२ इतिहास 6:1-42
२ इतिहास 6:1-42 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मग शलमोन म्हणाला, “मी निबीड अंधकारात वास करीन असे परमेश्वर म्हणाला आहे. परमेश्वरा, तुझ्या निवासासाठी मी हे विशाल घर बांधले आहे, तेथे तू चिरकाल राहावेस.” मग शलमोनाने मागे वळून सर्व इस्राएल समुदायांना आशीर्वाद दिला. आणि ते सर्व उभे राहीले. शलमोन पुढे म्हणाला, “इस्राएलाच्या परमेश्वर देवाचे स्तवन करा. माझे पिता दावीद यांच्याशी तो जे बोलला ते त्याने खरे करून दाखवले आहे. परमेश्वर देवाने असे वचन दिले होते.” मी माझ्या लोकांस मिसरातून बाहेर आणल्यानंतर इस्राएल वंशातील कोणतेही नगर मी माझ्या नावाचे घर तिथे बांधले जावे म्हणून निवडले नाही. तसेच, माझ्या इस्राएल लोकांचे आधिपत्य करण्यासाठी कोणाएकाची निवडही केली नाही. पण आता यरूशलेम हे स्थान माझे नाव तेथे रहावे यासाठी मी निवडले आहे आणि दावीदाला इस्राएल लोकांवर नेमले आहे. “इस्राएलाचा देव परमेश्वर याच्या प्रीत्यर्थ माझे पिता दावीद यांना मंदिर बांधायचे होते. पण परमेश्वर त्यांना म्हणाला, ‘दावीद माझ्या नावाने मदिर बांधायचा विचार तुझ्या मनात आला हे चांगले झाले. पण ते तू बांधू शकत नाहीस पण तुझा पुत्र जो तुझ्यापासून जन्मला तो हे काम करील.’ आता परमेश्वराने कबूल केले तसेच झाले आहे व माझे पिता दावीद यांच्या जागी मी इस्राएल लोकांचा राजा झालो आहे. ‘मी इस्राएलचा राजा आहे असे होईल’ हे वचन परमेश्वराने दिले होते, आणि मी इस्राएलाचा देव परमेश्वर याच्या नावाने मंदिर बांधले आहे. मी कराराचा कोश मंदिरात ठेवला आहे. इस्राएलच्या लोकांशी परमेश्वराने केलेला करार या कोशात आहे.” शलमोन, परमेश्वराच्या वेदीसमोर उभा राहिला. तेथे जमलेल्या सर्व इस्राएल लोकांपुढे तो उभा होता. त्याने आपले बाहू पसरले. बाहेरच्या दालनात प्रत्येकी पाच हात लांब, पाच हात रुंद आणि तीन हात उंच असलेला एक पितळी चौरंग शलमोनाने तयार केला व मंडपाच्या मध्यभागी ठेवला. त्यावर चढून तो समस्त इस्राएल लोकांसमोर गुडघे टेकून बसला आणि त्याने आकाशाकडे हात पसरले. शलमोन म्हणाला, “हे इस्राएलाच्या परमेश्वर देवा, स्वर्गात किंवा पृथ्वीवर तुझ्यासारखा दुसरा कोणीही देव नाही. तुझे जिवाभावाने अनुसरण करणाऱ्या आणि योग्य आचरण करणाऱ्या तुझ्या सेवकांना तुझे प्रेम आणि तुझी कृपा यांचे दिलेले वचन पाळणारा तू परमेश्वर आहेस.” दावीद याला दिलेले वचन तू पाळलेस. दावीद माझे पिता होते तू आपल्या मुखानेच त्यांना वचन दिलेस आणि आज आपल्या हाताने ते प्रत्यक्षात आणले आहेस. तसेच आता, हे इस्राएलच्या परमेश्वर देवा, दावीद या सेवकाला दिलेले हे वचनही खरे कर. तू असे म्हणाला होतास: माझ्यासमक्ष इस्राएलच्या राजासनावर न चुकता तुझ्या वंशातीलच कोणीतरी येत जाईल. मात्र तुझ्या मुलांनी माझ्या नियमशास्त्राप्रमाणे काटेकोर वर्तन केले पाहिजे. तुझ्याप्रमाणेच त्यांनीही माझा करार पाळला पाहिजे. तेव्हा आता, हे इस्राएलाच्या परमेश्वर देवा, तुझे हे शब्द खरे होऊ देत. आपला सेवक दावीद याला तू तसा शब्द दिला आहेस. परमेश्वर पृथ्वीवर लोकांमध्ये वस्ती करु शकत नाही ही गोष्ट, हे