२ इतिहास 34:22-28
२ इतिहास 34:22-28 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
हिल्कीया आणि राजाचे सेवक हुल्दा नावाच्या संदेष्टीकडे गेले. हुल्दा ही शल्लूमची पत्नीशल्लूम ताकहतचा आणि ताकहत इस्त्राचा पुत्र. इस्त्रा राजाच्या वस्त्रागाराचा प्रमुख होता. हुल्दा यरूशलेमेच्या नवीन भागात राहत होती. हिल्कीया आणि राजाचे सेवकांनी तिला सर्व जे घडले ते सांगितले. हुल्दा त्यांना म्हणाली, “इस्राएलाचा परमेश्वर देव याचे म्हणणे असे आहे.” राजा योशीयाला म्हणावे: परमेश्वर म्हणतो, “या प्रदेशावर आणि इथे राहणाऱ्या लोकांवर मी कोप आणणार आहे.” यहूदाच्या राजाला जे पुस्तक वाचून दाखवण्यात आले. त्यातील मजकुरात आहेत ती सर्व संकटे त्यांच्यावर ओढवतील. माझ्याकडे पाठ फिरवून इतर देवतांपुढे त्यांनी धूप जाळला म्हणून मी असे करणार आहे. आपल्या दुष्कृत्यांमुळे लोकांनी मला सतंप्त केले आहे. या क्रोधाचा अंगार त्यांच्यावर बरसेल आणि तो शांत होणार नाही. पण यहूदाचा राजा योशीया याला सांग, त्यानेच तुला माझ्याकडे पाठवले आहे की तू नुकतेच जे ऐकलेस त्याविषयी इस्राएलाचा परमेश्वर देव म्हणतो: योशीयाने, पश्चातापाने देवासमोर विनम्र झाला. खेदाने आपले कपडे फाडलेस. तू रडलास. तू मृदू अंत:करणाचा असल्यामुळे तुझ्या पूर्वजांकडे मी तुला नेईन. तुला शांत मरण येईल. या प्रदेशावर आणि लोकांवर जी संकटे कोसळतील ती तुला पाहायला लागणार नाहीत. हिल्कीया आणि राजाचे सेवक यासर्वांनी हा निरोप राजाला येऊन सांगितला.
२ इतिहास 34:22-28 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
हिल्कियाह आणि त्याच्याबरोबर राजाने ज्यांना पाठवले होते, ते संदेष्टी हुल्दाह हिच्याशी बोलण्यास गेले, ती पोशाख भांडाराचा अधिकारी हसराहचा पुत्र तोखाथ चा पुत्र शल्लूमची पत्नी होती. ती यरुशलेमच्या नव्या पेठेत राहत होती. ती त्यांना म्हणाली, “याहवेह इस्राएलचे परमेश्वर असे म्हणतात: ज्या मनुष्याने तुम्हाला माझ्याकडे पाठवले आहे, त्याला सांगा, ‘याहवेह असे म्हणतात: मी या ठिकाणावर आणि येथील लोकांवर संकट आणेन आणि यहूदीयाच्या राजासमोर वाचलेल्या ग्रंथात लिहिलेले सर्व शाप आणेन. कारण त्यांनी माझा त्याग केला आहे आणि इतर दैवतांना धूप जाळले आहेत आणि त्यांच्या हस्तकृतींनी माझा राग पेटविला गेला आहे आणि माझा राग या जागेवर ओतला जाईल आणि तो शांत होणार नाही.’ यहूदीयाच्या राजाला हे जाऊन सांगा, ज्याने तुम्हाला याहवेहची चौकशी करण्यासाठी पाठविले होते, ‘जे वचन तू ऐकले होते त्याबद्दल याहवेह इस्राएलचे परमेश्वर असे म्हणतात: कारण तुझे अंतःकरण प्रतिसाद देणारे होते आणि जेव्हा या ठिकाणाविषयी आणि येथील लोकांविरुद्ध तो जे काही बोलला ते तू ऐकले तेव्हा तू स्वतःला परमेश्वरासमोर नम्र केलेस आणि तू माझ्यासमोर नम्र झालास आणि तुझी वस्त्रे फाडली आणि माझ्यासमोर रडलास, म्हणून मी तुझे ऐकले आहे, असे याहवेह जाहीर करतात. आता मी तुला तुझ्या पूर्वजांबरोबर मिळवेन आणि तुला शांतीने पुरले जाईल. या ठिकाणावर आणि येथे राहणाऱ्यांवर मी जे संकट आणणार आहे, ते तुझ्या डोळ्यांना दिसणार नाही.’ ” तेव्हा त्यांनी तिचे उत्तर परत राजाला जाऊन सांगितले.
२ इतिहास 34:22-28 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
मग हिल्कीया व राजाने आज्ञा केलेले इतर लोक हे संदेष्ट्री हुल्दा हिच्याकडे गेले. ही शल्लूम बिन ताकहत2 बिन इस्रा नावाच्या जामदाराची स्त्री असून त्या वेळी यरुशलेमेत दुसर्या पेठेत राहत होती; तिच्याकडे जाऊन तिला त्यांनी हे कळवले. तेव्हा ती त्यांना म्हणाली, “इस्राएलाचा देव परमेश्वर म्हणतो, ज्या पुरुषाने तुम्हांला माझ्याकडे पाठवले त्याला जाऊन सांगा : ‘परमेश्वर म्हणतो, पाहा, यहूदाच्या राजासमोर जो ग्रंथ वाचला त्यात लिहिलेल्या सर्व शापांप्रमाणे मी ह्या स्थानावर व येथील रहिवाशांवर अनिष्ट आणीन. कारण त्या लोकांनी मला सोडून देऊन अन्य देवांपुढे धूप जाळला आहे आणि आपल्या हातांनी घडवलेल्या सर्व वस्तूंमुळे मला संतप्त केले आहे म्हणून ह्या स्थानावर माझ्या क्रोधाची वृष्टी झाली आहे; तो शांत व्हायचा नाही. तथापि ज्याने तुम्हांला परमेश्वराला प्रश्न करण्यास पाठवले त्या यहूदाच्या राजाला जाऊन सांगा : इस्राएलाचा देव परमेश्वर म्हणतो, ही वचने ऐकून तुझे हृदय मृदू झाले, तू देवापुढे नम्र झालास आणि ह्या स्थानाविरुद्ध व येथल्या रहिवाशांविरुद्ध मी सांगितले ते ऐकून तू दीन होऊन आपली वस्त्रे फाडून माझ्यासमोर रडलास, म्हणून मी तुझी विनंती ऐकली आहे, असे परमेश्वर म्हणतो. पाहा, मी तुला तुझ्या पितरांशी मिळवीन; तुला तुझ्या कबरेत शांतीने पोचवतील; जो गहजब मी ह्या स्थळावर व येथल्या रहिवाशांवर आणणार आहे तो तू आपल्या डोळ्यांनी पाहणार नाहीस.” त्यांनी परत येऊन राजाला हे कळवले.