YouVersion लोगो
सर्च आयकॉन

२ इतिहास 29:1-11

२ इतिहास 29:1-11 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

हिज्कीया वयाच्या पंचविसाव्या वर्षी राजा झाला. त्याने यरूशलेमामध्ये एकोणतीस वर्षे राज्य केले. त्याच्या आईचे नाव अबीया. ती जखऱ्याची कन्या. हिज्कीयाची वागणूक परमेश्वराच्या दृष्टीने उचित अशी होती. आपला पूर्वज दावीद याच्या प्रमाणेच त्याचे वर्तन सुयोग्य असे. हिज्कीयाने परमेश्वराच्या मंदिराचे दरवाजे उघडले आणि दुरुस्ती करून ते मजबूत केले. राजा झाल्याबरोबर आपल्या कारभाराच्या पहिल्या महिन्यातच त्याने हे केले. सर्व याजक आणि लेवी यांना त्याने एकत्र बोलावले आणि मंदिराच्या पूर्वेकडील मोकळ्या चौकात त्यांची सभा घेतली. तो त्यांना म्हणाला, “लेवी हो, ऐका! देवाच्या सेवेसाठी पवित्र व्हा. या पवित्र कार्यासाठी परमेश्वर देवाच्या मंदिराची सिध्दता करा. परमेश्वर हा आपल्या पूर्वजांचा देव आहे. पवित्रस्थानातूनही अशुद्धपणा काढून टाका. आपल्या पूर्वजांनी परमेश्वराची संगत सोडली आणि आपला देव परमेश्वर याच्या दृष्टीने वाईट ते केले त्याच्या मंदिराकडे पाठ फिरवली. त्यांनी मंदिराचे प्रवेशद्वार बंद केले आणि दिवे विझू दिले. इस्राएलाच्या परमेश्वराच्या पवित्र गाभाऱ्यात परमेश्वरासाठी धूप जाळणे, होमार्पणे करणे बंद पडले. म्हणून यहूदा व यरूशलेमेच्या लोकांवर परमेश्वर कोपला. त्याने लोकांस शासन केले. परमेश्वराचा क्रोध पाहून इतर लोक विस्मयचकित झाले आणि घाबरले. यहूदी लोकांबद्दल त्यांना तिरस्कार आणि शरम वाटली. ही वस्तुस्थिती तुम्हास माहीत आहे. तुम्ही ती पाहतच आहात. म्हणूनच युध्दात आपले पूर्वज मारले गेले. आपल्या स्त्रिया, मुले कैदी झाले. म्हणून मी, हिज्कीया, इस्राएलच्या परमेश्वर देवाशी करार करणार आहे. म्हणजे आपल्यावर त्याचा राग राहणार नाही. तेव्हा पुत्रांनो आता, आळसात वेळ घालवू नका. परमेश्वराने त्याच्या सेवेसाठी तुमची निवड केली आहे. मंदिरात त्याची सेवाचाकरी करणे, धूप जाळणे यासाठी तुम्हास त्याने निवडले आहे.”

सामायिक करा
२ इतिहास 29 वाचा

२ इतिहास 29:1-11 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

हिज्कीया राज्य करू लागला तेव्हा तो पंचवीस वर्षांचा होता; त्याने एकोणतीस वर्षे यरुशलेमेत राज्य केले; त्याच्या आईचे नाव अबीया, ती जखर्‍याची कन्या. आपला पूर्वज दावीद ह्याच्याप्रमाणे परमेश्वराच्या दृष्टीने जे नीट ते तो करीत असे. हिज्कीया मंदिरामधील उपासना पुन्हा चालू करतो त्याच्या कारकिर्दीच्या पहिल्या वर्षाच्या पहिल्या महिन्यात त्याने परमेश्वराच्या मंदिराचे दरवाजे उघडले आणि त्यांची दुरुस्ती केली. मग त्याने याजकांना व लेव्यांना आणून पूर्वेकडील चौकात जमा केले; आणि तो त्यांना म्हणाला, “लेव्यांनो, माझे ऐका! तुम्ही स्वत: पवित्र व्हा आणि तुमच्या पूर्वजांचा देव परमेश्वर ह्याचे मंदिर पवित्र करा; पवित्रस्थानातून सर्व अमंगलता दूर करा. आपल्या पूर्वजांनी अपराध करून आपला देव परमेश्वर ह्याच्या दृष्टीने जे वाईट ते केले व त्याला सोडून दिले; परमेश्वराच्या निवासस्थानापासून आपली तोंडे फिरवून त्याकडे त्यांनी पाठ फिरवली. त्याप्रमाणेच त्यांनी देवडीचे दरवाजे बंद केले, दीप मालवले आणि पवित्रस्थानात इस्राएलाच्या देवाप्रीत्यर्थ धूप जाळला नाही की होमबली अर्पण केले नाहीत. म्हणून परमेश्वराचा क्रोध यहूदा व यरुशलेम ह्यांवर भडकला; त्याने त्यांना दहशत व विस्मय ह्यांस कारण केले आहे व ते धिक्कारास पात्र झाले आहेत हे तुम्ही डोळ्यांनी पाहत आहात. ह्यामुळे आमच्या वाडवडिलांचा तलवारीने वध झाला; आमचे पुत्र, कन्या व स्त्रिया पाडाव होऊन गेल्या. आता माझ्या मनात आहे की इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याच्याशी आपण करार करावा, म्हणजे त्याचा आमच्यावरील संताप दूर होईल. मुलांनो, आता हयगय करू नका, कारण तुम्ही परमेश्वरासमोर उभे राहावे, त्याची सेवाचाकरी करावी व त्याचे सेवक होऊन धूप जाळावा म्हणून परमेश्वराने तुम्हांला निवडले आहे.”

सामायिक करा
२ इतिहास 29 वाचा