देवा, आम्हास माहीत आहे. आकाश आणि त्या पुढचे अवकाशही तुला सामावून घ्यायला असमर्थ आहेत. या मी बांधलेल्या मंदिरातही तू मावू शकत नाहीस हे आम्ही जाणतो पण माझी एवढी प्रार्थना ऐक. मी करुणा भाकतो तिजकडे लक्ष दे. परमेश्वर देवा, माझी हाक ऐक. मी तुझा एक दास आहे. या मंदिराकडे अहोरात्र तुझी दृष्टी असो असे मी तुला कळकळीने विनवतो. तुझे नाव इथे राहील असे तू म्हणाला होतास, मी या मंदिराकडे तोंड करून प्रार्थना करीन तेव्हा ती तू ऐक. तुझ्या इस्राएल लोकांनी तसेच मी केलेल्या प्रार्थना तू ऐक. या प्रार्थनास्थळाकडे तोंड करून आम्ही प्रार्थना करु तेव्हा तिच्याकडे तू लक्ष दे. तुझ्या आकाशातील स्थानावरुन इथे तुझे लक्ष असू दे. आमच्या प्रार्थना ऐक आणि आम्हास क्षमा कर. एखाद्याने आपल्या शेजाऱ्याचा काही अपराध केल्याचा आरोप त्याच्यावर आला आणि तो तुझे नाव घेऊन आपण निर्दोष आहोत असे सांगू लागला तर तो वेदीसमोर तसे शपथ घेऊन सांगत असतांना, तू स्वर्गातून ऐक तुझ्या सेवकाचा योग्य न्यायनिवाडा कर ज्याच्या हातून अपराध घडला असेल त्यास शासन कर त्याच्यामुळे इतरांना जसा त्रास झाला तसाच याला होऊ दे आणि ज्याचे वागणे उचित होते तो निर्दोष असल्याचे सिध्द कर. त्याचे प्रतिफळ त्यास दे. इस्राएल लोकांनी तुझ्याविरुध्द पाप केल्यामुळे जर शत्रूंनी तुझ्या इस्राएल लोकांचा पराभव केला आणि अशावेळी इस्राएल लोक तुझ्याकडे येऊन तुझ्या नावाने प्रार्थना करु लागले, या मंदिरात येऊन विनवणी करु लागले तर. तू स्वर्गातून ते ऐकून इस्राएल लोकांच्या पापांची क्षमा कर. तू त्यांना आणि त्यांच्या पूर्वजांना दिलेल्या भूमीवर त्यांना पुन्हा परत आण. जर इस्राएल लोकांनी पाप केल्यामुळे आकाश बंद होऊन पर्जन्यवृष्टी झालीच नाही त्यावेळी पश्चातापाने इस्राएल लोकांनी मंदिराच्या दिशेने पाहत प्रार्थना केली, आणि तू केलेल्या शिक्षेमुळे अपराध करणे थांबवले, तर स्वर्गातून त्यांचे ऐक आणि त्यांच्या पापांची क्षमा कर. इस्राएल लोक तुझे दास आहेत. त्यांना जगण्याचा सन्मार्ग दाखव. तुझ्या भूमीवर पाऊस पाड. कारण हा देश तू आपल्या लोकांस वतन करून दिला आहे. कदाचित् एखादयावेळी दुष्काळ, भयानक साथीचा रोग, किंवा पिकांवर रोग अथवा टोळ, नाकतोडे यांची धाड अशी काही आपत्ती किंवा लोकांच्या राहत्या नगरांवर शत्रूंचा हल्ला झाल्यास, रोगराई आल्यास, तुझे इस्राएल लोक तुझी करुणा भाकतील आणि प्रार्थना करतील. जो कोणी आपले क्लेश किंवा दु:ख ओळखून, या मंदिराच्या दिशेने बाहू उभारुन प्रार्थना करु लागेल. तेव्हा तू ते स्वर्गातून ऐक. जेथे तू राहतोस. तू ऐकून त्यांना क्षमा कर. प्रत्येका मनुष्याचा मनोदय तुला माहीत असल्यामुळे ज्याला जे योग्य असेल त्यास ते दे. मानवाचे मन फक्त तूच ओळखतोस. असे झाले म्हणजे तू आमच्या पूर्वजांना दिलेल्या या भूभागावर त्यांची वस्ती असेपर्यंत लोक तुझे भय बाळगतील आणि तुझे ऐकतील. जर तुझ्या इस्राएल प्रजेपेक्षा वेगळा असा कोणी उपराही कदाचित् दूर देशाहून इथे आलेला असेल. तुझ्या नावाची महती, आणि तुझे सामर्थ्यशाली बाहू यांच्यामुळे तो आलेला असेल. त्याने येऊन या मंदिराकडे पाहत प्रार्थना केली तर, तू