YouVersion लोगो
सर्च आयकॉन

२ करिंथ 10:1-15

२ करिंथ 10:1-15 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

पण जो मी, पौल, तुमच्याबरोबर असताना तुमच्याशी लीनपणे वागतो पण दूर असताना तुमच्याबरोबर कडकपणे वागतो. तो मी तुम्हास ख्रिस्ताच्या सौम्यतेने व नम्रतेने विनंती करतो. माझे मागणे असे आहे, आम्ही देहाला अनुसरून चालतो असा आमच्याविषयी जे विचार करतात, त्यांच्याबरोबर कडकपणे बोलण्याचा मी ज्या विश्वासाने विचार करीत आहे त्याप्रमाणे मला त्यांच्याविरुद्ध कडक होण्याची गरज पडू नये. कारण, आम्ही देहात चालणारे असूनही आम्ही देहस्वभावाप्रमाणे युद्ध करत नसतो. कारण आमच्या लढाईची शस्त्रे दैहिक नाहीत, तर देवासाठी तटबंदी नाश करण्यास ती समर्थ आहेत. चुकीच्या वादविवादातून काहीच निष्पन्न होत नाही. तर्कवितर्क व देवविषयक ज्ञानाविरूद्ध उंच उभारलेले असे सर्वकाही पाडून टाकून आम्ही प्रत्येक विचार अंकित करून तिला ख्रिस्ता पुढे मान झुकवण्यास लावतो. आणि तुम्ही आज्ञापालनांत पूर्ण व्हाल तेव्हा सर्व आज्ञाभंगाबद्दल शासन करण्यास आम्ही सिद्ध आहोत. डोळ्यांपुढे आहे ते पाहा; आपण ख्रिस्ताचे आहोत असा जर कोणाला स्वतःविषयी विश्वास असेल तर त्याने आमच्याविषयी स्वतःशी विचार करावा की, जसे आपण ख्रिस्ताचे आहोत तसे तेही ख्रिस्ताचे आहोत. कारण, प्रभूने आम्हास जो अधिकार दिलेला आहे, तो तुमची उन्नती व्हावी म्हणून दिलेला आहे, तुमचा नाश करण्यास दिलेला नाही, त्याचा मी अधिक अभिमान मिरवल्यास मला लाज वाटणार नाही; म्हणजे मी पत्रांद्वारे भीती घालू पाहतो असे माझ्याविषयी कोणास वाटू नये. कारण ते म्हणतात की, “त्यांची पत्रे गंभीर व जोरदार असतात, पण तो शरीराने अशक्त आहे आणि त्याचे बोलणे ऐकण्याच्या लायकीचे नसते.” अशा लोकांनी हे समजून घ्यावे की, आम्ही जसे दूर असताना आमच्या पत्रांतील बोलण्यात असतो, तसे आम्ही जवळ असताना कृतीत असतो. जे कित्येक स्वतःची प्रशंसा करतात, त्यांच्याबरोबर आम्ही आपणांस समजायला किंवा त्यांच्याशी आपली तुलना करायचे धाडस करीत नाही, ते तर स्वतःस स्वतःकडूनच मोजत असता व स्वतःची स्वतःबरोबरच तुलना करीत असतात हा शहाणपणा नाही. आम्ही आमच्या मर्यादेबाहेर अभिमान मिरवणार नाही; तर देवाने आम्हास लावून दिलेल्या आमच्या मर्यादेच्या आतच मिरवू, ती मर्यादा तुमच्यापर्यंत येऊन पोहोचली आहे. कारण जणू आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचलो नव्हतो, अशाप्रकारे आम्ही मर्यादेबाहेर जात नाही कारण आम्ही ख्रिस्ताचे शुभवर्तमान गाजवीत तुमच्यापर्यंत प्रथम पोहचलोच आहोत. आम्ही मर्यादा सोडून दुसर्‍यांच्या कामात अभिमान मिरवीत नाही; पण आम्हास आशा आहे की, जसा तुमचा विश्वास वाढेल तसा, आमच्या कामाच्या मर्यादेचे प्रमाण अधिक पसरत जाईल.

