे; अप्रसिद्ध मानलेले तरी सुप्रसिद्ध; ‘मरणोन्मुख’ असे मानलेले तरी पाहा, ‘आम्ही जिवंत आहोत;’ ‘शिक्षा भोगणारे’ असे मानलेले ‘तरी जिवे मारलेले नाही;’ दु:खी मानलेले तरी सर्वदा आनंद करणारे; दरिद्री मानलेले तरी पुष्कळांना सधन करणारे; कफल्लक असे मानलेले तरी सर्ववस्तुसंपन्न, अशी आम्ही आपली लायकी पटवून देतो. अहो करिंथकरांनो, तुमच्याबरोबर बोलण्यास आमचे तोंड मोकळे झाले आहे, आमचे ‘अंत:करण विशाल झाले आहे.’ संकुचित अंत:करणाविषयी म्हणाल तर, तुमचीच अंत:करणे संकुचित आहेत; आमची नाहीत. तेव्हा तुम्हांला आपली मुले समजून मी असे सांगतो की, तुम्हीही आमची परतफेड करण्यासाठी आपली अंत:करणे तशीच विशाल करा.
२ करिंथ 6:1-13 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
आम्ही देवाबरोबर कार्य करीत असता विनंती करतो की, तुम्ही केलेला त्याच्या कृपेचा स्वीकार व्यर्थ जाऊ देऊ नका. कारण तो म्हणतो: ‘योग्य समयी मी तुझे ऐकले व तारणाच्या दिवशी मी तुला साहाय्य केले. पाहा, उचित समय आत्ताच आहे. पाहा, आता तारणाचा दिवस आहे!’ आम्ही करत असलेल्या सेवाकार्यात काही दोष दिसून येऊ नयेत म्हणून आम्ही कोणत्याही प्रकारे दुसऱ्यांच्या मार्गात अडथळे निर्माण करत नाही. उलट, सर्व गोष्टींत देवाचे सेवक म्हणून आम्ही आपली पात्रता पटवून देतो. फार धीराने, यातना, विपत्ती, पेचप्रसंग, मार खाण्यात, तुरुंगवासात, दंग्याधोप्यांत, काबाडकष्टात, निद्राहीनतेत, उपासमारीत तसेच शुद्धतेने, ज्ञानाने, धीराने, चांगुलपणात, पवित्र वृत्तीने, खऱ्या प्रीतीने, सत्यसंभाषणाने, देवाच्या सामर्थ्याने आणि ह्रा व संरक्षण करणाऱ्या नीतिमत्वाच्या शस्त्रास्त्रांनी, मान, अपमान व अपकीर्तीने, आम्ही आमची पात्रता पटवून देतो. आम्हाला फसविणारे म्हणून गणण्यात येते तरी आम्ही खरे आहोत. अज्ञात असलो तरी सुप्रसिद्ध, मरणोन्मुख असलो तरी पाहा, आम्ही जिवंत आहोत. शिक्षा भोगणारे असे मानलेले तरी ठार मारलेले नाही. दुःखी असलो तरी सर्वदा आनंद करणारे, गरीब असलो तरी पुष्कळांना सधन करणारे. कफल्लक असलो, तरी सर्ववस्तुसंपन्न, अशी आम्ही आमची पात्रता पटवून देतो. अहो, करिंथकरांनो, तुमच्याबरोबर आम्ही अगदी प्रांजळपणे बोलत आहोत. आमचे अंतःकरण एकदम खुले आहे. आमच्या प्रीतीत संकुचितपणा नाही. तुमच्यात मात्र आहे. तुम्हांला आपली मुले समजून मी असे सांगतो की, तुम्हीही आमची परतफेड करण्यासाठी तुमची अंतःकरणे आमच्या अंतःकरणासारखी एकदम खुली करा.