ती स्वर्गातून ऐक. त्याची मागणी पुरव. म्हणजे इस्राएल लोकांप्रमाणेच पृथ्वीवरील इतर लोकांसही तुझ्या नावाचा महिमा कळेल आणि त्यांना तुझ्याविषयी आदर वाटेल. व मी बांधलेले हे मंदिर तुझ्या नावाचे आहे ते पृथ्वीवरील सर्व लोकांस कळेल. शत्रूंशी लढावयास जर तू आपल्या लोकांस दुसऱ्या ठिकाणी पाठवशील आणि तिथून ते तू निवडलेल्या या नगराच्या आणि मी बांधलेल्या मंदिराच्या दिशेने पाहत प्रार्थना करु लागतील. तर तू स्वर्गातून त्यांची प्रार्थना ऐक आणि त्यांच्या विनंती प्रमाणे त्यांना मदत कर. पाप कोणाच्या हातून होत नाही? तेव्हा लोक तुझ्याविरुध्द पाप करतील जेव्हा तुझा त्यांच्यावर कोप होईल. तू शत्रूंकरवी त्यांचा पाडाव करशील, बंदी म्हणून त्यांना बळजबरीने इथून दूरच्या किंवा एखाद्या जवळच्या ठिकाणी नेले जाईल. पण तिथे त्यांचे हृदयपरिवर्तन होऊन, परभूमीत कैदी होऊन पडलेले ते विनवणी करून म्हणतील, आम्ही चुकलो, आमच्या हातून पाप घडले आहे. आम्ही दुराचरण केले आहे. असतील तिथून ते अंतःकरणातून तुला शरण येतील. या देशाच्या तू त्याच्या पूर्वजांना दिलेल्या देशाच्या दिशेने आणि तू निवडलेल्या नगराच्या दिशेने पाहत ते प्रार्थना करतील. तुझ्या नावाकरिता मी बांधलेल्या या मंदिराच्या दिशेने पाहत ते प्रार्थना करतील. तेव्हा तू तुझ्या स्वर्गातील निवासस्थानातून ऐक; त्यांच्या प्रार्थना व विनंतीकडे कान दे, त्यांना मदत कर. ज्यांनी तुझ्याविरुध्द पाप केले आहे अशा तुझ्या लोकांस क्षमा कर. आता, हे परमेश्वरा, माझी तुला विनवणी आहे की तू तुझे कान आणि डोळे उघड. आम्ही इथे बसून जी प्रार्थना करणार आहोत ती लक्षपूर्वक ऐक. आता, हे परमेश्वर देवा, तुझे सामर्थ्य मिरवणाऱ्या या कराराच्या कोशाजवळ, आपल्या विश्रामस्थानी तू ये. तुझे याजक उध्दाराने भूषित होवोत. तुझ्या चांगूलपणात तूझे भक्त हर्ष पावोत. “हे परमेश्वर देवा, तुझ्या अभिषिक्त राजाचा स्विकार कर. तुझा एकनिष्ठ सेवक दावीद याचे स्मरण असू दे.”
२ इतिहास 6:1-42 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
तेव्हा शलोमोन म्हणाला, “याहवेहने म्हटले आहे की ते घनदाट मेघात राहतील; मी आपणासाठी एक भव्य मंदिर बांधले आहे, की आपण त्यात सर्वकाळ वस्ती करावी.” इस्राएलची सर्व मंडळी तिथे उभी असताना राजाने मागे वळून त्यांना आशीर्वाद दिला. मग राजा म्हणाला: “याहवेह इस्राएलचे परमेश्वर धन्यवादित असोत, कारण त्यांनी माझे वडील दावीदाला आपल्या मुखाने दिलेले वचन आज स्वहस्ते पूर्ण केले आहे. कारण याहवेहने म्हटले होते की, ‘मी माझ्या लोकांना इजिप्तमधून बाहेर आणले, त्या दिवसापासून इस्राएलातील कोणत्याही गोत्राचे शहर माझ्या नावाने मंदिर तिथे बांधावे म्हणून मी निवडले नाही, ज्यामुळे माझे नाव तिथे असावे किंवा माझ्या इस्राएली लोकांवर राज्य करण्यासाठी मी कोणालाही राज्यकर्ता म्हणून निवडले नाही. परंतु आता येथे माझे नाव असावे म्हणून मी यरुशलेमला निवडले आहे आणि माझ्या इस्राएल लोकांवर राज्य करण्यासाठी मी दावीदाची निवड केली आहे.’ “याहवेह इस्राएलच्या परमेश्वराच्या नावासाठी मंदिर बांधावे असे माझे वडील दावीद यांच्या मनात होते. पण याहवेहने माझे पिता दावीदाला म्हटले, ‘माझ्या नावासाठी मंदिर बांधावे अशी आपल्या हृदयात इच्छा बाळगून तू फार चांगले केले. तथापि, तू ते मंदिर बांधणार नाहीस, तर तुझा पुत्र, तुझ्या स्वतःच्या हाडामांसाचा; तोच माझ्या नावासाठी मंदिर बांधील.’ “याहवेहने दिलेले वचन पूर्ण केले आहे: माझे वडील दावीदाचा मी वारस झालो आणि याहवेहने अभिवचन दिल्याप्रमाणे आता इस्राएलच्या राजासनावर मी बसतो आणि याहवेह इस्राएलचे परमेश्वर यांच्यासाठी मी हे मंदिर बांधले आहे. तिथे कोशासाठी मी एक स्थान तयार केले आहे, ज्यात इस्राएली लोकांबरोबर याहवेहने केलेला करार आहे.” नंतर इस्राएलच्या सर्व मंडळीदेखत शलोमोन याहवेहच्या वेदीसमोर उभा राहिला, आणि त्याने आपले हात पसरले शलोमोनाने आता पाच हात लांब आणि पाच हात रुंद आणि तीन हात उंच असा एक कास्याचा मंच तयार केला होता आणि तो बाहेरील अंगणाच्या मध्यभागी ठेवण्यात आलेला होता. तो त्या मंचावर उभा राहिला आणि त्याने इस्राएलच्या सर्व मंडळीदेखत गुडघे टेकले आणि स्वर्गाकडे आपले हात पसरले. तो म्हणाला: “याहवेह, इस्राएलच्या परमेश्वरा, स्वर्गात किंवा पृथ्वीवर तुमच्यासारखा परमेश्वर नाही; जे आपले सेवक सर्व हृदयाने आपल्या मार्गात चालतात त्यांच्याशी आपण आपल्या प्रीतीच्या कराराची पूर्तता करतात. आपला सेवक, माझे पिता दावीदाला दिलेले अभिवचन आपण पाळले आहे; आपण आपल्या मुखाने अभिवचन दिले आणि स्वहस्ते ते आज पूर्ण केले आहे. “आता हे याहवेह, इस्राएलच्या परमेश्वरा, आपला सेवक माझे पिता दावीदाला आपण जे वचन दिले होते ते पाळावे. आपण म्हटले होते, ‘जसा तू होतास तसेच तुझे वंशज माझ्यासमोर माझ्या नियमानुसार चालण्यास सावधान राहतील, तर इस्राएलच्या राजासनावर बसण्यास तुझे वारस कधीही कमी पडणार नाही.’ तर आता, याहवेह हे इस्राएलच्या परमेश्वरा, आपला सेवक, माझे पिता दावीदाला जे अभिवचन आपण दिले होते ते प्रतितीस येऊ द्यावे. “पण परमेश्वर खचितच मानवजातीबरोबर पृथ्वीवर राहतील काय? स्वर्ग, अगदी सर्वोच्च स्वर्गात सुद्धा आपण मावणार नाहीत! मग हे जे मंदिर मी बांधले आहे त्यात आपण कसे मावाल? तरीही हे याहवेह, माझ्या परमेश्वरा, आपल्या सेवकाच्या प्रार्थनेकडे व त्याच्या दयेच्या याचनेकडे लक्ष द्यावे. आपला सेवक आपल्याकडे प्रार्थना व धावा करीत आहे त्याकडे कान द्या. आपण आपले नाव देणार असे ज्या स्थळाविषयी आपण म्हटले होते, त्या या मंदिराकडे दिवस व रात्र आपली दृष्टी असो; यासाठी की या ठिकाणातून करत असलेली तुमच्या सेवकाची प्रार्थना आपण ऐकावी. आपला सेवक व आपले इस्राएली लोक जेव्हा या ठिकाणातून विनंत्या करतील, तेव्हा त्यांच्या प्रार्थना ऐका. स्वर्गातून, आपल्या निवासस्थानातून कान द्या व ती ऐकून त्यांना क्षमा करा. “जेव्हा कोणी आपल्या शेजार्याचा अपराध करेल व त्यांना शपथ घ्यावी लागली आणि ते आपल्या वेदीसमोर या मंदिरात शपथ घेतील, तेव्हा स्वर्गातून ऐकून त्याप्रमाणे घडू द्या. आपल्या सेवकांचा न्याय करून दोषी व्यक्तीने केलेल्या कृत्यांनुसार त्यांचे शिर खाली झुकवा व निर्दोष्यास त्यांच्या निर्दोषतेनुसार वागणूक देऊन त्यांना न्याय द्यावा. “तुमच्याविरुद्ध