सामायिक करा
२ करिंथ 10 वाचा

२ करिंथ 10:1-15 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

ख्रिस्ताच्या सौम्यतेने व नम्रपणाने मी तुम्हाला विनंती करतो की तुमच्यापैकी काहीजण म्हणतात की मी पौल, तुमच्यासमोर असताना “भित्रा” व तुमच्यापासून दूर असलो म्हणजे “धीटपणे” वागतो. मी तुम्हाला विनंती करतो की मी तिथे आलो की ज्याकाही लोकांना वाटते की आमची जीवनशैली ऐहिक आहे, त्यांच्याविरुद्ध कठोर होण्याची गरज भासणार नाही, अशी माझी आशा आहे. आम्ही या जगामध्ये राहतो तरीपण ऐहिक लोक जसे युद्ध करतात तसे आम्ही करीत नाही. जी शस्त्रे युद्धासाठी आम्ही वापरतो ती दैहिक नाहीत याउलट त्यात किल्ले उद्ध्वस्त करण्याचे दैवी सामर्थ्य आहे. आम्ही वाद व परमेश्वराच्या ज्ञानाविरुद्ध उंच उभारलेले सर्वकाही पाडून टाकतो आणि प्रत्येक विचाराला बंदिस्त करून ख्रिस्ताच्या आज्ञेखाली स्वाधीन करतो. तुमचे आज्ञापालन पूर्ण झाल्यावर, जे आज्ञा न पाळणारे आहेत आम्ही त्यांना दंड करण्यास तयार आहोत. तुम्ही बाहेरील रूप पाहून न्याय करता. जर कोणाला असा भरवसा असेल की ते ख्रिस्ताचे आहेत, तर त्यांनी याबद्दल पुन्हा विचार करावा की जसे आम्ही ख्रिस्ताचे आहोत तसे तेही आहेत. हा अधिकार प्रभूने तुम्हाला खाली पाडून टाकण्यासाठी नव्हे, तर तुम्हाला विकसित करण्यासाठी आम्हाला दिला आहे, आणि जरी मी त्याविषयी थोडाफार अभिमान दाखविला, तरी मला त्याची लाज वाटणार नाही. तुम्हाला असा भास होऊ नये की घाबरून सोडण्याच्या उद्देशाने मी पत्रे लिहित आहे. काहीजण म्हणतात, “त्याची पत्रे वजनदार व प्रभावी आहेत परंतु व्यक्ती म्हणून त्याचा प्रभाव पडत नाही आणि त्याच्या भाषणात काही तथ्य नाही.” अशा लोकांना हे समजावे की आम्ही अनुपस्थितीत असताना आमच्या पत्राद्वारे जे काही आम्ही आहोत, तेच उपस्थित असताना आमच्या कृतीद्वारे आहोत. जे स्वतःची प्रशंसा करतात, त्यांच्याशी तुलना करण्याचे धैर्य आम्ही करीत नाही. ते स्वतःचे आपसात मोजमाप करतात व आपसातच तुलना करतात, ते शहाणे नाहीत. आम्ही मर्यादेच्या बाहेर प्रौढी मिरविणार नाही, तर जी सेवा परमेश्वराने आम्हास नेमून दिली आहे व जी मर्यादा परमेश्वराने आम्हास लावून दिली आहे, त्या मर्यादेतच आम्ही प्रौढी मिरवू आणि त्यात तुमचाही समावेश आहे. ख्रिस्ताविषयीची शुभवार्ता तुमच्याकडे पोहोचविणारे आम्हीच पहिले होतो. म्हणून अधिक प्रौढी मिरवून मर्यादेचे उल्लंघन करीत नाही, जर आम्ही तुमच्यापर्यंत येऊ शकलो नसतो तर आम्ही मर्यादेचे उल्लंघन करीत आहोत हे बोलणे ठीक असते. जे कार्य दुसर्‍यांनी केले आहे त्याबद्दल आम्ही मर्यादा सोडून अभिमान बाळगत नाही. तुमचा विश्वास जसजसा वाढत जाईल तसेच आमच्या कार्याचे क्षेत्र तुम्हामध्ये खूप वाढावे, अशी आमची आशा आहे.