पाप केल्यामुळे जेव्हा तुमचे इस्राएली लोक त्यांच्या शत्रूद्वारे पराभूत केले जातील आणि जेव्हा ते तुमच्याकडे पुन्हा वळतील व आपल्या नावाची थोरवी गाऊन या मंदिरात तुमच्यापुढे प्रार्थना व विनंती करतील, तेव्हा स्वर्गातून ऐकून तुमच्या इस्राएली लोकांच्या पापांची क्षमा करा व जो देश तुम्ही त्यांना व त्यांच्या पूर्वजांना दिला त्यात त्यांना परत आणावे. “तुमच्या लोकांनी तुमच्याविरुद्ध केलेल्या पापामुळे जेव्हा आकाश बंद होऊन पाऊस पडणार नाही, आणि जेव्हा ते या ठिकाणातून प्रार्थना करतील, आणि तुमच्या नावाची थोरवी गातील आणि आपण त्यांच्यावर आणलेल्या क्लेशामुळे ते आपल्या पापापासून वळतील, तेव्हा त्यांची विनंती ऐकून तुमचे सेवक, इस्राएली लोकांच्या पापांची क्षमा करा. जीवनाचा योग्य मार्ग त्यांना शिकवा, व जो देश तुम्ही तुमच्या लोकांना वतन म्हणून दिला त्यावर पाऊस पाठवावा. “जेव्हा देशावर दुष्काळ, किंवा पीडा येते, किंवा पिके करपवून टाकणारा वारा किंवा भेरड, टोळ किंवा नाकतोडे आले किंवा शत्रूंनी त्यांच्या एखाद्या शहराला वेढा घातला, असे कोणतेही अरिष्ट किंवा रोग आला, आणि तुमच्या इस्राएली लोकांपैकी कोणी त्यांच्या हृदयाला होत असलेले क्लेश आणि वेदना जाणून प्रार्थना किंवा विनंती करतील आणि त्यांचे हात मंदिराकडे पसरतील; तेव्हा स्वर्ग जे तुमचे निवासस्थान आहे तिथून ऐकून त्यांना क्षमा करा व त्यानुसार घडवून आणा; प्रत्येकाच्या सर्व कृत्यांनुसार त्यांच्याशी वागा, कारण तुम्हाला त्यांच्या हृदयाची पारख आहे (कारण केवळ तुम्हीच मानवाचे हृदय जाणणारे आहात), यासाठी की जो देश तुम्ही आमच्या पूर्वजांना दिला त्यात जितका काळ ते राहतील, त्यांनी तुमचे भय बाळगावे व तुमच्या आज्ञेत राहावे. “असा कोणी परदेशी, जो आपल्या इस्राएली लोकांमधील नाही, परंतु तुमचे महान नाव आणि तुमची पराक्रमी भुजा आणि तुमचा लांबवलेला बाहू यामुळे तिथे दूरवरील देशातून आले व त्यांनी मंदिराकडे वळून प्रार्थना केली, तेव्हा स्वर्ग जे तुमचे निवासस्थान आहे, तिथून तुम्ही त्यांची प्रार्थना ऐकावी. त्या परदेशीयाने जे काही तुमच्याकडे मागितले ते आपण त्यांना द्यावे, अशासाठी की पृथ्वीवरील लोकांनी तुमचे नाव ओळखावे व तुमच्या इस्राएली लोकांप्रमाणे तुमचे भय धरावे, व जाणावे की मी बांधलेल्या या घरावर तुमचे नाव आहे. “जेव्हा तुमचे लोक तुम्ही जिथे पाठवाल तिथे त्यांच्या शत्रूविरुद्ध युद्धास जातात आणि जेव्हा ते तुम्ही निवडलेल्या नगराकडे आणि तुमच्या नावासाठी मी बांधलेल्या मंदिराकडे तुमची प्रार्थना करतात, तेव्हा स्वर्गातून त्यांची प्रार्थना व विनंती ऐकून त्यांच्यावतीने न्याय करावा. “जेव्हा ते तुमच्याविरुद्ध पाप करतील; कारण पाप करीत नाही असा कोणीही मनुष्य नाही आणि त्यामुळे रागावून तुम्ही त्यांना त्यांच्या शत्रूच्या हाती दिले, आणि त्यांनी त्यांना गुलाम म्हणून जवळच्या किंवा दूरच्या देशात कैद करून नेले; आणि ते कैदेत असता त्यांच्या हृदयाचा पालट झाला व पश्चात्ताप करीत कैद करून नेलेल्या देशात तुमच्याकडे असे म्हणत विनंती केली, ‘आम्ही पाप केले आहे, आम्ही विपरीत वागलो आहोत आणि आम्ही दुष्टतेने वागलो आहोत,’ आणि त्यांना कैद करून नेलेल्या देशात ते जर त्यांच्या संपूर्ण हृदयाने व जिवाने तुमच्याकडे वळले आणि त्यांच्या पूर्वजांना दिलेल्या देशाकडे, जे शहर तुम्ही निवडले आणि मी तुमच्या नावासाठी बांधलेल्या या मंदिराकडे वळून प्रार्थना करतील, तेव्हा स्वर्ग जे तुमचे निवासस्थान आहे तिथून त्यांची प्रार्थना व विनंत्या ऐकून त्यांच्यावतीने न्याय करावा. आणि ज्या तुमच्या लोकांनी तुमच्याविरुद्ध पाप केले आहे त्यांना क्षमा करा. “माझ्या परमेश्वरा, आता तुमचे डोळे उघडे असावेत आणि तुमचे कान या ठिकाणी केल्या जाणार्या प्रार्थनांकडे लागावे. “याहवेह परमेश्वरा उठा आणि तुम्ही तुमच्या सामर्थ्याच्या कोशासह, तुमच्या विश्रामस्थानी या. याहवेह परमेश्वरा, तुमचे याजक तारणाचे वस्त्र परिधान करतील, तुमचे विश्वासू लोक तुमच्या चांगुलपणामध्ये आनंद करतील. हे याहवेह परमेश्वरा, तुमच्या अभिषिक्ताचा अव्हेर करू नका. तुमचा सेवक दावीदाला दिलेल्या महान प्रीतीच्या अभिवचनाची आठवण ठेवा.”
२ इतिहास 6:1-42 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
मग शलमोन म्हणाला, “परमेश्वराने म्हटले आहे की मी निबिड अंधकारात वास करीन; पण तुझ्यासाठी निवासस्थान, तुला युगानुयुग राहण्यासाठी मंदिर मी बांधले आहे.” मग राजाने मागे वळून इस्राएलाच्या सर्व मंडळीला आशीर्वाद दिला, तेव्हा ती सर्व मंडळी उठून उभी राहिली. तो म्हणाला, “धन्य तो इस्राएलाचा देव परमेश्वर, त्याने स्वमुखाने माझा बाप दावीद ह्याला वचन दिले होते व त्याने आपल्या हातांनी ते पूर्ण केले, ते वचन असे : ‘ज्या दिवशी मी आपल्या लोकांना मिसर देशातून बाहेर आणले, त्या दिवसापासून माझ्या नामाच्या निवासार्थ मंदिर बांधण्यासाठी कोणाही इस्राएल वंशाकडून मी अन्य कोणतेही नगर निवडून घेतले नाही, आणि माझी प्रजा इस्राएल हिच्यावर आधिपत्य करण्यासाठी कोणी अन्य मनुष्य निवडला नाही; परंतु यरुशलेम येथे माझे नाव असावे म्हणून मी ते निवडले आहे. माझे लोक इस्राएल ह्यांच्यावर मी दाविदाला निवडून नेमले आहे.’ माझा बाप दावीद ह्याचा मनोदय असा होता की, इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याच्या नामाप्रीत्यर्थ एक मंदिर बांधावे; पण परमेश्वराने माझा पिता दावीद ह्याला सांगितले की, ‘परमेश्वराच्या नामाप्रीत्यर्थ मंदिर बांधावे असा तू मनोदय धरला आहेस हे तू चांगले केले आहेस; पण तू ते मंदिर बांधणार नाहीस तर तुझ्या पोटी जो पुत्र येईल तो माझ्या नामाप्रीत्यर्थ मंदिर बांधील.’ परमेश्वर हे जे वचन बोलला ते त्याने पुरे केले. मी आपला बाप दावीद ह्याच्या जागी येऊन परमेश्वराच्या वचनानुसार इस्राएलाच्या गादीवर बसलो आहे; आणि इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याच्या नामाप्रीत्यर्थ हे मंदिर मी बांधले आहे. परमेश्वराने इस्राएल लोकांशी करार केला तो ज्या कोशात आहे, त्याची मी येथे स्थापना केली आहे.” इस्राएलाच्या सर्व मंडळीदेखत परमेश्वराच्या वेदीसमोर उभे राहून शलमोनाने आपले हात पसरले. शलमोनाने पाच हात लांब, पाच हात रुंद व तीन हात उंच असा पितळेचा एक चौरंग तयार करून अंगणाच्या