सामायिक करा
२ करिंथ 10 वाचा

२ करिंथ 10:1-15 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

मी पौल तुमच्याबरोबर असताना तुमच्याशी लीनपणे वागतो, परंतु दूर असताना तुमच्याशी कडकपणे वागतो, तो मी ख्रिस्ताच्या सौम्यतेने व नम्रतेने तुम्हांला विनंती करतो; माझे मागणे असे आहे : आम्ही देहस्वभावाने चालणारे आहोत असे कित्येक लोक मानतात; असे लोक माझ्यासमोर आल्यावर त्यांच्याशी कडकपणे बोलावेसे मला वाटण्याचा संभव आहे. तेव्हा कडकपणाने बोलण्याचा माझ्यावर प्रसंग आणू नये. कारण आम्ही देहात चालणारे असूनही आम्ही देहस्वभावाप्रमाणे युद्ध करत नसतो. कारण आमच्या युद्धाची शस्त्रे दैहिक नाहीत, तर तटबंदी जमीनदोस्त करण्यास ती देवाच्या दृष्टीने समर्थ आहेत. तर्कवितर्क व देवविषयक ज्ञानाविरुद्ध उंच उभारलेले असे सर्वकाही पाडून टाकून आम्ही प्रत्येक कल्पना अंकित करून तिला ख्रिस्तापुढे मान वाकवण्यास लावतो; आणि तुम्ही आज्ञापालनात पूर्ण व्हाल तेव्हा सर्व आज्ञाभंगाबद्दल शासन करण्यास आम्ही सिद्ध आहोत. तुमच्या डोळ्यांपुढे आहे ते तुम्ही पाहता. आपण ख्रिस्ताचे आहोत असा जर कोणाला स्वत:विषयी भरवसा असेल तर त्याने पुन्हा आमच्याविषयी स्वत:शी विचार करावा की, जसे आपण ख्रिस्ताचे आहोत तसे तेही ख्रिस्ताचे आहेत. आमचा तो अधिकार प्रभूने तुमच्या नाशासाठी नव्हे तर उन्नतीसाठी आम्हांला दिला, त्याविषयी मी काहीशी विशेष प्रौढी मिरवली तरी मला संकोच वाटणार नाही; असे की, मी तुम्हांला पत्राद्वारे भीती घालणारा आहे असा भास होऊ नये. कारण ते म्हणतात, “त्याची पत्रे वजनदार व जोरदार आहेत; परंतु त्याची शरीरयष्टी दुर्बळ व त्याचे भाषण टाकाऊ आहे.” अशा माणसाने हे लक्षात ठेवावे की, आम्ही दूर असताना पत्रात जसे आमचे शब्द असतात तसेच आम्ही जवळ असताना आमची कृतीही असते. कारण जे कित्येक स्वतःची प्रशंसा करतात त्यांच्यामध्ये आपली गणना करण्याचे अथवा त्यांच्याशी तुलना करण्याचे धाडस आम्ही करत नाही; ते तर स्वतःच स्वत:शी आपले मोजमाप करतात व स्वत:ची स्वत:बरोबर तुलना करतात; हा शहाणपणा नाही. आम्ही प्रतिष्ठा मिरवली तर ती आपल्या मर्यादेबाहेर न मिरवता देवाने आम्हांला लावून दिलेल्या मर्यादेच्या आतच मिरवू, ती मर्यादा तुमच्यापर्यंत येऊन पोहचली आहे. कारण तुमच्यापर्यंत संबंध पोहचत नसल्यासारखे आम्ही मर्यादेचे अतिक्रमण करत नाही; कारण ख्रिस्ताची सुवार्ता घेऊन पहिल्याने आम्ही तुमच्यापर्यंत पोहचलोच आहोत. आम्ही मर्यादा सोडून म्हणजे दुसर्‍यांच्या श्रमासंबंधाने प्रतिष्ठा मिरवत नाही; तर तुमचा विश्वास वाढत जाईल तसतसे आमच्या मर्यादेचे क्षेत्र तुमच्यामध्ये अधिकाधिक वाढत जाईल अशी आम्हांला आशा आहे

सामायिक करा
२ करिंथ 10 वाचा

२ करिंथ 10:1-15 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)