मध्यभागी ठेवला होता, त्याच्यावर तो उभा राहिला आणि इस्राएलाच्या सर्व मंडळीसमक्ष गुडघे टेकून आकाशाकडे आपले हात पसरून असे म्हणाला, “हे परमेश्वरा, इस्राएलाच्या देवा, आकाशात व पृथ्वीवर तुझ्यासमान कोणी देव नाही; जे तुझे सेवक जिवेभावे तुझ्यासमोर वागतात त्यांच्याशी तू आपल्या कराराप्रमाणे व दयेने वागतोस. जे वचन तुझा सेवक माझा बाप दावीद ह्याला दिलेस ते तू पाळले आहेस; जे तू आपल्या मुखाने बोललास ते तू आपल्या हाताने पुरे केले आहेस; अशी आज वस्तुस्थिती आहे. तर आता हे इस्राएलाच्या देवा, परमेश्वरा, तुझा सेवक माझा बाप दावीद ह्याला तू असे वचन दिले होतेस की, ‘तू माझ्यासमोर वागत आलास त्याचप्रमाणे तुझे वंशज आपली चालचलणूक ठेवण्याची काळजी बाळगून माझ्या नियमांनुसार चालतील तर माझ्यासमक्ष इस्राएलाच्या राजासनावर बसणार्या तुझ्या कुळातल्या पुरुषांची परंपरा कधीही खुंटणार नाही.’ त्याला दिलेले हे वचनही तू पुरे कर. हे इस्राएलाच्या देवा, परमेश्वरा, जे वचन तू आपला सेवक दावीद ह्याला दिले होतेस ते प्रतीतीस येऊ दे. देव ह्या भूतलावर मानवांबरोबर खरोखर वास करील काय? आकाश व नभोमंडळ ह्यात तुझा समावेश होत नाही; तर हे जे मंदिर मी बांधले आहे ह्यात तो कसा व्हावा? तरी हे माझ्या देवा, परमेश्वरा, तुझ्या सेवकाच्या प्रार्थनेकडे व याचनेकडे लक्ष दे; तुझा सेवक तुझा धावा करीत आहे व तुझ्यापुढे प्रार्थना करीत आहे तिच्याकडे कान दे. माझ्या नामाचा निवास येथे होईल असे ज्या स्थानाविषयी तू म्हटले त्या ह्या स्थानाकडे, ह्या मंदिराकडे अहोरात्र तुझी दृष्टी असो. जी प्रार्थना तुझा सेवक ह्या स्थानाकडे तोंड करून करीत आहे ती ऐक. तुझ्या सेवकाच्या विनवणीकडे आणि तुझे लोक इस्राएल ह्या स्थानाकडे तोंड करून विनवणी करतील तिच्याकडे तू कान दे; स्वर्गातील तुझ्या निवासस्थानातून तू ती श्रवण कर आणि श्रवण करून त्यांना क्षमा कर. एखाद्याने आपल्या शेजार्याचा अपराध केल्यामुळे त्याला शपथ घ्यायला लावली, आणि ती ह्या मंदिरात तुझ्या वेदीसमोर त्याने घेतली, तर तू स्वर्गलोकातून ती श्रवण कर; त्याप्रमाणे घडवून आण; आपल्या सेवकांचा न्याय करून दुष्टाची कृती त्याच्या शिरी उलटेल असे त्याचे पारिपत्य कर; निर्दोष्यास निर्दोषी ठरवून त्याच्या निर्दोषतेप्रमाणे त्याला फळ दे. तुझे लोक इस्राएल ह्यांनी तुझ्याविरुद्ध पाप केल्यामुळे शत्रूपुढे त्यांचा मोड झाला व ते पुन्हा तुझ्याकडे वळले आणि तुझ्या नामाचा स्वीकार करून ह्या मंदिरात तुझी प्रार्थना व विनवणी त्यांनी केली, तर तू स्वर्गलोकातून त्यांचे ऐक; तुझे लोक इस्राएल ह्यांच्या पापाची क्षमा कर आणि जो देश तू त्यांना व त्यांच्या पूर्वजांना दिलास त्यात त्यांना परत आण. त्यांनी तुझ्याविरुद्ध पाप केल्यामुळे आकाशकपाटे बंद होऊन पर्जन्यवृष्टी खुंटली तर अशा प्रसंगी त्यांनी ह्या स्थानाकडे तोंड करून प्रार्थना केली, तुझ्या नामाचा स्वीकार केला व तू त्यांना दीन केल्यामुळे ते आपल्या पापापासून परावृत्त झाले, तर तू स्वर्गलोकातून त्यांचे ऐक. इस्राएल तुझी प्रजा, तुझे सेवक, त्यांच्या पापाची क्षमा कर, कारण ज्या सन्मार्गाने त्यांनी चालले