मी पौल तुमच्यासमोर असताना तुमच्याशी लीनपणे व सौम्यतेने वागतो, परंतु दूर असताना तुमच्याशी कठोरपणे वागतो, असे म्हटले जाते. मी ख्रिस्ताच्या सौम्यतेने व नम्रतेने तुम्हांला विनंती करतो. माझे मागणे असे आहे: आम्ही देहस्वभावाने चालणारे आहोत, असे कित्येक लोक मानतात. असे लोक माझ्यासमोर आल्यावर त्यांच्याशी मला कडकपणे बोलावेसे वाटण्याचा संभव आहे. तेव्हा कडकपणाने बोलण्याचा प्रसंग माझ्यावर आणू नये. कारण आम्ही देहात चालणारे असूनही आम्ही देहस्वभावाप्रमाणे युद्ध करत नसतो. आमच्या युद्धाची शस्त्रे दैहिक नाहीत, तर देवाच्या सामर्थ्यशाली शस्त्रांनी तटबंदी जमीनदोस्त करण्यास आम्ही समर्थ आहोत. तर्कवितर्क व देवविषयक ज्ञानाविरुद्ध उंच उभारलेले सर्व अडसर पाडून टाकून प्रत्येक कल्पना बंदिस्त करून तिला ख्रिस्तापुढे मान वाकविण्यास लावतो आणि तुम्ही आज्ञापालनात पूर्ण व्हाल, तेव्हा सर्व आज्ञाभंगाबद्दल शासन करावयास आम्ही सिद्ध असू. तुम्ही बाह्य स्वरूप तेवढे पाहता. आपण ख्रिस्ताचे आहोत, असा जर कोणाला स्वतःविषयी भरवसा असेल, तर त्याने पुन्हा आमच्याविषयी स्वतःशी विचार करावा की, जसे आपण ख्रिस्ताचे आहोत तसे तेही ख्रिस्ताचे आहेत. आमचा अधिकार प्रभूने तुमच्या नाशासाठी नव्हे तर उन्नतीसाठी आम्हांला दिला आहे, ह्याविषयी मी काहीशी जास्तच प्रौढी मिरवली आहे, तरी मला संकोच वाटत नाही. मी तुम्हांला पत्रांद्वारे भयभीत करून सोडतो, असे मला दाखवायचे नाही. कुणी म्हणेल, पौलाची पत्रे गंभीर व कडक आहेत. परंतु तो प्रत्यक्ष आमच्याबरोबर असताना दुर्बल असतो व त्याचे भाषण तिरस्करणीय असते. अशा माणसाने हे लक्षात ठेवावे की, आम्ही दूर असताना जे काही पत्रात लिहितो तेच आम्ही जवळ असताना करीत असतो. जे कित्येक स्वतःची प्रशंसा करतात, त्यांच्यामध्ये आपली गणना करण्याचे अथवा त्यांच्याशी तुलना करण्याचे धाडस आम्ही करत नाही. ते तर स्वतःच स्वतःचे मोजमाप करतात व आपसांत एकमेकांशी तुलना करतात. हे सुबुद्धपणाचे नाही. आम्ही प्रतिष्ठा मिरविली, तर ती आपल्या मर्यादेबाहेर न मिरवता देवाने आम्हांला दिलेल्या सेवाकार्याच्या मर्यादेतच मिरवू. त्यात तुमच्यापर्यंत येऊन पोहचलेल्या आमच्या सेवाकार्याचा समावेश होतो. ख्रिस्ताचे शुभवर्तमान घेऊन पहिल्याने आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचलो, तेव्हा आम्ही ह्या मर्यादेचे उलंघन करीत नव्हतो कारण ती मर्यादा तुमच्यापर्यंत पोहोचत होती. आम्ही मर्यादा सोडून म्हणजे दुसऱ्यांच्या श्रमासंबंधाने प्रतिष्ठा मिरवत नाही, तर तुमचा विश्वास वाढत जाईल, तसतसे आमच्या सेवाकार्याचे क्षेत्र तुमच्यामध्ये देवाने घालून दिलेल्या मर्यादेत अधिकाधिक वाढत जाईल, अशी आम्हांला आशा आहे.

सामायिक करा
२ करिंथ 10 वाचा