पाहिजे तो तू त्यांना शिकवत आहेस; हा जो देश तू आपल्या लोकांना वतन करून दिला आहेस त्यावर पर्जन्यवृष्टी कर. ह्या देशावर दुष्काळ, मरी, शेते करपून टाकणारा वारा अथवा भेरड, टोळ अथवा नाकतोडे हे आले अथवा शत्रूंनी त्यांच्या एखाद्या शहरास वेढा घातला अथवा दुसरी कोणतीही आपत्ती अथवा रोग त्यांच्यावर आला, तर एखादा इस्राएल किंवा तुझे सगळे इस्राएल लोक आपल्याला होणारे क्लेश किंवा दुःख ओळखून जी प्रार्थना किंवा विनवणी आपले हात ह्या मंदिराकडे पसरून करतील, ती तू स्वर्गातील आपल्या निवासस्थानातून ऐक, त्यांना क्षमा कर; प्रत्येकाचे मन ओळखून त्याच्या सर्व वर्तनाप्रमाणे त्याला फळ दे; कारण सर्व मानवजातीची मने ओळखणारा केवळ तूच आहेस; म्हणजे जो देश तू आमच्या पूर्वजांना दिला त्यात ते राहतील तितके दिवस ते तुझे भय बाळगून तुझ्या मार्गांनी चालतील. तुझ्या इस्राएल लोकांतला नव्हे असा कोणी परदेशीय तुझे मोठे नाम, बलिष्ठ हस्त व पुढे केलेला बाहू ह्यास्तव परदेशाहून आला, आणि त्याने येऊन ह्या मंदिराकडे तोंड करून प्रार्थना केली, तर तू आपल्या स्वर्गातील निवासस्थानातून ती ऐक व हा परदेशीय ज्या कशासाठी तुझा धावा करील ते कर; म्हणजे ह्या भूतलावरील सर्व देशांचे लोक तुझे नाव ओळखून तुझ्या इस्राएल लोकांप्रमाणे तुझे भय बाळगतील आणि मी जे हे मंदिर बांधले आहे त्यावर तुझे नाम आहे हे त्यांना कळून येईल. तुझे लोक तू पाठवशील तिकडे आपल्या शत्रूंशी सामना करण्यास जातील आणि तू निवडलेल्या ह्या नगराकडे व तुझ्या नामासाठी मी बांधलेल्या ह्या मंदिराकडे तोंड करून तुझी प्रार्थना करतील, तर तू स्वर्गातून त्यांची प्रार्थना व विनवणी ऐक व त्यांना न्याय दे. त्यांनी तुझ्याविरुद्ध पाप केले. (कारण पाप करीत नाही असा कोणीच नाही) व तू त्यामुळे क्रोधीत होऊन त्यांना त्यांच्या शत्रूच्या हाती दिलेस आणि त्यांनी त्यांना जवळच्या अथवा दूरच्या देशात पाडाव करून नेले, तर ज्या देशात त्यांना पाडाव करून नेले असेल तेथे ते विचार करतील आणि आपल्याला पाडाव करून नेणार्या लोकांच्या देशात तुझ्याकडे वळून तुझी विनवणी करून म्हणतील, ‘आम्ही पाप केले आहे, आम्ही कुटिलतेने वागलो आहोत, आम्ही दुराचरण केले आहे’; आणि ज्यांनी त्यांना पाडाव करून नेले त्या त्यांच्या शत्रूंच्या देशात ते तुझ्याकडे जिवेभावे वळून आपल्या पूर्वजांना दिलेल्या देशाकडे, तू निवडलेल्या नगराकडे, तुझ्या नामासाठी मी बांधलेल्या ह्या मंदिराकडे तोंड करून तुझी प्रार्थना करतील; तेव्हा तू आपल्या स्वर्गातील निवासस्थानातून त्यांची प्रार्थना व विनवणी ऐक; त्यांना न्याय दे; तुझ्या लोकांनी तुझ्याविरुद्ध पाप केले असेल त्यांना क्षमा कर. तर आता हे माझ्या देवा, जी प्रार्थना ते ह्या स्थानी करतील तिकडे आपले डोळे उघडून कान दे. हे परमेश्वरा, देवा, ऊठ; तू आपल्या सामर्थ्याच्या कोशासह आपल्या विश्रामस्थानी ये; हे परमेश्वरा, देवा, तुझे याजक उद्धाराने भूषित होवोत आणि तुझे भक्त सुजनतेत आनंद पावोत. हे परमेश्वरा, देवा, तू आपल्या अभिषिक्ताचे तोंड मागे फिरवू नकोस; तुझा सेवक दावीद ह्याच्यावर दया करून जी कृत्ये तू केलीस त्यांचे स्मरण कर.”